Friday, June 8, 2018

धनगरानो! प्रस्थापित फक्त तुमच्या स्वाभिमानालाच घाबरतात..

डॉ. प्रभाकर लोंढे

समस्त धनगर बांधवांनो!! महाराष्ट्रातील एकूण  राजकारणाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये प्रस्थापितांना आपल्या धनगरांच्या स्वाभिमानाचीच भिती वाटत आलेली आहे. त्यामुळेच आपल्यातील स्वाभिमानी माणसं त्यांनी वेळोवेळी हेतुपुरस्सर नष्ट केली आहे किंवा आपल्यातील अशी स्वाभिमानाने जगणारी माणसं निर्माणच होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली आहे.. याचाच परिणाम तुमच्यातील स्वयंभू स्वाभिमानी नेता हा महाराष्ट्रामध्ये आपल्या अधिकारासाठी आपली गोष्ट स्वाभिमानाने व्यवस्थेसमोर मांडताना दिसला नाही. (ज्यांनी मांडली त्यांचे विशेष स्वागत) ज्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे दाबण्याचाच  प्रयत्न झाला आहे. ही वास्तविकता सर्वांना स्विकाराविच  लागेल.
            आजपर्यंत आमच्यात जी काही माणसं/ नेतृत्व निर्माण झाली त्या माणसांना लालूच दाखवून, प्रसंगी देऊन, आर्थिक दृष्ट्या संपन्न करून त्यांना आपल्या खुंट्याला बांधण्याचे काम या व्यवस्थेने केलेले आहे आणि आमच्या नेत्यांना आपल्या खुंट्याला बांधूनच संपूर्ण धनगर जमात आपल्या अधिपत्याखाली कशी राहतील याचा विशेष प्रयत्न केलेला आहे. हे केवळ धनगर जमातींच्याच बाबतीत नाही तर सर्वच उपेक्षितांच्या बाबतीत केलेलं आहे.
       अशा या इतिहासामध्ये जे कोणी स्वाभिमानी नेतृत्व या महाराष्ट्रात निर्माण झाले असतील त्यांचे विशेष स्वागत आम्ही करतोय परंतु अशा धनगर बांधवांचं किंवा नेतृत्वाचं पर्सेंटेज काय? हा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर शोधायला आम्हाला दारोदार फिरावं लागतं..... आणि उत्तर मिळालंच तर ते झिरो पाईंट झिरो पाईंट...  अशा आकडयात लक्षात येतं. त्यामुळेच आपले प्रश्न सुटू शकलेले नाही. हे सत्य स्विकाराव लागत. उलट आमच्या प्रश्नांची जटिलता निर्माण कशी करता येईल याचा विशेष प्रयत्न या व्यवस्थेने केलेला आहे. त्याचे वाहक आमचे नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बनले आहेत.
            आमच्या नेत्यांनी प्रसंगावधान राखून आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व निर्माण केले असते​ किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं असतं तर आजपर्यंत स्वाभिमानी नेतृत्वाची फौज आमच्या-तुमच्यामध्ये दिसली असती. आमचे नेते कोणत्याही पदाच्या लालसेला बळी पडले नसते तर त्यांच्या स्वाभिमानी नेतृत्वागुणापुढे ही व्यवस्था नक्कीच​ झुकली असती आणि त्या झुकलेल्या व्यवस्थेची तुमच्या बांधवांवर खोटे आरोप लावण्याची हिंमतही झाली नसती..  तुमच्या प्रश्नांना कधीच ठेंगा दाखवू शकली नसती.
           आज पर्यंत आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व यांना सहन झाले नाही. आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व लाचार कसे बनतील याचाच प्रयत्न प्रस्थापितांनी केलेला आहे. म्हणून आज स्वाभिमानानं आव्हान करणारे आमचे नेतृत्व यांना खपत नाही. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न या प्रस्थापीत व्यवस्थेची नित्याचीच बाब बनली आहे. म्हणून डॉक्टर भिसे व इतर टीम यांनी स्वाभिमानाची व आपल्या हक्काची मागणी केली असता यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेने चालवलेला आहे..  या व्यवस्थेकडून होणारा असा प्रयत्न हा पहिल्यांदा किंवा नवीन नाही. हा सातत्याने प्रयत्न सुरू राहीलेला आहे. (गोवारी हत्याकांड)  म्हणूनच आमच्या नेतृत्वाला उधाण आलेलं नाही पण आज आमच्या तरुणाईचा काळ आहे. आज धनगर तरुण स्वाभिमानाने पेटलेले आहेत.
              या स्वाभिमानी नेतृत्वामध्ये या तरुणांना कोणीही फसवू शकत नाही कारण स्वाभीमान ज्याचा जागा असतो त्याला लाचारीने जगण्याची आदत नसते. तो कधीच गुलाम म्हणून जगत नसतो. त्याला कोणतीही गुलामी पसंत नसते. तो आपले प्रश्न कोणाकडे भीक मागून सोडवण्याच्या मानसिकतेत नसतो. "लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची" ताकद त्यांच्यात असते. आणि अशा प्रकारची नेतृत्व क्षमता असलेला तरुण वर्ग आज धनगर जमातीमध्ये दिसायला लागलेला आहे. नक्कीच व्यवस्था परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थेत आपलं स्वाभिमानी स्थान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. अशा व्यवस्था परिवर्तनामध्ये तुमचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या प्रश्नांना बगल​ देण्याची हिंमत या व्यवस्थेमध्ये राहणार नाही आणि म्हणूनच तुमचा स्वाभिमान जागा करा. जिथे कुठे लाचारीच्या गोष्टी होत असेल त्यांना हाणून लावा, ही व्यवस्था तुम्हाला तुमचे अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही.
               लोकशाहीमध्ये अधिकार कधी मागून मिळत नाही. हिसकावून घेतल्या शिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाही.  लोकशाहीमध्ये राजकीय सत्तेशिवाय कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून हा तरुण आज राजकीय सत्ता हातात घेण्याच्या मागे लागलेला आहे. "सत्तासंपादन निर्धार मेळावा" याचं पहिलं पाऊल आहे. त्याची भीती या प्रस्थापितांना वाटू लागली आहे. तुमचा स्वाभिमान हीच यांची कमजोरी आहे आणि म्हणून प्रस्थापितांना दाबायचं असेल तर तुमच्या स्वाभिमानाचा उदो उदो आणि तुमच्या प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झालाच पाहिजे. ज्या दिवशी स्वाभिमानाची प्रत्येक गोष्ट या महाराष्ट्राचा आवाज मोठा करेल त्या दिवशी या व्यवस्थेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.  त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये कोणताही वाकड तोंड करणारा किंवा वाईट नजर टाकणारा तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही.  कारण तुमचा  स्वाभिमानच या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला पूरून उरलेला आहे, हा यशवंतरावांचा, मल्हाररावांचा इतिहास आहे, हा राजमाता अहिल्याबाईंचा इतिहास आहे आणि एवढंच नाही तर चंद्रगुप्त मौर्या सारख्या पराक्रमी पुरुषांचा इतिहास तुमचा इतिहास आहे तर उठा इतिहास पुनर्जागरणासाठी जागे व्हा!!!!!    रात्र वैऱ्याची असली तरी दिवस फक्त तुमचेच आहे...
जगा स्वाभिमानानं!!!....  रहा स्वाभिमानानं!!!  बोला स्वाभिमानानं!!!  राज करा स्वाभिमानानं..

कारण ही व्यवस्था बदलवू शकता तुम्ही .... केवळ स्वाभिमानानं!!!



एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Sunday, June 3, 2018

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*धनगर नेत्यांनो! यापुढे अनेक डॉ. भिसे जन्माला येतील.*

                           डॉ प्रभाकर लोंढे
------------------------------------------

                    31 मे हा  दिवस धनगरांच्या दृष्टीने अतीशय अस्मितेचा असला तरी या दिवशी धनगर नेत्यांच्याच कृपेने त्यांच्याच उपस्थितीमध्ये सरकार व्दारा चालवलेली दडपशाही ही धनगर नेत्यांना अशोभनीय आहेत. सत्यवादी, न्यायप्रिय जागतिक कीर्तीच्या महारानीची जयंती आणि त्यादिवशी धनगरांच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या महारानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्याच वंशजांच्या बाबतीत असा कायद्याचा व सत्तेचा गैरवापर करणे ही निंदनीय बाब आहे.  त्याचा सर्वच स्तरावर निषेध झालाच पाहिजे. आणि सत्ता पक्षांत असलेल्या धनगर नेत्यांनी तर तो सर्वप्रथम केलाच पाहिजे.
     सर्वच नेत्यांना व समाजबांधवांना माहित आहेत, धनगरांच्या बाबतीत सरकारने कसा खेळ चालवलेला आहे,  कशा प्रकारे प्रत्येक मुद्दा हा राजकारणाच्या दृष्टीने समाजामध्ये फुट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून​ वापरलेला आहे, जे सरकार धनगरांच्या मतसंख्येवर सत्तासंपन्न झालं, त्यांनी धनगरांचा एकही प्रश्न सोडवलेला नाही, ते सोडवण्याची चिन्हही दिसत नाही, हे सर्व धनगर नेत्यांना सुद्धा समजून चुकले आहे.

                असं हे  सगळं समजत असताना चौंडी मध्ये सरकारच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी करण्याचा घाट घातला गेला. (काहींच्या मते, तो सरकारी कार्यक्रम नव्हता त्यांनी समजून घ्यावे की, मग आपल्याच लोकांवर चौंडीमध्ये येण्याची बंदी का घातली होती. सरकारच्या वतीने चौंडीच्या कार्यक्रमाची लोकमत पेपर ला जाहिरात का दिली?) याचा अर्थ सामान्य धनगरांना आमच्या पराक्रमी आदर्श व्यक्तिमत्वांची, आमच्या अस्मितेची जयंती साजरा करण्याचा अधिकार आम्हाला नाही काय? आम्हाला अहील्याईच्या  जयंती दिनी चौंडी मध्ये जाण्याचा अधिकार नाही काय? सरकार आमच्या सर्वच बाबींवर नियंत्रण आणणार असेल तर आमच्या धनगर नेत्यांची कर्तव्यबुद्धी काय ?
        आमच्या होळकरशाहीच जवळपास सर्वच वैभव सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहे.  नको तीथे त्याना अपेक्षित पुतळे बसवले आहे (राजबाग पेलेस) आता आमच्या श्रद्धास्थानावर बंदी आणली काय? आम्ही आमच्या मागण्या सरकारकडे सरकारी कार्यक्रमात मागणार असेल तर त्यांच्यावर आपण बंदी आणणार आहेत काय? तुम्ही आमचे किती प्रश्न सोडवले याचा कधी आलेख मांडणार आहात काय​? तुटपुंजा आश्वासनांवर छातीठोकपणे स्वतःची  बळवणार्‍या व श्रेयासाठी झगडणाऱ्या धनगर नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांनो! खरच जर आपला सर्वांचा स्वाभिमान जागृत असेल तर आपल्याच बांधवांनी आपल्याच बहिणीवर अत्याचार केल्याचे खोटे कलम  पुलिस/सरकार लावत असेल, त्याआधारे तुरुंगात टाकत असेल, व एखाद्याचा संयम सुटला आणि त्याने एका पोलिस कर्मचाऱ्यांवर जर दगड उगारला तर  सर्वच धनगर बांधवांना तुरुंगात टाकणार आहात काय? त्यांच्यावर खोटे गुन्हे तुम्ही सहन करून घेणार आहात काय? आपण ते सर्व​ शांतपणे तमाशा पाहत असाल, तर यापुढचा तमाशा करण्यासाठी प्रत्येक सामान्य धनगर मानसिक दृष्ट्या तयार होत आहे, त्यालाही पाहण्यासाठी तयार रहावे लागणार नाही हे कशावरून म्हणता येईल???.. कारण प्रत्येक जागृत धनगर तरुण आज डॉक्टर भिसे बनायला तयार आहेत. तेव्हा समजून घ्या, समाजाचा संयम सुटतो आहे. आज सरकारच्या कार्यक्रमांमध्ये अनपेक्षित अपरीहार्य धुडगूस झाला. उद्या आपणा सर्वानाच आपल्याच समाजात जगणं मुश्किल होऊन जाईल, तेव्हा आपल्या बांधवां वरचे खोटे गुन्हे प्रथम मागे घ्यायला लावणे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यानो! भलेही नका देऊ आरक्षण!! नका करू नामांतरण!! ते कसं मिळवायचं ते यापुढे आपण ठरवू. पण आमच्या तरुण बांधवांना खोटे आरोप लावून  तुरुंगात टाकण्याचं तरी पाप होणार नाही, कृपया याची खबरदारी घेणे प्रत्येक धनगर माणसाचे कर्तव्य आहे. याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आता आमची चूक आमच्या लक्षात आलीय, की आरक्षण विरोधी भूमिका असलेल्या पक्षांकडूनच आम्ही आरक्षणाच्या अंमलबजावणी ची अपेक्षा करित राहीलो...... पण व्यर्थ!!!!
         गेल्या चार वर्षांत सरकारला जाब विचारण्याची संधी मिळत नसताना,व नेतेसुध्दा सत्य बाजू मांडत नसताना चौडीमध्ये सरकारने अहिल्याईची जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला, यामुळे संधी चालून आली होती, तिचा लाभ घेऊन सरकारला जाब विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्याचा वापर करणाऱ्या धनगर बांधवांवर बंधने टाकण्या साठीच हे सरकार स्थापन करण्यात धनगरा​नी मदत केली आहे काय? (धनगरा मुळे सरकार स्थापन झाले-- मुख्यमंत्री)
        ३१ तारखेला धनगर तरुणांनी आपल्या मागण्या सरकारच्या कार्यक्रमात उजागर करण्याचा प्रयत्न केला. त्या अगोदरच आमच्या धनगर तरुणांवर बंदीचे आदेश!
चौंडीमध्ये दुसरा कार्यक्रम होणार नाही या दृष्टीने सरकारी दक्षता!! यातून काय स्पष्ट होते?????        
        सरकारने आपल्या उपस्थितीत धनगरांच्या बाबतीत दडपशाही लावली आहे, या वाक्यात कुठे संदिग्धता दिसते आहे काय?   आता आम्हा प्रत्येक सामान्य धनगरांना सुद्धा प्रश्नच पडला आहे, आम्ही किती संयम ठेवायचा? तरी सुद्धा आम्ही संयम बाळगून आहोत.नेत्यांवरचा विश्वास सुध्दा सांभाळून ठेवला आहे. सर्व नेत्यांना कळून चुकलंय की सरकार धनगराच्या कोणत्याच प्रश्नावर निर्णय घेंतांना दिसत नाही.  असे असताना धनगर तरुण वर्गाला शांत रहाणे खूप खूप कठीण होत आहे ही बाब सर्वांनाच लक्षात आलेली​ आहे.
      एखाद्याशी नेहमीच खोट बोलता येईल पण सर्वांनाच सदासर्वकाळ खोट बोलून दिशाभूल करता येणार नाही. बांधवांनो!! आतातरी सत्य स्वीकारा आणि सत्याची कास धरून खऱ्या अर्थाने आम्ही धनगर अहिल्याईचे एवढंच नाही तर सर्वच होळकरशाहीचे,  मौर्य साम्राज्य सोबतच आमच्या सर्वच राजकीय इतिहासाचे सत्यवादी वारसदार आहोत ही बाब जगाला दाखवून द्या..
          यातील पहिलं काम म्हणजे धनगर बांधवावर लावलेले खोटे आरोप मागे घ्यायला​ भाग पाडा.
पहिल्यांदा धनगर तरुणांना तुरुंगाबाहेर काढा....
धनगर प्रश्नांवर राजकारणाच्या नाही तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करा.
जमात आता बेइमानी खपवून घेण्यास असमर्थ होत आहे याही बाबी कडे विशेष लक्ष द्या...
समाजात नेहमी सत्यच मांडा. कारण धनगर नावाचं एक घर आहेत. घरात असत्य बोलून चालत नाही.

 *नाही तर प्रत्येक घरात डॉ भिसे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही.*


 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*