Wednesday, June 17, 2020

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज!
  
           डॉ. प्रभाकर लोंढे

संपूर्ण समाज विकास प्रक्रियेतील सर्व समाज घटकांच्या त्या समाजासाठी चाललेल्या कार्याचे निरपेक्षपणे समीक्षण केले असता प्रत्येक समाजामध्ये व त्या समाजाच्या चळवळ, वळवळ, उपक्रम, उपद्रव एकूणच विकास प्रक्रियेमध्ये तीन प्रकारचे लोक कार्य करीत असतात. प्रत्येकाचा उद्देश समाज विकास हाच असतो, असा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेला असतो.  हाच त्यांच्यात ठासून भरलेला भाव समाजामध्ये काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करीत असतो. त्याच प्रेरणेने प्रत्येकाचे समाज विकासाच्या नावाने कार्य सुरू असते. आणि त्यातून समाज विकास प्रक्रियेची पावलं पडत असतात. त्या सर्व पावलांचं सरासरी दृष्ट्या चाललेलं मार्गक्रमण समाजाच्या विकास प्रक्रियेचा वेग ठरवत असते.
             माझ्या मते, या सर्व प्रक्रियेत कार्य करणाऱ्यां समाजधुरीणांचे  भक्त, कार्यकर्ता आणि समाजसेवक असे प्रकार आपल्याला वर्णन करता येतात, असं मला वाटत.  असा त्याला पर्यायी विचार सर्वांना नक्कीच करता येईल. तो प्रत्येकाचा अधिकार असतो. आणि तो प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. मात्र सार रूपाने अशा प्रकारचे वर्णन मात्र संयुक्तिक ठरेल. असे वर्गीकरण करताना कितीही कठीण काम असले तरी समाज चळवळीचा ओघ व वेग निश्चित करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे असं मला वाटते.
              धनगर समाजात काम करणाऱ्या या तिन्ही वर्गाची मिळून एकूण संख्या खूप झाले तर १० ते १५ टक्के आहे. त्यातही भक्तांची संख्या अधिक आहे. त्यानंतर तर कार्यकर्त्यांची संख्या व सर्वात शेवटी समाजसेवकांची संख्या फार दुर्मिळ आहे. पहिले दोन वर्ग समाज सेवक हा शब्द कधीकधी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. असो! काही का असेना या दहा पंधरा टक्के लोकांमुळे समाजातील चळवळ व उपक्रम सातत्याने सुरू असतात.  आज समाधान आहे की अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
      आता कोणी म्हणतील या सर्वांची व्याख्या कशी काय करता येईल, हे फार कठीण काम आहे तरी पण मी माझ्या परीने त्याचा प्रयत्न करतो त्यापैकी पहिला प्रकार 
१) भक्त - 
     हा शब्द प्रत्येकानेच ऐकलेला आहे. परंतु समाज चळवळीमध्ये सुद्धा भक्त असतात हे मात्र कदाचित नवीन संकल्पना आहे.  भक्त हा कधीच समीक्षक नसतो. त्याचा एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या विचारावर दृढ विश्वास असतो. त्या व्यक्ती किंवा विचार यापुढे जाऊन सुद्धा नवीन काही असू शकते यावर त्याचा कधीच विश्वास नसतो. किंवा स्विकारायला तयार नसतो.  यापुढे जाऊन काहींना तर अंधभक्त शब्द सुद्धा वापरू शकतो. काही भक्त तर एखाद्या व्यक्तीकडे सत्तेचा लाभ किंवा एखाद्याकडून आर्थिक फायदा मिळवून घेण्यासाठी त्या व्यक्तीची भक्ती करतात किंवा करीत असल्याचं सॉंग सुध्दा करीत असतात.  "..........
  चा मी कट्टर समर्थक" अशा भूमिकेतील लोकांचा  यामध्ये समावेश होतो.

२) कार्यकर्ता 
       हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्याकडे स्वतःचा विचार असतो. तो समीक्षक असतो. चांगलं काय? वाईट काय? हे सुद्धा तो समजून घेत असतो. घेण्याच्या पात्रतेचा असतो. विरोधी विचारांचा सुध्दा त्याला आदर असून त्यातील यथार्थता तो समजून घेत असतो. मान्य करीत असतो. असाच विचारी कार्यकर्ता समविचारी कार्यकर्त्यांशी जुळवून घेत असतो आणि त्यामधून समविचारी कार्यकर्त्यांची एक वैचारिक प्रवाही चळवळ निर्माण होत असते. तीच समाजाचे भले करू शकते आणि अशाच चळवळीची समाजाला आज गरज आहे.  तिथे व्यक्तीना नाही तर विचारांना महत्त्व असतं. विचार प्रमाण असतो पण अंतिम नाही. विचाराची सातत्याने समीक्षा होत असते. आणि त्याच्यातून काळ सापेक्ष विचार स्वीकारला जातो. स्वीकारण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची तयारी असते. अशा कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढ होणे समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
         
      ३) समाज सेवक - हा समाज कार्यकर्त्यांमधील अतिशय महत्त्वाचा प्रकार असून तो खरा समाज सुधारक असतो. त्याला केवळ समाजहिताचा शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची हाव नसते. त्याच्या सर्व बाबी समाज हितासाठीच असतात.  ते समाजहितासाठी केवळ सत्याचे आग्रही असतात. "हाडाचा कार्यकर्ता" शेवटी समाजसेवक  पदापर्यंत पोहचू शकतो. वयाच्या सत्तर च्या दरम्यान असलेल्या अनेक धनगर कार्यकर्त्यांचा समाजसेवक या सदरामध्ये समावेश करू शकतो. माझ्या नजरेत असलेली अनेक नावे मला या ठिकाणी देता आली असती. परंतु याठिकाणी व्यक्तीसापेक्षता टाळण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन स्विकारून मी ती टाळतो आहे. माझ्या साठी ते नेहमी प्रेरणास्थान आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर अशा समाजसेवकाचा शोध घ्यावा ही वाचकांना विनंती
       आता पर्यंत मांडलेले विचार हे माझं मत असल्याने, ते प्रमाण माणण्याची गरज नाही. मात्र त्यावर विचार व्हावा. त्यापेक्षा नवीन विचार समाजासमोर यावा. वैचारिक क्रांती ची पावलं वेगानी पडावी ही मात्र अपेक्षा. 

त्यादृष्टीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

Thursday, May 21, 2020

आ. गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आ. *गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..* 
            (कोणीही भावनात्मक होवून वाचू नये)

                 *डॉ. प्रभाकर लोंढे* 

               इतिहासात महाराष्ट्रातील पेशवाईचा काळ सर्वांना अभिमानाची बाब आहे. म्हणून तो समजून घेण्याची  गरज आहे. कारण भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमानाची पावलं भविष्याकडे टाकत असताना आजची व्यवस्था तशी समजून घेतली तर पेशवाईची पूनर्स्थापना होत आहे. *मराठे सरदार पहीलेच मजबूत बनले आहे. ते पेशव्यांना हातात घेऊन प्रसंगी त्यांची मुंडी मुरगाळून सत्ता उपभोगत आहेत.*  याबाबीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 
          फडणवीस साहेबांनी यापूर्वी मागील पाच वर्षे जी सत्ता उपभोगली तेव्हा *त्यांनी धनगरांना इतकं महत्व दिलं नसलं तरी धनगरांचा साथ मात्र घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.* धनगरांचा आधार घेऊन मराठा सरदारांना शह दिला जाऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटला आहे म्हणून खोटे  का असेना आरक्षणाचे आश्वासन देऊन जानकर साहेब व शिंदे साहेब यांना मंत्री पदापर्यंत सोबत घेऊन आपली पेशवाई मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.  तेव्हा त्यांनी हा विचार केला की येथील मराठा सरदारांना शह देण्यासाठी धनगर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ *त्यांनी पेशवाई व मल्हारराव यांचा पुरेपूर अभ्यास केला आहे.*  तेव्हा त्यांनी ही सुद्धा दक्षता घेतलेली आहे की या *धरगरांमधून पेशवाईवर प्रभाव, दबाव आणि वर्चस्व असलेला नवीन मल्हारराव घडणार नाही.* आणि म्हणूनच त्यांनी पुढचं पाऊल टाकत (माजी मंत्री शिंदे साहेब व इतरांना टाळून) गोपीचंद पडळकर नावाच्या तरुण, उत्साही व्यक्तीला,  *धनगरांना भावनात्मक करू शकेल, तरुणांमध्ये उत्साह भरू शकेल अशा  धनगर उमेदवाराला विधान परिषद दिलेली आहे.*  
          ही विधान परिषद केवळ आणि केवळ धनगर म्हणून दिलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्याप्रमाणे राजश्री *मल्हाररावांशिवाय येथील मराठीशाही किंवा पेशवाईचा झेंडा मातीमोल होता.* (मल्हाररावांनी एकट्याच्या भरोसावर नाही तर आपल्या विविध धनगर सरदारांच्या भरोशावर एवढा वचक निर्माण केला होता. जागोजागी त्यांनी आपली माणसं पेरली होती.) त्याप्रमाणे आजच्या बीजेपीचा झेंडा धनगरांशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून ते मल्हाररावांप्रमाणे धनगरांच्या काही उमेदवारांना हाताशी बाळगत असतात. त्यांना आजच्या लोकशाहीत धनगर मजुरांकडून मल्हाररावांचा पराक्रम अपेक्षित आहे पण वर्चस्व मात्र नक्कीच नाही. *त्यामुळेच ते वारंवार सरदार बदलत असतात.* 
              आज धनगरांना सरदारकी देत असताना आजच्या लोकशाहीतील लोकमताचा भावी काळासाठी विचार करून ते धनगरातील सरदार निवडत असतात.  आज त्यांच्या दृष्टीने असा उपयोगी सरदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ते *वकृत्वाच्या भरोशावर धनगर तरुणांना आपल्या कहेत नक्कीच घेऊ शकतात. तेवढी त्यांची क्षमता सुद्धा आहेत, असं म्हटलं तर चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकत नाही. परंतु ते सर्व गोपीचंद पडळकर साहेबांच्या पुढील धोरण व महत्वाकांक्षा यावर अवलंबून आहे.* 
          थोर सुभेदार राजश्री मल्हारराव उदयास आले, तेव्हा त्यांनी तत्कालीन *धनगर सरदारांचा साथ घेतला होता. त्यांनी बुळे, वाघमोडे, पांढरे, धायगुडे, .......   अशा अनेक धनगर सरदारांना मोठं केलं होतं.* एवढेच नाही तर अनेकांचं  सत्तेत बस्तान बसविलं होतं. अनेकांना आपल्या साम्राज्यात प्रस्थापित केलं होतं.  त्यामुळेच मल्हारराव आपल्या राज्यकारभारात व पेशवाईत यशस्वी झाले होते. त्याच भरोश्यावर त्यानी अटकेपार झेंडे फडकावले होते. ते *त्यांना एकट्याच्या भरोशावर करता आलं नसतं.* 
         आज गोपीचंद पडळकर साहेबांना मल्हाररावांच्या भूमिकेत हाताशी पकडलं असलं तरी शिंदे साहेब, गणेश हाके साहेब यासह अनेक जुने सरदार बीजेपी मध्ये विद्यमान कार्यरत आहेत. आ. महादेव जानकर साहेब तर गोपीचंद पडळकर साहेबांचे गुरु आहेत. मंत्री दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीत असले तरी ते राष्ट्रवादीतील धनगरांचा प्रमुख सरदार आहे. त्यांच्या नेतृत्वात सुध्दा एक महत्त्वाची फळी उभी आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर साहेबांची ४९  भावी आमदारांची तरुण तुर्क फौज सुध्दा सोबत तयार आहे. 
          सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने व स्वतःच्या धोरण निर्धारण व अचूक पावले टाकून गोपीचंद पडळकर साहेबांना आधुनिक पेशवाई मधील सुभेदार राजश्री मल्हारराव बनणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रथमता आपला सर्वांचा शत्रू असलेली मानसिकता ओळखून त्याविरोधात लढण्याची सांघिक नीती निर्धारित होणे आवश्यक आहे तरच *गोपीचंद पडळकर साहेबांना  मल्हाररावांच्या सरदारकीचा सन्मान व स्वराज्याचे वैभव नक्कीच प्राप्त होणार आहे. नाही तर आमदार गोपीचंद साहेबांमधून, शेंडगे, डांगे, महात्मे मात्र नक्कीच घडणार आहे.* 

