विद्रोही राजमाता अहील्याबाई होळकर...... एक आकलन
डॉ प्रभाकर लोंढे
आज ज्यांची 300 वी जयंती संपूर्ण जग साजरी करीत आहेत, त्या लोककल्याणकारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेतलं तरी एक शांत, संयमी, आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त आदर्श महिला व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आयुष्यभर दुःखाला पेलत, तोलत आणि त्यावर मात करत, स्वतःच्या जीवनाला, जीवनातील प्रत्येक क्षणाला इतरांसाठी अर्पण करणारं एक आदर्श व्यक्तित्व म्हणून अहिल्याबाई होळकर यांचं एक सोज्वळ व्यक्तीमत्व आपल्याला प्रभावित करून जातं.
असं असलं तरी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाची सारांश रूपाने समीक्षा करताना एक विशेष बाब लक्षात येतं, आणि प्रकर्षाने समजून घेणं सर्वांना अत्यावश्यक ठरतं आणि या भारत भूमीतील वैचारिक तसेच तात्विक उत्क्रांतीमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांना एक "विद्रोही" विचारवंत म्हणून सुद्धा मान्यता देणं भाग पडतं. त्या मान्यतेतच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचा मोठेपणा आहे असं मला वाटतं..
राजमाता अहिल्याबाई होळकरांना विद्रोही विचार परंपरेतील एक महत्त्वाची कळी घोषित करीत असताना कदाचित काहींना ही बाब पटायला सहज शक्य होणार नाही. परंतु ते पटवून समजून उमजून घेण्यासाठी त्यांना प्रथमतः "विद्रोह" म्हणजे काय? या बाबतीत विचार प्रवाही करणे आवश्यक आहे.
त्यासाठीच त्यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रचलित व्यवस्थेतील विद्यमान प्रथा, परंपरा, आणि विचार प्रवाह यांची समीक्षा करून त्यातील वाईट गोष्टींचा विरोध व आवश्यकतेनुसार त्याग करून नवीन पुरोगामी विचाराची मांडणी, प्रचार, प्रसार आणि स्विकार करणे, तो अंगिकारणे, कृतीत उतरविणे, त्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करणे, याला माझ्या मते प्रचलित व्यवस्थेच्या विरोधी केलेला तो "विद्रोह" आहे.
ही विद्रोही विचार परंपरा भारतासाठी नवीन नाही. सामाजिक नवनिर्मितीच्या विद्रोही परंपरेला येथे फार मोठा ऐतिहासिक आधार आहे. त्यापैकीच एक प्रकारचा विद्रोह अहील्याबाई होळकर यांनी केला. तो भारताच्या इतिहासात पहीला नव्हता तर त्या विचार परंपरेपैकी त्या एक कडी बनल्या. म्हणूनच या ठिकाणी
त्यांच्या अगोदरच्या विद्रोही परंपरेतील काही निवडक नावे आपल्याला देता येईल.
चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर जैन, संत कबीर, संत तुकाराम यांनी सुध्दा विद्रोह केला होता. त्यानंतर अहिल्याबाई.. या शिवाय नंतरच्या विद्रोही विचार परंपरेचा विचार केला असता, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांना या विद्रोही परंपरेत समाविष्ट करणे आवश्यक ठरते. कारण त्यांनी नवं समाज निर्मितीसाठी प्रस्थापित व्यवस्थेतील कुरितींवर प्रहार करून नवीन वैचारिक प्रवाह निर्मिती सोबतच कृतीयुक्त कार्यक्रम राबविला.. याच विद्रोही परंपरेतील अहिल्याबाईं होळकरांनी तत्कालीन समाजातील वाईट रुढी, प्रथा, परंपरावर प्रहार करीत स्वतःच्या संयमशील आचरणातून पुरोगामी समाज निर्मितीचा ध्यास घेतला होता. त्यासाठी आवश्यक सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता... त्यामुळेच राजमाता अहिल्याबाई होळकर विद्रोही विचार परंपरेतील ठरतात..
ते पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल.
१) शैक्षणिक विद्रोह...
