Tuesday, September 12, 2023

राधाकृष्ण विखे साहेब! भंडारा तर नेहमीच पवित्र पण तुम्ही कधी होणार?

राधाकृष्ण विखे साहेब! भंडारा तर नेहमीच पवित्र पण तुम्ही कधी होणार?


        डॉ प्रभाकर लोंढे


     "शेखर बंगाळे" नावाच्या धनगर युवकांने मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला त्याप्रसंगी त्या युवकाला झालेल्या मारहाणीचा निंदनीय प्रकार झाला.. तो प्रकार घडत असताना मात्र विखे पाटलांना त्या भंडाराची पवित्रता कदाचित समजली नसावी म्हणूनच त्या युवकाला मारहाण झाली, हे मात्र नक्की...  ती मारहाण होत असताना भंडाराची पवित्रता जाणून घेवून "आपला शब्द" मारहाण थांबवण्यासाठी वापरला असता तर त्यांच्या शब्दाचा मान राखणारे कार्यकर्त्यांनी ती मारहाण केलीच नसती. आणि उशिरा का होईना मा. विखे पाटील साहेब यांना भंडाऱ्याची पवित्रता मीडियासमोर येऊन सांगण्याची गरज पडली नसती.

        परंतु तसं झालेलं दिसत नाही. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न विखे पाटलांना करावसां वाटला नाही. भंडारा अंगावर पडत असताना त्यांना कदाचित तसं सुचलं नसावं. तसं त्यांना उरकलं नाही, असं आपण म्हणू शकतो.. 

       परंतु त्याप्रसंगी त्या युवकाला झालेली मारहाण अतिशय निंदनीय बाब होती हे मात्र नक्की. त्याचं श्रेय विखे पाटलांनी नक्कीच घेतलंच पाहिजे. त्याचा जबाब त्यांनी मतदार जनतेला दिलाच दिला पाहिजे. 

     शेखर बंगाळे या युवकांने उधळलेला पवित्र भंडारा "पवित्र" आहे, असं जर विखे पाटलांना वाटत असेल तर त्या कार्यकर्त्याला मारहाण कशी काय झाली? हा प्रश्न फार गंभीर आहे.. विचार करायला लावणारा आहे. वाचक मित्र याचा विचार नक्कीच करतील.

    आदरनिय विखे साहेब!आपल्या पिढ्यानपिढ्याचं राजकीय अस्तित्व जपणाऱ्या धनगर मतदार बांधवांचे उपकार तुमच्या भावी पिढ्या सुद्धा विसरू शकणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा मरणोपरांत विसरणे शक्य होणार नाही. ही वास्तविक एक महत्वपूर्ण बाब असताना, त्यांच्याच सहकार्याने आपण सत्ताधीश असताना, आपल्या हितचिंतक धनगर जमातीच्या समस्या जर सुटत नाही, उलट दिवसेंदिवस त्या जटील होत जात असतील. त्यांच्या त्या जटील प्रश्नांवर आपण बोलायला सुद्धा तयार नाही... त्यांच्या भावना समजून घ्यायला सुध्दा तयार नाही..  उलट त्यांच्या नामांतरा सारख्या भावनिक मुद्द्यांना जर आपण विरोध करणार असाल. तर आपल्या "मनाची अपवित्रता" मात्र नक्की स्पष्ट होते. तेवढ्याच तीव्रतेने जगासमोर येते. ती आपण मान्य करायला खरं तर हरकत नसावी. 

      तुमची ती अपवित्रता निघून जावी, आपलं मन शुद्ध व्हावं, आपल्या मनात सत्यतेच्या आधारे एक सद्भाव निर्माण व्हावा, आपल्याला सद्बुद्धी सुचावी, यासाठी उदार अंतकरणाने जर शेखर बंगाळे यांनी भंडाराची पवित्रता आपल्यावर उधळली तर मला असं वाटते की शेखर बंगाळे यांचे आपण मानावे तेवढे उपकार कमीच आहे. आपण माणलेच पाहिजे. कारण तू प्रश्न केवळ एकट्या शेखर बंगाळे नसून संपूर्ण धनगर जमातीच्या व आपला सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. व असायला हवा..

        आपणास याची जाणीव असेलच. भंडारा /हळद ही अँटिबायोटिक आहे. त्यामुळे अनेक रोग दुरुस्त होतात.  

"जातीय तिरस्कार" सारखा रोग आपल्या मनाला जडलेला  असेल तर तो मात्र यानंतर निघून जावा. धनगर समाजाच्या भावना त्यांचे प्रश्न याविषयी आपल्या मनात सद्भावना निर्माण व्हावी, त्यांच्यावर यथायोग्य तोडगा काढण्याची मनोवृत्ती आपल्यामध्ये विकसित व्हावी, ही आग्रहाची विनंती.

 आणि आदरणीय साहेब!आपणास माहिती असेलच जेव्हा हळदीचे पेटंट घेण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला तेव्हा भारताने भंडाऱ्याचा दाखला देऊन खंडोबाच्या देव्हाऱ्यात भंडारा का उधळला जातो याचा संदर्भ देऊन भारताने हळदीचे पेटंट आपल्याकडे राखून ठेवलं. एवढा मोठा राष्ट्र कार्यामध्ये उपयोगामध्ये आलेला भंडारा जर आपल्यावर उधळला जात असेल तर मला असं वाटते आपण त्याचा आनंदाने स्वीकार करायला हवा होता, त्यासंबंधीचा अभिमान आपल्याला वाटायला हवा होता, अशी उधळण करणाऱ्या शेखर बंगाळे सारख्या तरुणाचा आपणाकडून सत्कार व्हायला हवा होता... पण असं झालेलं दिसत नाही... होईल का नाही याची शाश्वती नसली तरी तेवढे पवित्र कार्य करण्याची मनोवृत्ती आपल्यात विकासित व्हावी व भंडाऱ्याप्रमाणे आपलं मन "पवित्र" व्हावं, एवढी खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन जेजुरीच्या खंडोबाला त्यासाठी मागणं घालतोय, धनगरांच्या भावनांची कदर करावी, एवढी आपणास विनंती करतो...


 धन्यवाद!

                                    आपला हितचिंतक

                                   व धनगर जमातीचा अभ्यासक

                                          डॉ प्रभाकर लोंढे