Thursday, January 16, 2020

राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*राजमाता अहिल्याबाई होळकरांचा हिमखंड बनवू नका.     
     

              *डॉ प्रभाकर लोंढे*

   अहिल्याबाई होळकर नावाचं व्यक्तिमत्व या जगाच्या पाठीवर अथांग सागरा सारखं आहे. त्यामुळे या उदात्त व्यक्तीमत्वाला वैश्विक दृष्टिकोनातून, उदात्त नजरेतून जगासमोर मांडणे भावी पिढ्यांच्या दृष्टीने व जागतिक पातळीवर एक आदर्श निर्माण करण्यासाठी अत्यावश्यक आहे. काही लोकांना या संबंधाने कदाचित प्रश्न निर्माण होतील की हा माणूस असं का लिहीत आहे?  परंतु  आजच्या परिस्थितीमध्ये या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष, विशिष्ट नजरेतून या व्यक्तीमत्वाला जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होतो आहे, हा खरंच एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.  *एकीकडे "राईचे पर्वत" बनत असताना पर्वताचं (अहिल्याबाईंचा व्यक्तित्व) खच्चीकरण होवू नये हाच या लेखाचा उद्देश आहे.*
                  सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक या सर्वच अंगाने त्या व्यक्तिमत्वाने सर्वकालिक काम केले आहे,की ज्याला इतिहासात तोड नाही. असे असतानाच त्या व्यक्तिमत्त्वाची केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडणे, केवळ धार्मिक झालर चढवून एक देवी स्वरूपात तिची वैश्विक प्रतिमा निर्माण करणे,  ही बाब तिच्या ऐतिहासिक सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वावर फार मोठा अन्याय व भविष्याच्या दृष्टीने एक वैचारिक पोकळी निर्माण करणारी आहे.
           एखाद्या अथांग पसरलेल्या समुद्राचा किनारा, सर्वत्र किनाराच म्हटला जात असला तरी प्रत्येक किनाऱ्याचं वैशिष्ट्य, वेगळेपण व महत्त्व अलग असतं. त्यामुळे समुद्राचं वर्णन करताना किंवा त्यासंबंधीची महती गातांना केवळ एका किनाऱ्यावरून समुद्राची किंवा किनारपट्टीची विशालता स्पष्ट करणं शक्य नसतं. त्याप्रमाणेच राजमाता अहिल्याबाई होळकर *या अठ्ठाविस वर्षे राज्य करणाऱ्या रणरागिणी, लोककल्याणकारी, आदर्श महाराणी, पुरोगामी व्यक्तित्वाच्या केवळ धार्मिक अंगाला प्रदर्शित केल्याने संपूर्ण व्यक्तीत्वाचा परिचय होणार नाही. कोणत्याही व्यक्तीचं केवळ धार्मिक जीवन म्हणजे संपूर्ण जीवन नसतं. कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक संकल्पना, धार्मिक विचार आचार हा त्या व्यक्तित्वाचा एक भाग असतो. परंतु त्याला संपूर्ण जीवन म्हणणे अतिशय चुकीचं आहे.* असे जर होत असेल किंवा केले जात असेल तर त्या व्यक्तित्वाला मर्यादित करण्यासारखे आहे. आणि असा तो अधिकार आज कोणालाही नाही.
        साधारणतः कोणताही व्यक्ती जीवनातील जास्तीत जास्त  १० % (खूप झाले) वेळ काळ धार्मिक कार्यामध्ये देत असतो.  याचा अर्थ उरलेला काळ तो इतर समाजकार्य किवा स्वतःसाठी जगत असतो. अहिल्याबाई होळकर एक महापराक्रमी कर्तबगार महाराणी होत्या. *त्यांनी त्यांच्या 28 वर्षाच्या राजकीय काळात या देशाच्या पूर्व- पश्चिम- उत्तर- दक्षिण चहू दिशेला केलेले विकास कार्य आजही त्यांच्या व्यक्तित्वाचा, राजकीय कारकीर्दीचा, विकास कार्याचा, त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, लोककल्याणकारी दृष्टिकोन, धार्मिक सहिष्णुता व वैचारिक प्रगल्भतेचा परिचय करून देतात.*
         असे असताना सुद्धा राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील केवळ धार्मिक बाजू जगासमोर मांडल्याने त्यांच व्यक्तित्व आज हिमखंडा सारखं वाटायला लागलं आहे. त्यांची केवळ धार्मिक बाब प्रकाशात आणल्याने त्यांचे इतर महाकाय लोककल्याणकारी, समाज हितवादी जनकल्याणार्थ कार्य व भूमिका हे अदृश्य झाल्यासारखे वाटायला लागले आहे. 
          ज्याप्रमाणे हिमखंडाचा फार कमी भाग हा पाण्याच्या वर दृश्य स्वरूपात असतो आणि त्यापेक्षा बराच मोठा भाग पाण्यात व्यापलेला असतो, त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीमध्ये अहिल्याबाई होळकरांचे कार्यकर्तृत्व केवळ धार्मिक बाबतीत दृश्य स्वरूपात दाखवले जात असून इतर कार्याला फारसा उजाळा दिला जात नाही. असं का होतं?? हा प्रश्न असला तरी  स्त्रीशक्ती व बहूजन समाजासाठी ही अतिशय गंभीर बाब आहे.
           *होळकर संस्थानात २८ वर्षे राज्य करणाऱी एक महाराणी म्हणून जगाच्या पाठीवर जिने कार्यकाळ गाजवला. अनेक विकृतांना त्यांची जागा दाखवली. स्वतःच्या जगण्यातून जगाच्या पाठीवर दीपस्तंभासारखा आदर्श निर्माण केला. स्वतःच्या खाजगी जीवनातील समस्यांची शृंखला संपत नसताना त्याचा परिणाम कधीच जनमानसावर होऊ दिला नाही. लोककल्याणावर होऊ दिला नाही. सर्वत्र मानव, पशु पक्षी, जीव सुखी समाधानी राहतील, याचा सातत्याने प्रयत्न केला. हा प्रयत्न लोककल्याणकारी भूमिकेतून करीत असताना त्यांच्या कार्याला जगाच्या पाठीवर कुठेच तोड नाही.*
   ‌      परंतु या कार्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्याविषयी केवळ धार्मिक स्त्री, पूजा पाठ करणारी स्त्री, व्रत वैकल्य, कर्मकांडा मध्ये गुंतून राहणारी स्त्री, दानधर्म करणारी स्त्री, याच्याही पलीकडे त्यांचे व्यक्तिमत्व देवी स्वरूपामध्ये सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. भारतीय समाजातील मानसिकतेला अनुसरून कदाचित काहींना हे अतिशय चांगलं वाटत असेल, काही लोक त्यांना देवी स्वरूपातच स्विकारायला उत्सुक असतील. यावर माझी काय कोणाचीही काहीही हरकत नाही. परंतु प्रश्न निर्माण होतो माझ्या तुमच्या अपेक्षांचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मर्यादित करण्यामध्ये का व्हावा?
             *माझ्या तुमच्या अपेक्षांमुळे त्यांच्या व्यक्तित्वावर पडणारा प्रकाश का मर्यादित व्हावा? आमच्या लेखणी वाणी, कृती केवळ त्यांच्या धार्मिक जीवना संबंधाने का अग्रेसर व्हाव्यात? त्यांच व्यक्तित्व राशिभविष्य, कर्मकांड पोथ्या पुराण, धार्मिक पारायण यामध्येच आम्ही का आडकवावं?*

 *आमच्या लेखणी त्यांच्या युद्ध, युद्ध कौशल्य, त्यांचे विजय, तलवारबाजी, अस्सल पुरोगामित्व, नीतिमत्ता, न्यायदान, परधर्म सहिष्णुता, शत्रूला दम व सन्मानजनक वागणूक सुद्धा,  गुंडांचा बंदोबस्त, अनिष्ट प्रथा-रूढींचा विरोध, प्राणिमात्रांवर दयाभाव, पर्यावरण रक्षण, लोक कल्याणकारी राज्य, रोजगार हमी योजना, साहित्य व सांस्कृतिक प्रेम, व्यापाराला प्राधान्य, जनकल्याणासाठी खाजगी संपत्तीचा वापर करण्याची वृत्ती.*

या *गोष्टींना आम्ही का उजाळा देत नाही??? का आमच्या लेखनी अंगाने चालत नाही ?? आमची वाणी यादृष्टीने का व्यक्त होत नाही??  त्यांची स्मारक तयार करतांना आम्ही या गोष्टींना का प्राधान्य देत नाही???*

शेवटी एकच विनंती करावीशी वाटते,
 *उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा कृपया हिमखंड मात्र बनवू नका....*

__________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Tuesday, January 7, 2020

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.

धनगरानो! भावी नेतृत्व जिल्हा परिषद मधूनच घडवावे लागेल.
 
डॉ प्रभाकर लोंढे.

"उष:काल होता होता, काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली."

         धनगर जमातीच्या राजकीय नेतृत्वाची दुरावस्था आज सार्वत्रिक तसेच सर्वमान्य झालेली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका धनगर जमातीने अनुभवलेल्या आहेत. आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका धनगर जमातीच्या हातात आहे. जमातीला  सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थावर अधिराज्य निर्माण होणे तसेच जमातीने भावी राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणे यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका धनगर जमातीसाठी एक संधी स्वरूपात आहेत.
          लोकसभेतील तसेच विधानसभेतील धनगर उमेदवारांचा दारुन झालेला पराभव, निवडून आलेला एकमेव आमदार हा धनगरांचा विजय म्हणावं की पराभव?????  हा प्रश्र्नच असतांना कोट्यावधी धनगरांचा सार्वत्रिक पराभवच झाला आहे असं प्रत्येकाने म्हटलंच पाहिजे व तो पराभव प्रत्येकाच्या जिव्हारी लागलाच पाहिजे. तरच यापुढे धनगर राजकीय अस्मिता पुनर्जीवित करणे शक्य आहे.
                धनगर राजकीय अस्मितेची वारंवार लाजिरवाणी पडझड सुरू असतांनाच, महाराष्ट्रातील धनगर "संवेदनाशून्य धनगर" आहे, असं म्हणणं चुकीचं ठरलंच पाहिजे. त्यासाठी जिथे कुठे संवेदना शुन्य धनगर लक्षात येईल तेथे सामाजिक संवेदना जागवायला कोणाची हरकत नसावी. तसा प्रयत्न प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. अशा प्रयत्नांचा सार्वजनिक व मिशन स्वरूपात प्रत्येकाने स्विकार केलाच पाहिजे.  राजकीय सत्ता किती महत्त्वाची आहे, हे अलीकडेच महाराष्ट्रातील पार पडलेल्या प्रस्थापितांच्या (प्रस्थापित पक्षांच्या) राजकीय नाट्यावरून लक्षात येईल. सत्तेच्या भरोश्यावर जीवनभर केलेली पापं कसे धुता येते.  याचे प्रमाण/ सबुत गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात पहायला मिळते. तेव्हा सत्तेचे महत्त्व धनगरांनी समजून घेवूनच जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जावे.
           सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहे. किंवा येणाऱ्या भावि काळात लवकरच त्या होणार आहे. जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालय समजले जाते. यामध्ये आपला प्रतिनिधी असेल तर छोट्या का होईना सत्तेच्या विकेंद्रीकरणातून सत्तेचा फायदा जमातीला होवू शकतो. भावी काळात निर्माण झालेले जिल्हा परिषद मधील धनगर  नेतृत्वाच्या जाळ्याच्या सहकार्याने किंवा त्यांच्या पैकीच काही विधानभवनात आमदार, संसदेत खासदार  म्हणून नक्कीच पाठविता येतील.
     उभरत्या धनगर नेतृत्त्वाला परस्पर सहकार्याने आपला स्वत:चा तसेच जमातीचा राजकीय विकास करता येईल. राजकीय सत्तेपासून वंचित असलेली, हेतूपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या गेलेली धनगर जमात राजकीय प्रवाहात येईल. दिवसेंदिवस जमातीची चाललेली राजकीय परवड, पडझड थांबविता येईल. तुमच्या छोट्याच्या प्रयत्नातून धनगर राजकीय अस्मितेचे पुनर्जागरण झाल्याशिवाय राहणार नाही.
               म्हणून धनगर असाल तर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये धनगर उमेदवार दिसेल तिथे, त्यालाच मतदान केल्या शिवाय राहू नका. "विसरून सारे भेद- धनगर सारा एक" या म्हणीप्रमाणे एक जीवाने संघटित होऊन तन-मन-धनाने मतदान करून सर्वांना प्रोत्साहित करून भावी धनगर नेतृत्वाचे पाय मजबूत करा....
वैचारिक मतभेद का असेना रक्ताचा माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवा.  जिल्हा परिषद,पंचायत समितीतून, ग्रामपंचायत मधून धनगर समाजाच्या राजकीय नेतृत्वाचे आणि राजकीय अस्मितेचे पुनर्भरण करा.
    त्यावेळी लक्षात ठेवा!!! मोठ्या कामाची सुरुवात छोट्या पासूनच होत असते. थेंबा थेंबाने तळे साचत असते. शतकांपासून गमावलेली राजकीय अस्मिता पुनर्जीवित करण्यासाठी कदाचित पुढील शतक सुद्धा लागण्याची शक्यता असेल.  परंतु या कार्याची सुरुवात करणारे तुम्हीच असाल. म्हणून जगायचं तर स्वतःसाठी!! स्वतःच्या माणसांसाठी!! स्वतःच्या राजकीय अस्मितेसाठी!! स्वतःच्या भावी पिढ्यांच्या सुंदर जगण्यासाठी, आवश्यक असलेल्या व्यवस्था परिवर्तनासाठी!!! 
    उठा!! जागे व्हा!! जागवा आणि मतदान करा!! आपल्यासाठी!! आपल्याच माणसांना!! आपल्या सर्वांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी!!
,
खूप खूप शुभेच्छा!!!

अरे!
उष:काल होता होता,काळरात्र झाली.
 धनगरांनो! राजकीय अस्मितेच्या
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......
                आता पेटवा मशाली......

___________________________&__
जय यशवंतराव !! जय मल्हार

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३