Friday, June 8, 2018

धनगरानो! प्रस्थापित फक्त तुमच्या स्वाभिमानालाच घाबरतात..

डॉ. प्रभाकर लोंढे

समस्त धनगर बांधवांनो!! महाराष्ट्रातील एकूण  राजकारणाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये प्रस्थापितांना आपल्या धनगरांच्या स्वाभिमानाचीच भिती वाटत आलेली आहे. त्यामुळेच आपल्यातील स्वाभिमानी माणसं त्यांनी वेळोवेळी हेतुपुरस्सर नष्ट केली आहे किंवा आपल्यातील अशी स्वाभिमानाने जगणारी माणसं निर्माणच होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली आहे.. याचाच परिणाम तुमच्यातील स्वयंभू स्वाभिमानी नेता हा महाराष्ट्रामध्ये आपल्या अधिकारासाठी आपली गोष्ट स्वाभिमानाने व्यवस्थेसमोर मांडताना दिसला नाही. (ज्यांनी मांडली त्यांचे विशेष स्वागत) ज्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे दाबण्याचाच  प्रयत्न झाला आहे. ही वास्तविकता सर्वांना स्विकाराविच  लागेल.
            आजपर्यंत आमच्यात जी काही माणसं/ नेतृत्व निर्माण झाली त्या माणसांना लालूच दाखवून, प्रसंगी देऊन, आर्थिक दृष्ट्या संपन्न करून त्यांना आपल्या खुंट्याला बांधण्याचे काम या व्यवस्थेने केलेले आहे आणि आमच्या नेत्यांना आपल्या खुंट्याला बांधूनच संपूर्ण धनगर जमात आपल्या अधिपत्याखाली कशी राहतील याचा विशेष प्रयत्न केलेला आहे. हे केवळ धनगर जमातींच्याच बाबतीत नाही तर सर्वच उपेक्षितांच्या बाबतीत केलेलं आहे.
       अशा या इतिहासामध्ये जे कोणी स्वाभिमानी नेतृत्व या महाराष्ट्रात निर्माण झाले असतील त्यांचे विशेष स्वागत आम्ही करतोय परंतु अशा धनगर बांधवांचं किंवा नेतृत्वाचं पर्सेंटेज काय? हा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर शोधायला आम्हाला दारोदार फिरावं लागतं..... आणि उत्तर मिळालंच तर ते झिरो पाईंट झिरो पाईंट...  अशा आकडयात लक्षात येतं. त्यामुळेच आपले प्रश्न सुटू शकलेले नाही. हे सत्य स्विकाराव लागत. उलट आमच्या प्रश्नांची जटिलता निर्माण कशी करता येईल याचा विशेष प्रयत्न या व्यवस्थेने केलेला आहे. त्याचे वाहक आमचे नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बनले आहेत.
            आमच्या नेत्यांनी प्रसंगावधान राखून आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व निर्माण केले असते​ किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं असतं तर आजपर्यंत स्वाभिमानी नेतृत्वाची फौज आमच्या-तुमच्यामध्ये दिसली असती. आमचे नेते कोणत्याही पदाच्या लालसेला बळी पडले नसते तर त्यांच्या स्वाभिमानी नेतृत्वागुणापुढे ही व्यवस्था नक्कीच​ झुकली असती आणि त्या झुकलेल्या व्यवस्थेची तुमच्या बांधवांवर खोटे आरोप लावण्याची हिंमतही झाली नसती..  तुमच्या प्रश्नांना कधीच ठेंगा दाखवू शकली नसती.
