Saturday, February 22, 2020

पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻
*पिंडधारी प्रतिमा आणि राजमाता अहिल्याबाई होळकर.*

            *डॉ प्रभाकर लोंढे*

आज मी खूप विवादाचा नसला तरी विविधांगी मतेमतांतरे असण्याची शक्यता असलेला महत्त्वाचा विषय हाताळण्याची हिम्मत करतो आहे. त्याला कोणीही भावनात्मक स्वरूपात न घेता वैचारिक दृष्टिकोनातून त्यावर विचारमंथन करावं. एवढीच आग्रही अपेक्षा.
          राजमाता अहिल्याबाई होळकर विचार, आचार, कर्तृत्व,  युद्ध, न्याय, समाजसेवा, जनकल्याणाकारी कार्य यासाठी जगात नावलौकिक असलेलं एक मोठं नाव. एका संस्थानाची महाराणी असली तरी वैश्विक नजरेने जगणारं व्यक्तिमत्व की ज्यामध्ये एक विशाल चरित्र दडलेलं आहे. नाव ऐकताच आदराने चरण झुकावं एवढं निष्कलंकित, सात्विक, संयमी, चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व असलेली विधवा स्त्री सलग २८ वर्ष राज्य करणाऱी ती एक महाराणी.  या कर्तव्यदक्ष राणीने जीवनभर जनसेवेला महत्त्वच नाही तर जीवनाचा एक भाग बनवून खाजगी जीवनातील दुःखाकडे  दुर्लक्ष करीत स्वत:ला प्रजेसाठी समर्पित केलं. *प्रजेच्या सुखात स्वतःचे सुख मानलं. याचाच परिणाम स्वरूप किंवा त्यामुळेच त्यांची प्रतिमा किंवा त्यांचं स्थान सामान्य माणसांच्या मनातील ईश्र्वर संकल्पनेपेक्षा कमी नव्हतंच.*
             एवढी समाजनिष्ठा जपत सामाजिक जगत असताना राजमाता अहिल्याबाईंच्या जिवनात त्यांच्या घराण्यातील जेष्ठांविषयी आदर व घराण्याच्या कुलदैवता विषयी श्रद्धेमध्ये कुठेही कमतरता दिसत नाही. त्यांच्या विषयी त्यांना प्रचंड आदर होता, ही विशेष बाब लक्षात येते. व ती अनेक पुराव्यांनिशी सिद्ध होते.
             इतिहासात लक्ष घातल्यास *विशेषत: होळकर व बहुतांश धनगर राजघराणे शिवपुजक असल्याचे दाखले मिळतात. "शिव" ही मुळात द्रविड देवता. यामध्ये शिवपिंड/शिवलिंग पुजा महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच कदाचित होळकर घराणे शिवलिंग पुजनाला महत्त्व देत असावे‌. त्यांच्या पैकीच एक म्हणून अहिल्याबाई होळकरांनी आपल्या जिवनात शिवलिंग पुजेला महत्त्वपुर्ण स्थान दिले होते. बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केला.  त्यांच्या दैनंदिन जिवनात* शिवपिंड पुजनाशिवाय त्यांच्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होत नव्हती. एवढा अतुट संबंध राजमाता अहिल्याबाई होळकर व शिवपिंड यांचा होता.
               हे जरी खरं असलं तरी शिवभक्ती, *देवभक्ती व धार्मिक कार्याशिवाय अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक, आर्थिक,  राजकीय व सांस्कृतिक विकासाची उल्लेखनीय कामे त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत केलेली आहे. त्यामुळेच त्यांचे व्यक्तित्व बहुआयामी होतं हे सिद्ध होते.* तसेच आजच्या काळात सुध्दा त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांगीण दृष्टीने सर्वार्थाने प्रेरणादायी आहे.  म्हणूनच त्या *व्यक्तित्वाची मांडणी (project),  प्रदर्शन समाजासमोर तसेच भावी पिढ्यांच्या दृष्टीने करीत असताना किंवा त्यांची प्रतिमा साकारताना/ उभी करीत असताना तशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.*
          अहिल्याबाई होळकर आणि शिवपिंड हे समीकरण आज सर्वत्र परिचित झालेलं आहे. ही बाब धार्मिक दृष्ट्या अतिशय मार्मिक असून आम्ही द्रविड असल्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण पुरावा आहे. तशा प्रकारची त्यांच्या विषयीची धारणा समाजात निर्माण झालेली आहे. आज त्यांचा पुतळा बहूतेक ठिकाणी शिवपिंडधारी दिसून येतो. त्या संबंधाने कोणाचाही आक्षेप असू शकत नाही. माझा तर बिलकुल नाही. परंतु धनुर्विद्या घेण्यासाठी एकलव्यानी *द्रोणाचार्याचा जो पुतळा बनवला होता असं म्हणतात.  त्या पुतळ्यात त्याला त्याचा गुरु दिसत होता, गुरूकडून मिळणारी प्रेरणा, गुरूकडून मिळणारी विद्या, म्हणजेच त्या पुतळ्या मधून त्याला गुरूच्या जीवनातील सर्वच अंगांचे दर्शन घडत होतं. व त्या पुतळ्याला नजरेसमोर ठेवून एकलव्य उत्तम धनुर्धारी बनला.* तो त्या पुतळ्या पासून मिळालेल्या प्रेरणेचा परिणाम होता. असं जर असेल आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांना आमच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान मानत असू ,त्यांच्या व्यक्तित्वाला पाहून भावी पिढ्या घडवाव्या, त्यातून नवनिर्मित समाज हवा असेल, एक आदर्श नवनिर्मित समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने आदर्श राजा किंवा राणी अपेक्षित असेल   तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा कसा असावा याचा विचार सर्वांनी करावा. त्यांच्या पिंडधारी पुतळ्यापासून कोणता बोध होणार आहे किंवा भावी पिढ्यांसाठी कोणती प्रेरणा अपेक्षित आहे याचा सुध्दा विचार व्हावा.
        *कोणी मान्य करो अथवा न करो हे सत्य आहे की, राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक असल्या तरी त्यांचा तो शिवपिंडधारी पुतळा त्यांच्या केवळ धार्मिक जीवनाला प्रदर्शित करीत असतो* . आणि वास्तविकता ही आहे की, *कोणताही व्यक्ती कितीही धार्मिक असला तरी आपल्या जीवनाचा कमीत कमी वेळ धर्मकार्यात घालवत असतो.* त्याचप्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचे इतर कार्य त्यांच्या धार्मिक कार्यापेक्षा खूप मोठे व लोकाभिमुख तसेच अथांग सागरा सारखे आहे. त्या सर्व कार्याला प्रदर्शित करणारा व भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारा, त्यांच्या व्यक्तित्वातील सर्वगुणसंपन्नता प्रदर्शित करणारा पुतळा हाच अहिल्याबाई होळकरांच्या व्यक्ती व कृतीला सन्मान तसेच पूर्णत्व देऊ शकतो. भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करू शकतो. याचा अर्थ राजमाता अहिल्याबाई होळकरांचा शिवपिंडधारी पुतळा प्रेरक नाही असं होत नाही किंवा मला तसं म्हणायचं सुद्धा नाही. परंतु या पुतळ्याच्या माध्यमातून केवळ धर्मभावना, धार्मिक श्रद्धा, कृती याशिवाय दुसरा भाव निर्माण होत नाही. हे मात्र सार्वजनिक स्तरावर प्रकर्षाने सांगितल्याशिवाय राहणार नाही.
          संपूर्ण होळकर घराणे व स्वतः अहिल्याबाई होळकर शिवपूजक असले तरी त्यांनी लढाया किंवा रणांगणात उतरण्याची हिम्मत तलवारीचे भरोश्यावर, तिच्यावर विश्वास ठेवून केलेली आहे.  त्यामुळे *रनांगणावर लढणारी तलवारधारी अहिल्याबाई होळकर, समाजात दानधर्म करणारी दानशूर अहिल्याबाई होळकर प्रतिमा/पुतळा, नीती व कायद्याच्या चौकटीत न्यायदान करणारी अहिल्याबाई होळकर, बलाढ्य संस्थानाची राजगादी सांभाळणारी सिंहासनाधिष्ठीत अहिल्याबाई होळकर, लोककल्याणासाठी दक्ष व प्रत्यक्ष काम करणारी अहिल्याबाई होळकर,  पर्यावरणाकडे लक्ष देणारी अहिल्याबाई होळकर,  नर्मदा तीरी बसून मासे व प्राणीमात्रांना अन्न टाकणारी अहिल्याबाई होळकर* अशी त्यांचे विविधांगी सत्यरूपे प्रदर्शित करणारी प्रतिमा/ पुतळे सार्वजनिक होणे आवश्यक आहे.
       एखाद्या कर्तबगार पुरुषाचा किंवा स्त्रीचा पुतळा कसा असावा ? हा मोठाच प्रश्न असला तरी पुतळा नेहमी त्या *व्यक्तित्वाचा निदर्शक असावा, त्यातून तो भावी पिढ्यांसाठी प्रेरणा निर्माण करणारा असावा, काही नव्हे तर एक विशिष्ट समाजोपयोगी संदेश पोहोचविणारा असावा.*
              झाशीची राणी लक्ष्मीबाई (पेशव्यांची भाची) च्या हातात ढाल तलवार, पाठीवर लेकरू(वारस) घेऊन घोड्यावर स्वार असलेली प्रतिमा व पुतळा आज सार्वत्रिक दिसून येतो. तो पुतळा किंवा प्रतिमा पाहून मनात शूर वीर भाव जागृत होतो. त्या सातत्याने लढत होत्या असा विचार डोक्यात येतो. (काही विचारप्रवाह त्यांच्या लढण्यावर आक्षेप घेऊन त्या लढल्याच नाही, त्यांच्या नावाने झलकारीबाई लढण्याचा पुरावा देतात) पुतळ्या मधून पराक्रमाच्या छटा अलगत झलकतात. त्यांचा पुतळा पाहून भावी पिढ्यांच्या भल्यासाठी त्या ढाल तलवार घेऊन लढल्या, असा संदेश तो पुतळा देतो, त्यापासून मिळणारी प्रेरणा लढण्याची उर्मी निर्माण करतो. पेशवे तर गणपती भक्त धार्मिक प्रवृत्तीचे होते परंतु कुठल्याही पेशव्याची प्रतिमा त्यांच्या धार्मिक भावना प्रदर्शित करणारी सार्वजनिक स्तरावर दिसत नाही.
         रयतेचा राजा शिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांनी शिवरायांला घडवले ही महत्त्वपूर्ण बाब आहे. ते त्यांच्या संस्कारात वाढले हे सुद्धा सत्य. त्यामुळेच कदाचित बालशिवाजीला धडे देत जिजाऊंना दाखवले जाते. अलीकडे तर जिजाऊंच्या हातात तलवार दिसायला लागली आहे. तेव्हा मला प्रश्न पडतोय की त्यांच्या हातात तुळजाभवानी किंवा रेणुका मातेची भक्ती करताना जिजाबाईंना का दाखवले जात नाही.
          असो कोणाची प्रतिमा कशी बनवायची हा इतिहासाचा व अभ्यासकांचा  बनविण्याचा भाग असला तरी *भावी पिढ्यांना प्रेरक व सर्व गुण संपन्नता प्रदर्शित करणारा प्रत्येक पुतळा असावा असं मला वाटते.  अहिल्याबाई होळकर यांच्या हातातील पिंडधारी पुतळा यापुढे अहिल्याबाई होळकर यांना मर्यादित करणार नाही. एवढीच अपेक्षा!*


(या संबंधाने काही सूचना मतमतांतरे असल्यास कृपया ९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद मात्र नक्कीच करावा.)
 ________________________________________
 *राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचा अभ्यासक*
      *डॉ प्रभाकर लोंढे*
             गोंदिया चंद्रपूर

No comments:

Post a Comment