ऋणानुबंध
जेव्हा आपलेच
आपल्याला खेटतात,
नकळत लुटतात.
पुन्हा नाक वर करून भेटतात.
तेव्हा होतो वेदनांचा
महाभयंकर कडकडाट,
मनाचा थरथराट.
अशा विस्फोटक अवस्थेत
दु:खानी भरलेल्या ढगातून
नकळत ढसाढसा
अश्रुंचा पाऊस बरसावा.
अन् आलेल्या महापुरात
वाहून जावी ती
दु:खांची जळमटं.
निर्विकार नात्यांसाठी....
अन् त्या नात्यांच्या समृद्धीसाठी.....
हे शक्य होत नाही
तेव्हा उभा राहतो
नात्यांचा महाभयंकर कलह
नात्यांच्याच विरोधात
अणि त्या कोलाहलात
नष्ट होवून जातात नाती...
मग रक्ताची असो वा
असो जिव्हाळ्याची....
डॉ प्रभाकर लोंढे
No comments:
Post a Comment