           आज पर्यंत आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व यांना सहन झाले नाही. आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व लाचार कसे बनतील याचाच प्रयत्न प्रस्थापितांनी केलेला आहे. म्हणून आज स्वाभिमानानं आव्हान करणारे आमचे नेतृत्व यांना खपत नाही. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न या प्रस्थापीत व्यवस्थेची नित्याचीच बाब बनली आहे. म्हणून डॉक्टर भिसे व इतर टीम यांनी स्वाभिमानाची व आपल्या हक्काची मागणी केली असता यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेने चालवलेला आहे..  या व्यवस्थेकडून होणारा असा प्रयत्न हा पहिल्यांदा किंवा नवीन नाही. हा सातत्याने प्रयत्न सुरू राहीलेला आहे. (गोवारी हत्याकांड)  म्हणूनच आमच्या नेतृत्वाला उधाण आलेलं नाही पण आज आमच्या तरुणाईचा काळ आहे. आज धनगर तरुण स्वाभिमानाने पेटलेले आहेत.
              या स्वाभिमानी नेतृत्वामध्ये या तरुणांना कोणीही फसवू शकत नाही कारण स्वाभीमान ज्याचा जागा असतो त्याला लाचारीने जगण्याची आदत नसते. तो कधीच गुलाम म्हणून जगत नसतो. त्याला कोणतीही गुलामी पसंत नसते. तो आपले प्रश्न कोणाकडे भीक मागून सोडवण्याच्या मानसिकतेत नसतो. "लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची" ताकद त्यांच्यात असते. आणि अशा प्रकारची नेतृत्व क्षमता असलेला तरुण वर्ग आज धनगर जमातीमध्ये दिसायला लागलेला आहे. नक्कीच व्यवस्था परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थेत आपलं स्वाभिमानी स्थान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. अशा व्यवस्था परिवर्तनामध्ये तुमचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या प्रश्नांना बगल​ देण्याची हिंमत या व्यवस्थेमध्ये राहणार नाही आणि म्हणूनच तुमचा स्वाभिमान जागा करा. जिथे कुठे लाचारीच्या गोष्टी होत असेल त्यांना हाणून लावा, ही व्यवस्था तुम्हाला तुमचे अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही.
               लोकशाहीमध्ये अधिकार कधी मागून मिळत नाही. हिसकावून घेतल्या शिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाही.  लोकशाहीमध्ये राजकीय सत्तेशिवाय कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून हा तरुण आज राजकीय सत्ता हातात घेण्याच्या मागे लागलेला आहे. "सत्तासंपादन निर्धार मेळावा" याचं पहिलं पाऊल आहे. त्याची भीती या प्रस्थापितांना वाटू लागली आहे. तुमचा स्वाभिमान हीच यांची कमजोरी आहे आणि म्हणून प्रस्थापितांना दाबायचं असेल तर तुमच्या स्वाभिमानाचा उदो उदो आणि तुमच्या प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झालाच पाहिजे. ज्या दिवशी स्वाभिमानाची प्रत्येक गोष्ट या महाराष्ट्राचा आवाज मोठा करेल त्या दिवशी या व्यवस्थेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.  त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये कोणताही वाकड तोंड करणारा किंवा वाईट नजर टाकणारा तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही.  कारण तुमचा  स्वाभिमानच या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला पूरून उरलेला आहे, हा यशवंतरावांचा, मल्हाररावांचा इतिहास आहे, हा राजमाता अहिल्याबाईंचा इतिहास आहे आणि एवढंच नाही तर चंद्रगुप्त मौर्या सारख्या पराक्रमी पुरुषांचा इतिहास तुमचा इतिहास आहे तर उठा इतिहास पुनर्जागरणासाठी जागे व्हा!!!!!    रात्र वैऱ्याची असली तरी दिवस फक्त तुमचेच आहे...
जगा स्वाभिमानानं!!!....  रहा स्वाभिमानानं!!!  बोला स्वाभिमानानं!!!  राज करा स्वाभिमानानं..

