Tuesday, February 21, 2023

धनगर जमात राजकीय सत्तेच्या मागे का लागत नाही???

 धनगर जमात राजकीय सत्तेच्या मागे का लागत नाही???

  डॉ प्रभाकर लोंढे


"बुडती हे जन, देखवें ना डोळा!
म्हणूनी कळवळा, येत असे!!"
          


         या महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रश्नग्रस्त व समस्याग्रस्त दुर्लक्षित, उपेक्षित, हेतू पुरत्सर राजकीय सत्तेपासून वंचित राहिलेली किंवा ठेवलेली जमात म्हणून जर नाव घ्यायचं झालं तर धनगर जमातीचं प्रकर्षाने नाव समोर येतं. 

       विविध समस्या असताना या धनगरांनी "आरक्षण" या "सुविधे" साठी अनेकदा प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी मोठ मोठी आंदोलने उभारलेली आहे, जमात न्यायासाठी सातत्याने लढत आलेली आहे. यामध्ये जमातीच्या हितचिंतकांचं तन-मन-धन खर्ची होत आहे. त्यातून काय आऊटपुट द्यायचं? हे मात्र धनगरांच्या नाही तर येथील राजकीय सत्तेच्या मर्जीवर चाललेलं आहे. हे आतापर्यंत होत आलेलं आहे व या पुढेही होणार आहे, (येथील न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवायचा? हा अलीकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे)

        असं असताना मला नेहमी सतावणारा प्रश्न पडतोय की, या धनगरांना सर्व प्रश्नांची चाबी "राजकीय सत्तेत" का दिसत नाही? किंवा राजकीय सत्तेत जाण्याची इच्छा यांना का होत नाही?  किंवा महाराष्ट्रातील राजकीय सत्तेत जाण्याची संधी यांना का दिसत नाही?  सर्व समस्यांचा मार्ग राजकीय सत्तेत आहे, हे राजकीय सत्तेचा वारसा सांगणाऱ्या या धनगरांना का समजत नाही?? हा प्रश्न मात्र अनेकदा पडलेला आहे व आजही अनुत्तरीत आहेत.

      धनगरांच्या श्रद्धेचा, निष्ठेचा, आत्मियतेचा व त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग त्यांना ज्याच्यामध्ये दिसतयं, तो "आरक्षण" हे जरी खरं असलं तरी कोणाला काय द्यायचं? किंवा द्यायचं नाही, हे मात्र येथील राजकीय सत्ता ठरविणार आहे. (येथील न्यायव्यवस्था सुद्धा त्यांची बटीक झालेली आहे) 

       काही वेळासाठी मान्य करून टाकू की, धनगराच्या समस्यांचा "आरक्षण" हा जरी राजमार्ग असला तरी भविष्यात तेच जर "संपुष्टात" येणार असेल आणि तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळालं तर त्याचा काय फायदा होणार आहे?  

      प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरक्षण धोरण संपविण्याची प्रक्रिया या भारतात सुरू झालेली असताना, आम्ही ते मिळविण्याच्या मागे लागतोय, ते मिळतील ही पण ज्या दिवशी मिळतील, त्या दिवशी जर आरक्षणाचे धोरण खतम झालेले असेल तर त्याचा काय फायदा जमातीला??  त्या दिवशी मात्र जमातीचा वेळ पैसा आणि पिढ्या खर्च झालेल्या असेल, हे मात्र नक्की.. 

       महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये धनगरांना राजकीय स्थान मिळविणे, सहज शक्य आहे. कारण "मनी, मसल आणि पावर" (money, muscle and power ) हा येथील राजकारणाचा मुख्य आधार आहे.

       महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला तर आज फक्त "पावर" धनगरांकडे नाही. त्यामुळेच "पावरलेस" धनगरांच्या आरक्षणासह सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत.. आणि म्हणून धनगरांनी "पॉवर" मध्ये येणे किती अत्यावश्यक आहे? ही बाब धनगरांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे..

     धनगरांच्या मतसंख्येच्या आधारे आपल्याला सातत्याने "पावर" मध्ये राहता येईल याची सुव्यवस्था, धोरण, क्लुप्त्या, येथील प्रस्थापितांकडून नेहमी केल्या जातात. धनगरांच्या भावनिक मुद्द्याच्या आधारे त्यांना संघटित करून एखाद्या "लुच्च्या" धनगराला हाती पकडायचं आणि त्याच्या माध्यमातून धनगरांची मतसंख्या आपल्या मागे लावून घ्यायची, हा नित्याचा प्रयोग महाराष्ट्रात झालेला आहे..

    असे प्रयोग आतापर्यंत झालेले आहे, सध्या सुरू आहे. त्याला धनगरांनी किती बळी पडायचं? हा प्रश्न धनगरांच्या हातात आहे..

      धनगरांनी राजकीय सत्ता प्राप्तीसाठी धनगरांच्या छोट्या मोठ्या नेत्यांना "तन मन धन" देऊन त्यांना त्यांच्या राजकीय अजेंड्यामध्ये सहकार्य करणे व आपल्या माणसांना राजकीय सत्तेमध्ये पाठविणे, हा धनगरांच्या आरक्षण प्रश्नापेक्षाही हमखास व महत्त्वाचा राजमार्ग धनगरांकडे दुसरा कुठलाही असूच शकत नाही.


धन्यवाद!

-------------------------


अलीकडे सामाजिक प्रश्नांवर लिखाण बंद केलं, परंतु


"बुडती हे जन, देखवें ना डोळा!

म्हणूनी कळवळा, येत असे!!"


"धनगर जमातीतील छोट्या मोठ्या जननेत्यांना पाठबळ देऊन धनगर जमातीत "राजकीय चळवळ" निर्माण व्हावी हाच या लेखा मागील हेतू आहे..



डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर नेतृत्व आणि  राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक)