ऐतिहासिक श्रध्दास्थानांवरील अतिक्रमण थांबवा.
डॉ प्रभाकर लोंढे
या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात बहुतांश तिर्थक्षेत्र मुळात धनगरांचे कर्मस्थान व श्रद्धास्थान राहीलेले आहे. या श्रद्धास्थानावर काळानुसार विविध प्रकारे अतिक्रमण झाल्याचे दाखले इतिहासाच्या अभ्यासावरून लक्षात येते. हे अतिक्रमण धार्मिक आधारावर मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास पंढरपुरचा विठोबा व क्षेत्राचे देता येईल.
मुळात पशुपालक असलेला कानडा विठ्ठल एक पराक्रमी पुरुष होय. त्याच्या पराक्रमाविषयी धनगरांच्या मनात प्रचंड आस्था व स्वाभिमान. काळाबरोबर पुढे ते धनगरांचं आराध्य दैवत बनले. त्याच्या प्रति जनमानसात असलेल्या श्रद्धेपोटी व असलेल्या आत्मिक-व्यावसायिक नात्यातून या महाराष्ट्रात आषाढी-कार्तिकीची वारी सुरू झाली. ती मुळात धनगरांनी सुरू केली. प्रत्येक धनगर आषाढी कार्तिकी ला पंढरपुरात न चुकता जावू लागला.
पुढे हीच वारी समाजप्रबोधनासाठी महाराष्ट्रातील संत परंपरेने वापरली. पंढरीचा विठ्ठल हा जनसामान्यांच्या मनातील ताईत असल्याने प्रबोधनासाठी संतांनी आपल्या अभंगांचा आधार विठ्ठलाला बनवले. विठ्ठलाला साक्षी ठेवून आपले विचार जनमाणसात पेरले. पुढे हव्यासापोटी याच विठ्ठल मंदिराचा कब्जा बडव्यांनी आपल्याकडे घेतला. जनसामान्यांच्या संपुर्ण शोषणाचे केंद्रच हे पंढरपुरचे मंदिर बनले. शेवटी बडव्यांच्या हातून या देवस्थानची सुटका करून घेण्यासाठी न्यायालयातच जावे लागले.
असे ते पंढरपूरचे देवस्थान मुळात धनगरांचे श्रद्धास्थान असताना तो रानोमाळ भटकत राहणारा धनगर त्याच्या मूळ अवस्थेतच राहीला पण या देवस्थानचा फायदा मात्र इतरांनीच लुटला. आज ती ट्रस्ट सुध्दा इतरांच्याच अधिपत्याखाली काम करते हे वास्तव! त्याचा अध्यक्ष सुध्दा इतरांच्याच मर्जीने निश्चित होत असते. हे अतिक्रमणाचं एक ऐतिहासिक उदाहरण झालं .
वर्तमान काळातील अतिक्रमणाचं ज्वलंत उदाहरण...
धनगरांचं दुसरं अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे गांव आहे. या ठिकाणाचा महिमा म्हणजे जगात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला नगण्य स्थान असताना स्त्रीचं कर्तुत्व काय असते याचे ज्वलंत उदाहरण, स्त्रीजन्माची यशोगाथा असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्मगाव!! ज्यानी सामाजिक राजकीय परिस्थिती विपरीत असताना 28 वर्ष राज्य केलं. इंदोर सारख्या बलाढ्य संस्थानाच्या राज्यकारभाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. भारत भूमीच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या कर्तुत्वाच्या पाऊलखुणा निर्माण केल्या. सामाजिक कल्याणासाठी राजकीय सत्तेचा वापर करून राज्यकारभार केला. याचाच परिणाम जनमाणसामध्ये त्यांची प्रतिमा लोक कल्याणकारी लोकमाता अशा प्रकारची उंचावली. व तो इतिहास कधीही विसरला जाऊ शकत नाही.
याचाच परिणाम म्हणून अलीकडे चौंडी या त्यांच्या जन्मगावामध्ये राजमाता अहिल्याबाई चे स्मारक तयार करण्यात आले. ही जरी योग्य बाब असली तरी तिथे बसविण्यात आलेले बारा राशींचे पुतळे खूप मोठा प्रश्न निर्माण करतात. यातून काय सांगायच आहे/ काय सिद्ध करायचं आहे, हे जरी मला समजलं नसलं तरी त्यातून समस्त होळकरशाहीच्या कर्तुत्वाचा सहसंबंध त्या राशीभविष्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे की काय?असा प्रश्न सहज निर्माण होतो.
राजमाता अहिल्याराणीच्या व होळकरशाहीच्या कार्यकर्तृत्वावर अतिक्रमणाची सुरवात झाली आहे असं कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही..
आद्य समग्र क्रांतीकारी महीला राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाला नतमस्तक होण्यासाठी आलेला त्यांच्या विचारांचा अनुयायी या राशी चक्रापासून काय प्रेरणा घेणार आहे. व या राशीचक्राचा राजमाता अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा कशाप्रकारे सहसंबंध जोडणार आहे, हाच मोठा अनाकलनीय प्रश्न मला पडला आहे. सर्वानाच पडावा ही अपेक्षा!!! जेणेकरून त्याचे उत्तर सार्वजनिक पातळीवर मिळू शकेल. परंतु हे राशीचक्र/राशींचे पुतळे अहिल्या मातेच्या स्मारकापुढे तयार करण्याची कारण मिमांसा जर कुणाला माहित असेल, खरंच त्या राशीचक्राचा अहिल्या मातेच्या जीवन व कार्य कर्तुत्व मध्ये महत्त्वाचा वाटा असेल आणि ते राशीचक्र अगदी प्रवेशद्वारावर तयार करण्याचे औचित्य ज्याना कोणाला माहित असेल त्यांनी जर ते सार्वजनिक केले तर एका कर्तुत्ववान महिलेच्या जीवनामध्ये असलेले राशीचक्राचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येतील व आम्हा सर्व बहुजनांच्या महिलांना अहील्या मातेच्या आदर्श जीवनकार्यापेक्षा राशी चक्रात गुंतवून त्याचा निश्चितच उद्धार करता येतील.
परंतु माझ्या अल्पबुध्दी, अल्पमतीनुसार हे राशीचक्र, राशीपुतळे अहिल्या मातेच्या स्वावलंबी, कर्मण्यवादी, सत्यशीलाधारित न्यायप्रिय लोकराणीच्या कार्यकर्तृत्वाला न्याय देणारे नाही. त्याचा कोणताही संबंध राजमाता अहिल्याईच्या जीवनाशी नाही. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नको ती वेगळी झालर चढविण्याचा नको तो प्रयत्न केला जातो आहे, असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. असा हा प्रकार सरळ सरळ त्यांच्या कर्तृत्व-व्यक्तित्व/ जीवन चरित्रावर श्रद्धा असणाऱ्या जनमानसाच्या श्रध्देवर व श्रद्धास्थानावरच अतिक्रमण आहे. येथील राशी चक्रापासून भावी पिढीला काय संदेश जाणार आहे किंवा कोणता संदेश अपेक्षित आहे, ही बाब सर्वांनाच लक्षात घ्यावी लागेल. अनावश्यक वाटत असेल तर ते हटविणे अत्यावश्यक आहे.
हे झालं धार्मिक अतिक्रमणाचं उदाहरण!!! दुसरं उदाहरण म्हणजे इंदोरमधील राजबाग पेलेस. यावर मी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिला होता.
सदर लेखन प्रपंच करीत असताना इतिहासावर होणारं अतिक्रमण थांबवून त्याचं विकृतीकरण होणार नाही, यादृष्टीने चिकित्सक वृत्तीने वाचकांनी प्रत्येक गोष्टीचे समीक्षण करावे व सत्य जाणून घ्यावे एवढीच अपेक्षा..
__________________________
डॉ प्रभाकर लोंढे
गोंदिया
९६७३३८६९६३