Friday, May 30, 2025

विद्रोही राजमाता अहील्याबाई होळकर...... एक आकलन.

 विद्रोही राजमाता अहील्याबाई होळकर...... एक आकलन

        डॉ प्रभाकर लोंढे

         आज ज्यांची 300 वी जयंती संपूर्ण जग साजरी करीत आहेत, त्या लोककल्याणकारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव घेतलं तरी एक शांत, संयमी, आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त आदर्श महिला व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.  आयुष्यभर दुःखाला पेलत, तोलत आणि त्यावर मात करत, स्वतःच्या जीवनाला, जीवनातील प्रत्येक क्षणाला इतरांसाठी अर्पण करणारं एक आदर्श व्यक्तित्व म्हणून अहिल्याबाई होळकर यांचं एक सोज्वळ व्यक्तीमत्व आपल्याला प्रभावित करून जातं. 

   असं असलं तरी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाची सारांश रूपाने समीक्षा करताना एक विशेष बाब लक्षात येतं, आणि प्रकर्षाने समजून घेणं सर्वांना अत्यावश्यक ठरतं आणि या भारत भूमीतील वैचारिक तसेच तात्विक उत्क्रांतीमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांना एक "विद्रोही" विचारवंत म्हणून सुद्धा मान्यता देणं भाग पडतं. त्या मान्यतेतच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाचा मोठेपणा आहे असं मला वाटतं..

          राजमाता अहिल्याबाई होळकरांना विद्रोही विचार परंपरेतील एक महत्त्वाची कळी घोषित करीत असताना कदाचित काहींना ही बाब पटायला सहज शक्य होणार नाही. परंतु ते पटवून समजून उमजून घेण्यासाठी त्यांना प्रथमतः  "विद्रोह" म्हणजे काय? या बाबतीत विचार प्रवाही करणे आवश्यक आहे. 

       त्यासाठीच त्यांनी ही बाब गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक आहे की, प्रचलित व्यवस्थेतील विद्यमान प्रथा, परंपरा, आणि विचार प्रवाह यांची समीक्षा करून त्यातील वाईट गोष्टींचा विरोध व आवश्यकतेनुसार त्याग करून नवीन पुरोगामी विचाराची मांडणी, प्रचार, प्रसार आणि स्विकार करणे, तो अंगिकारणे, कृतीत उतरविणे, त्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करणे, याला माझ्या मते प्रचलित व्यवस्थेच्या विरोधी केलेला तो "विद्रोह" आहे.

       ही विद्रोही विचार परंपरा भारतासाठी नवीन नाही.  सामाजिक नवनिर्मितीच्या विद्रोही परंपरेला येथे फार मोठा ऐतिहासिक आधार आहे. त्यापैकीच एक प्रकारचा विद्रोह अहील्याबाई होळकर यांनी केला.  तो भारताच्या इतिहासात पहीला नव्हता तर त्या विचार परंपरेपैकी त्या एक कडी बनल्या. म्हणूनच या ठिकाणी

त्यांच्या अगोदरच्या विद्रोही परंपरेतील काही निवडक नावे   आपल्याला देता येईल.        

             चार्वाक, गौतम बुद्ध, महावीर जैन, संत कबीर, संत तुकाराम यांनी सुध्दा विद्रोह केला होता. त्यानंतर  अहिल्याबाई.. या शिवाय नंतरच्या विद्रोही विचार परंपरेचा विचार केला असता, छत्रपती शाहू महाराज,  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे  यांना या विद्रोही परंपरेत समाविष्ट करणे आवश्यक ठरते. कारण त्यांनी नवं समाज निर्मितीसाठी प्रस्थापित व्यवस्थेतील कुरितींवर प्रहार करून नवीन वैचारिक प्रवाह निर्मिती सोबतच कृतीयुक्त कार्यक्रम राबविला.. याच विद्रोही परंपरेतील अहिल्याबाईं होळकरांनी तत्कालीन समाजातील वाईट रुढी, प्रथा, परंपरावर  प्रहार करीत स्वतःच्या संयमशील आचरणातून पुरोगामी समाज निर्मितीचा ध्यास घेतला होता. त्यासाठी आवश्यक सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता... त्यामुळेच राजमाता अहिल्याबाई होळकर विद्रोही विचार परंपरेतील ठरतात..

ते पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल.

१) शैक्षणिक विद्रोह...

       ज्ञानाचा संग्रह करून व्यक्तीची वैचारिक क्षमता वृद्धिंगत करणारी प्रक्रिया म्हणजेच शिक्षण... परंतु मध्ययुगीन समाजात अशा त्या महत्वपूर्ण प्रक्रियेपासून स्त्रियांना वंचित ठेवण्याचे कार्य तत्कालीन समाज व्यवस्थेने केलेले होते.. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता.  त्यामुळे स्त्रियांनी शिक्षण घेणे हा गुन्हा मानला जात होता. 

        अशा त्या समाज व्यवस्थेमध्ये अहिल्याबाई होळकरांनी शिक्षण घेतलं. पुरोगामी पाऊल टाकलं. स्वतःला परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने पुरुषांच्या  बरोबरीने शिक्षणासाठी त्यांनी टाकलेलं त्यांचं पहिलं पाऊल हे खऱ्या अर्थाने तत्कालीन प्रचलित समाज व्यवस्थेच्या विरोधातील पुरोगामी पाऊल होतं. तो एक प्रकारे त्यांनी केलेला महत्त्वपूर्ण सामाजिक विद्रोह होता.


२) राजकीय विद्रोह. 

    अहिल्याबाई होळकर यांच्या राजकीय विद्रोहाच्या जर विचार केला तर तोच खऱ्या अर्थाने त्यांचा मोठा पराक्रम होता. स्त्रियांना राजकीय तर सोडाच पण स्त्री म्हणून सुद्धा सामाजिक धार्मिक अधिकार नाकारणाऱ्या समाजात तिला राजकीय अधिकार मिळाले पाहिजे. तो तिचा तसा पुरुषांबरोबरीचा अधिकार आहे. या प्रगल्भ कृतीयुक्त विचारसरणीतून त्यांनी स्त्रियांसाठी प्रथमता राजकीय क्षेत्र मुक्त केले. त्यामुळे भारत भूमीत राजसत्तेसाठी राजकीय विद्रोह करणारी आणि राजकीय सत्ता स्वतःकडे घेणारी ती पहिली स्त्री ठरते.  

         थोडक्यात सांगायचे झाल्यास राजसत्ता हातात घेण्याचा आणि ती सांभाळण्याचा अधिकार पुरुषांबरोबरच स्त्रियांना सुद्धा मिळायला पाहिजे असा विचार मांडणारी आणि त्याच्या अंमलबजावणीस स्वतःपासून सुरुवात करणारी अहिल्याबाई होळकर ही खऱ्या अर्थाने महिलांच्या राजकीय क्रांतीचा अग्रदूत ठरते.

               युरोप खंडात आणि इंग्लंड सारख्या प्रगतिशील समाजात महिलांना राजकीय सत्ता तर सोडाच, मतदानाचा सुद्धा अधिकार नव्हता त्या काळात भारतीय समाजामध्ये राजकीय सत्ता स्वतःकडे घेणारी अहिल्याबाई होळकर ही खऱ्या अर्थाने भारतीय समाजामध्ये महिलांच्या दृष्टीने राजकीय क्रांती करणारी जागतिक विद्रोही महिला ठरते.

         त्या काळामध्ये स्त्रियांना राजसत्ता धारण करण्याचा अधिकार नसताना सामाजिक रिती रिवाज रूढी, प्रथा, परंपरा आणि त्याचे ठेकेदार यांना न  जूमानता इंदोर संस्थानाची राजगादी २८ वर्षे सांभाळली.  सभोवताली असलेल्या विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून एका समृद्ध दरारा असलेल्या संस्थानांचा राज्य कारभार उत्तम प्रकारे लोकाभिमुख सांभाळला.

        त्यांच्या राजकीय सत्ता पदाला विरोध करणाऱ्या धार्मिक ठेकेदार व राज सत्तेचे ठेकेदार, पुरुषी वर्चस्ववाद यांना झुगारून देऊन लोककल्याणाकारी राज्य अशी आपल्या इंदोर राज्याची छबी सर्वत्र निर्माण केली. राजसत्तेला आध्यात्मिक अधिष्ठान देण्याचे कार्य केले. आपले राज्य धर्मांध किंवा धार्मिक नाही तर सर्व धर्म समभाव जपणारे आदर्श राज्य म्हणून नावारूपाला आणले. राज्याचा दरारा कायम टिकवून ठेवण्याचे व होळकरशाहीचा कर्तबगार ऐतिहासिक वारसा वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न अहिल्याबाईनी केला. त्यासाठीच राजसत्ता स्वतःकडे घेण्याचे विद्रोही कार्य अहिल्याबाई होळकरांनी केले. इंदोर संस्थांनाचा वारसा, त्याला राजकीय सातत्य देण्याचे काम एक स्त्री, ती पण विधवा स्त्री असताना सुद्धा यशस्वीपणे केले, हा त्यांचा राजकीय विद्रोह खऱ्या अर्थाने लोककल्याणासाठी असून, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं, तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो हे आपल्या विचार व कृतीतून दाखवून देण्याचे कार्य अहिल्याबाई होळकरांनी राज सत्तेच्या माध्यमातून केलं.  तो त्यांनी केलेल्या तत्कालीन राजकीय विद्रोहाचा परिणाम होता.


३) धार्मिक विद्रोह..   धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब असून प्रत्येक धर्माने केवळ मानव कल्याणाचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाचे आचरण मानवतेला जपणारं असलं पाहिजे, प्रत्येक माणसाची परधर्मीयांविषयी आदर व सन्मान जनक वागणूक असली पाहिजे. कोणत्याही धर्मासाठी व्यक्ती नसून व्यक्तीसाठी धर्म आहे, अशा प्रकारचा विचार अहिल्याबाई होळकर यांच्या विचारसरणीमध्ये होता. त्यामुळे व्यक्तीला बंदिस्त करणाऱ्या धार्मिक रूढी प्रथा परंपरांचा त्यांनी कडाडून विरोध केला.  त्यांनी कोणत्याही एका धर्माला प्राधान्य न देता सर्वधर्म समभाव जपत धर्मातील पवित्र स्थानांचा विकास मानवाच्या सोयी आणि सुविधेसाठी करून घेतला. धर्मातील विकृतींवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रसंगी कठोर निर्णय घेतले. यावरून धर्माच्या अनिष्ट प्रथांच्या विरोधात विद्रोह करणारी आणि मानवतेला मुक्तीचा मार्ग दाखविणारी अहिल्याबाई होळकर जगाच्या पाठीवर एक महत्त्वपूर्ण क्रांतीकारी  विद्रोही महिला म्हणून सिद्ध होते.


४) सांस्कृतिक विद्रोह

"जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. ती समाजात रुढी, प्रथा, परंपरांच्या माध्यमातून प्रचलित असते. अशा त्या रूढी, प्रथा, परंपरापैकी काही काळाच्या बरोबर समाज विघातक ठरत असतात. त्यामुळे त्या वेळीच नष्ट होणे आवश्यक असते. परंतु समाज त्यांना तोडायला तयार नसतो.  अशावेळी समाजाचा विरोध पत्करून समाजात नवीन विचार प्रवाह प्रवाहित करण्यासाठी एका विद्रोहाची गरज असते. भारतीय समाजात अशा प्रकारचा सांस्कृतिक विद्रोह राजमाता अहिल्याबाई होळकरांनी केला. समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः पासून सुरुवात केली. विधवांना संपत्तीच्या अधिकार, स्त्रियांच्या हातात राज्य, शस्त्र व शास्त्र या सर्व पुरुषांबरोबरीच्या बाबी स्त्रियांच्या जीवनात याव्यात, यासाठी त्यांनी एल्गार पुकारला आणि महीलांच्या जिवनात, दैनंदिन जगण्याच्या पद्धतीत परिवर्तनास सुरुवात झाली.  याचे श्रेय राजमाता अहिल्याबाई होळकरांनाच जातं, हा सुद्धा त्यांचा सांस्कृतिक विद्रोहच होता.  

         एकूणच राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जीवनाचा विचार केल्यास त्यांची विचारसरणी व कृती मध्ये दलित शोषित, पीडित, वंचित या सर्वांच्या दुःखाचे निराकरणाचा मार्ग प्रामुख्याने दिसून येतो. मी कोण ?माझे कोण? मी कोणासाठी जगायचे? याचा विचार करणारी विचारसरणी अहिल्याबाई होळकरांच्या विचारात दिसून येते. खरंच त्यांचे विचार समाज परिवर्तनाला चालना देणारे पुरोगामी विचार आहे ... आज त्यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन... विचार अनुसरणाच्या दृष्टीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!


डॉ प्रभाकर लोंढे 

राजकीय अभ्यासक 

नागपूर 

Tuesday, November 26, 2024

प्रा. राम शिंदे व शिलेदार खंडेराव होळकरांचा राजकीय पराभव सेम ... सेम ... सेम....सेम

 प्रा. राम शिंदे व शिलेदार खंडेराव होळकरांचा राजकीय पराभव 
सेम ... सेम ... सेम....सेम

डॉ प्रभाकर लोंढे


(याला ऐतिहासिक संदर्भ

प्रथम हा लेख वाचा.

https://sanjaysonwani.blogspot.com/2020/04/blog-post.html )


    महाराष्ट्राच्या विधानसभा २०२४ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रा. राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधील पराभव कोणालाही पचनी न पडणारा व महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्यांना विचार करायला लावणारा आहे.. याशिवाय येथील विकृत प्रवृत्तींना उजाळा देणारा आहे.

   महाराष्ट्र विधानसभा २०२४ ची निवडणूक महायुती व महाआघाडी या दोन प्रामुख्याने  आघाड्यामध्ये लढली गेली हे सर्वांना माहीत आहे.

      प्रा. राम शिंदे महायुतीचा उमेदवार म्हणून कर्जत जामखेड मधून रिंगणात होते. असे असताना त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांचा पक्ष (बीजेपी ) व घटक पक्षांच्या नेत्यांवर होती. याचा अर्थ त्यांच्यासाठी वेळ देणे, प्रचार सभा घेणे, प्रचारासाठी आवश्यक ती मदत करणे हे प्रथम देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे परम कर्तव्य होते. परंतु असं झालेलं दिसत नाही.. याची खंत खुद्द राम शिंदे सरांनी व्यक्त केलेली आहे.

      त्यांना दिल्ली कार्यालयातून सुद्धा मदत मिळाली नाही.  फडणवीस साहेबांनी सुध्दा कर्जत जामखेड मध्ये सभा घेतली नाही. अजित पवारांनी तर राम शिंदे सरांना प्रतिसादच दिला नाही. यविषयी राम शिंदे सरांनी खेदपुर्वक आपबिती सांगितली... त्यामुळे सभा घेण्याचा प्रश्नच नाही. उलट राम शिंदे सरांचे प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार रोहीत पवार यांच्या विजयासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. हे सिद्ध झालेले आहे. व त्यांनी ते अप्रत्यक्ष कबुल सुद्धा केलेलं आहे.

    ही सर्व परिस्थिती पहाता,  राम शिंदे यांना स्वबळावरच आपला मतदारसंघ लढावा लागला. ( आधुनिक पेशवा देवेंद्र फडणवीस व मराठा सरदार अजित पवार यांच्या नाटकीय सहकार्याला सांभाळत मतदारांपर्यंत जाणे. आपलं अस्तित्व निर्माण करणे. ते टिकवून ठेवणे,  त्याला मतदानात व मतदानानंतर आपल्याला अपेक्षित निकालात परावर्तित करून घेणे, केवळ पवार घराण्यालाच शक्य असलेलं काम राम शिदे साहेबांना शक्य झालं नाही.. आणि राम शिंदे सरांचा पराभव झाला हे त्यांना न पचणारं सत्य स्विकारावं लागलं.

       साम-दाम-दंड- नीतीभेद याचा वापर करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झालेल्या मतदारसंघात आपला नातू रोहित पवार ला निवडून आणणे, यासाठी कोणत्याही खालच्या पातळीवर जायला तयार असलेल्या सन्माननीय शरद पवारांच्या सुपरीचित नीतीला भेदणे , अहील्याबाईंचा रक्त व तत्वशील वारसा जपणाऱ्या प्रा राम शिंदे यांना शक्य झालेलं दिसत नाही. यात राम शिंदे साहेब कमजोर होते असं कदापिही नाही.. 

       परंतु वयस्कर शरद नितीचा शब्द मोडेल, एवढे राजकीय नैतिक सामर्थ्य आज तरी देवेंद्र फडणवीस कडे आहे, असं मला वाटत नाही..  (मागील लोकसभेत सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात महादेव जानकर साहेब यांच्या साठी सुद्धा मा्. नरेंद्र मोदी साहेबांनी सुध्दा सभा घेतली नाही ) (यावेळी तर घरातच नाटकीय विरोध तयार करून-सुप्रिया×सुनेत्रा, अजित×युगांत अशी सत्ता घरातच ठेवण्याची नाटकीय कला जर कोणाला जमली असेल तर मा. शरद पवार साहेबांचं नाव प्रथम येतं) 

     राम शिंदे सर आपलं युद्ध हे कुंभेरीच्या युद्धासारखं होतं. ज्याप्रमाणे या युध्दात पेशवा रघुनाथराव व मराठा सरदार जयाजी शिंदे हे दोघेही सुभेदार मल्हारराव व शिलेदार खंडेराव होळकर यांच्या सोबत असले तरी प्रतिस्पर्धी शत्रू सुरजमल जाटाशी जवळीकता साधून होते,  युध्दानंतर सुरजमल जाटाला संरक्षणाची हमी देणारे जयाजी शिंदेच होते. व त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेणारे पेशवा रघुनाथराव होते. परिणाम होळकरांना भोगावे लागले. सुभेदार मल्हाररावांचा कर्तबगार वारस गमवावा लागला... त्यांना पचनी न पडणारा दुःख पचवावं लागलं.

      तुमच्या कर्जत जामखेडच्या 2024 च्या युद्धात अजित पवार तुमच्या सोबत असले तरी ते तुमचे कधीच नव्हते.  देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच बघ्याची भूमिका घेतली कारण ते आतून शरद पवारांच्या आज्ञेचा सन्मान राखणार होते.

 कुंभेरीच्या लढ्यात पराक्रमी खंडेरावांचा बळी गेला.  सुदैव की तुम्ही जिवंत आहात. सत्तेसाठी आम्ही कोणत्याही स्तरावर जाणार .... हा येथील महाराष्ट्रीयन काही प्रवृत्तींचा गुणधर्म आहे.....

 यापूर्वी आदरणीय महादेव जानकर साहेबांना सुद्धा अशाच प्रकारे बारामती मध्ये एकाकी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा वारसा तुम्हाला भोगावा लागला.. शिंदे साहेब वाईट वाटण्याची गरज नाही कारण तो तुमचा नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता....

  लोकशाहीमध्ये तुम्ही जिवंत आहात.. जिएंगे तो और भी लडेगे!!!!

आता प्रश्न आहे फक्त ...

भारतीय जनता पक्ष / मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि!  आपलं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करतय?


  खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय जागृतीचा अभ्यासक)

9673386963



 








                  

Thursday, May 30, 2024

राजमाता अहिल्याबाई होळकरांचं हिंदूत्व नाही तर आध्यात्मिकत्व...

 राजमाता अहिल्याबाई होळकरांचं हिंदूत्व नाही तर आध्यात्मिकत्व...


डॉ प्रभाकर लोंढे


     भारताच्या इतिहासात राजमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव जे काही अतुलनीय आहे, त्यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजेच त्यांची आध्यात्मिकता .त्यांचा नेहमीच विशेषत्वाने उल्लेख केला जाते. 

      त्यांना मिळालेली पुण्यश्लोक पदवी किंवा त्यांनी जीवनभर केलेला धार्मिक स्थळांचा, त्यातही सर्वाधिक मंदिरांचा जीर्णोद्धार. याशिवाय त्यांचा दैनंदिन चालणारा दानधर्म,  व्रतवैकल्य, पुजा अर्चा , शिव शंकरा प्रती असलेली श्रद्धा या सर्व बाबी पाहता बहुतेक लोक त्यांना हिंदू किंवा अलीकडे तर काही महाभाग हिंदुत्ववादी, हिंदू धर्मरक्षक इथपर्यंतची विशेषण लावण्यासाठी उतावीळ झालेले पाहायला मिळतात. 

        यामध्ये काही चुकीचं आहे असं म्हणता येत नसलं, कोणाला चुकीचे ठरवणे हा माझा अधिकार नसला तरी या शब्दांच्या माध्यमातून राजमाता अहिल्याबाईंच्या जीवनाला मात्र मर्यादित केलं जात आहे, असं माझं नक्कीच स्पष्ट मत आहे. कारण त्या हिंदू धर्मात जन्माला आल्या.  हिंदू धर्मानुसार जीवनभर जगल्या.  हिंदू देवता शिवाशंकराच्या त्या भक्त असल्या तरी मात्र त्या केवळ हिंदू धर्माच्या होत्या. त्यांनी केवळ हिंदू धर्माचे रक्षण केलं. त्या हिंदुत्वासाठी जगल्या. त्या हिंदुत्ववादी होत्या, असं म्हणणं चुकीचं आहेत. कारण त्यांना कुठेही हिंदू धर्माची रक्षा करायची नव्हती, त्यांना मात्र मुळ हिंदू जीवन पद्धती मान्य होती,  त्याच वेळेस इतर धर्म पद्धती सुद्धा मान्य होती.त्या पध्दतीनुसार  जगणाऱ्या सुध्दा प्रत्येक माणसाच्या जगण्यामध्ये काहीतरी स्वारश्य निर्माण व्हावं, प्रत्येकाला आनंदानी जगता यावं. त्यांच्या जगण्यातील आनंद द्विगुणीत व्हावा, तो आनंद सातत्याने टिकून राहावा. त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करता यावी. प्रत्येकाचं जगणं सुखर व्हावं, या सर्व बाबी मात्र अहिल्याबाई होळकर यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन केलेल्या आहेत. त्या कधीच धार्मिक नव्हत्या, तर त्या धर्माच्या पलीकडे जाऊन त्या प्रचंड आध्यात्मिक होत्या.  

        त्यामुळे धर्म ही बाब त्यांना  जीवनामध्ये मर्यादित कधीच करु शकत नाही. धर्म ही प्रत्येकाची स्वतंत्रपणे खाजगी बाब असून  धर्म ही प्रत्येकाच्या घरची बाब आहे. 

       जेव्हा आपण समाजामध्ये जगत आहोत, त्यावेळेस जगत असताना आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे. माणूस म्हणून जगत असताना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ज्या आवश्यक आहे, त्या प्रत्येकाला मिळाल्याच पाहिजे. हा माणुसकीचा विचार त्यांच्या जीवनकार्याचा आधारस्तंभ होता.

          प्रत्येकाच्या ज्या दैनंदिन गरजा आहे त्या पूर्ण झाल्याच पाहिजे. त्या पूर्ण करताना कुठलाही त्रास होणार नाही मग तो व्यक्ती कुठल्याही धर्माची असो.  त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते ते देण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याचं काम राजमाता अहिल्याबाई होळकरांनी जीवनभर केलं. 

       ते हिंदू धर्माची म्हणून केलेलं नाही. कुठल्या हिंदूंसाठी केलेलं नाही. प्रत्येक माणूस हा माणूस असून मग ते धर्माने मुस्लिम का असेना,जैन का असेना, बौद्ध का असेना प्रत्येक धर्माच्या माणसासाठी ते होतं. 

                    थोडक्यात सांगायचं झालं तर अहिल्याबाई होळकरांच्या कार्याला एका धर्मामध्ये बांधून त्यांना मर्यादित करण्यासारखं होणार आहे. म्हणून हिंदुत्वाचे लेबल अहिल्याबाई होळकरांवर लावणं ही खऱ्या अर्थाने चूक आहे्  त्यांना हिंदुत्वामध्ये मर्यादित करून त्यांची जी वैश्विक दृष्टी, किर्ती आहे.  त्यांचा जो सर्वधर्मसमभाव आहे. त्यांचा जो काही वैश्विक दृष्टिकोन आहे. विश्व कुटुंबाच्या दृष्टिकोन आहे, तो मात्र हिंदुत्वामध्ये बांधून मर्यादित करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे केला जातो,  हे आम्ही केव्हा समजून घेणार आहोत..????



(२९९ जयंतीच्या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन व आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!)



डॉ प्रभाकर लोंढे

नागपूर

Tuesday, September 12, 2023

राधाकृष्ण विखे साहेब! भंडारा तर नेहमीच पवित्र पण तुम्ही कधी होणार?

राधाकृष्ण विखे साहेब! भंडारा तर नेहमीच पवित्र पण तुम्ही कधी होणार?


        डॉ प्रभाकर लोंढे


     "शेखर बंगाळे" नावाच्या धनगर युवकांने मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला त्याप्रसंगी त्या युवकाला झालेल्या मारहाणीचा निंदनीय प्रकार झाला.. तो प्रकार घडत असताना मात्र विखे पाटलांना त्या भंडाराची पवित्रता कदाचित समजली नसावी म्हणूनच त्या युवकाला मारहाण झाली, हे मात्र नक्की...  ती मारहाण होत असताना भंडाराची पवित्रता जाणून घेवून "आपला शब्द" मारहाण थांबवण्यासाठी वापरला असता तर त्यांच्या शब्दाचा मान राखणारे कार्यकर्त्यांनी ती मारहाण केलीच नसती. आणि उशिरा का होईना मा. विखे पाटील साहेब यांना भंडाऱ्याची पवित्रता मीडियासमोर येऊन सांगण्याची गरज पडली नसती.

        परंतु तसं झालेलं दिसत नाही. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न विखे पाटलांना करावसां वाटला नाही. भंडारा अंगावर पडत असताना त्यांना कदाचित तसं सुचलं नसावं. तसं त्यांना उरकलं नाही, असं आपण म्हणू शकतो.. 

       परंतु त्याप्रसंगी त्या युवकाला झालेली मारहाण अतिशय निंदनीय बाब होती हे मात्र नक्की. त्याचं श्रेय विखे पाटलांनी नक्कीच घेतलंच पाहिजे. त्याचा जबाब त्यांनी मतदार जनतेला दिलाच दिला पाहिजे. 

     शेखर बंगाळे या युवकांने उधळलेला पवित्र भंडारा "पवित्र" आहे, असं जर विखे पाटलांना वाटत असेल तर त्या कार्यकर्त्याला मारहाण कशी काय झाली? हा प्रश्न फार गंभीर आहे.. विचार करायला लावणारा आहे. वाचक मित्र याचा विचार नक्कीच करतील.

    आदरनिय विखे साहेब!आपल्या पिढ्यानपिढ्याचं राजकीय अस्तित्व जपणाऱ्या धनगर मतदार बांधवांचे उपकार तुमच्या भावी पिढ्या सुद्धा विसरू शकणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा मरणोपरांत विसरणे शक्य होणार नाही. ही वास्तविक एक महत्वपूर्ण बाब असताना, त्यांच्याच सहकार्याने आपण सत्ताधीश असताना, आपल्या हितचिंतक धनगर जमातीच्या समस्या जर सुटत नाही, उलट दिवसेंदिवस त्या जटील होत जात असतील. त्यांच्या त्या जटील प्रश्नांवर आपण बोलायला सुद्धा तयार नाही... त्यांच्या भावना समजून घ्यायला सुध्दा तयार नाही..  उलट त्यांच्या नामांतरा सारख्या भावनिक मुद्द्यांना जर आपण विरोध करणार असाल. तर आपल्या "मनाची अपवित्रता" मात्र नक्की स्पष्ट होते. तेवढ्याच तीव्रतेने जगासमोर येते. ती आपण मान्य करायला खरं तर हरकत नसावी. 

      तुमची ती अपवित्रता निघून जावी, आपलं मन शुद्ध व्हावं, आपल्या मनात सत्यतेच्या आधारे एक सद्भाव निर्माण व्हावा, आपल्याला सद्बुद्धी सुचावी, यासाठी उदार अंतकरणाने जर शेखर बंगाळे यांनी भंडाराची पवित्रता आपल्यावर उधळली तर मला असं वाटते की शेखर बंगाळे यांचे आपण मानावे तेवढे उपकार कमीच आहे. आपण माणलेच पाहिजे. कारण तू प्रश्न केवळ एकट्या शेखर बंगाळे नसून संपूर्ण धनगर जमातीच्या व आपला सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. व असायला हवा..

        आपणास याची जाणीव असेलच. भंडारा /हळद ही अँटिबायोटिक आहे. त्यामुळे अनेक रोग दुरुस्त होतात.  

"जातीय तिरस्कार" सारखा रोग आपल्या मनाला जडलेला  असेल तर तो मात्र यानंतर निघून जावा. धनगर समाजाच्या भावना त्यांचे प्रश्न याविषयी आपल्या मनात सद्भावना निर्माण व्हावी, त्यांच्यावर यथायोग्य तोडगा काढण्याची मनोवृत्ती आपल्यामध्ये विकसित व्हावी, ही आग्रहाची विनंती.

 आणि आदरणीय साहेब!आपणास माहिती असेलच जेव्हा हळदीचे पेटंट घेण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला तेव्हा भारताने भंडाऱ्याचा दाखला देऊन खंडोबाच्या देव्हाऱ्यात भंडारा का उधळला जातो याचा संदर्भ देऊन भारताने हळदीचे पेटंट आपल्याकडे राखून ठेवलं. एवढा मोठा राष्ट्र कार्यामध्ये उपयोगामध्ये आलेला भंडारा जर आपल्यावर उधळला जात असेल तर मला असं वाटते आपण त्याचा आनंदाने स्वीकार करायला हवा होता, त्यासंबंधीचा अभिमान आपल्याला वाटायला हवा होता, अशी उधळण करणाऱ्या शेखर बंगाळे सारख्या तरुणाचा आपणाकडून सत्कार व्हायला हवा होता... पण असं झालेलं दिसत नाही... होईल का नाही याची शाश्वती नसली तरी तेवढे पवित्र कार्य करण्याची मनोवृत्ती आपल्यात विकासित व्हावी व भंडाऱ्याप्रमाणे आपलं मन "पवित्र" व्हावं, एवढी खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन जेजुरीच्या खंडोबाला त्यासाठी मागणं घालतोय, धनगरांच्या भावनांची कदर करावी, एवढी आपणास विनंती करतो...


 धन्यवाद!

                                    आपला हितचिंतक

                                   व धनगर जमातीचा अभ्यासक

                                          डॉ प्रभाकर लोंढे

Monday, July 31, 2023

अण्णा भाऊ साठे: सर्वंकश क्रांतीचं वादळ.. डॉ प्रभाकर लोंढे

 अण्णा भाऊ साठे: सर्वंकश क्रांतीचं वादळ..
                                डॉ प्रभाकर लोंढे


   "क्रांती आणि प्रतिक्रांती" हा समाज विकास प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाच्या विचारांचा परिपाक असून एका नंतर दुसरे सातत्याने घडत आलेलं आहे. समाजात असलेले दोन वर्ग एक दुसऱ्यांवर अधिराज्य गाजवण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाजात आर्थिक संपन्नता असलेला वर्ग समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषत: राजकीय संस्थांवर अधिराज्य गाजवीत असतो. त्या माध्यमातून निर्माण झालेल्या व्यवस्थेत वंचित उपेक्षित निर्धन लोकांकडे दयेवर जगण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांच्यावर अनपेक्षितपणे सातत्याने अन्याय अत्याचार चालू असतात. तेव्हा अशा उपेक्षितांचा तारणहार समाजामध्ये परीस्थितीतून जन्माला येतो. त्यापैकीच एक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे!

         उपेक्षितांच्या वेदनांविषयी सामाजिक संवेदना जागवितो आणि त्या संवेदनेमधून क्रांतीसाठी एक सामाजिक वातावरण निर्माण करतो. त्यांच्या वाणी, लेखनीतून वैचारिक परिवर्तनाचा प्रवाह समाजामध्ये वाहायला लागतो. अशा त्या प्रवाहातील एक महत्त्वाचा "निखारा" म्हणून महाराष्ट्राच्या भूमीत १ आगष्ट १९२० ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे जन्माला आला तो अण्णाभाऊ त्याच मुळ नाव तुकाराम भाऊराव साठे !

     अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काम धंद्यासाठी गाव सोडून मुंबईत गेलेला हा आर्थिक दरिद्री माणूस प्रथम मार्क्सवाद व नंतरच्या काळात शाहू- फुले- आंबेडकर परिवर्तनवादी विचारसरणीचा पायिक ठरला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाने महाराष्ट्राचा व मराठी साहित्य जगताचा प्रेरणास्थान ठरला. केवळ भारतातीलच नाही तर जागतिक पातळीवर कामगार उपेक्षितांच्या जीवनात एक क्रांतीज्योत पेटवणारा एक "मशाल" ठरला.

       संपूर्ण जिवनात केवळ दिड दिवस शाळेत गेलेला हा अण्णा  आपल्या जीवनात ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य,११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या लिहीतो आणि मराठी साहित्य जगतात आपल्या लेखणीचा व वाणीचा ठसा उमटवतो. यावरून अण्णाभाऊंच्या जिवनाचं उच्च कोटीत्व लक्षात येतं.

        त्यांच्या साहित्य लेखनात माणूस हा केंद्रीय स्थानी असून संपूर्ण साहित्यातून दारिद्र्य, उपेक्षित जीवन व जीवन संघर्ष मांडला आहे. ते करीत असताना संपूर्ण परीवर्तनासाठी वैचारिक क्रांती कशी होईल याचा विचार मांडला आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन स्विकारून "ही धरती शेषनागावर नाही तर कष्टकऱ्यांच्या श्रमावर, त्यांच्या तळहातावर उभी आहे, अशा प्रकारचा वास्तववाद त्यांनी आपल्या लिखाणातून मांडला आहे. संपूर्ण विकास प्रक्रियेत कष्टकऱ्यांच्या कामाला महत्त्व देऊन श्रमिक व त्याचे श्रम याला विकासाचा केंद्रबिंदू बनविलं आहे. परंतु व्यवस्थेत श्रमिकांचं सातत्याने शोषण होतं, ही मात्र अण्णांची नेहमी खंत राहिलेली आहे, म्हणूनच शोषणमुक्त समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी कामगार, उपेक्षितांची चळवळ उभी राहावी, यादृष्टीने त्यांनी आपला विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

         इंग्रजांपासून मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्यासंबंधीचा त्यांचा एक वेगळा वास्तववादी विचार असून १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नसून त्यांना स्वातंत्र्यासाठी समग्र क्रांति अपेक्षित होती. या स्वातंत्र्यातून सवर्णांचं, उच्चवर्णीयांचं राज्य स्थापन होणार आहे, त्यातून शोषणमुक्त समाज निर्माण होऊच शकत नाही, असं त्यांना वाटत असल्यामुळेच त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये २०००० लोकांसह मोर्चा काढला आणि "यह आजादी झुटी है, देश की जनता भुखी है! या घोषणेने सरंजामी स्वातंत्र्याचा धिक्कार केला.

      संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेचं योगदान अतिशय मोलाचं आहे. भाषावार प्रांतरचनेमध्ये मराठी भाषेच्या आधारे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी जे जन आंदोलन उभं राहिलं, त्या जन आंदोलनात प्राण भरण्याचं, सामाजिक वातावरण निर्माण करण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ, अमर शेख यांनी केलं. शाहिरी, पोवाडा, लावणी सारख्या लोकसंगीतातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात रूजविण्याचं, चळवळीला सार्वत्रिक करण्याचं कार्य अण्णाभाऊनी केलं.

'माझी मयना गावाकडं राहीली, माझ्या जिवाची होतेया काहीली.." हे त्यांचं गाणं चळवळीमध्ये अतिशय गाजलं. त्यांची डफावरील थाप आणि पहाडी आवाजातील पोवाडे, गीतं, लावण्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माणसं जोडण्याचं काम केलं, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊचं योगदान विसरता येणार नाही.

      मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेल्या अण्णाभाऊंनी भारतात साम्यवादी विचारसरणी  रूजविण्याचं कार्य केलं, विचारसरणी कोणतीही असो, परंतु उपेक्षितांच्या वेदना हाच त्यांच्या अंतरंगातील विचार व कर्माचा मुळ आधार होता. म्हणूनच शेवटी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पायिक झाले होते.  म्हणूनच एका ठिकाणी ते म्हणतात,

    " जग बदल घालूनी घाव,

      सांगून गेले मज भिमराव"

          यावरून अण्णाभाऊंचा दृष्टीकोन कसा वैश्विक होता, हे लक्षात येईल.  जिवनाच्या शेवटच्या टप्प्यात १८ जूलै १९६९ ला त्याचा मृत्यू झाला. परंतु अण्णा साहित्य रूपात आजही जिवंत आहे. आजही जगण्याची प्रेरणा व दिशा देतो आहे.

             केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊंचं साहित्य आज संपूर्ण जगामध्ये 27 विदेशी भाषांमध्ये भाषांतरित झालं, जागतिक पातळीवर त्याला स्विकारलं गेलं.  सोबतच आज उच्च शिक्षित, सुशिक्षित वर्गांसाठी विचाराचं प्रेरणास्थान ठरलं, यातून अण्णाभाऊंच्या लेखणी, वाणी आणि कर्मकहानी ची गहनता, प्रगल्भता व सर्वोत्कृष्टता सिद्ध होते.... अशा त्या लेखणी, वाणी व विचारसरणी सम्राटाला कोटी कोटी वंदन........


    लोकशाहीर अण्णाभाऊंना मी माझ्या "वेदना उपेक्षितांच्या" काव्यसंग्रहात पुढील प्रमाणे काव्यं स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे...


"प्रणाम"


लोकशाहीर अण्णा!

घालून शब्दांचे वार

मुक्त केले तू

कामगारांचे बंदिस्त आवार.

कामगार क्रांतीचा महामेरू तू ,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


तू होतास धगधगता निखार,

तुझ्या लेखणीला तलवारीची धार.

उपेक्षित पिडीत कामगारांचा

तू होतास तारणहार.

उपेक्षितांच्या क्रांतीचा महामेरू तू ,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


जाणुनी उपेक्षितांच्या वेदना,

जागवल्या तू शाहिरी, पोवाडा

अन् तमाशातून संवेदना.

उपेक्षितांचा क्रांतीनायक तू ,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा

होतास तू कर्णधार.

मराठी माणसासाठी अण्णा,

तू पेटवले शिवार.

संयुक्त महाराष्ट्राचा शिल्पकार तू,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


आज तुझ्या आठवणीने,

अण्णा झालोय आम्ही बेजार.

तुझ्यावाचुनी या पामरांना

असे तुझ्या साहित्याचाच आधार.

तूच असे स्वामी आमचा,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.



१८/०७/२०२३

डॉ प्रभाकर लोंढे

उज्वल सोसायटी, नागपूर

९६७३३८६९६३

Saturday, July 15, 2023

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील धनगर राजकीय नेतृत्वाची समिक्षा...

 स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील धनगर राजकीय नेतृत्वाची समिक्षा...


डॉ प्रभाकर लोंढे


       प्रत्येक समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच विशेषता म्हणजे राजकीय अंगाने होणे अपेक्षित असते. आणि त्यातून त्या समाजाची संस्कृती व सांस्कृतिक परंपरा विकसित होत असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या महत्वपूर्ण प्रक्रियेत त्या समाज घटकातील राजकीय नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका असते.

        एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्या समाज (जमात) घटकाचे किती प्रतिनिधित्व आहेत आणि ते राजकीय प्रतिनिधित्व कुठल्या स्तराला आहे. राजकीय नेतृत्व किती प्रभावी आहे, राजकीय सत्तेला केंद्रित, नियंत्रित करणारी नेतेमंडळी त्या समाजा मध्ये किती आहेत. निर्णय क्षमता असलेली किंवा निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणारी किंवा त्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव असलेली नेतेमंडळी जमातीमध्ये किती आहे, हे अतिशय महत्त्वाचं असून ते त्या समाज घटकाचं(भारतात जाती/जमातीचं) नेहमी एक महत्त्वाचं बलस्थान असते. 

     त्या सर्व बाबीवरून जमातीच्या प्रगतीचा आलेख, प्रगतीची दिशा, प्रगतीचे मापदंड निश्चित होत असतात. या बाबतीत धनगर जमातीचा विशेषत्वाने विचार केल्यास स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील राजकीय सत्ताकारणामुळे धनगर जमात राजकीय सत्तेपासून आज उपेक्षित असलेली दिसून येते.       

      या सर्व प्रक्रियेत  जमातीतील नेतृत्वाचा जर विचार केला तर नेतृत्वाचे प्रमाण जमातीत फार कमी असून ते नेतृत्व येथील राजकीय व्यवस्थेमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यात अयशस्वी ठरलेले दिसून येते. अशाही परिस्थितीमध्ये ज्या धनगर नेतृत्वाने स्वतःच अस्तित्व या व्यवस्थेत निर्माण केलं, स्वतःला कसं बसं टिकवून ठेवलं. त्या सर्व धनगर राजकीय नेतृत्वाचा विचार केला तर त्यांचं पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येतं. 

      सदर वर्गीकरण हे समग्र स्वरूपात असून धनगर नेत्यांच्या खाजगी गुणधर्माचा, त्याच्या नेतृत्व शैली, त्याच्या नेतृत्वाची कार्यपद्धती, त्यामागची त्या नेतृत्वाची विचारसरणी, त्याची जमाती प्रती निष्ठा, त्याने जमातीसंबंधी केलेल्या सकारात्मक- नकारात्मक कार्याचा परिणाम, त्याने जमातीसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा जमातीवरील चांगला वाईट परिणाम, या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.


धनगर राजकीय नेतृत्वाचे वर्गीकरण ;-


१) स्वयंप्रेरीत प्रेरणादायी नेतृत्व..

         धनगर जमातीतील राजकीय नेतृत्वाचा विचार करता स्वयंप्रेरणेने स्वतःसह जमात विकासाच्या दृष्टीने राजकीय सत्तेचे महत्त्व जाणून सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक धनगर राजकीय नेतृत्वाचा समावेश यामध्ये करता येईल. या प्रकारात मोडणारे धनगर नेते स्वतःच्या अस्तित्वा बरोबर जमातीच्या अस्तित्वाला व त्याच्या राजकीय उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.. स्वतःच्या जगण्या, वागण्या, बोलण्यातून आणि कर्मातून जमातीमध्ये प्रेरणा निर्माण करीत असतात. याचाच परिणाम म्हणून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते, नेते जमातीमध्ये सातत्याने सक्रिय असतात. 

         अशा प्रकारचे नेते महाराष्ट्रातील धनगर जमातीमध्ये  नगण्य असले तरी काहीच्या बाबतीत या प्रकारामध्ये त्यांचा समावेश केला जावू शकतो. या प्रकारात मोडणारे नेते धनगर जमातीसाठी कधीच घातक नसतात. ते स्वतः प्रेरणादायी असल्यामुळे त्यांच्या विचार व कर्माचा जमातीमध्ये एक प्रवाह निर्माण झालेला असतो व तो जमातीला राजकीय सत्तेकडे नेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो.


२) स्वयंप्रेरित आत्मकेंद्रित नेतृत्व :-

 हा धनगर जमातीतील नेतृत्वाचा दुसरा प्रकार असून हा नेता स्वयंप्रेरित, स्वयंसिद्ध असला तरी तो नेता आत्मकेंद्रित असल्यामुळे जमातीच्या हितासाठी तेवढा कामाचा नसतो. तो आत्मकेंद्रीत असल्यामुळे मी, माझा मतदारसंघ, माझा कार्यकर्ता, माझं हित, माझा परिवार, या पुरताच मर्यादित राजकीय सत्तेच्या दृष्टीने विचार व काम करीत असतो. 

         त्याला जमातीच्या समस्या, जमातीचे सामाजिक प्रश्न, जमातीचा सामाजिक उत्कर्ष, याच्याशी त्याचं काहीही देणं घेणं नसतं. त्यामुळेच त्याला "आत्मकेंद्रीत नेतृत्व" असे म्हणता येते. अशा प्रकारचे काही धनगर नेते आत्मकेंद्रित असल्यामुळे जमातीला स्वतःच्या नजरेतून स्वतःच्या हितासाठी वापरण्याच्या प्रयत्नात असतात.. त्यामुळे ते स्वतः खूप मोठ्या उंचीचे नेते म्हणून समाज मान्यता पावतात. परंतू जमातीच्या तेवढे कामाचे नसतात


३) परपोषी(परजीवी) नेतृत्व...

