Sunday, July 19, 2020

वर्तमान सासूबाई

वर्तमान सासूबाई

बर आहे सुनबाई
तुमचा जमानाच मोठा हाय.
तुमच्या या जमान्यात
आता काहीच कमी नाय.

खिशात तुमच्या नवरा अन्
तुमची हवाच अलग  हाय.
वृद्धाश्रमात जाऊन पडली
जरी तुमच्या नवऱ्याची माय.

बेस वाटते तुम्हाले
तुमचे जन्मदाते बाप माय.
नवऱ्याचे मायबाप तुम्हाले,
काव्हून सहन होत नाय?

हाच होय काय नविन
तुमचा जमाना अन् फ्रेंड बाय.
रोजच घसरताना दिसतोय,
तुमचा जागोजागी पाय.

सासरा झोपला उपाशी
अन् सासू कन्हत हाय.
मोबाईल वर गेम खेळताना
कशी लाजही वाटत नाय?

सगळे झाले ऑनलाईन
म्हणे उधारीवर भेटते बाप माय.
तुमच्या जमान्यात लेकराले
मायेची माया कळेल काय?

चालवा बाई तुम्ही मोबाईल
अन् तुमचं ते व्हाय फाय.
पोरांनं लाथ मारल्यावर म्हणाल,
हे कसं झालं वो माय!

वटयात रडते लेकरू
गोठ्यात हंबरते गाय.
तुमच्या पेक्षा बरी वाटते वो
त्या वासराची माय.....

पिझ्झा, बर्गर, पुन्हा काही
जसी तुम्हा सुटली खाय खाय.
अन्नासाठी भटकते वो
त्या गरिब लेकरांची माय..

बदला बाई किती बदलायचं तर,
जमाना तुमचाच नक्की हाय.
जिवंत ठेवा फक्त ती,
तुमच्यातली लेकरांची ती माय..


                       तुझीच सासू
________________________________

डॉ प्रभाकर सीमा लोंढे
गोंदिया ९६७३३८६९६३

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..


                             डॉ प्रभाकर लोंढे


            समाजात जगत असताना मनुष्य नेहमी भावना व बुद्धी या दोन्हीच्याच भरोशावर जीवनातील निर्णय घेत असतो. बहुतांश वेळा जास्तीत जास्त निर्णय हे बुद्धीपेक्षा भावनेच्याच भरोशावर घेतले जात असतात. परंतु भावनेच्या भरोशावर घेतलेले निर्णय चुकीचे सुध्दा होवू शकतात. त्यामुळे माणसाच्या बुद्ध्यांक(I.Q) पेक्षा भावनांक(E.Q) हा अतिशय योग्य रीतीने वापरणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते असे असले तरी परंतु जेव्हा या भावनेला बुद्धीची जोड मिळत असते तेव्हा ते निर्णय योग्य व परिस्थितीसापेक्ष दीर्घायुषी व हितकारी होत असते. म्हणून कधीही भावनेपेक्षा बुध्दी ला जास्त महत्व देणे कधीही श्रेष्ठ ठरते.
               धनगर जमातीच्या आजच्या संक्रमणावस्थेचा विचार करता त्यामध्ये धनगर नेत्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असून त्यांनी घेतलेले निर्णय हे जमातीसाठी, जमातीच्या तसेच नेत्यांच्या भविष्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे. तेव्हा धनगर नेत्यांनी केवळ भावनेच्या आधारे निर्णय न घेता त्याला बुद्धीची विशेष जोड देऊन प्रत्येक निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण हजारो सामान्य माणसे चुकले तरी त्याचे वैयक्तिक परिणाम होतील परंतु जर एक नेता जर चुकीचे वागत असेल तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. याचे अनुभव धनगर जमातीकडे खूप मोठे आहेत. त्यामुळे इथे उल्लेख करण्याची गरजच वाटत नाही.
              धनगर जमात आज ज्या प्रश्नांना समोर जात आहे, ज्या प्रश्नांमुळे संपूर्ण जमात अस्वस्थ आहे, ज्या प्रश्नांमुळे तरुण वर्ग पेटून उठलेला आहे, ते सर्व प्रश्न धनगर जमातीच्या इतिहासातील नेतृत्वाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे व राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेले आहे. भूतकाळातील धनगर नेत्यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती सापेक्ष मनात कोणताही कलुषित भाव न ठेवता योग्य ते निर्णय घेतले असते तर आज धनगर जमात प्रगतीच्या शिखरावर राहिली असती. परंतु व्यर्थ!!
          इतिहास नेहमी मार्गदर्शन करीत असतो, झालेल्या चुका सुधारण्याची संधी देत असतो व भविष्याकडे वाटचाल करीत असताना झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घ्यायला सुद्धा शिकवतो. हीच बाब या ठिकाणी प्रत्येक धनगर नेत्यांनी(मानत असेल तर) लक्षात घेणे आवश्यक आहे तरच ते जमातीचा विश्वास संपादन करू शकतात. कारण आज धनगर जमातीतील तरुण वर्गाच्या भावनेचा आदर करून बुद्धीच्या आधारे निर्णय घेणारे नेतेच धनगर जमातीचे नेतृत्व करू शकतात हे प्रयोगाने सिद्ध झालं आहे. या अवस्थेमध्ये धनगर जमातीची कार्यक्षमता लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळे अश्या परिस्थितीत परिस्थिती सापेक्ष (व्यक्तीसापेक्ष नाही)असे निर्णय घेत असताना धनगर नेत्यांनी स्वतःच्या भावनेपेक्षा बुद्धीला शाबूत ठेवून, प्रमाण मानून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे
                  याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, आज  खोट्या गुन्हयांच्या आधारे जे धनगर तरुण तुरुंगात आहे त्यांना निर्दोष मुक्त करणे, त्यासाठी सरकारवर आवश्यक तो दबाव निर्माण करणे हा धनगर नेत्यांनी भावनेपेक्षा बुद्धीच्या आधारे घेतलेला निर्णय हा केवळ समाजाच्याच हिताचा नाही तर धनगर नेत्यांच्या सुध्दा खाजगी हिताच्या दृष्टिकोनातून नेहमी फायद्याचाच ठरणार आहे. भलेही या आंदोलनकर्त्यांचा प्रचंड राग काही धनगर नेतृत्वामध्ये असेल, अद्दल घडविण्याचा काहींना अभिमान ही वाटत असेल, पुन्हा धनगर जमातीचे तरुण रस्त्यावर उतरणार नाही याचा बंदोबस्त केल्याचा काहींना विश्वासही वाटत असेल.
            हे त्यांचं थोड्या फार प्रमाणात खरं असल तरी ते पूर्ण सत्य होवू शकत नाही. सत्य समजून घेणे व ते स्विकारण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे. सरकारने केलेल्या फसवणुकीची चीड, त्यामध्ये असलेली धनगर नेत्यांची भूमिका, यातून धनगर जमातीतील तरुणांमध्ये निर्माण झालेली उद्विग्नता, यापुढे धनगर तरुणांना नक्कीच शांत बसू देणार नाही आणि म्हणून असे ते धनगर तरुण विद्यमान नेतृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या आंदोलनकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील, कोणावर वैयक्तिक टिका, कोणत्या नेत्यावर वैयक्तिक रागही व्यक्त केला असशील,  तरी परिस्थिती, जमातीची भावना व शुद्ध फसवणूक समजून घेवून त्यांना उदार अंतःकरणाने जमातीचे प्रगल्भ नेतृत्व या नात्याने माफ करण्याचा, निर्दोष मुक्त करण्याचा, (लोकशाहीमध्ये जाब विचारणे गुन्हा नसतो)  निर्णय धनगर नेतृत्वाला नक्कीच दीर्घायुष्य देईल व त्यांनी घेतलेला निर्णय हा जमातीला नेहमीच स्वीकारार्य राहील यात कोणतीच शंका असू शकत नाही.
---------------&-----------------

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास___________&_____________________धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासकडॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३