Tuesday, May 3, 2022

धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?

 धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?


                  डॉ प्रभाकर लोंढे


              शिर्षक वाचून प्रथम दर्शनी काहीना आश्चर्य वाटेल की संघटना सुद्धा आत्महत्या करतात? तेव्हा आज पर्यंत च्या अनुभव आणि अभ्यासावरुन मी त्यांना म्हणेल "होय". धनगर संघटना आत्महत्याच करतात... तसं यामध्ये त्यांना आश्चर्य वाटण्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही कारण आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या , तरुणांच्या आत्महत्या, सुनेची आत्महत्या अशा खाजगी जीवन संपविणाऱ्या आत्महत्या ऐकलेल्या आहेच, परंतु  त्यांनी "आत्महत्या" हा शब्द केवळ एका व्यक्तीशी संबंधित आहेत, या अर्थाने ऐकलेला आहे हे नक्की...  आता संघटना सुद्धा "आत्महत्या" करीत असते, हा विचार कदाचित त्यांना प्रथम दर्शनी नवीन असल्याने.. आश्र्चर्यकारक वाटू शकतो.


         साधारणतः "आत्महत्या" तो करीत असतो, जो आत्मबल गमावून बसतो. तशी आत्महत्या ही एक मानसिक प्रक्रिया असते,  त्याच्या असण्या- नसण्यात, त्याच्या जगण्या- मरण्यात त्याला काहीच रस उरत नसतो. तो विवेकशून्य होवुन जातो आणि नकळत स्वतःच स्वतःला संपवून घेतो. स्वत:ला संपविण्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. कधी कधी यामागे कारणीभूत भलेही दुसराच कोणीतरी वाटत असेल तरी आत्महत्येची जबाबदारी मात्र त्याच्यावरच निश्चित होत असते. कारण आत्मबल, आत्महत्या ह्या बाबी व्यक्तीच्या मनोबलाशी संबंधित असतात. मनोबलाच्या नकारात्मक अवस्थेचा अंतिम परिणाम "आत्महत्या" हा असतो. 

           प्रत्येकाच्या मनोबलाची अवस्था ही त्याची विचारक्षमता तसेच वैचारिक गुणवत्ता आणि वैचारिक दिशा यावरून निर्धारित होत असते. आणि या सर्व बाबींचा प्रमुख आधार असतो तो "विचारप्रणालीचा".... साधारणतः व्यक्तिगत पातळीवर विचार केल्यास व्यक्तीच्या खाजगी जीवनात आध्यात्मिकतेला किंवा भौतिकतेला प्राधान्य देणारी विचारसरणी जीवनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार असतो... विचारसरणी खाजगी जीवनाचा अतिशय महत्त्वाचा पैलू असतो. आणि तिला अनुसरण्याच्या प्रमाणावरून जीवनाच्या आलेखाची दिशा व अंत निर्धारित होत असतो.

         हाच विचार किंवा हिच सत्यता संस्था, संघटना, चळवळीच्या बाबतीत सुद्धा लागू होत असते.  त्यामुळे  संस्था, संघटना, चळवळी मोडित का निघतात? याचा विचार करतांना मी म्हणेल, काही संघटना तर नकळत स्वतःच आत्महत्या करीत असतात... स्वत:च्या कार्यपद्धतीतून अनपेक्षित, अनभिज्ञपणे स्वत:च स्वतःच्या आत्महत्येची बीजं पेरतात. आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की, ती संघटना काही काळाने आपोआप अंतिम घटका मोजायला लागते.. आणि नामशेष होवून जाते. 

          यालाच संघटनेची "आत्महत्या" असे म्हणता येईल. असे मला वाटते. आणि धनगर जमातीतील विविध संघटनांच्या बाबतीत ऐतिहासिक अभ्यास केला तर अशा अनेक संघटनांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. किंवा वर्तमानातील बहूतांश संघटना आता आत्महत्येच्या मार्गावर आहेत. आर.एस.एस आणि बामसेफ यांच्या धनगर जमातींमध्ये घुसलेल्या "विंग" सोडल्या तर  इतर बहुतेक धनगर संघटना (स्वत;ला बुध्दिजीवी समजणाऱ्यांच्या सुद्धा)  आत्महत्येच्या मार्गावर आहे, असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दीर्घायुष्यी धनगर संघटनां दिसत नाही.... हे समाजाची खंत आहे. (हे माझं विश्लेषणात्मक मत आहे, काहीच्या बाबतीत चुकीचे असण्याची दाट शक्यता आहे.. त्यांनी संशोधन करावे)

              धनगर संघटनांच्या आत्महत्ये मागे अनेक कारणे कारणीभूत असली तरी, त्यापैकी काही निवडक, ठळक, महत्त्वाची कारणं पुढील प्रमाणे मांडता येईल.


१) अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वस्थाच्या भावनेचा अभाव...


२) निर्मिती मागचा छुपा संकुचित दृष्टिकोन...


 ३) एका निश्चित सर्वसमावेशक विचारसरणीचा कमी अधिक अभाव, 


४) दुरगामी ध्येयवृत्तीचा अभाव,


५) स्वामीत्वाच्या छुप्या भूमिकेत असलेले संघटनेचे मालक ठरवेल तीच अंतिम कार्यपद्धती... 


 ६) एखाद्या संघटनात्मक पदावर आरूढ होऊन, पदांची झालर चढवून पद, प्रतिष्ठा प्राप्त करण्याची मनिषा...


७) सभासदांचा  विचार, संघटनेप्रती धारणा, दृष्टिकोन यांना स्थान न देता संघटनेची होणारी एककल्ली,- एकवल्ली सरंजामी वाटचाल. 

८) एखादा व्यक्ती, संकुचित प्रवृत्ती संबंधात बटीक वृत्ती


या कमी अधिक अभावात्मक परिस्थितीमध्ये केवळ भावना(काहितरी दिव्य करण्याची) व स्वार्थ (पदांची लालसा, प्रसिद्धीची भूक किंवा प्रासंगिक/संघटनांत्मक प्रतिशोध/व्यक्तिगत विरोध) यांच्या आधारे संघटना जन्म घेते. भावनात्मक आधार घेऊन संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य यांच्या मनाला भावेल अशी ती "संघटना" ही संघटनेची व्याख्या होऊ लागते, तिचा विस्तार सुद्धा संकुचित ध्येयासह मनाच्या समाधानासाठी एककल्ली मार्गाने होवू लागते, तेव्हा ती संघटना ----------- लिमिटेड & कंपनी सिध्द होते. संघटनेविषयी मालकीची भावना निर्माण होते व  बळावते. विचारसरणी पेक्षा स्वार्थाला/ व्यक्तीला महत्त्व दिले जाते. 

         अशी ती संघटना काही प्रमाणात श्वास घेत असली तरी तिचा प्रवास मात्र सर्वनाशा कडे सुरू झालेला असतो. केवळ स्वार्थाने चिपकलेली माणसं त्या संघटनेचे पायिक नाही तर "वाहक"  या अर्थाने कार्य करीत असतात. स्वाभिमानी (Self respect) माणसं कधीचेच दूर झालेले असतात.

          गाय मरताच गेचूडांनी पलायन करावे, या भूमिकेत असलेले स्वार्थपिपासू संघटनेच्या अंतिम घटकेला सोबत राहीलच याचा नेम नसतो.. शेवटी संघटनेचा मालक स्वरूपात असलेला अध्यक्ष किंवा इतर वाहक संघटनेच्या आत्महत्येचा साक्षिदार ठरतो. हा संघटनेच्या निर्मितीपासून पेरल्या गेलेल्या बिजांकूराचा परिणाम असतो.


         असले बिजांकूर वेळीच ओळखले नाही तर फार मोठं सामाजिक व खऱ्या समाजहित चिंतकांच खूप मोठं नुकसान होत असतं.... कारण जीवनातील वेळ, पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो... अनपेक्षित चुकीच्या प्रवृत्तींना बळ मिळतं.. यातून एखादा "ढेंड्या" मोठा होतो आणि समाजाचा लिलाव होतो...  समाज प्रवाहाबाहेर फेकला जातो. 

         असला प्रकार संघटनेच्या बाबतीत कुठे होऊ नये कारण, "संघटना" कुठल्याही समाजाचा आत्मा असतो. संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेला समाज एक कृतिशील तसेच आत्मनिष्ठ आणि कार्यप्रवण प्रगल्भ समाज असतो. अशा त्या संघटना समाजामध्ये सातत्याने परिवर्तन तसेच प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. अशा संघटना म्हणजे काय याचा विचार केला तर एका "विशिष्ट विचारसरणीच्या आधारे संघटित होऊन विशिष्ट कार्यपद्धतीनुसार विशिष्ट ध्येयासाठी कार्य करणारा संघटित प्रवाही गट म्हणजेच संघटना होय"


धनगर संघटनांना आत्मपरीक्षणार्थ, समाजहितार्थ सदर लेखन प्रपंच....

यामध्ये काही आक्षेप असल्यास कृपया

९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद साधू शकता....




डॉ प्रभाकर लोंढे

No comments:

Post a Comment