      धनगर जमातीमध्ये अशा नेतृत्वाचं प्रमाण इतर नेतृत्व प्रकाराच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात दिसून येतं. हे नेते येथील प्रस्थापित व्यवस्थेतील प्रस्थापित गैरधनगर नेत्यांचे "हस्तक" म्हणून जमातीमध्ये कार्य करीत असतात. त्यांना ना जमाती विषयी निष्ठा असते, ना जमाती विषयी कळवळा असते, फक्त ते आपल्या मालकाच्या आदेशानुसार जमातीमध्ये जाऊन आपली जमात त्या आपल्या मालकाच्या मागे कशी राहील, सातत्याने मालकाचा उदोउदो करतील, यासाठी ते प्रयत्नशील असतात.      

        मालकाकडून भेटणाऱ्या पद, थोडाफार आर्थिक लाभ, प्रतिष्ठा, त्यासाठी तो भुकेला असतो. जमात विकास व जमातीचे प्रश्न यासंदर्भात त्याची निष्ठा औपचारिक असते.

 त्यामुळे ते "धनगर नेतृत्व" या नावाने धनगर जमातीमध्ये फिरणारं एक कळसुत्री बाहुलं असतं. त्याची प्रत्येक कृती ही त्याच्या धन्याच्या मर्जी व भल्यासाठी असून धन्याच्या आदेशाकडे त्यांचं पुर्णतः लक्ष असतं. त्याच्याकडे धनगर जमाती विषयी कुठलंच स्वतःच व्हिजन नसतं. त्यामुळे तो केवळ जमाती मधलं एक राजकीय नेतृत्व नावाने असलेलं "बुजगावणं" ठरतं. त्याचं सर्वांगीण पोषण व नियंत्रण गैर धनगर प्रस्थापित नेत्याच्या भरोशावर होत असतं. त्यामुळेच त्याला परपोषी (परजीवी) धनगर नेतृत्व असं आपण म्हणू शकतो.     

            ते कोणत्याही क्षणी जमातीशी कोणत्याही प्रकारची गद्दारी सुद्धा करण्यासाठी तयार असतात. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात जमातीचं जे काही नुकसान झालं, ते याच नेतृत्वाच्या प्रकारामुळे झालेलं आहे. त्यामुळे यापुढे जमातीच्या राजकीय उत्थानासाठी अशा प्रकारच्या नेतृत्वाची संख्या समाप्त होणे अत्यावश्यक आहे.

          महाराष्ट्रातील धनगर जमातीमध्ये इ. स.२०१३ चं तन मन धन देऊन उठलेलं जनआंदोलन याच प्रकारच्या नेतृत्वा ने हळूहळू समाप्त केलं. याचं त्यांना काहीच वाईट वाटत नाही. कारण त्यांच्यामध्ये जमाती विषयी असलेल्या निष्ठांपेक्षा त्यांच्या मालकांच्या/पक्षश्रेष्ठीं विषयीच्या निष्ठा त्यांच्यासाठी महत्वाच्या व श्रेष्ठ असतात.


४) संधीसाधू नेतृत्व...

         या प्रकारचं धनगर नेतृत्व जमातीसाठी, जमातीच्या हितासाठी जेवढं घातक त्यापेक्षा प्रसंगी अधिक लाभदायक होऊ शकतं. कारण अशा प्रकारचं नेतृत्व हे स्वतःच्या हिताच्या, विकासाच्या संधी सतत शोधत असत. अशा संधीसाधक, उचित संधीशोधक, संधीसाधू राजकीय नेतृत्वाची धनगर जमातीला गरज असून व्यवस्थेमध्ये स्वतःचे व जमातीचे अस्तित्व/ व्यवस्थेत वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या नेतृत्वाचा भविष्यामध्ये धनगर जमातीला नक्कीच फायदा होऊ शकतो. 


५) समाजहितवादी नेतृत्व

     या प्रकारचे नेतृत्व केवळ जमातहितवादी विचार व कार्य करीत असून ते आपल्या खाजगी जीवन, संपत्ती, प्रसंगी सर्वच काही जमातीसाठी अर्पण करण्याच्या मानसिक तयारीत असतात. जमातीच्या प्रश्नांचा ते गांभीर्याने विचार करतात. आपल्या समाजसुधारणवादी कार्यात ते सतत मग्न असतात. असे कार्य करीत असताना मात्र ते कधीच प्रसिद्धीच्या भानगडीत पडत नसतात.

त्यांच्या मागे असणारा कार्यकर्ता संख्येने कमी असला तरी त्याच्या सुधारणावादी विचार व  कार्याचा  पायिक असतो. तशा अर्थाने त्यांना राजकीय नेतृत्व हा शब्द लागू होत नसला तरी ते जमातीतून राजकीय नेतृत्व विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात... त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.. नेतृत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.


६) जमातशोषक नेतृत्व

       या प्रकारामध्ये नेतृत्वाचा जन्मच जमातीच्या शोषणातून होतो.. ते जमातीत तुरीच्या शेंगांमध्ये असलेल्या पोटकिड्या प्रमाणे पैदा होतात.  शेंगामध्येच वाढतात, आपले वंशज/किड्यांची जमात वाढवितात, ते सर्व किडे शेंगांमध्ये असलेल्या सर्व दाण्यांना खराब करतात. वरून शेंग खूप चांगली दिसत असली तरी ती आतून पोखरल्या गेलेली असते,  त्यामुळे त्या शेंगाना बाजारात कवडीची इज्जत नसते.

        त्या शेंगा प्रमाणेच धनगर जमातीची आज अवस्था झालेली असून त्यासाठी हे जमात शोषक धनगर नेतृत्व कारणीभूत आहेत. या प्रकारच्या नेतृत्वामुळे जमात आज बेदखल झालेली आहे. 


७) जमात विचारप्रवाही नेतृत्व

        धनगर जमातीमध्ये असलेले अशा प्रकारचे नेते जमातीच्या ऐतिहासिक परंपरा, ऐतिहासिक वैभव या आधारे जमातीला एक वैचारिक दिशा देऊन राजकीय सत्तेमध्ये प्रवाही करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. 

      तशा विचारांचा प्रवाह निर्माण करून तो प्रवाह जमातीच्या अंतिम टोकापर्यंत/ अंतिम घटकापर्यंत कसा प्रवाहित होईल? त्यातून एक राजकीय क्रांती घडून येईल, याचा ते विचार करतात व त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परंतु  सत्य वास्तविकता ही आहे की, या नेतृत्वाला जमातीतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, 

त्याच्या अधिकाधिक वेळ जमातीमध्ये आपला विचार व दृष्टीकोन रुजविण्यासाठी जात असतो.

       त्यामुळे या नेत्यांचा "जीवन संघर्ष" हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो परंतु संघर्षातून राजकीय क्रांती करण्यासाठी समाज त्याला प्रतिसाद देत नाही, ही त्याची शोकांतिका असते. त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व काही वेळा राजकीय सत्तेपर्यंत पोहचू शकत नाही तरी मात्र सत्तेपर्यंत जाण्याचा प्रवाह हे नेतृत्व निर्माण करीत असतं.


         अशाप्रकारे वेगवेगळ्या सात प्रकारामध्ये आतापर्यंतच्या धनगर जमातीतील नेतृत्वांना आपल्याला वर्गिकृत करता येत. एखादा नेता कशाप्रकारे होता? त्याची कार्यपद्धती काय होती? त्याने समाजासाठी दिलेलं योगदान, त्याने निर्माण केलेला विचारप्रवाह, या सर्व बाबी कमी अधिक प्रमाणात त्याच्यामध्ये किती आहेत? यावरून तो नेता कोणत्या प्रकारात मोडतो, हे ठरवण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे. 

       जो तो उठतो आणि मी धनगरांचा नेता म्हणून समाजात वावरतो, जमातीची दिशाभूल करतो, तेव्हा यापुढे हे बंद व्हायला हवं, समाजामध्ये खऱ्या नेत्याची ओळख व्हावी, त्यासोबतच खऱ्या नेत्याच्या कर्माची समाजात कदर व्हावी. आणि जमातीने सोंगाड्या नेत्यापासून सावध राहून योग्य नेत्यांना समाजाने कशाप्रकारे साथ द्यावी.  यासाठीच हा लेखन प्रपंच आहे.  कोणता नेता कशा प्रकारचा हे जरी तंतोतंत या मुद्द्यांमध्ये बसत नसलं तरी मात्र समाजातील नेत्यांचं मूल्यमापन करण्यासाठी हा लेख अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे, तरी वाचक या लेखाला एक दृष्टिकोन या नजरेने स्विकारतील,  कोणत्याही नेत्याला वैयक्तिक स्तरावर न घेता त्याच्यातील असलेल्या गुणधर्मांचा विचार करून हे मूल्यमापन सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतील, हे नक्की.

   यापुढे समाजातील योग्य नेत्यांची ओळख समाजाला करता यावी, यासाठी हा लेख लिहिल्या गेलेला आहे. त्या संबंधाने कोणाला काही अडचणी असल्यास, कोणाला काही तक्रारी असल्यास किंवा काही गोष्टी सुचवायच्या असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.


----------------------------

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

डॉ प्रभाकर लोंढे

गोंदिया 

९६७३३८६९६३

Tuesday, February 21, 2023

धनगर जमात राजकीय सत्तेच्या मागे का लागत नाही???

 धनगर जमात राजकीय सत्तेच्या मागे का लागत नाही???

  डॉ प्रभाकर लोंढे


"बुडती हे जन, देखवें ना डोळा!
म्हणूनी कळवळा, येत असे!!"
          


         या महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रश्नग्रस्त व समस्याग्रस्त दुर्लक्षित, उपेक्षित, हेतू पुरत्सर राजकीय सत्तेपासून वंचित राहिलेली किंवा ठेवलेली जमात म्हणून जर नाव घ्यायचं झालं तर धनगर जमातीचं प्रकर्षाने नाव समोर येतं. 

       विविध समस्या असताना या धनगरांनी "आरक्षण" या "सुविधे" साठी अनेकदा प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी मोठ मोठी आंदोलने उभारलेली आहे, जमात न्यायासाठी सातत्याने लढत आलेली आहे. यामध्ये जमातीच्या हितचिंतकांचं तन-मन-धन खर्ची होत आहे. त्यातून काय आऊटपुट द्यायचं? हे मात्र धनगरांच्या नाही तर येथील राजकीय सत्तेच्या मर्जीवर चाललेलं आहे. हे आतापर्यंत होत आलेलं आहे व या पुढेही होणार आहे, (येथील न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवायचा? हा अलीकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे)

        असं असताना मला नेहमी सतावणारा प्रश्न पडतोय की, या धनगरांना सर्व प्रश्नांची चाबी "राजकीय सत्तेत" का दिसत नाही? किंवा राजकीय सत्तेत जाण्याची इच्छा यांना का होत नाही?  किंवा महाराष्ट्रातील राजकीय सत्तेत जाण्याची संधी यांना का दिसत नाही?  सर्व समस्यांचा मार्ग राजकीय सत्तेत आहे, हे राजकीय सत्तेचा वारसा सांगणाऱ्या या धनगरांना का समजत नाही?? हा प्रश्न मात्र अनेकदा पडलेला आहे व आजही अनुत्तरीत आहेत.

      धनगरांच्या श्रद्धेचा, निष्ठेचा, आत्मियतेचा व त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा मार्ग त्यांना ज्याच्यामध्ये दिसतयं, तो "आरक्षण" हे जरी खरं असलं तरी कोणाला काय द्यायचं? किंवा द्यायचं नाही, हे मात्र येथील राजकीय सत्ता ठरविणार आहे. (येथील न्यायव्यवस्था सुद्धा त्यांची बटीक झालेली आहे) 

       काही वेळासाठी मान्य करून टाकू की, धनगराच्या समस्यांचा "आरक्षण" हा जरी राजमार्ग असला तरी भविष्यात तेच जर "संपुष्टात" येणार असेल आणि तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळालं तर त्याचा काय फायदा होणार आहे?  

      प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरक्षण धोरण संपविण्याची प्रक्रिया या भारतात सुरू झालेली असताना, आम्ही ते मिळविण्याच्या मागे लागतोय, ते मिळतील ही पण ज्या दिवशी मिळतील, त्या दिवशी जर आरक्षणाचे धोरण खतम झालेले असेल तर त्याचा काय फायदा जमातीला??  त्या दिवशी मात्र जमातीचा वेळ पैसा आणि पिढ्या खर्च झालेल्या असेल, हे मात्र नक्की.. 

       महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये धनगरांना राजकीय स्थान मिळविणे, सहज शक्य आहे. कारण "मनी, मसल आणि पावर" (money, muscle and power ) हा येथील राजकारणाचा मुख्य आधार आहे.

       महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला तर आज फक्त "पावर" धनगरांकडे नाही. त्यामुळेच "पावरलेस" धनगरांच्या आरक्षणासह सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत.. आणि म्हणून धनगरांनी "पॉवर" मध्ये येणे किती अत्यावश्यक आहे? ही बाब धनगरांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे..

     धनगरांच्या मतसंख्येच्या आधारे आपल्याला सातत्याने "पावर" मध्ये राहता येईल याची सुव्यवस्था, धोरण, क्लुप्त्या, येथील प्रस्थापितांकडून नेहमी केल्या जातात. धनगरांच्या भावनिक मुद्द्याच्या आधारे त्यांना संघटित करून एखाद्या "लुच्च्या" धनगराला हाती पकडायचं आणि त्याच्या माध्यमातून धनगरांची मतसंख्या आपल्या मागे लावून घ्यायची, हा नित्याचा प्रयोग महाराष्ट्रात झालेला आहे..

    असे प्रयोग आतापर्यंत झालेले आहे, सध्या सुरू आहे. त्याला धनगरांनी किती बळी पडायचं? हा प्रश्न धनगरांच्या हातात आहे..

      धनगरांनी राजकीय सत्ता प्राप्तीसाठी धनगरांच्या छोट्या मोठ्या नेत्यांना "तन मन धन" देऊन त्यांना त्यांच्या राजकीय अजेंड्यामध्ये सहकार्य करणे व आपल्या माणसांना राजकीय सत्तेमध्ये पाठविणे, हा धनगरांच्या आरक्षण प्रश्नापेक्षाही हमखास व महत्त्वाचा राजमार्ग धनगरांकडे दुसरा कुठलाही असूच शकत नाही.


धन्यवाद!

-------------------------


अलीकडे सामाजिक प्रश्नांवर लिखाण बंद केलं, परंतु


"बुडती हे जन, देखवें ना डोळा!

म्हणूनी कळवळा, येत असे!!"


"धनगर जमातीतील छोट्या मोठ्या जननेत्यांना पाठबळ देऊन धनगर जमातीत "राजकीय चळवळ" निर्माण व्हावी हाच या लेखा मागील हेतू आहे..



डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर नेतृत्व आणि  राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक)