Sunday, December 20, 2020

ऋणानुबंध

 ऋणानुबंध


जेव्हा आपलेच 

आपल्याला खेटतात,

नकळत लुटतात.

पुन्हा नाक वर करून भेटतात.

तेव्हा होतो वेदनांचा 

महाभयंकर कडकडाट,

मनाचा थरथराट.


अशा विस्फोटक अवस्थेत

दु:खानी भरलेल्या ढगातून

नकळत ढसाढसा 

अश्रुंचा पाऊस बरसावा.

अन् आलेल्या महापुरात

वाहून जावी ती 

दु:खांची जळमटं.

निर्विकार नात्यांसाठी....

अन् त्या नात्यांच्या समृद्धीसाठी.....


हे शक्य होत नाही

तेव्हा उभा राहतो 

नात्यांचा महाभयंकर कलह

नात्यांच्याच विरोधात

अणि त्या कोलाहलात

नष्ट होवून जातात नाती...

मग रक्ताची असो वा 

असो जिव्हाळ्याची....


डॉ प्रभाकर लोंढे

मातृदेवता

 मातृदेवता


असेल कोट्यावधी देवता

या जगात‌ पण 

माझा देव जन्मदात्या मायेत आहे 

गाई मध्ये काय शोधता राव

तिच्यातही वासराची माय आहे.


ज्या घरात माय आहे

तेथे एकाच काय ?

सर्वच देवाचा वास आहे.

मायेशिवाय घर म्हणजे

घर नसून वनवास आहे.


अरे जाणून घ्या 

घरातील वृद्ध मातेचं महत्त्व

ती तर घरातील स्वास आहे.

करीत असेल जराशी किटकिट

पण तिच्या प्रत्येक कृतीला

तुमच्याच भल्याचा ध्यास आहे.


दगडांना नवस अन्

पोथ्या पुराणं वाचत बस

यापेक्षा जन्मदात्या मातेला

देवता माणून घराचच

मंदिर बनविणारा जगातील खास आहे.

विचारता काय राव 

त्याच्याच जगण्याला माणूसकीचा वास आहे...



डॉ प्रभाकर लोंढे

Sunday, July 19, 2020

वर्तमान सासूबाई

वर्तमान सासूबाई

बर आहे सुनबाई
तुमचा जमानाच मोठा हाय.
तुमच्या या जमान्यात
आता काहीच कमी नाय.

खिशात तुमच्या नवरा अन्
तुमची हवाच अलग  हाय.
वृद्धाश्रमात जाऊन पडली
जरी तुमच्या नवऱ्याची माय.

बेस वाटते तुम्हाले
तुमचे जन्मदाते बाप माय.
नवऱ्याचे मायबाप तुम्हाले,
काव्हून सहन होत नाय?

हाच होय काय नविन
तुमचा जमाना अन् फ्रेंड बाय.
रोजच घसरताना दिसतोय,
तुमचा जागोजागी पाय.

सासरा झोपला उपाशी
अन् सासू कन्हत हाय.
मोबाईल वर गेम खेळताना
कशी लाजही वाटत नाय?

सगळे झाले ऑनलाईन
म्हणे उधारीवर भेटते बाप माय.
तुमच्या जमान्यात लेकराले
मायेची माया कळेल काय?

चालवा बाई तुम्ही मोबाईल
अन् तुमचं ते व्हाय फाय.
पोरांनं लाथ मारल्यावर म्हणाल,
हे कसं झालं वो माय!

वटयात रडते लेकरू
गोठ्यात हंबरते गाय.
तुमच्या पेक्षा बरी वाटते वो
त्या वासराची माय.....

पिझ्झा, बर्गर, पुन्हा काही
जसी तुम्हा सुटली खाय खाय.
अन्नासाठी भटकते वो
त्या गरिब लेकरांची माय..

बदला बाई किती बदलायचं तर,
जमाना तुमचाच नक्की हाय.
जिवंत ठेवा फक्त ती,
तुमच्यातली लेकरांची ती माय..


                       तुझीच सासू
________________________________

डॉ प्रभाकर सीमा लोंढे
गोंदिया ९६७३३८६९६३

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..

धनगर नेत्यांनो!! भावनेपेक्षा बुध्दी ला प्राधान्य द्या..


                             डॉ प्रभाकर लोंढे


            समाजात जगत असताना मनुष्य नेहमी भावना व बुद्धी या दोन्हीच्याच भरोशावर जीवनातील निर्णय घेत असतो. बहुतांश वेळा जास्तीत जास्त निर्णय हे बुद्धीपेक्षा भावनेच्याच भरोशावर घेतले जात असतात. परंतु भावनेच्या भरोशावर घेतलेले निर्णय चुकीचे सुध्दा होवू शकतात. त्यामुळे माणसाच्या बुद्ध्यांक(I.Q) पेक्षा भावनांक(E.Q) हा अतिशय योग्य रीतीने वापरणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते असे असले तरी परंतु जेव्हा या भावनेला बुद्धीची जोड मिळत असते तेव्हा ते निर्णय योग्य व परिस्थितीसापेक्ष दीर्घायुषी व हितकारी होत असते. म्हणून कधीही भावनेपेक्षा बुध्दी ला जास्त महत्व देणे कधीही श्रेष्ठ ठरते.
               धनगर जमातीच्या आजच्या संक्रमणावस्थेचा विचार करता त्यामध्ये धनगर नेत्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असून त्यांनी घेतलेले निर्णय हे जमातीसाठी, जमातीच्या तसेच नेत्यांच्या भविष्यासाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे. तेव्हा धनगर नेत्यांनी केवळ भावनेच्या आधारे निर्णय न घेता त्याला बुद्धीची विशेष जोड देऊन प्रत्येक निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. कारण हजारो सामान्य माणसे चुकले तरी त्याचे वैयक्तिक परिणाम होतील परंतु जर एक नेता जर चुकीचे वागत असेल तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. याचे अनुभव धनगर जमातीकडे खूप मोठे आहेत. त्यामुळे इथे उल्लेख करण्याची गरजच वाटत नाही.
              धनगर जमात आज ज्या प्रश्नांना समोर जात आहे, ज्या प्रश्नांमुळे संपूर्ण जमात अस्वस्थ आहे, ज्या प्रश्नांमुळे तरुण वर्ग पेटून उठलेला आहे, ते सर्व प्रश्न धनगर जमातीच्या इतिहासातील नेतृत्वाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे व राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेले आहे. भूतकाळातील धनगर नेत्यांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती सापेक्ष मनात कोणताही कलुषित भाव न ठेवता योग्य ते निर्णय घेतले असते तर आज धनगर जमात प्रगतीच्या शिखरावर राहिली असती. परंतु व्यर्थ!!