कारण ही व्यवस्था बदलवू शकता तुम्ही .... केवळ स्वाभिमानानं!!!



एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Sunday, June 3, 2018

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*धनगर नेत्यांनो! यापुढे अनेक डॉ. भिसे जन्माला येतील.*

                           डॉ प्रभाकर लोंढे
------------------------------------------

                    31 मे हा  दिवस धनगरांच्या दृष्टीने अतीशय अस्मितेचा असला तरी या दिवशी धनगर नेत्यांच्याच कृपेने त्यांच्याच उपस्थितीमध्ये सरकार व्दारा चालवलेली दडपशाही ही धनगर नेत्यांना अशोभनीय आहेत. सत्यवादी, न्यायप्रिय जागतिक कीर्तीच्या महारानीची जयंती आणि त्यादिवशी धनगरांच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या महारानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्याच वंशजांच्या बाबतीत असा कायद्याचा व सत्तेचा गैरवापर करणे ही निंदनीय बाब आहे.  त्याचा सर्वच स्तरावर निषेध झालाच पाहिजे. आणि सत्ता पक्षांत असलेल्या धनगर नेत्यांनी तर तो सर्वप्रथम केलाच पाहिजे.
     सर्वच नेत्यांना व समाजबांधवांना माहित आहेत, धनगरांच्या बाबतीत सरकारने कसा खेळ चालवलेला आहे,  कशा प्रकारे प्रत्येक मुद्दा हा राजकारणाच्या दृष्टीने समाजामध्ये फुट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून​ वापरलेला आहे, जे सरकार धनगरांच्या मतसंख्येवर सत्तासंपन्न झालं, त्यांनी धनगरांचा एकही प्रश्न सोडवलेला नाही, ते सोडवण्याची चिन्हही दिसत नाही, हे सर्व धनगर नेत्यांना सुद्धा समजून चुकले आहे.

                असं हे  सगळं समजत असताना चौंडी मध्ये सरकारच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करण्याचा घाट घातला गेला. (काहींच्या मते, तो सरकारी कार्यक्रम नव्हता त्यांनी समजून घ्यावे की, मग आपल्याच लोकांवर चौंडीमध्ये येण्याची बंदी का घातली होती. सरकारच्या वतीने चौंडीच्या कार्यक्रमाची लोकमत पेपर ला जाहिरात का दिली?) याचा अर्थ सामान्य धनगरांना आमच्या पराक्रमी आदर्श व्यक्तिमत्वांची, आमच्या अस्मितेची जयंती साजरा करण्याचा अधिकार आम्हाला नाही काय? आम्हाला अहील्याईच्या  जयंती दिनी चौंडी मध्ये जाण्याचा अधिकार नाही काय? सरकार आमच्या सर्वच बाबींवर नियंत्रण आणणार असेल तर आमच्या धनगर नेत्यांची कर्तव्यबुद्धी काय ?
        आमच्या होळकरशाहीच जवळपास सर्वच वैभव सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहे.  नको तीथे त्याना अपेक्षित पुतळे बसवले आहे (राजबाग पेलेस) आता आमच्या श्रद्धास्थानावर बंदी आणली काय? आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे सरकारी कार्यक्रमात मागणार असेल तर त्यांच्यावर आपण बंदी आणणार आहेत काय? तुम्ही आमचे किती प्रश्न सोडवले याचा कधी आलेख मांडणार आहात काय​? तुटपुंजा आश्वासनांवर छातीठोकपणे स्वतःची  बळवणार्‍या व श्रेयासाठी झगडणाऱ्या धनगर नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनो! खरच जर आपला सर्वांचा स्वाभिमान जागृत असेल तर आपल्याच बांधवांनी आपल्याच बहिणीवर अत्याचार केल्याचे खोटे कलम  पुलिस/सरकार लावत असेल, त्याआधारे तुरुंगात टाकत असेल, व एखाद्याचा संयम सुटला आणि त्याने एका पोलिस कर्मचाऱ्यांवर जर दगड उगारला तर  सर्वच धनगर बांधवांना तुरुंगात टाकणार आहात काय? त्यांच्यावर खोटे गुन्हे तुम्ही सहन करून घेणार आहात काय? आपण ते सर्व​ शांतपणे तमाशा पाहत असाल, तर यापुढचा तमाशा करण्यासाठी प्रत्येक सामान्य धनगर मानसिक दृष्ट्या तयार होत आहे, त्यालाही पाहण्यासाठी तयार रहावे लागणार नाही हे कशावरून म्हणता येईल???.. कारण प्रत्येक जागृत धनगर तरुण आज डॉक्टर भिसे बनायला तयार आहेत. तेव्हा समजून घ्या, समाजाचा संयम सुटतो आहे. आज सरकारच्या कार्यक्रमांमध्ये अनपेक्षित अपरीहार्य धुडगूस झाला. उद्या आपणा सर्वानाच आपल्याच समाजात जगणं मुश्किल होऊन जाईल, तेव्हा आपल्या बांधवां वरचे खोटे गुन्हे प्रथम मागे घ्यायला लावणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यानो! भलेही नका देऊ आरक्षण!! नका करू नामांतरण!! ते कसं मिळवायचं ते यापुढे आपण ठरवू. पण आमच्या तरुण बांधवांना खोटे आरोप लावून  तुरुंगात टाकण्याचं तरी पाप होणार नाही, कृपया याची खबरदारी घेणे प्रत्येक धनगर माणसाचे कर्तव्य आहे. याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आता आमची चूक आमच्या लक्षात आलीय, की आरक्षण विरोधी भूमिका असलेल्या पक्षांकडूनच आम्ही आरक्षणाच्या अंमलबजावणी ची अपेक्षा करित राहीलो...... पण व्यर्थ!!!!
         गेल्या चार वर्षांत सरकारला जाब विचारण्याची संधी मिळत नसताना,व नेतेसुध्दा सत्य बाजू मांडत नसताना चौडीमध्ये सरकारने अहिल्याईची जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला, यामुळे संधी चालून आली होती, तिचा लाभ घेऊन सरकारला जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याचा वापर करणाऱ्या धनगर बांधवांवर बंधने टाकण्या साठीच हे सरकार स्थापन करण्यात धनगरा​नी मदत केली आहे काय? (धनगरा मुळे सरकार स्थापन झाले-- मुख्यमंत्री)
        ३१ तारखेला धनगर तरुणांनी आपल्या मागण्या सरकारच्या कार्यक्रमात उजागर करण्याचा प्रयत्न केला. त्या अगोदरच आमच्या धनगर तरुणांवर बंदीचे आदेश!
चौंडीमध्ये दुसरा कार्यक्रम होणार नाही या दृष्टीने सरकारी दक्षता!! यातून काय स्पष्ट होते?????        
        सरकारने आपल्या उपस्थितीत धनगरांच्या बाबतीत दडपशाही लावली आहे, या वाक्यात कुठे संदिग्धता दिसते आहे काय?   आता आम्हा प्रत्येक सामान्य धनगरांना सुद्धा प्रश्नच पडला आहे, आम्ही किती संयम ठेवायचा? तरी सुद्धा आम्ही संयम बाळगून आहोत.नेत्यांवरचा विश्वास सुध्दा सांभाळून ठेवला आहे. सर्व नेत्यांना कळून चुकलंय की सरकार धनगराच्या कोणत्याच प्रश्नावर निर्णय घेंतांना दिसत नाही.  असे असताना धनगर तरुण वर्गाला शांत रहाणे खूप खूप कठीण होत आहे ही बाब सर्वांनाच लक्षात आलेली​ आहे.
      एखाद्याशी नेहमीच खोट बोलता येईल पण सर्वांनाच सदासर्वकाळ खोट बोलून दिशाभूल करता येणार नाही. बांधवांनो!! आतातरी सत्य स्वीकारा आणि सत्याची कास धरून खऱ्या अर्थाने आम्ही धनगर अहिल्याईचे एवढंच नाही तर सर्वच होळकरशाहीचे,  मौर्य साम्राज्य सोबतच आमच्या सर्वच राजकीय इतिहासाचे सत्यवादी वारसदार आहोत ही बाब जगाला दाखवून द्या..
          यातील पहिलं काम म्हणजे धनगर बांधवावर लावलेले खोटे आरोप मागे घ्यायला​ भाग पाडा.
पहिल्यांदा धनगर तरुणांना तुरुंगाबाहेर काढा....
धनगर प्रश्नांवर राजकारणाच्या नाही तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करा.
जमात आता बेइमानी खपवून घेण्यास असमर्थ होत आहे याही बाबी कडे विशेष लक्ष द्या...
समाजात नेहमी सत्यच मांडा. कारण धनगर नावाचं एक घर आहेत. घरात असत्य बोलून चालत नाही.

 *नाही तर प्रत्येक घरात डॉ भिसे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही.*


 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Thursday, May 17, 2018


महाराष्ट्रातील​ तिसरी आघाडी :: प्रस्थापित विरुद्ध विस्थापित..
-------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे
-----------------------

महाराष्ट्रातील सत्ताकारणामध्ये​ संयुक्त पुरोगामी आघाडी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पर्याय म्हणून अलीकडे तिसरी आघाडी निर्माण होताना व जोरदार पाठिंबा मिळतांना दिसून येत आहे. आतापर्यत महाराष्ट्रातील संपूर्ण सत्ता पहिल्या दोन आघाड्यांमध्ये प्रमुख​ पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या पक्षानींच उपभोगलेली आहे. या सर्व पक्षांची विचारधारा यापेक्षा कृती कार्यक्रम येथील विशिष्ट प्रस्थापितांना प्रस्थापित करणारा आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी मोठी सामाजिक दरी निर्माण झालेली आहे.
         अशा  या परिस्थितीत असलेल्या महाराष्ट्रीयन लोकसमुदायाचे/ समाजाचे, कार्ल मार्क्स च्या मते "आहे रे (have's)"  आणि "नाही रे(have's not)" असे स्पष्ट वर्गीकरण करता येते. यातील "आहे रे" हा वर्ग नेहमीच सत्ताधीश तर "नाही रे" वर्ग नेहमीच सत्ताहीन राहिलेला आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात पॅकेज, मदतीच्या,  दयेवर, आशेवर उपेक्षित जगत आला व  जगताना दिसून येतो आहे. महाराष्ट्रातील​ कष्टकरी वर्ग, छोट्या-मोठ्या जातीं जमातीं या रूपाने  जगत  आहे.  हे वर्ग देशात लोकशाही व लोकशाही संविधान असतांना सुध्दा संविधानिक अधिकारांसाठी, सत्ताधारी (आहे रे) वर्गाकडून अपेक्षा  करीत उपेक्षित जगत आहेत. राजकीय सत्तेत प्रस्थापित असलेला आहे रे,  हा वर्ग संख्येने फार थोडा असून बहुसंख्य असलेला विस्थापित/नाही रे, हा वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिलेला आहे. ही स्थिती वरवर पाहता लक्षात येत नसली तरी लोकशाहीच्या तळाशी याचे भयान अस्तित्व लक्षात येते.  त्यामुळेच या महाराष्ट्रा पुरता विचार करता, महाराष्ट्रात लोकशाही पूर्णता रुजली आहे असे म्हणता येत नाही. हा विस्तापित वर्ग सत्ताहीन असल्याने विचारांने संघटित नसला तरी आज त्याला आपल्या शोषणा विषयी संपूर्ण जाणीव निर्माण झालेली आहे.
     असा तो महाराष्ट्रातील "आहे रे" वर्ग हा बीजेपी, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून आतापर्यत नेहमीच सत्तेमध्ये राहिलेला आहे.  सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने हा वर्ग या पक्षांच्या माध्यमातून नेहमी विकासाचा आशावाद, धार्मिक भावना, धार्मिक प्रश्न, वाद, जातीयवाद, दंगली, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, अंधश्रद्धा, अशा मुद्दांचा आधार घेतात, असे दिसून येते. या सर्व मुद्यांवर महाराष्ट्रातील संपूर्ण उपेक्षित/ नाही रे वर्ग भावनिक होवून या सर्व पक्षांच्या माध्यमातून प्रस्थापित/आहे रे वर्गानी आपल्या पाठीशी लावून ठेवलेला आहे. यांचे मतदान या चार पक्षांपेक्षा इतरांना जाणार नाही,  किंवा तसा इतर पर्याय निर्माण होणार नाही, याची वेळोवेळी​ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आज पर्यंत यांच्या व्यतिरिक्त सत्ता इतरत्र गेलेली​ नाही.
                   राजकीय सत्तेचा वापर करून या वर्गाने स्वतःची केवळ सत्ताकेंद्र काबीजच नाही तर मजबूत केली आहे. या सर्वच पक्षांनी येथील सत्ता हस्तगत करून येथील, आहे रे वर्गाला त्यांनी संगनमताने प्रस्थापित केले आहे.
           यासाठी या पक्षांनी, विस्थापित, नाही रे वर्गातील काही तितरं (आपल्या उपेक्षित वर्गाचं/उपेक्षित जाती-जमातींच प्रतिनिधित्व करण्याचं सोंग करण्यात पटाईत असलेले, प्रसंगी प्रस्थापित वर्गाशीच बांधीलकी जपणारे) आपल्या हाताशी पकडलेले आहे. व त्यांच्या माध्यमातून हे पक्ष, नाही रे वर्गाला आपल्याशी बांधून ठेवण्याचा/ बांधीलकी जपण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असतात. ही बाब विस्थापित/नाही रे वर्गातील जाणकारांना अलीकडच्या काळात लक्षात आलेली आहे.
        याच जाणिवेतून महाराष्ट्रात या वर्गात अस्मितेचे वारे वाहू लागले आहे. त्यातूनच तिसरी आघाडी जन्माला येण्याची पार्श्वभूमी तयार झाली.  यामुळे बारा बलुतेदारांची, उपेक्षित, वंचित, भटक्या-विमुक्त, दलित-आदिवासी, मुस्लीम, इतर मागासवर्गीय घटकांची राजकीय सत्तेसाठी महत्त्वाकांक्षा वाढली. त्यातूनच महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडी ची संकल्पना वास्तविक रूप धारण करू लागली. सामाजिक-राजकीय आराखडे, खलबते आखण्यास सुरुवात झाली. अनेक मतप्रवाह विचारप्रवाह असलेल्या विविध सामाजिक राजकीय संघटना या आघाडीमध्ये समाविष्ट होताना दिसू लागल्या. हा तिसऱ्या आघाडीचा प्रवाह नक्कीच प्रलयात रूपांतरित होईल, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. येणाऱ्या काळात ही आघाडी प्रस्थापित बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अनीतीमत्तेवर नक्कीच विजय मिळवेल, हा विश्वास  महाराष्ट्रातील एकूण वातावरण बघता लक्षात येते.
              येत्या 2019 च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये  महाराष्ट्रात ही आघाडी सत्ताधारी बनेलच हे सांगता येत नसले तरी ती येथील राजकीय समीकरणे बदलविण्यास ती नक्कीच समर्थ ठरणार आहे. पिढ्यान् पिढ्यां गारद झाल्यानंतर उपेक्षितांमध्ये राजकीय सत्तेच्या आकांक्षा निर्माणच नाही तर वास्तवामध्ये स्वप्न साकार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपेक्षितांच्या विकासाचे सोंग​ करणाऱ्या, स्ववर्गाच्या हितासाठी उपेक्षितांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या, मुजोर अल्पसंख्यांक​ प्रस्थापित,आहे रे वर्गाला (ज्यांच्याकडे सर्वच आहे) हे समस्त उपेक्षित, नाही रे वर्ग(ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही ) लोकशाहीतील मतदान या शास्त्राच्या माध्यमातून आपल्या मतसंख्येच्या आधारे मोठा धक्का देणार आहे.

उपेक्षित एकता-- उपेक्षित भाग्यविधाता !!!

एकच ध्यास  --- उपेक्षितांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

सत्ता अभंग

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हार चा गजर!धृ!
सत्तेची आस घेऊन येती.
त्यात अहिल्येची मूर्ती.
पंढरपुरी जाहला हो.
ऐक्याचा गजर.

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर.!धृ!

यशवंत-भीम घोष
कानी येती.
त्यात विठ्ठलाची मूर्ती.
स्वाभिमानी रंगले हो
चंद्रभागा तीर..

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर.!धृ!

नैराश्य  हे
गळूनी जाती,
धनगराला या
प्रेरणा मिळती.
पंढरपुरी आले हो
स्वाभिमानी धनगर.

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर!धृ!

-----------------------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
९६७३३८६९६३
कर्तव्यदक्ष जवान

मी राष्ट्रसेवक
मीच खरा देशभक्त
राष्ट्रसेवेच्या अग्नीकुंडात
सदा अर्पितो माझं रक्त.

देश असो वा परदेश
सदा शत्रू कडेच लक्ष.
राष्ट्र कार्यातच दक्ष मी.
मात्र संसारातच दुर्लक्ष​.

राष्ट्रच माझं कुटुंब,
तेच जीवनाचे मर्म.
माणूसकीला जपणारे
सदा करतो मी कर्म.

राष्ट्रसेवा-जनसेवा
हाच मी मानतो स्वधर्म
सीमेवर लढतांना
फक्त जानतो राष्ट्रधर्म.

_________________________
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
__________________________

Monday, May 7, 2018

*डॉ. महात्मे साहेब, एकदा खासदारकीच्या राजिनाम्याचा विचार करूनच पहा!*
-------------------------------------------
-------------------------------------------
(वाचकाने, ही माझी मागणी नाही विचारार्थ सुचना आहे.हे गंभीरपणे समजून घेवूनच वाचण्यास सुरूवात करावी. ही विनंती )

 समस्त धनगर बांधवानो! हे वाचून डॉ. साहेबांचे भक्त नाराज होतील. अनूयायी विचार करायला लागतील, विरोधक आनंदी होतील. तो त्यांचा प्रश्न आहे, पण एवढं नक्की  सांगतो,

१) या महाराष्ट्रातील व्यवस्था हालल्या शिवाय राहणार नाही. 

२) पंचवार्षिक मध्ये धनगराना काय दिलं याचा विचार सरकार व तुमचा बीजेपी पक्ष केल्या शिवाय राहणार नाही.

३) बीजेपीला जो आपल्या माध्यमातून धनगरांना मार्गाने लावल्याचा/  लावण्याचा विश्वास वाटतो आहे,  तो खंडित झाल्याशिवाय राहणार नाही.

४) आपण स्थापन केलेल्या  धनगर आरक्षण संघर्ष समीतीचे  बीजेपीशी काहीही देणेघेणे लागत नाही हे सिध्द होईल.

५) धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी आपणास खासदार बनविलं की बी.जे पी पक्षासाठी हे सुद्धा स्पष्ट होईल.

६) खासदारकीचा राजिनामा दिल्याने धनगर समाजाचं किंवा डॉ. साहेबांचं  खूप काही खाजगी  नुकसान होईल असं वाटत नाही. पण आपण स्विकारलेला पक्ष, सरकार, व ही व्यवस्था यांच्यावर धनगर जमातीचा नक्कीच दबाव निर्माण होईल.

७)  धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी धनगरानी ठरविलेला समाजनेता ही आपली मूळ भूमिका कायम राहील. व त्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सिध्द होईल.

८) आपण खासदारकी सोडल्याने आपल्या कार्यशैली तसेच  कार्यक्षमतेत कमी होईल असे नक्कीच वाटत नाही.

९) आपण समाजासाठी विशेष नेञतज्ञ पद्मश्री डॉ विकास महात्मे  म्हणून सन्माननिय आहात व नेहमीच असाल. त्यापेक्षा मोठ काम आपल्या हातून खासदार म्हणून ही व्यवस्था किंवा सरकार किंवा बीजेपी पक्ष होवू देईल असं आजतरी  मला वाटत नाही.

१०) विदर्भात महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असतांना व सोबतच धनगरांनी बीजेपीला मते दिल्याने सरकार स्थापन झाल्यानंतर, विदर्भात धनगर खासदार असतांना आपल्या बीजेपी पक्षाकडून धनगरांचा खूप मोठा राजकीय  फायदा झाला आहे. असे वाटत नाही,

११) विदर्भातील एकाही महानगरपालिकेत (विशेषतः नागपूर/चंद्रपूर) आपल्या  बीजेपी पक्षाने एकही उमेदवार धनगर दिला नाही. (नागपूर म. पालिका स्विकृत सदस्यत्वासाठी काय झालं हे आपल्यालाच माहित आहे)

 १२) जिल्हा परिषद /पंचायत समिती साठी इच्छुक धनगर नेत्यांनी उभे राहू नये  यासाठी आपणावर किती दबाव आला होता, हे मी आपणास सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

१३) आपल्या शब्दाचा/ खासदारकीचा मान राखून बीजेपी पक्षाने धनगर नेत्यांना उमेदवारी दिली, असं कधी लक्षात आलं नाही.

१४) आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आमच्या  (डॉ. तात्या साहेब लहाने यांच्या तोडीचा)  नेञतज्ञाला आदर्श मेंढीफार्म स्थापन करायला लावण्यास (धनगरांनी मेंढ्याच राखल्या पाहीजे) हे सरकार यशस्वी झाले , ही या सरकारने धनगरांना दिलेली सर्वात मोठी देणगी मला वाटायला लागली आहे. याचा सुद्धा विचार करावा.

१५) माझ्या या सुचना विचारात घेतल्याच पाहीजे ही बळजबरी नाही. माञ न पटल्यास क्षमा असावी.

१६) अशा सुचना करण्याचा मला व्यक्तीगत काहीही अधिकार नाही. पण धनगरांची ताकद पाहून बीजेपी ने आपणास खासदार बनविलं, याची आपणास जाणीव असल्याने व मी केवळ धनगर जमातीचा राजकीय अभ्यासक एवढाच माझा अधिकार वापरून मी या सुचना केलेल्या आहे.

ही माझी सुचना केवळ धनगर जमाती संबंधाने त्यांच्या पक्षापुरती जबाबदारी डॉ साहेबांवर, डॉ. साहेबांचा दबाव आता केवळ बीजेपी पक्षावर निर्माण व्हावा. दबावातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर विदर्भातील तरी धनगर नेत्यांचा राजकीय विकास व्हावा. (विदर्भातील धनगर राजकीय सत्तेत नगन्य आहे)  एवढाच माझा निष्कलंकित हेतू आहे....


*जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*आपलाच*
*धनगर बांधवांचा शुभचिंतक*
डॉ. प्रभाकर लोंढे
गोंदिया-चंद्रपूर
९६७३३८६९६३
एक धनगर -लाख धनगर

धनगर  बांधवांनो! (नेते,कार्यकर्ते)

१)काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे राजकीय पक्ष धनगरांना उमेदवारीच देत नाही तर धनगरांनी या पक्षांमध्ये का रहावं.???

२) धनगरांनी या पक्षाना साथ का द्यावी? धनगर नेत्यांच्या शब्दाला मान देऊन सामान्य धनगरांनी या पक्ष्यांच्या नेत्यांना मतदान का करावे???

३) ज्यांनी गेल्या पासष्ट सत्तर वर्षात तुमचे घटनात्मक आरक्षण मिळू दिला नाही त्यांच्यासोबत राहून तुम्ही काय साध्य केलं???

४) या पक्षांमध्ये काम करणाऱ्या धनगर नेत्यांना कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून धनगरांचं राजकीय शोषण या पक्ष्यांनी केलं यापुढेही असेच होणार असेल तर तुम्ही त्यामध्ये का काम करावं????

५) धनगर नेत्यांनो तुमच्या या पक्षांनी तुमच्या असलेल्या निष्ठेमुळेच भूतकाळात धनगरांची राजकीय बरबादी झाली ती यापुढेही आपण सहन करणार आहात काय? आणि किती दिवस होऊ देणार आहात???

६) या पक्ष्यांमधील काही राजकीय नेते तुमच्या बाबतीत विरोधी भूमिका घेऊन मजुरी करतात त्यांना कधी तुम्ही धडा शिकवणार आहात काय???

७) तुम्ही स्वाभिमानी धनगर आहात ही बाब त्यांना कधी    लक्षात आणून देणार आहात???

८) ह्यापुढे आपल्या भूमिका स्पष्ट करून आपल्या पक्षात काम करणार आहात की नेहमीप्रमाणे use & through???

९) आपल्या अस्तित्वाची जाणीव पक्षांना करून देण्यासाठी आपण अजेंडे आखले आहेत काय??????

१०) यापुढे तरी आपल्या पक्षातून धनगरांना उमेदवारी मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न होणार आहेत का????

 (या प्रश्नांची उत्तरे स्वतःच स्वतःशी द्यावी ही विनंती)

धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणिवा जागृती चांगला अभ्यासक

                           डॉ.प्रभाकर लोंढे.