ज्ञानाचा संग्रह करून व्यक्तीची वैचारिक क्षमता वृद्धिंगत करणारी प्रक्रिया म्हणजेच शिक्षण... परंतु मध्ययुगीन समाजात अशा त्या महत्वपूर्ण प्रक्रियेपासून स्त्रियांना वंचित ठेवण्याचे कार्य तत्कालीन समाज व्यवस्थेने केलेले होते.. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता. त्यामुळे स्त्रियांनी शिक्षण घेणे हा गुन्हा मानला जात होता.
अशा त्या समाज व्यवस्थेमध्ये अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. पुरोगामी पाऊल टाकलं. स्वतःला परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणासाठी त्यांनी टाकलेलं त्यांचं पहिलं पाऊल हे खऱ्या अर्थाने तत्कालीन प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधातील पुरोगामी पाऊल होतं. तो एक प्रकारे त्यांनी केलेला महत्त्वपूर्ण सामाजिक विद्रोह होता.
२) राजकीय विद्रोह.
अहिल्याबाई होळकर यांच्या राजकीय विद्रोहाच्या जर विचार केला तर तोच खऱ्या अर्थाने त्यांचा मोठा पराक्रम होता. स्त्रियांना राजकीय तर सोडाच पण स्त्री म्हणून सुद्धा सामाजिक धार्मिक अधिकार नाकारणाऱ्या समाजात तिला राजकीय अधिकार मिळाले पाहिजे. तो तिचा तसा पुरुषांबरोबरीचा अधिकार आहे. या प्रगल्भ कृतीयुक्त विचारसरणीतून त्यांनी स्त्रियांसाठी प्रथमता राजकीय क्षेत्र मुक्त केले. त्यामुळे भारत भूमीत राजसत्तेसाठी राजकीय विद्रोह करणारी आणि राजकीय सत्ता स्वतःकडे घेणारी ती पहिली स्त्री ठरते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास राजसत्ता हातात घेण्याचा आणि ती सांभाळण्याचा अधिकार पुरुषांबरोबरच स्त्रियांना सुद्धा मिळायला पाहिजे असा विचार मांडणारी आणि त्याच्या अंमलबजावणीस स्वतःपासून सुरुवात करणारी अहिल्याबाई होळकर ही खऱ्या अर्थाने महिलांच्या राजकीय क्रांतीचा अग्रदूत ठरते.
युरोप खंडात आणि इंग्लंड सारख्या प्रगतिशील समाजात महिलांना राजकीय सत्ता तर सोडाच, मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता त्या काळात भारतीय समाजामध्ये राजकीय सत्ता स्वतःकडे घेणारी अहिल्याबाई होळकर ही खऱ्या अर्थाने भारतीय समाजामध्ये महिलांच्या दृष्टीने राजकीय क्रांती करणारी जागतिक विद्रोही महिला ठरते.
त्या काळामध्ये स्त्रियांना राजसत्ता धारण करण्याचा अधिकार नसताना सामाजिक रिती रिवाज रूढी, प्रथा, परंपरा आणि त्याचे ठेकेदार यांना न जूमानता इंदोर संस्थानाची राजगादी २८ वर्षे सांभाळली. सभोवताली असलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून एका समृद्ध दरारा असलेल्या संस्थानांचा राज्य कारभार उत्तम प्रकारे लोकाभिमुख सांभाळला.
त्यांच्या राजकीय सत्ता पदाला विरोध करणाऱ्या धार्मिक ठेकेदार व राज सत्तेचे ठेकेदार, पुरुषी वर्चस्ववाद यांना झुगारून देऊन लोककल्याणाकारी राज्य अशी आपल्या इंदोर राज्याची छबी सर्वत्र निर्माण केली. राजसत्तेला आध्यात्मिक अधिष्ठान देण्याचे कार्य केले. आपले राज्य धर्मांध किंवा धार्मिक नाही तर सर्व धर्म समभाव जपणारे आदर्श राज्य म्हणून नावारूपाला आणले. राज्याचा दरारा कायम टिकवून ठेवण्याचे व होळकरशाहीचा कर्तबगार ऐतिहासिक वारसा वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न अहिल्याबाईनी केला. त्यासाठीच राजसत्ता स्वतःकडे घेण्याचे विद्रोही कार्य अहिल्याबाई होळकरांनी केले. इंदोर संस्थांनाचा वारसा, त्याला राजकीय सातत्य देण्याचे काम एक स्त्री, ती पण विधवा स्त्री असताना सुद्धा यशस्वीपणे केले, हा त्यांचा राजकीय विद्रोह खऱ्या अर्थाने लोककल्याणासाठी असून, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं, तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो हे आपल्या विचार व कृतीतून दाखवून देण्याचे कार्य अहिल्याबाई होळकरांनी राज सत्तेच्या माध्यमातून केलं. तो त्यांनी केलेल्या तत्कालीन राजकीय विद्रोहाचा परिणाम होता.
