Sunday, November 24, 2019

एकूण राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे?

👁👁👁👁👁👁👁👁👁
राजकीय घडामोडी मध्ये धनगर कुठे??*

               *डॉ प्रभाकर लोंढे*

            अख्खा महाराष्ट्र होरपळून निघत आहे, नाट्यमय घडामोडी घडत आहे. मात्र सत्ता कोणाची हे अजून निश्चित झालेलं नाही.  प्रत्येक चेहऱ्यावर, प्रत्येक मनामध्ये, प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच चर्चा,  प्रत्येकाच्या शब्दाचा आधार महाराष्ट्रातील राजकीय सत्ता व राजपटावर कोण बसणार? किती काळ बसणार? कोणाची महत्त्वाची भूमिका असणाऱ? या चर्चेमध्ये गल्ली बोळात, घरातल्या घरात, वाड्या-वस्त्यांवर, शेतात, जनावरां मागे *होणाऱ्या चर्चेत कदाचित धनगर सुद्धा सहभागी असेल. की जो आज राजकीय बाबतीत प्रवाहापासून दूर फेकला गेला* आहे.  पण या सत्तेचा हक्कदार कोण ठरणार? हे मात्र धनगर सह बहुजनांच्या हातात काहीही दिसत नाही.
                   मागे पडला आरक्षणाचा प्रश्न, संपून गेला उमेदवारीचा प्रश्‍न, मागे पडला शेतकऱ्यांचा प्रश्र्न, मागे पडला याचा प्रश्र्न, मागे पडला त्याचा प्रश्न, *आता फक्त प्रश्र्न व चर्चा . पवार, फडणवीस, ठाकरे, -------- आणि सत्ता व राजपद ? पण या सर्वांच्यामध्ये कुठेही धनगर रक्ताचा माणूस दिसत नाही.*
           कोणी म्हणेल महाराष्ट्र बदलला. आता लोकशाही आहे. नकळत मान्य करावेच लागेल. मात्र *सरंजामी थाटात वागणारे घराणे आजही महाराष्ट्रात दिसून येत आहे.* तेही स्विकारावे लागेलच. पूर्वी *पेशवे, होळकर, शिंदे, पवार, भोसले यासोबतच पांढरे , देवकते, आणि अनेक मरहट्टी धनगर सरदार घराणे या महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आपली महत्त्वाची भूमिका बजावत होते* . याठिकाणी त्याकाळी *धनगर सत्तेचे वाटेकरी होते,* एवढेच सांगायचे आहे.
                   तो काळ पेशवाईचा होता, पेशवे सर्वेसर्वा असले तरी महाराष्ट्रातील *पेशवाईच्या गादी पासून तर ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या राजगादीवर कोण बसेल? याचा निर्णय, तो राजकीय प्रश्न सोडवणे थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रभावात्मक अधिकार कक्षेत होता.*  यासंबंधाने सुभेदार मल्हारराव होळकरांचा निर्णय, शब्द व सल्ला शिरसावंद्य मानला जात होता.  त्यामुळे त्यांचा सल्ला हा त्यावेळच्या केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सत्ताकारणाला दिशा देऊ शकत होता. *एवढी ताकद व व्यवस्थेवर प्रभाव, तो तसा सन्मान सुभेदार मल्हारराव यांच्या शब्दाला होता.* हे मी कल्पनेवरून नाही तर त्यांच्या पराक्रमाचा परिणाम म्हणून लक्षात आलेल्या बाबी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  हे आपल्याला मराठेशाहीच्या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल, की येथील वारसा हक्काचे व राजगादीचे अनेक प्रश्न, किल्ल्यांवरील अधिकाराचे प्रश्न, सुभेदार मल्हाररावांनी सल्लामसलत करून, प्रसंगी बळाचा वापर करून सोडविण्याचे अनेक दाखले मल्हाररावांच्या विषयी इतिहासामध्ये दिसून येतात.
                        यावरून मला एवढेच लक्षात आणून द्यायचं आहे, की *तत्कालीन पेशवाईमध्ये होळकर व इतर सरदारांच्या माध्यमातून तत्कालीन धनगर हा दखलपात्र होता. त्याचा तेव्हा दरारा होता. त्याचा या व्यवस्थेवर प्रभाव होता. महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये धनगरांचा फार मोठा मोलाचा वाटा होता.* या धनगर रक्ताला विचारात घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील निर्णय पूर्णत्वाकडे जात नव्हता. एवढा व्यवस्थेवर राज करणारा *धनगर आजच्या काळात पूर्णतः बेदखल कसा काय झाला ????* हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक वाचकांने करावा, हिच या लेखामागची अपेक्षा आहे.
         आजच्या एकूण राजकीय घडामोडी व सत्ताकारणात धनगर कुठेच दिसत नाही.  सत्य आहे की, काळ बदलतो, व्यवस्था बदलते पण बदलत्या परिस्थितीत स्वत:ला प्रवाहित ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. काळाबरोबर पेशवाई गेली. *आज लोकशाही (घराणेप्रधान) प्रस्थापित झाली.* सत्तापद बदलली पण पदावरील मक्तेदारी मात्र कायम आहे, असं म्हटल तर चूकीचे होणार नाही.  या महाराष्ट्रातील पेशवाई पासून येथे राज करणारे पेशवे (ब्राम्हण), मुळ पेशवाईत दुय्यम स्थान असणारे मराठे आज सत्तेच्या आखाड्यात प्रथम स्थानी दिसून येतात. *आज मराठे व ब्राम्हण हे दोन्ही आज सत्तेची सुत्रे हालवितांना दिसून येतात.* तेव्हा येथील इतिहास पाहिला तर *धनगर, मराठे व ब्राम्हण या तिन समुदायांनीच महाराष्ट्रातील इतिहास घडविला ही बाब लक्षात येते.*
             पाणीपत युध्दात मराठ्यांचा पराभव झाला, या पराभवाचं खापर फोडण्यापुरतेच मल्हारराव मराठ्यांच्या इतिहासात नव्हते. अरे *पेशवाईचा खडा न खडा मल्हाररावांच्या विश्वासाने सुरक्षित होता. पेशवाईच्या बेंबीच्या देठापासून मल्हारराव पेशवाईला जाणत होते.* कारण तिचा मुख्य आधारस्तंभच मल्हाररावच होते.
            परंतु ऐतिहासिक प्रभावशाली असलेला धनगर मात्र आज सत्तेच्या आखाड्यात कुठेच दिसत नाही. ही गंभीर बाब होळकरांच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या धनगर व इतरांना विचार करायला लावणारी आहे.
 *सर्वांनी याचा विचार करावा. याची कारणं मिमांसा तपासून पहावी हिच या लेखाची पार्श्र्वभूमी....*


खूप खूप शुभेच्छा!!


 *एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश* .
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Thursday, November 21, 2019

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

केवळ धनगरांचीच हालत अशी का?

                     डॉ प्रभाकर लोंढे

महाराष्ट्रातील धनगर जमात बहूसंख्य, ऐतिहासिक दृष्ट्या संपन्न, तरीही वर्तमानात राजकीय दृष्ट्या ती इतकी अस्पृश्य का? हा प्रश्न प्रत्येकालाच पडणे सहाजिकच आहे.

           आपणा सर्वांना एक माहिती आहे की एखाद्याला नियंत्रणात ठेवण्याची इच्छा आहे, परंतु त्याच्या अफाट ताकतीची जाणीव आहे, त्याच्या त्या ताकदीपुढे आपण टिकू शकणार नाही याची हमखास भिती आहे. तेव्हा समोरच्याला त्याच्या ताकदीची व त्याच्या अधिकाराची जाणीवच होणार नाही. यासाठी प्रयत्न केले जातात. दुसरीकडे त्याला संधीच मिळणार नाही यासाठी हेतुपुरस्सर डावलण्याचे तसेच त्याची शक्ती कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने चालू असतात. त्याच्या कमजोरी शोधून त्याबाबतीत त्याला पुन्हा कमजोर कसा करता येतील यावर जोर दिला जात असते, कारण त्यांना माहित असते की, हे शक्य झालं तरच आपण समोरच्याला नियंत्रणात ठेवून त्याचा आपल्यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे वापर करू शकतो. याचं उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर बैल या पाळीव प्राण्यांचं घेता येईल.

                मानवी विकास प्रक्रियेत त्याला बैलाची मिळालेली साथ समस्त मानव जात कधीच विसरू शकत नाही, परंतु त्याला नाकात व्यसन घातल्याशिवाय व त्याला निर्बीज केल्याशिवाय माणूस त्याच्या ताकतीचा वापर करण्याची हिंमत सुध्दा करू शकत नाही, हे माणसाला माहीत असल्यामुळेच माणूस स्वार्थापोटी बैलावर ही दोन अमानुष ( वेसन- नाकात दोरी घालणे व नपुसक करणे) कृत्य करीत असतो. तो बैल आपल्या नियंत्रणात (वेसन)राहिल  व त्याला त्याची क्षमता (नपुसक) सुद्धा वापरता येणार नाही. याची काळजी मानवाने घेतली. म्हणूनच पिढ्यानपिढ्या पासून मानवाची गुलामी  स्वीकारून बैल इमानेइतबारे मानवाच्या सेवेत रुजू आहे. एवढंच काय गुलामीची हद्द तेव्हा ओलांडली जेव्हा बैलाने नंदीबैल म्हणून माणसाच्या चरणी  संपूर्ण समर्पण केलं.
            यामध्ये त्या बैलावर अन्याय होत आहे हे जरी मानवाधिकारांच्या व प्राण्यांच्या हक्काच्या गोष्टी करणाऱ्या माणसाला मान्य असलं तरी त्याशिवाय बैलाच्या शक्तीचा वापर करण्याची लायकी आपल्यात नाही,  याची जाणीव/ भीती माणसाला वाटत असल्यामुळेच तो बैलांसाठी वेसनमुक्तीचा जाहीरनामा हा पशूप्रेमी माणूस कधीच प्रसिद्ध करणार नाही. बैलाच्या  नाकातील ती वेसन काढणार नाही. कारण मानवाने हे ओळखलं आहे की, त्यावरच यांच्या स्वामित्वाचं व बैलाच्या गुलामीचं सुत्र आधारलेलं आहे तसेच मानवी विकासाचं गुणसुत्र अवलंबून आहे.
   
        हे सर्व गुणसूत्र महाराष्ट्रातील आजच्या धनगर जमातीच्या बाबतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लागू केलेलं आपल्याला पाहायला मिळते. या भारतातील सर्वांगीण दृष्टीने सर्वाधिक बलवान जमात कोणती असेल तर धनगर जमात आहे, इतिहास,  समाज, संस्कृती, पराक्रम, धैर्य, मेहनत, व अत्यंत महत्त्वाची लोकाभिमुखता याबाबतीत परिपूर्ण असलेली महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतातील धनगर जमात येथील समाजव्यवस्थेच्या विकासाचा आधारभूत केंद्रबिंदू आहे. हे या धनगर जमातीचं प्रमुख बलस्थान आहे.
                या देशातील संपूर्ण इतिहास व ऐतिहासिक पराक्रम, राजकीय, सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे याच जमातीच्या सभोवताल फिरतात. ही या जमातीची प्रमुख वास्तविकता. ती त्यांची ताकद येथील विशिष्ट गैरधनगर लोकांनी ओळखलेली आहे. ही बाब धनगर जमातीच्या लक्षात येवू म्हणून ते या जमातीच्या बाबतीत सातत्याने षडयंत्र रचून तिला दुर्बल करण्याचा प्रयत्न करतात. या जमातीला संधीच मिळणार नाही याची दक्षता घेतात.
        याठिकाणी आपण अलीकडील काळाचा विचार करू, पेशवाईच्या काळानंतर येथील प्रस्थापित व्यवस्था सुव्यवस्थित टिकवून ठेवण्यासाठी या धनगर जमातीतील लोक गुलाम मानसिकतेत, अदृश्य गुलाम म्हणून जगत राहले तरच ह्या व्यवस्थेतील विशिष्ट प्रस्थापितांच्या अस्तित्वाची सूत्र जुळते. ते सुत्र सतत कायम रहावे यासाठी या धनगर जमातीला अंधश्रद्धेच्या माध्यमातून, त्यांच्या पराक्रमी इतिहासापासून अनभिज्ञ ठेवून, तो इतिहास नष्ट-भ्रष्ट करून, यांच्या कर्तबगार स्त्री पुरुषांना देव- देवी बनवून, त्यांच्यासंबंधी दैविक, चमत्कारिक आख्यायिका बनवून,  त्यांच्यामध्ये कर्तबगार पुरुष निर्माण होणारच नाही याची दक्षता घेऊन केवळ वैचारिक नपुसक, आज्ञाधारी गुलाम पिढी जन्माला येईल अशी परिस्थिती सातत्याने टिकवून ठेवली जाते
                  त्या परिस्थितीमुळे धनगरांना स्वतःची, स्व अस्तित्वाची, स्वपराक्रमाची, स्वताच्या क्षमतांची जाणीवच होत नाही, परिणामी धनगर जमातीतील बहूतांश वर्ग मान्य करीत नसला तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक गुलाम म्हणून जगत असताना दिसून येतो. यावर काहींचा आक्षेप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावेळी सामाजिक आत्मपरीक्षणा शिवाय आपणाकडे पर्याय उरत नाही.
                 दुसरं असं की, या जमातीतील जे लोक सामाजिक दृष्ट्या धडपडतात, काही तरी करण्याची आकांक्षा ठेवतात, त्यापैकी काहींना नियंत्रित सत्तापद, संपत्ती, नोकरी याचे लाभ देवून किंवा काही वेळा नुसती प्रलोभने देऊन कायमची गुलामी लादण्याचा प्रयत्न सुरू असतो. जमातीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे गुलामांची फौज निर्माण होत राहील व ती सातत्याने टिकून राहील याचा सातत्याने प्रयत्न या प्रस्थापितांकडून सुरू असतो. त्यासाठी धनगर लोकांमधील काशिराव (कच्चे दुवे Under control लाभार्थी) हाताशी धरून स्वयंनिर्भर/स्वाभिमानी विठोजीचा राजकीय खून केला जातो.  आणि लाभार्थीच्या माध्यमातून संपूर्ण जमातीला भावनिक आव्हाने केली जातात व त्या बेसवर संपूर्ण जमात स्वत्व विसरून भावनिक होवून प्रस्थापितांच्या मागे फिरतात. याची उदाहरणे आज मी देण्याची गरजच नाही. प्रत्यक्ष अनुभवू शकता.
              म्हणूनच. आज गुलामीच्या वेसनी कापून अंधश्रद्धा, अंधभक्ती, प्रलोभने यांच्याआधारे हेतूपुरस्सर लादले  जाणारे राजकीय नपुंसकत्व ओळखून धनगरांच्या सामाजिक, ऐतिहासिक ताकदीची जाणीव करून देणारे विचार व नेतृत्वच धनगरांची राजकीय हालत सुधारू शकतात.
तेव्हा आपणास शून्यातून विश्व निर्माण करणारे मल्हारराव प्रेरणा देवू शकतात. पेशवाईचे शडयंत्र जाणणाऱ्या राजमाता अहिल्याबाई जगण्याचा संदेश देतात. सर्वांची पराक्रम गाजविण्याची क्षमता जाणणारे यशवंतरावच परिस्थितीवर मात करण्यासाठी मार्ग दाखवू शकतात.
           तेव्हा परिस्थितीला शरण जायचं व माझं भलं होईल याची अपेक्षा करीत स्वकियांना लाथाडून शडयंत्राला बळी पडत काशिराव म्हणून जगायचं?  की ती विदारक परिस्थिती लाथाडून यशवंतरावांसारखं पुणर्उत्थान करायचं?  ज्याचं त्यांनी ठरवायचं.......

खूप खूप शुभेच्छा!!


एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३