राजमाता अहिल्याबाई होळकरांचं हिंदूत्व नाही तर आध्यात्मिकत्व...
डॉ प्रभाकर लोंढे
भारताच्या इतिहासात राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव जे काही अतुलनीय आहे, त्यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजेच त्यांची आध्यात्मिकता .त्यांचा नेहमीच विशेषत्वाने उल्लेख केला जाते.
त्यांना मिळालेली पुण्यश्लोक पदवी किंवा त्यांनी जीवनभर केलेला धार्मिक स्थळांचा, त्यातही सर्वाधिक मंदिरांचा जीर्णोद्धार. याशिवाय त्यांचा दैनंदिन चालणारा दानधर्म, व्रतवैकल्य, पुजा अर्चा , शिव शंकरा प्रती असलेली श्रद्धा या सर्व बाबी पाहता बहुतेक लोक त्यांना हिंदू किंवा अलीकडे तर काही महाभाग हिंदुत्ववादी, हिंदू धर्मरक्षक इथपर्यंतची विशेषण लावण्यासाठी उतावीळ झालेले पाहायला मिळतात.
यामध्ये काही चुकीचं आहे असं म्हणता येत नसलं, कोणाला चुकीचे ठरवणे हा माझा अधिकार नसला तरी या शब्दांच्या माध्यमातून राजमाता अहिल्याबाईंच्या जीवनाला मात्र मर्यादित केलं जात आहे, असं माझं नक्कीच स्पष्ट मत आहे. कारण त्या हिंदू धर्मात जन्माला आल्या. हिंदू धर्मानुसार जीवनभर जगल्या. हिंदू देवता शिवाशंकराच्या त्या भक्त असल्या तरी मात्र त्या केवळ हिंदू धर्माच्या होत्या. त्यांनी केवळ हिंदू धर्माचे रक्षण केलं. त्या हिंदुत्वासाठी जगल्या. त्या हिंदुत्ववादी होत्या, असं म्हणणं चुकीचं आहेत. कारण त्यांना कुठेही हिंदू धर्माची रक्षा करायची नव्हती, त्यांना मात्र मुळ हिंदू जीवन पद्धती मान्य होती, त्याच वेळेस इतर धर्म पद्धती सुद्धा मान्य होती.त्या पध्दतीनुसार जगणाऱ्या सुध्दा प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये काहीतरी स्वारश्य निर्माण व्हावं, प्रत्येकाला आनंदानी जगता यावं. त्यांच्या जगण्यातील आनंद द्विगुणीत व्हावा, तो आनंद सातत्याने टिकून राहावा. त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करता यावी. प्रत्येकाचं जगणं सुखर व्हावं, या सर्व बाबी मात्र अहिल्याबाई होळकर यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन केलेल्या आहेत. त्या कधीच धार्मिक नव्हत्या, तर त्या धर्माच्या पलीकडे जाऊन त्या प्रचंड आध्यात्मिक होत्या.
त्यामुळे धर्म ही बाब त्यांना जीवनामध्ये मर्यादित कधीच करु शकत नाही. धर्म ही प्रत्येकाची स्वतंत्रपणे खाजगी बाब असून धर्म ही प्रत्येकाच्या घरची बाब आहे.
जेव्हा आपण समाजामध्ये जगत आहोत, त्यावेळेस जगत असताना आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे. माणूस म्हणून जगत असताना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ज्या आवश्यक आहे, त्या प्रत्येकाला मिळाल्याच पाहिजे. हा माणुसकीचा विचार त्यांच्या जीवनकार्याचा आधारस्तंभ होता.
प्रत्येकाच्या ज्या दैनंदिन गरजा आहे त्या पूर्ण झाल्याच पाहिजे. त्या पूर्ण करताना कुठलाही त्रास होणार नाही मग तो व्यक्ती कुठल्याही धर्माची असो. त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते ते देण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याचं काम राजमाता अहिल्याबाई होळकरांनी जीवनभर केलं.
ते हिंदू धर्माची म्हणून केलेलं नाही. कुठल्या हिंदूंसाठी केलेलं नाही. प्रत्येक माणूस हा माणूस असून मग ते धर्माने मुस्लिम का असेना,जैन का असेना, बौद्ध का असेना प्रत्येक धर्माच्या माणसासाठी ते होतं.
थोडक्यात सांगायचं झालं तर अहिल्याबाई होळकरांच्या कार्याला एका धर्मामध्ये बांधून त्यांना मर्यादित करण्यासारखं होणार आहे. म्हणून हिंदुत्वाचे लेबल अहिल्याबाई होळकरांवर लावणं ही खऱ्या अर्थाने चूक आहे् त्यांना हिंदुत्वामध्ये मर्यादित करून त्यांची जी वैश्विक दृष्टी, किर्ती आहे. त्यांचा जो सर्वधर्मसमभाव आहे. त्यांचा जो काही वैश्विक दृष्टिकोन आहे. विश्व कुटुंबाच्या दृष्टिकोन आहे, तो मात्र हिंदुत्वामध्ये बांधून मर्यादित करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे केला जातो, हे आम्ही केव्हा समजून घेणार आहोत..????
(२९९ जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन व आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!)
डॉ प्रभाकर लोंढे
नागपूर