३) धार्मिक विद्रोह.. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब असून प्रत्येक धर्माने केवळ मानव कल्याणाचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाचे आचरण मानवतेला जपणारं असलं पाहिजे, प्रत्येक माणसाची परधर्मीयांविषयी आदर व सन्मान जनक वागणूक असली पाहिजे. कोणत्याही धर्मासाठी व्यक्ती नसून व्यक्तीसाठी धर्म आहे, अशा प्रकारचा विचार अहिल्याबाई होळकर यांच्या विचारसरणीमध्ये होता. त्यामुळे व्यक्तीला बंदिस्त करणाऱ्या धार्मिक रूढी प्रथा परंपरांचा त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी कोणत्याही एका धर्माला प्राधान्य न देता सर्वधर्म समभाव जपत धर्मातील पवित्र स्थानांचा विकास मानवाच्या सोयी आणि सुविधेसाठी करून घेतला. धर्मातील विकृतींवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रसंगी कठोर निर्णय घेतले. यावरून धर्माच्या अनिष्ट प्रथांच्या विरोधात विद्रोह करणारी आणि मानवतेला मुक्तीचा मार्ग दाखविणारी अहिल्याबाई होळकर जगाच्या पाठीवर एक महत्त्वपूर्ण क्रांतीकारी विद्रोही महिला म्हणून सिद्ध होते.
४) सांस्कृतिक विद्रोह
"जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. ती समाजात रुढी, प्रथा, परंपरांच्या माध्यमातून प्रचलित असते. अशा त्या रूढी, प्रथा, परंपरापैकी काही काळाच्या बरोबर समाज विघातक ठरत असतात. त्यामुळे त्या वेळीच नष्ट होणे आवश्यक असते. परंतु समाज त्यांना तोडायला तयार नसतो. अशावेळी समाजाचा विरोध पत्करून समाजात नवीन विचार प्रवाह प्रवाहित करण्यासाठी एका विद्रोहाची गरज असते. भारतीय समाजात अशा प्रकारचा सांस्कृतिक विद्रोह राजमाता अहिल्याबाई होळकरांनी केला. समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः पासून सुरुवात केली. विधवांना संपत्तीच्या अधिकार, स्त्रियांच्या हातात राज्य, शस्त्र व शास्त्र या सर्व पुरुषांबरोबरीच्या बाबी स्त्रियांच्या जीवनात याव्यात, यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आणि महीलांच्या जिवनात, दैनंदिन जगण्याच्या पद्धतीत परिवर्तनास सुरुवात झाली. याचे श्रेय राजमाता अहिल्याबाई होळकरांनाच जातं, हा सुद्धा त्यांचा सांस्कृतिक विद्रोहच होता.
एकूणच राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाचा विचार केल्यास त्यांची विचारसरणी व कृती मध्ये दलित शोषित, पीडित, वंचित या सर्वांच्या दुःखाचे निराकरणाचा मार्ग प्रामुख्याने दिसून येतो. मी कोण ?माझे कोण? मी कोणासाठी जगायचे? याचा विचार करणारी विचारसरणी अहिल्याबाई होळकरांच्या विचारात दिसून येते. खरंच त्यांचे विचार समाज परिवर्तनाला चालना देणारे पुरोगामी विचार आहे ... आज त्यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन... विचार अनुसरणाच्या दृष्टीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!
डॉ प्रभाकर लोंढे
राजकीय अभ्यासक
नागपूर