          इतिहास नेहमी मार्गदर्शन करीत असतो, झालेल्या चुका सुधारण्याची संधी देत असतो व भविष्याकडे वाटचाल करीत असताना झालेल्या चुका पुन्हा होणार नाही, याची खबरदारी घ्यायला सुद्धा शिकवतो. हीच बाब या ठिकाणी प्रत्येक धनगर नेत्यांनी(मानत असेल तर) लक्षात घेणे आवश्यक आहे तरच ते जमातीचा विश्वास संपादन करू शकतात. कारण आज धनगर जमातीतील तरुण वर्गाच्या भावनेचा आदर करून बुद्धीच्या आधारे निर्णय घेणारे नेतेच धनगर जमातीचे नेतृत्व करू शकतात हे प्रयोगाने सिद्ध झालं आहे. या अवस्थेमध्ये धनगर जमातीची कार्यक्षमता लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळे अश्या परिस्थितीत परिस्थिती सापेक्ष (व्यक्तीसापेक्ष नाही)असे निर्णय घेत असताना धनगर नेत्यांनी स्वतःच्या भावनेपेक्षा बुद्धीला शाबूत ठेवून, प्रमाण मानून निर्णय घेणे अत्यावश्यक आहे
                  याचे उदाहरण द्यायचे झाल्यास, आज  खोट्या गुन्हयांच्या आधारे जे धनगर तरुण तुरुंगात आहे त्यांना निर्दोष मुक्त करणे, त्यासाठी सरकारवर आवश्यक तो दबाव निर्माण करणे हा धनगर नेत्यांनी भावनेपेक्षा बुद्धीच्या आधारे घेतलेला निर्णय हा केवळ समाजाच्याच हिताचा नाही तर धनगर नेत्यांच्या सुध्दा खाजगी हिताच्या दृष्टिकोनातून नेहमी फायद्याचाच ठरणार आहे. भलेही या आंदोलनकर्त्यांचा प्रचंड राग काही धनगर नेतृत्वामध्ये असेल, अद्दल घडविण्याचा काहींना अभिमान ही वाटत असेल, पुन्हा धनगर जमातीचे तरुण रस्त्यावर उतरणार नाही याचा बंदोबस्त केल्याचा काहींना विश्वासही वाटत असेल.
            हे त्यांचं थोड्या फार प्रमाणात खरं असल तरी ते पूर्ण सत्य होवू शकत नाही. सत्य समजून घेणे व ते स्विकारण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असलीच पाहिजे. सरकारने केलेल्या फसवणुकीची चीड, त्यामध्ये असलेली धनगर नेत्यांची भूमिका, यातून धनगर जमातीतील तरुणांमध्ये निर्माण झालेली उद्विग्नता, यापुढे धनगर तरुणांना नक्कीच शांत बसू देणार नाही आणि म्हणून असे ते धनगर तरुण विद्यमान नेतृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या आंदोलनकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील, कोणावर वैयक्तिक टिका, कोणत्या नेत्यावर वैयक्तिक रागही व्यक्त केला असशील,  तरी परिस्थिती, जमातीची भावना व शुद्ध फसवणूक समजून घेवून त्यांना उदार अंतःकरणाने जमातीचे प्रगल्भ नेतृत्व या नात्याने माफ करण्याचा, निर्दोष मुक्त करण्याचा, (लोकशाहीमध्ये जाब विचारणे गुन्हा नसतो)  निर्णय धनगर नेतृत्वाला नक्कीच दीर्घायुष्य देईल व त्यांनी घेतलेला निर्णय हा जमातीला नेहमीच स्वीकारार्य राहील यात कोणतीच शंका असू शकत नाही.
---------------&-----------------

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास___________&_____________________धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासकडॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Friday, June 19, 2020

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

डॉ प्रभाकर लोंढे

         कुठलीही चळवळ ही एका विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करीत असते. त्या विचाराला मानणारी मंडळी जुळत जातात. तन मन धन देऊन चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. प्रत्येक चळवळीला कार्यकर्त्यांमुळे खरी बळकटी येत असते. त्यातून चळवळ शक्तिशाली होवून आपला मार्गक्रमण करीत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका असते त्यावेळी सामान्य जनता हा चळवळीचा मुख्य आधार असते. चळवळीतील कार्यकर्ते हे चळवळ व सामान्य जनता याना जोडणारा अतिशय महत्वाचा दुवा असते. त्या कार्यकर्त्यांमुळेच जनसामान्यांचा चळवळीवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत जातो. आणि तीच चळवळीची खरी ताकद असते. 
     सामान्यांचा व कार्यकर्त्यांचा विश्वास ही चळवळीची ताकद असल्यामुळे ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. व ती नेतृत्वाची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणून नेतृत्वाकडून घेतले जाणारे निर्णय सामान्य जनता तसेच कार्यकर्ते यांचा विश्वासघात होणार नाही शिवाय चळवळीला कोणतेही नुकसान होणार नाही या दोन दृष्टीने होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच निरंतरता व गतिशीलता हे दोन गुण सदासर्वकाळ चळवळीच्या सोबत राहू शकतात. 
        चळवळ ही कोणाही एका व्यक्तीमुळे नाही तर विचारांमुळे ध्येयाच्या दिशेने प्रवाहित असते. त्यामुळे विचार हा नेहमी चळवळीचा गाभा असलाच पाहिजे. विचारांच्या आधारे निर्माण झालेल्या चळवळीला दिशा देण्याचे कार्य मात्र नेतृत्व करीत असते. त्यामुळे नेतृत्वाने आपली  विवेकनिष्ठा व ध्येयनिष्ठा सोबतच समाजनिष्ठा जपलीच पाहिजे, कारण  नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे चळवळीचे भवितव्य ठरत असते.   
          नेतृत्वाविषयी जनमानसात निर्माण झालेली विश्वासार्हता ही नेतृत्वाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता सोबतच जनभावना व तिचा आदर यावर अवलंबून असते. जनभावनेशी जुळलेली चळवळ वेगाने फोफावत असते. परंतु तिचा अनादर झाला तर त्याचे वाईट परिणाम नेतृत्वावर नाही पण चळवळ व कार्यकर्ता यांच्या वर होतात. कार्यकर्त्यांची तर फार मोठी फजिती होते. कार्यकर्त्यांना तोंड दाखवायला सुध्दा जागा नसते. कारण सामान्य जनतेपर्यंत नेता नाही तर कार्यकर्ता जात असते. चळवळीतील कार्यकर्ताच सामान्य ते असामान्य यांपासून चळवळीसाठी तन-मन-धन जमा करीत असते. त्यामुळे चळवळीतील नेतृत्वाने जनभावनेचा आदर करीत सर्व बाबतीत निर्णय घेणे, पारदर्शकता जपणे अतिशय आवश्यक आहे. 
       चळवळीमध्ये व्यक्ती व व्यक्तीसंबंधी भक्ती या दोन गोष्टी चळवळीला अतिशय मारक असतात. त्यामुळे नेतृत्वाचे विचार व कृती यांचे कार्यकर्त्यांकडून नेहमी समीक्षण व्हायलाच पाहिजे. याच आधारे नेतृत्वाच्या खाजगी कर्तुत्वाचे पोवाडे नाही तर सामाजिक कार्याचा आलेख मांडायला काही हरकत नाही. परंतु तो भक्ती स्वरूपाचा नसावा. त्यासाठी कार्यकर्त्यांची नेतृत्वावर श्रद्धा असलीच पाहिजे परंतु ती अंधश्रद्धा नसावी.
           धनगर चळवळी उभ्या राहत असताना चळवळीतील ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी सर्वांनी समजून घ्याव्या. त्यादृष्टीने कार्य करावे
नाहीतर अनेक महान आत्मे (नेते)जन्माला येतील, चळवळ मात्र जागेवर मरून जातील, कार्यकर्ते कडीपत्यासारखे स्वाद घेवून (वापरून) फेकले जातील, सामान्य माणसांमध्ये नैराश्य, औदासिन्य सातत्याने पहायला मिळतील. सामाजिक प्रश्न जागचे जागेवर पिढ्या बरबाद करतील. समाज मात्र भरकटत राहतील. 
          हे होवू नये असं जर वाटत असेल तर चळवळी भरडल्या जाणार नाही यादृष्टीने सर्वांनी आपली कर्तव्य भावना जपावी. ही विनंती त्यासाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!

डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३..

Wednesday, June 17, 2020

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज!
  
           डॉ. प्रभाकर लोंढे

संपूर्ण समाज विकास प्रक्रियेतील सर्व समाज घटकांच्या त्या समाजासाठी चाललेल्या कार्याचे निरपेक्षपणे समीक्षण केले असता प्रत्येक समाजामध्ये व त्या समाजाच्या चळवळ, वळवळ, उपक्रम, उपद्रव एकूणच विकास प्रक्रियेमध्ये तीन प्रकारचे लोक कार्य करीत असतात. प्रत्येकाचा उद्देश समाज विकास हाच असतो, असा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेला असतो.  हाच त्यांच्यात ठासून भरलेला भाव समाजामध्ये काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करीत असतो. त्याच प्रेरणेने प्रत्येकाचे समाज विकासाच्या नावाने कार्य सुरू असते. आणि त्यातून समाज विकास प्रक्रियेची पावलं पडत असतात. त्या सर्व पावलांचं सरासरी दृष्ट्या चाललेलं मार्गक्रमण समाजाच्या विकास प्रक्रियेचा वेग ठरवत असते.
             माझ्या मते, या सर्व प्रक्रियेत कार्य करणाऱ्यां समाजधुरीणांचे  भक्त, कार्यकर्ता आणि समाजसेवक असे प्रकार आपल्याला वर्णन करता येतात, असं मला वाटत.  असा त्याला पर्यायी विचार सर्वांना नक्कीच करता येईल. तो प्रत्येकाचा अधिकार असतो. आणि तो प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. मात्र सार रूपाने अशा प्रकारचे वर्णन मात्र संयुक्तिक ठरेल. असे वर्गीकरण करताना कितीही कठीण काम असले तरी समाज चळवळीचा ओघ व वेग निश्चित करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे असं मला वाटते.
              धनगर समाजात काम करणाऱ्या या तिन्ही वर्गाची मिळून एकूण संख्या खूप झाले तर १० ते १५ टक्के आहे. त्यातही भक्तांची संख्या अधिक आहे. त्यानंतर तर कार्यकर्त्यांची संख्या व सर्वात शेवटी समाजसेवकांची संख्या फार दुर्मिळ आहे. पहिले दोन वर्ग समाज सेवक हा शब्द कधीकधी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. असो! काही का असेना या दहा पंधरा टक्के लोकांमुळे समाजातील चळवळ व उपक्रम सातत्याने सुरू असतात.  आज समाधान आहे की अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
      आता कोणी म्हणतील या सर्वांची व्याख्या कशी काय करता येईल, हे फार कठीण काम आहे तरी पण मी माझ्या परीने त्याचा प्रयत्न करतो त्यापैकी पहिला प्रकार 
१) भक्त - 
     हा शब्द प्रत्येकानेच ऐकलेला आहे. परंतु समाज चळवळीमध्ये सुद्धा भक्त असतात हे मात्र कदाचित नवीन संकल्पना आहे.  भक्त हा कधीच समीक्षक नसतो. त्याचा एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या विचारावर दृढ विश्वास असतो. त्या व्यक्ती किंवा विचार यापुढे जाऊन सुद्धा नवीन काही असू शकते यावर त्याचा कधीच विश्वास नसतो. किंवा स्विकारायला तयार नसतो.  यापुढे जाऊन काहींना तर अंधभक्त शब्द सुद्धा वापरू शकतो. काही भक्त तर एखाद्या व्यक्तीकडे सत्तेचा लाभ किंवा एखाद्याकडून आर्थिक फायदा मिळवून घेण्यासाठी त्या व्यक्तीची भक्ती करतात किंवा करीत असल्याचं सॉंग सुध्दा करीत असतात.  "..........
  चा मी कट्टर समर्थक" अशा भूमिकेतील लोकांचा  यामध्ये समावेश होतो.

२) कार्यकर्ता 
       हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्याकडे स्वतःचा विचार असतो. तो समीक्षक असतो. चांगलं काय? वाईट काय? हे सुद्धा तो समजून घेत असतो. घेण्याच्या पात्रतेचा असतो. विरोधी विचारांचा सुध्दा त्याला आदर असून त्यातील यथार्थता तो समजून घेत असतो. मान्य करीत असतो. असाच विचारी कार्यकर्ता समविचारी कार्यकर्त्यांशी जुळवून घेत असतो आणि त्यामधून समविचारी कार्यकर्त्यांची एक वैचारिक प्रवाही चळवळ निर्माण होत असते. तीच समाजाचे भले करू शकते आणि अशाच चळवळीची समाजाला आज गरज आहे.  तिथे व्यक्तीना नाही तर विचारांना महत्त्व असतं. विचार प्रमाण असतो पण अंतिम नाही. विचाराची सातत्याने समीक्षा होत असते. आणि त्याच्यातून काळ सापेक्ष विचार स्वीकारला जातो. स्वीकारण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची तयारी असते. अशा कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढ होणे समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
         
      ३) समाज सेवक - हा समाज कार्यकर्त्यांमधील अतिशय महत्त्वाचा प्रकार असून तो खरा समाज सुधारक असतो. त्याला केवळ समाजहिताचा शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची हाव नसते. त्याच्या सर्व बाबी समाज हितासाठीच असतात.  ते समाजहितासाठी केवळ सत्याचे आग्रही असतात. "हाडाचा कार्यकर्ता" शेवटी समाजसेवक  पदापर्यंत पोहचू शकतो. वयाच्या सत्तर च्या दरम्यान असलेल्या अनेक धनगर कार्यकर्त्यांचा समाजसेवक या सदरामध्ये समावेश करू शकतो. माझ्या नजरेत असलेली अनेक नावे मला या ठिकाणी देता आली असती. परंतु याठिकाणी व्यक्तीसापेक्षता टाळण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन स्विकारून मी ती टाळतो आहे. माझ्या साठी ते नेहमी प्रेरणास्थान आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर अशा समाजसेवकाचा शोध घ्यावा ही वाचकांना विनंती
       आता पर्यंत मांडलेले विचार हे माझं मत असल्याने, ते प्रमाण माणण्याची गरज नाही. मात्र त्यावर विचार व्हावा. त्यापेक्षा नवीन विचार समाजासमोर यावा. वैचारिक क्रांती ची पावलं वेगानी पडावी ही मात्र अपेक्षा. 

त्यादृष्टीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

Thursday, May 21, 2020

आ. गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आ. *गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..* 
            (कोणीही भावनात्मक होवून वाचू नये)

                 *डॉ. प्रभाकर लोंढे* 

               इतिहासात महाराष्ट्रातील पेशवाईचा काळ सर्वांना अभिमानाची बाब आहे. म्हणून तो समजून घेण्याची  गरज आहे. कारण भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमानाची पावलं भविष्याकडे टाकत असताना आजची व्यवस्था तशी समजून घेतली तर पेशवाईची पूनर्स्थापना होत आहे. *मराठे सरदार पहीलेच मजबूत बनले आहे. ते पेशव्यांना हातात घेऊन प्रसंगी त्यांची मुंडी मुरगाळून सत्ता उपभोगत आहेत.*  याबाबीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 
          फडणवीस साहेबांनी यापूर्वी मागील पाच वर्षे जी सत्ता उपभोगली तेव्हा *त्यांनी धनगरांना इतकं महत्व दिलं नसलं तरी धनगरांचा साथ मात्र घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.* धनगरांचा आधार घेऊन मराठा सरदारांना शह दिला जाऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटला आहे म्हणून खोटे  का असेना आरक्षणाचे आश्वासन देऊन जानकर साहेब व शिंदे साहेब यांना मंत्री पदापर्यंत सोबत घेऊन आपली पेशवाई मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.  तेव्हा त्यांनी हा विचार केला की येथील मराठा सरदारांना शह देण्यासाठी धनगर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ *त्यांनी पेशवाई व मल्हारराव यांचा पुरेपूर अभ्यास केला आहे.*  तेव्हा त्यांनी ही सुद्धा दक्षता घेतलेली आहे की या *धरगरांमधून पेशवाईवर प्रभाव, दबाव आणि वर्चस्व असलेला नवीन मल्हारराव घडणार नाही.* आणि म्हणूनच त्यांनी पुढचं पाऊल टाकत (माजी मंत्री शिंदे साहेब व इतरांना टाळून) गोपीचंद पडळकर नावाच्या तरुण, उत्साही व्यक्तीला,  *धनगरांना भावनात्मक करू शकेल, तरुणांमध्ये उत्साह भरू शकेल अशा  धनगर उमेदवाराला विधान परिषद दिलेली आहे.*  
          ही विधान परिषद केवळ आणि केवळ धनगर म्हणून दिलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्याप्रमाणे राजश्री *मल्हाररावांशिवाय येथील मराठीशाही किंवा पेशवाईचा झेंडा मातीमोल होता.* (मल्हाररावांनी एकट्याच्या भरोसावर नाही तर आपल्या विविध धनगर सरदारांच्या भरोशावर एवढा वचक निर्माण केला होता. जागोजागी त्यांनी आपली माणसं पेरली होती.) त्याप्रमाणे आजच्या बीजेपीचा झेंडा धनगरांशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून ते मल्हाररावांप्रमाणे धनगरांच्या काही उमेदवारांना हाताशी बाळगत असतात. त्यांना आजच्या लोकशाहीत धनगर मजुरांकडून मल्हाररावांचा पराक्रम अपेक्षित आहे पण वर्चस्व मात्र नक्कीच नाही. *त्यामुळेच ते वारंवार सरदार बदलत असतात.* 
              आज धनगरांना सरदारकी देत असताना आजच्या लोकशाहीतील लोकमताचा भावी काळासाठी विचार करून ते धनगरातील सरदार निवडत असतात.  आज त्यांच्या दृष्टीने असा उपयोगी सरदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ते *वकृत्वाच्या भरोशावर धनगर तरुणांना आपल्या कहेत नक्कीच घेऊ शकतात. तेवढी त्यांची क्षमता सुद्धा आहेत, असं म्हटलं तर चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकत नाही. परंतु ते सर्व गोपीचंद पडळकर साहेबांच्या पुढील धोरण व महत्वाकांक्षा यावर अवलंबून आहे.* 
          थोर सुभेदार राजश्री मल्हारराव उदयास आले, तेव्हा त्यांनी तत्कालीन *धनगर सरदारांचा साथ घेतला होता. त्यांनी बुळे, वाघमोडे, पांढरे, धायगुडे, .......   अशा अनेक धनगर सरदारांना मोठं केलं होतं.* एवढेच नाही तर अनेकांचं  सत्तेत बस्तान बसविलं होतं. अनेकांना आपल्या साम्राज्यात प्रस्थापित केलं होतं.  त्यामुळेच मल्हारराव आपल्या राज्यकारभारात व पेशवाईत यशस्वी झाले होते. त्याच भरोश्यावर त्यानी अटकेपार झेंडे फडकावले होते. ते *त्यांना एकट्याच्या भरोशावर करता आलं नसतं.* 
         आज गोपीचंद पडळकर साहेबांना मल्हाररावांच्या भूमिकेत हाताशी पकडलं असलं तरी शिंदे साहेब, गणेश हाके साहेब यासह अनेक जुने सरदार बीजेपी मध्ये विद्यमान कार्यरत आहेत. आ. महादेव जानकर साहेब तर गोपीचंद पडळकर साहेबांचे गुरु आहेत. मंत्री दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीत असले तरी ते राष्ट्रवादीतील धनगरांचा प्रमुख सरदार आहे. त्यांच्या नेतृत्वात सुध्दा एक महत्त्वाची फळी उभी आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर साहेबांची ४९  भावी आमदारांची तरुण तुर्क फौज सुध्दा सोबत तयार आहे. 
          सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने व स्वतःच्या धोरण निर्धारण व अचूक पावले टाकून गोपीचंद पडळकर साहेबांना आधुनिक पेशवाई मधील सुभेदार राजश्री मल्हारराव बनणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रथमता आपला सर्वांचा शत्रू असलेली मानसिकता ओळखून त्याविरोधात लढण्याची सांघिक नीती निर्धारित होणे आवश्यक आहे तरच *गोपीचंद पडळकर साहेबांना  मल्हाररावांच्या सरदारकीचा सन्मान व स्वराज्याचे वैभव नक्कीच प्राप्त होणार आहे. नाही तर आमदार गोपीचंद साहेबांमधून, शेंडगे, डांगे, महात्मे मात्र नक्कीच घडणार आहे.* 

 *त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!* 


 *डॉ.  प्रभाकर लोंढे* 
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचे अभ्यासक* 
९६७३३८६९६३