Friday, June 8, 2018

धनगरानो! प्रस्थापित फक्त तुमच्या स्वाभिमानालाच घाबरतात..

डॉ. प्रभाकर लोंढे

समस्त धनगर बांधवांनो!! महाराष्ट्रातील एकूण  राजकारणाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये प्रस्थापितांना आपल्या धनगरांच्या स्वाभिमानाचीच भिती वाटत आलेली आहे. त्यामुळेच आपल्यातील स्वाभिमानी माणसं त्यांनी वेळोवेळी हेतुपुरस्सर नष्ट केली आहे किंवा आपल्यातील अशी स्वाभिमानाने जगणारी माणसं निर्माणच होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली आहे.. याचाच परिणाम तुमच्यातील स्वयंभू स्वाभिमानी नेता हा महाराष्ट्रामध्ये आपल्या अधिकारासाठी आपली गोष्ट स्वाभिमानाने व्यवस्थेसमोर मांडताना दिसला नाही. (ज्यांनी मांडली त्यांचे विशेष स्वागत) ज्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे दाबण्याचाच  प्रयत्न झाला आहे. ही वास्तविकता सर्वांना स्विकाराविच  लागेल.
            आजपर्यंत आमच्यात जी काही माणसं/ नेतृत्व निर्माण झाली त्या माणसांना लालूच दाखवून, प्रसंगी देऊन, आर्थिक दृष्ट्या संपन्न करून त्यांना आपल्या खुंट्याला बांधण्याचे काम या व्यवस्थेने केलेले आहे आणि आमच्या नेत्यांना आपल्या खुंट्याला बांधूनच संपूर्ण धनगर जमात आपल्या अधिपत्याखाली कशी राहतील याचा विशेष प्रयत्न केलेला आहे. हे केवळ धनगर जमातींच्याच बाबतीत नाही तर सर्वच उपेक्षितांच्या बाबतीत केलेलं आहे.
       अशा या इतिहासामध्ये जे कोणी स्वाभिमानी नेतृत्व या महाराष्ट्रात निर्माण झाले असतील त्यांचे विशेष स्वागत आम्ही करतोय परंतु अशा धनगर बांधवांचं किंवा नेतृत्वाचं पर्सेंटेज काय? हा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर शोधायला आम्हाला दारोदार फिरावं लागतं..... आणि उत्तर मिळालंच तर ते झिरो पाईंट झिरो पाईंट...  अशा आकडयात लक्षात येतं. त्यामुळेच आपले प्रश्न सुटू शकलेले नाही. हे सत्य स्विकाराव लागत. उलट आमच्या प्रश्नांची जटिलता निर्माण कशी करता येईल याचा विशेष प्रयत्न या व्यवस्थेने केलेला आहे. त्याचे वाहक आमचे नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बनले आहेत.
            आमच्या नेत्यांनी प्रसंगावधान राखून आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व निर्माण केले असते​ किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं असतं तर आजपर्यंत स्वाभिमानी नेतृत्वाची फौज आमच्या-तुमच्यामध्ये दिसली असती. आमचे नेते कोणत्याही पदाच्या लालसेला बळी पडले नसते तर त्यांच्या स्वाभिमानी नेतृत्वागुणापुढे ही व्यवस्था नक्कीच​ झुकली असती आणि त्या झुकलेल्या व्यवस्थेची तुमच्या बांधवांवर खोटे आरोप लावण्याची हिंमतही झाली नसती..  तुमच्या प्रश्नांना कधीच ठेंगा दाखवू शकली नसती.
           आज पर्यंत आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व यांना सहन झाले नाही. आमच्यातील स्वाभिमानी नेतृत्व लाचार कसे बनतील याचाच प्रयत्न प्रस्थापितांनी केलेला आहे. म्हणून आज स्वाभिमानानं आव्हान करणारे आमचे नेतृत्व यांना खपत नाही. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न या प्रस्थापीत व्यवस्थेची नित्याचीच बाब बनली आहे. म्हणून डॉक्टर भिसे व इतर टीम यांनी स्वाभिमानाची व आपल्या हक्काची मागणी केली असता यांना तुरुंगात टाकून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेने चालवलेला आहे..  या व्यवस्थेकडून होणारा असा प्रयत्न हा पहिल्यांदा किंवा नवीन नाही. हा सातत्याने प्रयत्न सुरू राहीलेला आहे. (गोवारी हत्याकांड)  म्हणूनच आमच्या नेतृत्वाला उधाण आलेलं नाही पण आज आमच्या तरुणाईचा काळ आहे. आज धनगर तरुण स्वाभिमानाने पेटलेले आहेत.
              या स्वाभिमानी नेतृत्वामध्ये या तरुणांना कोणीही फसवू शकत नाही कारण स्वाभीमान ज्याचा जागा असतो त्याला लाचारीने जगण्याची आदत नसते. तो कधीच गुलाम म्हणून जगत नसतो. त्याला कोणतीही गुलामी पसंत नसते. तो आपले प्रश्न कोणाकडे भीक मागून सोडवण्याच्या मानसिकतेत नसतो. "लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची" ताकद त्यांच्यात असते. आणि अशा प्रकारची नेतृत्व क्षमता असलेला तरुण वर्ग आज धनगर जमातीमध्ये दिसायला लागलेला आहे. नक्कीच व्यवस्था परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. व्यवस्थेत आपलं स्वाभिमानी स्थान निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. अशा व्यवस्था परिवर्तनामध्ये तुमचे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या प्रश्नांना बगल​ देण्याची हिंमत या व्यवस्थेमध्ये राहणार नाही आणि म्हणूनच तुमचा स्वाभिमान जागा करा. जिथे कुठे लाचारीच्या गोष्टी होत असेल त्यांना हाणून लावा, ही व्यवस्था तुम्हाला तुमचे अधिकार दिल्याशिवाय राहणार नाही.
               लोकशाहीमध्ये अधिकार कधी मागून मिळत नाही. हिसकावून घेतल्या शिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाही.  लोकशाहीमध्ये राजकीय सत्तेशिवाय कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून हा तरुण आज राजकीय सत्ता हातात घेण्याच्या मागे लागलेला आहे. "सत्तासंपादन निर्धार मेळावा" याचं पहिलं पाऊल आहे. त्याची भीती या प्रस्थापितांना वाटू लागली आहे. तुमचा स्वाभिमान हीच यांची कमजोरी आहे आणि म्हणून प्रस्थापितांना दाबायचं असेल तर तुमच्या स्वाभिमानाचा उदो उदो आणि तुमच्या प्रत्येकाचा स्वाभिमान जागा झालाच पाहिजे. ज्या दिवशी स्वाभिमानाची प्रत्येक गोष्ट या महाराष्ट्राचा आवाज मोठा करेल त्या दिवशी या व्यवस्थेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.  त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये कोणताही वाकड तोंड करणारा किंवा वाईट नजर टाकणारा तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही.  कारण तुमचा  स्वाभिमानच या महाराष्ट्रालाच नाही तर देशाला पूरून उरलेला आहे, हा यशवंतरावांचा, मल्हाररावांचा इतिहास आहे, हा राजमाता अहिल्याबाईंचा इतिहास आहे आणि एवढंच नाही तर चंद्रगुप्त मौर्या सारख्या पराक्रमी पुरुषांचा इतिहास तुमचा इतिहास आहे तर उठा इतिहास पुनर्जागरणासाठी जागे व्हा!!!!!    रात्र वैऱ्याची असली तरी दिवस फक्त तुमचेच आहे...
जगा स्वाभिमानानं!!!....  रहा स्वाभिमानानं!!!  बोला स्वाभिमानानं!!!  राज करा स्वाभिमानानं..

कारण ही व्यवस्था बदलवू शकता तुम्ही .... केवळ स्वाभिमानानं!!!



एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment