आ. जयंत पाटिलांच्या घरच्या लग्नावरून धनगरांना इतिहास आठवला नाही काय??
डॉ प्रभाकर लोंढे
महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आणि सत्तेमध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण केलेले मा. जयंत पाटील माजी मंत्री सुद्धा राहिले. त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच सांगली मधील इस्लामपूर मधील एका साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये पार पडला... लग्न सोहळा आणि त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रमुख वजनदार सत्ताधारी/ राजकारणी लोकांची (केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे प्रमुख)उपस्थिती अवाक होण्यासारखी नसली तरी मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक इतिहास प्रेमीला त्यातही होळकरशाहीला प्रेरणास्थान मानणाऱ्या प्रत्येकाला एका "ऐतिहासिक लग्न" सोहळ्याची आठवण करून देणारा तो सोहळा होता.. परंतु या ठिकाणी आमच्या "ऐतिहासिक संवेदना" किती जागृत आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
"पेशवाई" मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान. त्यातही सुभेदार मल्हारराव होळकर व होळकरशाही तत्कालीन राजकीय परिस्थितीवर निर्णय घेणारं व्यक्तित्व. संपूर्ण भारतातील तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर प्रभाव/ उपकार असलेलं व्यक्तित्व म्हणजे मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर यांचा एकुलता एक पुत्र खंडेरावांचा विवाह शनिवार वाड्यावर झाला होता असे संदर्भ सापडतात. त्याप्रसंगी खुद्द छत्रपती शाहु महाराज, पेशव्यांपासून तर भारतातील अनेक राजे महाराजे व सरदार सुभेदार सगळे उपस्थित होते. त्याला इतिहासामध्ये "शाही" सोहळा असा उल्लेख आढळतो. त्याप्रसंगी असलेली राजे महाराजांची उपस्थिती व त्यांनी दिलेल्या "भेटवस्तू" यावरून त्या शाही सोहळ्याची आपल्याला नक्कीच कल्पना येतं.
सुभेदार मल्हारराव होळकर आणि मा.जयंतराव पाटील यांची तुलना होऊ शकत नाही. तुलना करणं सुध्दा योग्य वाटत नाही. परंतु त्यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने मात्र त्या ऐतिहासिक सोहळ्यांची आठवण नक्की झाली.
या लग्न सोहळ्याचे निमित्ताने होळकरशाहीच्या इतिहासावर प्रेम असणाऱ्या सर्व इतिहास प्रेमींना त्या इतिहासाची जाणीव करून देणे हाच या लेखा मागे उद्देश आहे. इतिहासात तत्कालीन राजकीय व्यवस्थेमध्ये "दखल पात्र" असलेले "होळकर" व त्यांचे
वंशज आज कसे "अदखल पात्र" झाले याची जाणीव करून देणे हा या लेखा मागचा मुख्य उद्देश आहे.
(खंडेराव अहिल्येचा शाही लग्न सोहळा)
राजपुत्र खंडेराव मराठा साम्राज्याचे थोर, मुत्सद्दी सुभेदार राजश्री मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक पुत्र. त्यांचा विवाह चौंढी गावाचे पाटील मानकोजी शिंदे यांची एकुलती एक मुलगी अहिल्या हिच्याशी झाला. त्यावेळी खंडेरावांचे वय १४ वर्षे आणि अहिल्याबाईंचे वय १२ वर्षे होते. हा विवाह सोहळा संवत १७९४ म्हणजेच इ. सन १७३७ च्या २० मे ला पुणे येथील पेशव्यांच्या शनिवारवाडयावर मोठ्या थाटामाटात पेशव्यांच्याच पुढाकाराने पार पडला. या सोहळ्याचे यजमानपद खुद पेशवे बाजीराव व रघुनाथरावांनी आपल्याकडे घेतले होते.
बर्याच संदर्भ ग्रंथात खंडेरावांचा हा विवाह पेशवे बाजीरावांच्या मध्यस्थीने निश्चित झाला होता असा उल्लेख आहे. आणि हे सत्य आहे. त्यामुळेच त्यांनी मुलीकडील म्हणजेच मानकोजी शिंदे यांचेकडील बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. मानकोजी शिंदे म्हणजे राजश्री मल्हाररावांच्या तुलनेत अत्यंत गरीब. विवाह सोहळ्याप्रसंगी मुलाकडील राजदरबारातील थाट व मानसन्मान सांभाळणे मानकोजीना आवाक्याबाहेर होते. याची कल्पना सुभेदार मल्हारराव व पेशवे बाजीराव यांना असल्यामुळेच दोघांनीही संगनमत करून वधू पक्ष सांभाळण्याची जबाबदारी पेशवे बाजीरावांनी आपल्याकडे घेतली व विवाह सोहळ्याचे यजमानपद स्विकारून सोहळा शनिवारड्यावर थाटामाटात पार पाडला.
त्याकाळात सलग पाच दिवस थाटामाटात चाललेला हा विवाह शाही स्वरूपाचा होता. खंडेराव-अहिल्येचा हा विवाह म्हणजे मराठा इतिहासाचे सोनेरी पानच होते. या विवाह प्रसंगावरून होळकरांच्या तत्कालीन प्रभावाची व दरार्याची आजही आपल्याला कल्पना येते. या सोहळ्याची दिव्यता एवढी होती की, या सोहळ्या प्रसंगी खुद छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अहिल्येच्या साळी-चोळीसाठी चोळ हे गाव अहिल्येला आंदण म्हणून दिले. याशिवाय महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्याचे यजमानपद प्रत्यक्ष पेशव्यांकडे होते.
एकुलत्या एक मुलाचा विवाह असल्याने सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई सोबतच संपूर्ण होळकर संस्थांनासाठी हा सोहळा म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण होता. पुरुषोत्तम कृत अहिल्याबाईंच्या चरित्रात त्यांच्या लग्नाविषयी पुढील प्रमाणे उल्लेख मिळतो. “अहिल्याबाईचे लग्न मल्हारराव होळकरच्या खंडेराव नामक पुत्राशी झाले, हा संयोग केवळ तिच्या भाग्यात परमेश्वराने अपार संपत्ती, स्वतंत्र राज्योयोपभोग व दिगंत किर्ति लिहिली होती. म्हणूनच हा योग जुळून आला होता. मल्हारराव यावेळी धनगरांचा राजा झाला होता व त्याचे जवळ पैकाही खूप होता.”
या उल्लेखावरुन असे लक्षात येते की खंडेरावाच्या विवाहप्रसंगी मल्हाररावांचा सर्वत्र दरारा निर्माण झाला होता. शिवाय तोपर्यंत ते मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत सुभेदार बनले होते, ही बाब स्पष्ट होते.
याचाच परिणाम स्वरूप होळकर राजघराण्यातील हा विवाह सोहळा असल्याने संपूर्ण भारतातील जवळपास सर्वच राजे, महाराजे, सरदार पुण्यात उपस्थित झाले होते. याला कारणही तसेच होते. कारण भारतात असा कोणताही राजा, सरदार नव्हता की, ज्याला मल्हाररावांनी मदत केली नव्हती.
या बाबीची प्रचिती त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अहिल्याबाईंना आली होती.
होळकर घराण्यात जेव्हा कोणीही वारस उरला नव्हता, अशा परिस्थीतीत राघोबा पेशव्याने होळकर संस्थान गिळंकृत करता येईल या दुष्ट वृत्तीने संस्थांनावर वाकडी नजर टाकली. त्यावेळी राजमाता अहिल्याबाईनी सर्वांना मदत मागितली, तेव्हा त्यांना सर्व स्तरातून मदत मिळाली. या प्रसंगाच्या संबंधाने “होळकरांची कैफियत” मधील उल्लेखानुसार वरफडच्या सरदाराने “मल्हारजींचा उपकार नाही असे कोण नाही? प्रसंगास आपले जवळचे समजावे.” असे लिहून पाठविले, यावरून असे लक्षात येते की, राजश्री मल्हाररावांचा सर्वत्र दरारा होता. शिवाय त्यांचे उपकार संपूर्ण भारतातील अनेकांवर होते तसेच त्यांचे संबंध सर्वांशी चांगले व सन्मानाचे होत्ते, ही बाब लक्षात येते.
म्हणूनच खंडेरावांच्या विवाहाचे निमंत्रण सर्वांना देणे अगत्याचे होते. त्यादृष्टीने लेखी निमंत्रण पत्रिका पाठवून सर्वांना निमंत्रित करण्यात आले. त्यासाठी निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या होत्या. राजश्री मल्हारपुत्र खंडेराव व अहिल्याबाई यांच्या लग्नाची ती पत्रिका पुढील प्रमाणे होती.
“अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मलारजी होळकर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणे. हयानंतर चिरंजीव राजेश्री खंडेराऊ ह्यांच्या लग्नाची तीथ जेष्ठ शुद्ध ७ सुरजेस कर्तव्य निश्चय जाला आहे. तरी आपण येवून लग्नमंडप शोभिवंत करावा. रवाना चंद्र २१ मोहरम हे विनंती.”
नियोजित २० मे १७३७ ला हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बर्याच पुस्तकांमध्ये खंडेरावांचा विवाह १७३३ मध्ये दाखविलेला आहे. पुरुषोत्तमकृत अहिल्या चरित्रात आहील्याबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी इ.स. १७३३ मध्ये मल्हारराव होळकरांच्या खंडेराव नामक मुलाशी झाला असा उल्लेख सापडतो. असे असले तरी मूळ संशोधनपर ग्रंथातील संदर्भ लक्षात घेवून २० मे १७३७ ही तारीख मी ग्राह्य मानली आहे. हा पाच दिवशीय जंगी विवाह सोहळा उरकल्यावर वाद्ये, वाजंत्री, पालख्या, समान घेवून वरात पुण्यातून इंदोरकडे रवाना झाली. पूर्वीची अहिल्या मानकोजी शिंदे आता अहिल्या खंडेराव होळकर झाली होती. एकीकडे खंडेरावांची धर्मपत्नी तर त्याच वेळी दुसरीकडे एका समृद्ध, महापराक्रमी होळकर घराण्याची सून, इंदोर संस्थांनाची भावीभावी पालक रूपात तिने इंदोर राजवाड्यात पाऊल टाकलं. तो दिवस आहिल्याबाईंच्या जीवनाला वळण देणारा ठरला. तेव्हापासून आता खंडेरावांची जबाबदारी सुद्धा वाढली होती.
शाही विवाह सोहळा असल्याने या प्रसंगी मोठया प्रमाणात भेटवस्तु व अहेर प्राप्त झाला होता. त्यापैकी काही निवडक महत्वाच्या बाबींचा उल्लेख याठिकाणी करावासा वाटतो. या विवाह सोहळ्यातील सर्वात मोठी भेट छत्रपती शाहू महाराजांनी अहिल्याबाईंना साळी-चोळीसाठी म्हणून चोळ नावाचे गाव आंदन म्हणून दिले होते तर पेशव्यांकडून या विवाह सोहळ्यात मल्हाररावांच्या सुनबाई म्हणजेच अहिल्याबाईना तत्कालीन रुपये २७२५ रकमेचे २०० तोळे सोन्याचे नग तयार करण्यात आले. तर मल्हाररावांच्या मुलाचे लग्न म्हणून वधू वरास ४०२ रुपये १४ आणे किमतीचे वस्त्र वराती समयी दिल्या गेले. ही रक्कम आजच्या परिस्थितीत करोडो च्या आकड्यात असेल, यावरून एवढे स्पष्ट होते किंवा सांगता येते की, मल्हारराव होळकरांचे पेशवे घराण्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्यांचा छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात सुद्धा मान होता. म्हणूनच खंडेरावांचा विवाह हा केवळ होळकरशाहीचा नाही तर मराठेशाहीचा पारीवारिक सन्मान सोहळा ठरला होता.
हा सोहळा होळकरशाहीला व त्यांचे वंशज मानणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचे महाराष्ट्रातील राजकारणात स्थान यासंबंधी आत्मचिंतन करायला लावणारा आहे.....
तेव्हा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन वर्तमानाचे आत्मचिंतन सर्व स्तरातून व्हावे हीच या लेखा मागची अतिशय प्रामाणिक निष्कलंकित इच्छा... अपेक्षा...
------------------------