 *त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!* 


 *डॉ.  प्रभाकर लोंढे* 
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचे अभ्यासक* 
९६७३३८६९६३

Wednesday, May 13, 2020

गोपिचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

गोपीचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

डॉ प्रभाकर लोंढे

         धनगर नेते म्हणून ब्रँडिंग झालेले मा. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळताच धनगर समाजामध्ये काही प्रमाणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.  प्रथमतः गोपीचंद पडळकर यांचे त्रिवार विशेष अभिनंदन!!!  ही धनगर जमातीसाठी अभिनंदनाची बाब असली तरी ही  विधान परिषदेची उमेदवारी मिळवून घेण्यासाठी त्यांना बारामती मध्ये येऊन स्वतःच डिपॉझिट जप्त करून घ्यावं लागलं ही बाब अतिशय विचार करायला लावणारी आहे. . धनगर बहुल बारामतीमध्ये येऊन धनगर उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणं ही जमातीसाठी अभिमानास्पद बाब आहे, असं मला तरी वाटत नाही. परंतु ते बारामतीत का आले? हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी सांगली(जिल्हा) सोडली नसती तर कदाचित ही वेळ आली नसती.
              गोपीचंद म्हणजे एका सामान्य धनगर कुटुंबातील माणूस पण त्यांनी "50 धनगरांना आमदार व तीन महिन्याच्या आत एस.टी.चे सर्टिफिकेट" या मुद्यांवर उत्तम वकृत्व शैलीच्या आधारे धनगर तरुणाईला भारित केलं.  असं एक व्यक्तित्व म्हणून बीजेपी ने गोपीचंद पडळकरांना पुन्हा जवळ केलं. त्याआधारे बीजेपीला जी काही मत मिळायची ती मिळाली. तसा गोपीचंद पडळकर यांचा प्रवास हा अत्यंत खडतर, त्यांना प्रस्थापितांच्या कट कारस्थानांच्या बाबतीत चांगला अनुभव आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वत:ला चांगल्या प्रकारे स्थीर ठेवलं. काही प्रमाणात का होईना स्वत:ला आर्थिक राजकीय बाबतीत सक्षम केलं.
          प्रस्थापितांनी त्यांच्याशी कसेही वागले तरी धनगर लाटेला वळविण्याचं काम गोपीचंदनी उत्तम प्रकारे केलं किंवा करू शकतो हा विश्वास बीजेपीला वाटल्यामुळे तसेच धनगरांचा नवीन पत्ता खेळण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी दिलेली आहे, असं मला वाटते. शेवटी हे माझं मत आहे. पण विधान परिषदेतील उधारीच्या सभासदत्वाची धनगर संख्या एक ने वाढेल. त्याबद्दल धनगर जमातीचे विशेष अभिनंदन!!
          गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच मात्र अनेकांनी त्यांची तुलना गोपीनाथ मुंडेशी केली. बीजेपी तील गोपीनाथ मुंडे बनण्याची संधी, ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी अशा आशयाची प्रतिक्रिया वाचली. आनंद झाला. डोक्यात  विचार आला. मन गंभीर झालं आणि त्यानी ठरवून टाकलं. की मी लिहून देतो, गोपीचंद पडळकरांना गोपीनाथ मुंडे बनण्याचे मार्ग पूर्णता बंद झालेले आहे. 
           गोपीनाथ मुंडेंचा ज्या परिस्थितीमध्ये राजकीय जन्म झाला, ती राजकीय परिस्थिती बीजेपी मध्ये गोपीचंद यांना नक्कीच मिळणार नाही. याशिवाय गोपीचंदची जमात धनगर, महाराष्ट्रात हेतुपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या जात असलेली धनगर. (आजचा अलिखित नियमच बनून गेला आहे की या महाराष्ट्रात धनगर नेतृत्व सदासर्वकाळ सत्तेत किंवा नेतृत्वात राहूच द्यायचा नाही) आजच्या महाराष्ट्रातील धनगर नेतृत्वाचा इतिहास पाहिला तर धनगरांचा कोणताही पत्ता(नेतृत्व) फूल टाइम वापरला गेला नाही. (आबा अपवाद) धनगरांच्या नेत्याला शह देण्यासाठी नवीन दुसरा धनगर नेता शोधणे व त्याला पुढे करून जमातीला बांधून ठेवणे, ही येथील प्रस्थापित पक्षांची नीती. पडळकरांना  उमेदवारी देण्यामागचा कदाचित हा उद्देश असण्याची दाट शक्यता आहे.  बीजेपीला पडळकरांची राजकीय ताकद वाढवायची असती तर विधानसभेसाठी बारामतीत नेऊन त्यांची डिपॉझिट जप्त होऊ दिली नसती.  
           गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. लोकांना माहीत नसलेला बीजेपी पक्ष त्यांनी घराघरात नेऊन पोहचविला. ती बीजेपी ची गरज होती.  त्यामुळे त्यांची नाळ ही अठरापगड जातीशी व घरात पत्नी महाजन (प्रमोद महाजन ची बहिण) घराण्याची होती. त्या
मुळे गोपीनाथ  मुंडे साहेबांना शेवटचे गोपीनाथ मुंडेसाहेब बनण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली. तशी संधी आज गोपीचंदजीना बीजेपी मध्ये उपलब्ध आहे, असं मला तरी वाटत नाही. 
            तसं पाहिलं तर प्रस्थापितांनी गोपीचंद पडळकरांची  महाराष्ट्रातील विधिमंडळात /राजकारणात सुरुवातच विधानसभेची  डिपॉझिट जप्त करून विधानपरिषदे पासून केली . (याचा अर्थ असा काढू नका की, गोपीचंद पडळकर निवडून येवू शकत नाही ) मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की त्यांच्यासाठी ही परिस्थिती हेतुपुरस्सर निर्माण केल्या गेली. 
             गोपीचंद पडळकरना मिळालेली उमेदवारी ती मागावी लागली. येथे मिळलेली उमेदवारी ही धनगर समाजाला आहेत की गोपीचंद पडळकरांना आहे?, हा मोठा प्रश्र्नच आहे. पडळकर साहेबांच्या कार्याचं ? की धनगर जमातीच्या त्यागाचं फलित? म्हणून ही उमेदवारी मिळालेली आहे. (यापूर्वी धनगरांच्या त्यागाच फलित म्हणून धनगरांना खासदारकी मिळाली आहे)
            या ठिकाणी प्रश्न कितीही असले तरी आलेली संधी मात्र गोपीचंद पडळकर साहेबांच्या राजकीय जीवनाचे सार्थक करू शकते. आलेले कटू अनुभव व योग्य पावले पडली तर धनगर जमातीच्या राजकीय पटलावर एक नेतृत्व म्हणून विधानमंडळात महत्त्वाची भूमिका बजावू होऊ शकते. 
   त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!*

🥈🥉🥈🥉🥈🥉🥈🥈🥈🥉
*जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!* 
 
                    *डॉ प्रभाकर लोंढे.* 

                 माणूस जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतःच्या क्षमतेनुसार जगत असतो, असं असलं तरी त्याचा दृष्टीकोन त्याला त्याच्या जगण्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करीत असतो. हा त्याचा दृष्टीकोन त्याच्यावरील संस्कार, उपलब्ध परिस्थिती व त्याने जीवनामध्ये पाहिलेल्या स्वप्नांवरून ठरत असतो. यापुढे त्याने आपल्या दृष्टिकोनाला सांभाळत असताना केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा त्याच्या जीवनाचा दर्जा ठरवित असतो, प्रसंगी त्याच्या/ तिच्या व्यक्तित्वाला अमरत्व प्राप्त करून देत असतो. तेच अमरत्व इतर सामान्य माणसांच्या दृष्टीने त्याला महापुरुषाचा दर्जा प्राप्त करून देत असतो. व त्याच्या प्रेरणेतून सामान्य माणूस संपूर्ण जीवन जगत असतो.
        असे *कर्तुत्ववान प्रेरणादायी महापुरुष पैदा करता येत नाही तर ते घडविता येतात. महापुरुष हा विचारांनी व कर्तुत्वानी घडत असतो,*  त्यामुळे स्वतःच्या जीवनातील आचारपद्धती व स्वप्न साकार करण्यासाठी इतिहासात घडून गेलेल्या महापुरुषांची कार्य पद्धती व जीवन कार्य सामान्यांना जीवनामध्ये आधारस्तंभ दीपस्तंभ यासारखे कार्य करीत असते.  समाजात घडून गेलेले महापुरुष समाजात सातत्याने दीपस्तंभासारखे जळत राहावे, सर्वसामान्यांपर्यंत जगण्याची दृष्टी देत राहावे, यादृष्टीने महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या समाजामध्ये साजरा करावयाच्या असतात. 
             *पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर हे व्यक्तित्व समाजामध्ये अनेक अंगाने मार्गदर्शक असून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जगण्याची ऊर्जा देऊन जात. संपूर्ण जग दुःखमय असताना दुःखातही सुख शोधण्याची वृत्ती निर्माण करतं. खाजगी जगत असताना सार्वजनिक, सर्वकालिक होण्याची प्रेरणा देतं. सर्वधर्मसमभाव यातून सामाजिक समतोल साधण्याची एक विचार प्रेरणा घेऊन जगण्यासाठी माणसाला प्रेरित करतं. सत्तेचा माज उतरवून समाजामध्ये सेवाभावी दृष्टीने जगण्यासाठी मजबूर करतं.* म्हणून ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोनाचार्याचा पुतळा बनवला होता तो पुतळा एकलव्या तील सर्व स्कील विकसित करण्यासाठी प्रेरणा देत होता. त्यातूनच तो उत्तम धनुर्धारी बनला. यातून मला एवढेच सांगायचे आहे की महापुरुषांचे पुतळे, चित्र, स्मृती ह्या बाबी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं जीवन जगण्यासाठी व स्वतःतील गुण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करीत असतात. 
                 त्यासाठीच यावर्षीची राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे २०२० ला सर्व सामाजिक व राजकीय बंधन पाळून आपण आपल्या घरी वाड्या-वस्त्यांवर राहून उत्साहात साजरी करू शकतो. यावेळी कोणीही शासकीय निर्बंध,नियम, कायदा तोडणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेऊनच जयंती साजरी करावी. व ते सर्वांवर बंधनकारक आहे. परंतु याचा असा एक फायदा आहे की, त्यामुळे दरवर्षी जयंतीसाठी मोठ्या खर्च होणारा पैसा वाचणार आहे. *हा वाचलेला पैसा खर्च झालाच पाहिजे, असं बंधनकारक नाही. परंतु त्या मधून भुकेलेल्यांना अन्न, पैशावाचून शिक्षण थांबणाऱ्यांना शिक्षणाच्या सोयी, बिमारांना आर्थिक मदत, समाजातील अन्याय, अत्याचारग्रस्त यांना मदत, याशिवाय प्रत्येकाच्या मनात असलेले समाज उद्धारक नवोउपक्रम राबवण्यासाठी या जयंतीचा वापर करून खऱ्या अर्थाने आपण दानदात्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वारस असल्याचे सिद्ध करू शकतो.* 
        याशिवाय लॉक डाऊनचा काळ असल्यामुळे कुठे सार्वजनिक स्थळी राजमाता *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी न करण्याचं शल्य मनात येऊ न देता पारंपारिक उत्साह जोश कायम ठेवून त्याला मात्र वेगळ्या वळणावर परिस्थितीसापेक्ष निर्णय घेऊन यावर्षीची जयंती साजरी केली तर ती अविस्मरणीय राहणार आहे.*         

अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विविध चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वाड्या-वस्त्या यांना महापुरुषांची नावे देण्याची ट्रेंड प्रचलित होताना दिसत आहे. सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक अंगाने मार्गदर्शक जीवन असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा चौक, रोड, रस्ता उड्डाणपूल दिसत नाही किंवा ऐकायला मिळत नाही.  *यावर्षीच्या जयंती निमित्ताने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव एखाद्या चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वार्ड, मोहल्ला, वाड्या-वस्त्यांना  देऊन, त्याची ३१ मेला तत्वतः घोषणा करून सर्वांनी आपल्या घरीच राहुन ऑनलाइन पद्धतीने विचारविनिमय करून ऑनलाइन पद्धतीनेच त्याची घोषणा केली तर लाकडाऊन नंतर त्याची अंमलबजावणी करता येईल.* या लाकडाऊनच्या निमित्ताने ती अविस्मरणीय बाब ठरणार आहे. 
       सर्वांनी सार्वजनिक व खाजगी आरोग्याची काळजी घेऊन लाकडावून चे पालन करण्यासाठी शासनाला व प्रशासनाला संपूर्णतः सहकार्य करावे. *राष्ट्र प्रथम कर्तव्य समजावे.* .. ही विनंती..

 *त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!* 


 *डॉ प्रभाकर लोंढे*
*गोंदिया* 
९६७३३८६९६३

Wednesday, April 29, 2020

धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

📚🖊️🖊️📚📖🖊️🖊️📚📚🖊️🖊️🖊️📚
 *धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*

           *डॉ प्रभाकर लोंढे.*

   या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत सर्वाधिक पराक्रमी सर्वगुणसंपन्न म्हणून नावलौकिक असलेले राजे/ राजकीय वंशांचा विचार केल्यास त्यापैकी बहुतांश धनगर वंशाचे आहेत असा उल्लेख करावा लागतो. हे *मी जातीय अस्मिता म्हणून नाही तर वास्तविकतेच्या आधारे बोलतो आहे.* (ज्यांना कुणाला यावर आक्षेप असेल त्यांनी थोडे इतिहासात डोकावून पाहावं ही विनंती) असे असले तरी मी येथे सर्व वंशांचा उल्लेख करणार नाही. परंतु याच शृंखलेतील *मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ असलेले संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर व त्यांच्यापासून सुरु झालेल्या होळकर वंशातील राजपुत्र खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, शूरवीर महाराजा यशवंतराव यांना इतिहासकारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा वारंवार बदनाम/संकुचित करण्याचाच प्रयत्न केलेला आहे* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
              *तेव्हा प्रश्न निर्माण होतं की असं का झालं???*

याचे उत्तर आपल्याला प्रथमतः

 🖊️१) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनीच दिलेलं आहे. " *आम्हा कडील लोकांची कामे यथास्थित होतात. परंतु उजेडात आणणार कोणी नाही. न होत्याचे उजेडात येते. असो दिवस असेच आहेत"* (महेश्वर दरबारची बातमीपत्रे पान-१९) याचा अर्थ तेव्हापासून असं चालत होतं आणि आजही ते बंद झालं आहे, असं म्हणता येत नाही.
 *🖊️२) "होळकरांची कैफियत"* म्हणजे होळकर यांच्या पराक्रमाचा आलेख आहे. ती *भाऊसाहेबांच्या बखरीच्या तोडीची आहे, परंतु ती मागे पडण्याची दोन कारणे ये. ना. खेडकर यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये दिलेली आहेत.*
 *अ) मराठी इतिहासकारांनी शिंदे* होळकर घराण्याची वारंवार तुलना करून होळकरांची कृती सारी स्वार्थ मुलक तर शिंद्यांची कृती तेवढी सारी उदात्त, असे रंगवण्याचा प्रघात पाडला. यामुळे होळकर बदनाम झाले.
 *ब) "भाऊसाहेबांची बखर" अप्रत्यक्षपणे पेशव्यांची बखर म्हणून प्रसिद्ध झाली, याला कारण लेखन कलेवर त्यांचे असलेले प्रभुत्व. ही बखर भाऊसाहेबांची बखर नावाने ओळखली जात असली तरी त्यामधून शिंद्यांचा उदोउदो करण्यात आलेला आहे.* (हे असं का झालं? याचा सर्वांनी विचार करावा). तुलनेने होळकरांच्या पराक्रमाच्या इतिहासाला, शिंदे व पेशव्यांच्या उदात्तीकरणाच्या दृष्टीने दडपण्याचाच किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. *यामध्ये होळकरांचा इतिहास किंवा पराक्रम कमजोर होता हे कदाचित त्यांना सुद्धा मान्य होणार नाही. पण त्यादृष्टीने त्यांची लेखणी मात्र चालली नाही. याला कारण इतिहासामध्ये शिंद्यांपेक्षा होळकरांना श्रेष्ठ दाखवण्याची त्यांच्यामध्ये तेवढी हिम्मत नव्हती. यापुढे जाऊन त्यांची तशी नियत नव्हती असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकूणच मराठा साम्राज्यातील इतिहासाचे हिरो असलेले होळकर हे खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आहे.* त्यामुळे येथे आपल्याला संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे ही बाब समजून घेतल्याशिवाय पुढचं कार्य करता येणार नाही.

🖊️ *३) माझ्या मते, साधारणता* समाजात जेव्हा एखाद्याची गुणवत्ता आपल्या लक्षात येते, तेव्हा त्याच्याशी स्वतःची तुलना करता आपण त्याची बरोबरी करू शकत नाही हे तो मान्य करतो,पण ते त्याला सहन होत नाही.  तिथूनच तो त्या व्यक्तीच्या बदनामीला सुरुवात करतो. यामध्ये समोरच्याला बदनाम करणे हा त्याचा  मुख्य उद्देश नसतो तर आपण त्यापेक्षा कमजोर दिसू नये एवढीच तो दक्षता घेत असतो.व त्याच्यासाठी त्याचा सर्व खटाटोप चाललेला असतो. हेच होळकरांच्या इतिहासाच्या बाबतीत झालेलं नाकारता येत नाही.

🖊️ ४) " *बोलक्याचे बोंड खपते, मुक्याचे मोती लपते"* ही एक म्हण आहे. ती होळकरांच्या इतिहासाला समर्पकपणे लागू होते. मराठी इतिहासकारांना वगळून इतर संदर्भ लक्षात घेता मराठी इतिहासकारांच्या इतिहास लेखनावर संशय निर्माण होतो. त्यामुळे होळकरांच्या इतिहासलेखनासंबंधी ची आत्मियता असणाऱ्या *इतिहासकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असती तर कदाचित होळकरांच्या इतिहासाला न्याय मिळाला असता. होळकरांच्या इतिहासाला बदनाम होण्याची वेळ आली नसती.*

🖊️ *५) या चार बाबींबरोबरच ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की समाजातील जागृत लोकांचाच समाजावर, संस्कृतीवर, राजकीय व्यवस्था व अर्थव्यवस्थेवर नेहमी प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे लेखन सुद्धा त्याच अंगाने झालेल्या आहेत. तेव्हा प्रश्न निर्माण होतो कि, धनगर जमातीचे किती लोक इतिहास लेखनाच्या बाबतीत जागृत होते व आहे ??*

 🖊️ *६)  दैनंदिन जीवनात व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीच्या चुका होणे, ही बाब स्वाभाविक आहे. आणि जो कर्तुत्वप्रधान जगत असतो, त्यांच्याकडून तर चुका नक्कीच होतं असतात. त्यामुळे होळकर राजांकडून चुका झाल्या असेल तर ते नक्कीच कर्तुत्व प्रधान होते. म्हणून त्याच्या चुका दाखवत असताना त्यांच्या कर्तुत्वाची सुद्धा तेवढ्याच प्रगल्भ नजरेने मांडणी होणे आवश्यक आहे. पण ती होता ना किंवा झालेली दिसत नाही*

🖊️७) *इतिहास लेखन करताना आपण ज्याप्रमाणे होळकरांच्या इतिहासाविषयीची जे आत्मीयता दाखवतात* त्याप्रमाणे तत्कालीन मराठी इतिहासकारांना होळकरी इतिहासा पेक्षा पेशवे आणि शिंदे यांच्या इतिहासाशी जवळीकता वाटली असेल आणि त्यातून जर ते इतिहास लेखन झाले असेल तर त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. तर *तो आत्मियता असणाऱ्यांच्या निष्क्रियतेचा परिणाम असल्याचे मान्य व स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.*
             ही बाब सत्य असताना एखाद्याच्या नकळत झालेल्या चुकांचा अतिरंजितपणा किंवा राईचा पर्वत करून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची बाजू , व्यक्तिमत्वाचे विविधांगी समाजोपयोगी व कर्तबगार पैलू याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते तेव्हा *ऐतिहासिक दृष्ट्या त्या व्यक्तीत्वावर नक्कीच अन्याय होत असतो. आणि होळकर राजवंशाचे बाबतीत हे नक्कीच झालं आहे,* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. 
       आणि याची आपणास उशिरा का होईना *जाणीव झाली असेल तर इतिहास संशोधना बरोबरच इतिहास लेखन शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही....*


 *धन्यवाद*
------------------------------------
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक*

🖊️ *डॉ. प्रभाकर लोंढे*🖊️
          ९६७३३८६९६३

Saturday, April 18, 2020

राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
*राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*

                             *डॉ प्रभाकर लोंढे*

     मराठेशाहीच्या इतिहासामध्ये होळकर संस्थान बलाढ्य संस्थान म्हणून सर्वपरिचित होतं. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा खुद्द पेशवे तसेच इतर सरदार यांचेवर  तसेच अखंड भारतामध्ये सर्वत्र दबदबा होता.  मल्हाररावांना विश्वासात घेतल्याशिवाय पेशवाईतील कोणताही निर्णय होत नव्हता. अशा या महान सुभेदारांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांना इतिहासामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. त्या इतिहासाची वास्तविकता सत्तेच्या आधारे पुढच्या काळामध्ये सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी *खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाला तो काही संदर्भांवरून संशयास्पद वाटतो.*
                 सुरजमल जाट कुंभेरीचा किल्ला बळकावून बसला होता. त्यावेळी पेशवा रघुनाथराव, जयाजी शिंदे व मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. तसा हा किल्ला जिंकण्याचा आग्रह सुभेदार मल्हाररावांचाच होता. त्यावेळी *रघुनाथराव व जयाजी शिंदे होळकरांच्या सोबत असले तरी आतून ते जाटांसोबत मिळाले होते.* त्यामुळे ते होळकरांना मदत करीत नव्हते. व ते स्पष्ट दिसत होते.
         तत्पूर्वी मल्हारराव होळकर यांचा पुत्र *खंडेराव होळकर चारशे स्वरांच्या पथकासोबत दिल्ली स्वारी आटोपून जानेवारी १७५४ च्या आरंभी होडाळ येथे आपला तळ ठोकून बसला होता.* जाट वाड्यातील जाटांची त्यांच्या केंद्रापासून दूर असलेली ठाणी उठवून लावण्याचे कामावर तो होता. (कदाचित हा मल्हाररावांचा युद्धनीतीचा भाग असावा) असे असताना या पथकाने आता कुंभेरी च्या वेढ्यात येऊन सामिल व्हावे, असा पिताश्री मल्हारराव कडून त्याला आदेश मिळाला. त्याप्रमाणे खंडेराव होळकर कुंभेरीच्या वाटेने निघाला. वाटेत मेवातचे ठाणे लुटून तो कुभेरीला पोहोचला.(इथे प्रश्न निर्माण होतात की,
 *१) मल्हाररावांना कुभेरीच्या वेढ्यात खंडेरावांना का बोलावावं लागलं?*
*२) जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे त्यावेळी काय करीत होते?*
    एकाकी लढा देत असताना  कुंभेरी चा प्रदेश रेताळ असल्याने लांब पल्ल्यांच्या तोफांची आवश्यकता मल्हाररावांना वाटली. त्याची पूर्तता व्हावी म्हणून दिल्ली दरबार कडे *तोफांची मागणी केली परंतु दिल्ली दरबारने ती नाकारली. (दिल्ली दरबारातील गोंधळ शांत करण्यासाठी आपल्या मुलाच्या(खंडेराव) नेतृत्वात सेना पाठवणाऱ्या मल्हाररावांना दिल्ली दरबार/ बादशाहाने ही मदत का नाकारली? हा येथे मोठा प्रश्न निर्माण होतो)*
         त्यावेळी जाटां विरुद्ध लढण्यासाठी इमाद उल- मुल्क तसेच अकितब यांना मल्हाररावानी बोलावून घेतले. बोलण्यावरून ते लढ्यात सामील झाले. *खंडेराव सुद्धा नेटाने लढत होते. अतिशय बिकट परिस्थिती असताना खंडेरावांनी किल्ल्याच्या तटा पर्यंत झाकलेल्या भुयारा सारख्या खंदकातून जाणाऱ्या निरुंद वाटा तयार केल्या होत्या व तो किल्ल्याच्या तटा पर्यंत जाऊन पोहोचला होता.* हा खंडेरावाचा इतिहास खंडेरावांवर आक्षेप घेणाऱ्यांसाठी अतिशय चपराक देणारा आहे.
           सुरजमल जाट कुंभेरीच्या किल्ल्यात दबा मारून बसला होता. पेशवा रघुनाथराव व जयाजी शिंदे वेढयात उपस्थित असले तरी त्यांचे सहकार्य मिळत नव्हते. ते दोन्ही आतून सुरजमल जाटाशी जवळीक साधून होते. (नंतरच्या काळात रघुनाथराव पेशवा जाटाशी तह करून २२ मे १७५४ ला कुंभेरीची छावणी मोडून निघून गेला.) त्यामुळे कुभेरीचा संपूर्ण लढा होळकरांना लढावा लागला.         
         *मल्हारराव आणि खंडेराव यांचेकडून सर्वतोपरीने लढा सुरू असताना त्यांना जाटा सह अंतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागत होता. अन्नाशिवाय पोट भरणे व शस्त्राशिवाय युद्ध जिंकणे कठीण जाते.  कुंभेरीच्या रेताळ प्रदेशावर लढण्यासाठी होळकर पिता-पुत्रांना लांब पल्ल्याच्या तोफा जर बादशहा किंवा कुठून मिळाल्या असत्या तर कदाचित कोणत्याही परिस्थितीत होळकर मराठा साम्राज्याचा झेंडा कुभेरीवर फडकला असता.*
            होळकर पिता पुत्राचे जिकरीचे प्रयत्न सुरू असतानाच *१५ मार्च १७५४ ला खंडेराव जेवणानंतर खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता अचानकपणे किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु झाला.* जंबरुकचा एक गोळा लागून *खंडेराव मारला गेला* .... एकुलता एक खंडेराव मृतप्राय झाला याची माहिती कळताच मल्हारराव देहभान विसरले. या सर्व प्रकारात कुंभेरीचा लढा अर्धमेला झाला खरा.  तरी त्याठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात.  १. *) खंडेराव खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा कसा काय झाला?*
 *२) सुरजमल जाटाशी संबंध जोडून असलेल्या जयाजी शिंदे व खुद्द रघुनाथराव पेशवे यांनी मल्हाररावांचा काटा काढण्यासाठी सुरजमलला माहिती पुरवून खंडेरावांचा मृत्यू घडवून तर आणला नाही ना?*
               परिस्थिती काहीही असो, खंडेरावाच्या मृत्यूने मल्हारराव पुर्णतः खचून गेले होते. अशाही परिस्थितीत *रघुनाथराव व जयाजी शिंदे पातशहाचा दबाव दाखवून जाटांशी मेळ घालण्यासाठी मल्हाररावांना बोलू लागले. दबाव टाकू लागले.* परिस्थितीने अगतिक असलेले मल्हारराव एकीकडे मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने व्याकुळ होते. तेव्हा मल्हारराव उदास होऊन *जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे यांना बोलले "आपण धनी व शिंदे मुखत्यार सरदार, सांगाल ती चाकरी करू!* असे उद्विग्न होवून मल्हारराव बोलले व कोणतीही पूर्वसूचना न देता खंडेरावाच्या मृत्यूचे उत्तरकार्य निमित्त मथुरेला निघून गेले..
          *मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवून बाहेर येणार नाही तो सुभेदार मल्हारराव कसला?* खंडेरावाचे उत्तर कार्य आटोपून मल्हाररावांनी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली." _*सूरजमल जाट याचे शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन. तरीस जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राण त्याग करिन."*_
             यावरून आपल्याला मल्हाररावांना पुत्रमृत्यूचं किती दुःख झालं होतं, हे लक्षात येईल. *यावेळी मल्हाररावांचं दुःख एकट्या मल्हाररावांचं न राहता सर्व मराठा सरदारांचं व ज्यांचं अस्तित्व मल्हाररावाच्या तलवार व भरोशावर निर्माण झालं होतं त्या पेशव्यांना व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही.* (याचा अर्थ खंडेरावाच्या मृत्यू संबंधाने संशयास जागा आहे) *सर्व मराठा सरदार व पेशवे यांनी एकत्र येऊन मल्हाररावांवर आलेला प्रसंगाचा बदला घेण्यासाठी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती. सर्वांनी मिळून सुरजमलला धडा शिकवायला पाहिजे होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही.*
       मात्र मल्हाररावांच्या प्रतिज्ञेने तिकडे सुरजमल जाट पूरता घाबरून गेला होता. त्याने *जयाजी शिंदे कडे आपल्या वकिलामार्फत पगडी व पत्र पाठवून, माहिती मिळेल त्या मार्गाने बचाव करावा, अशी विनंती केली. त्यावर जयाजी शिंदेनी जाटाना बेलभंडार व अभयपत्र पाठवले. दोघेही पगडी बंधू बनले. जयाजी शिंदेनी जाटाची बाजू घेतली व संरक्षणाची हमी दिली.*
   यावेळी प्रश्न निर्माण होतो
     १) सुरजमल जाटानी जयाप्पा शिंदेनाच संरक्षण का मागितले?
     २) जयप्पा शिंदेना खंडेरावाच्या मृत्यूचं दुःख झालं नव्हतं काय?
३) मल्हाररावांच्या दुःखाशी जयप्पा मराठा सरदार म्हणून त्यांच काही नातं नव्हतं काय?
४) खंडेरावाचा मृत्यू संगनमताने तर झाला नव्हता ना?
५) रघुनाथरावानी "पेशवा" या नात्याने मल्हारराव च्या बाजूने उभे न राहता जाटाशी तह करण्याचा आग्रह का धरला?
६) या दोघांना मल्हाररावांपेक्षा जाट जवळचे का वाटले?
 *असे अनेक प्रश्न निर्माण करून*
                  *कुंभारीचा लढा संपला.*
                 खंडेराव मारला गेला.
                 पराक्रमी मल्हारराव काही अंशी खचला.
         *पण हा सर्व प्रकार मला संशय निर्माण करून गेला, की, खंडेरावाच्या मृत्यूमागे येथील प्रवृत्तीचा तर हात नव्हता ना??*
(सत्यता तपासणीच्या दृष्टीने लेख आपणास पाठवित आहे)

------------------------------------
 *डॉ. प्रभाकर लोंढे*
*९६७३३८६९६३*

Saturday, March 14, 2020

समाज दर्पण

समाज दर्पण


पाहिला मी
स्वास घेणारा मुडदा.
ज्याचा फ्याक्चर 
झाला होता गुडघा.

तेव्हा
पहातच राहिलो
आश्र्चर्यचकित होवून
त्या स्वासाला.
जो चालू होता
कसाबसा.
रडत होता ढसाढसा.
दुसरीकडे जागा भेटत नव्हती,
म्हणून बसला होता
देहाची लत्करे पांघरूण.
स्वत्व विसरून
निव्वळ टाईमपास साठी.

तेव्हा विचार आला.
मनाला प्रश्न पडला.
विधात्यानं का बनविलं याला ?
तेव्हा
विधाताच
न राहावून बोलला,
हा प्रश्नच का पडला तुला?
तेव्हा निरूत्तर होवून बोललो.
थोडं समाजात विचारून सांगतो तुला...

डॉ प्रभाकर लोंढे
गोंदिया