Monday, July 31, 2023

अण्णा भाऊ साठे: सर्वंकश क्रांतीचं वादळ.. डॉ प्रभाकर लोंढे

 अण्णा भाऊ साठे: सर्वंकश क्रांतीचं वादळ..
                                डॉ प्रभाकर लोंढे


   "क्रांती आणि प्रतिक्रांती" हा समाज विकास प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाच्या विचारांचा परिपाक असून एका नंतर दुसरे सातत्याने घडत आलेलं आहे. समाजात असलेले दोन वर्ग एक दुसऱ्यांवर अधिराज्य गाजवण्यासाठी प्रयत्नशील असतात. समाजात आर्थिक संपन्नता असलेला वर्ग समाजातील सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषत: राजकीय संस्थांवर अधिराज्य गाजवीत असतो. त्या माध्यमातून निर्माण झालेल्या व्यवस्थेत वंचित उपेक्षित निर्धन लोकांकडे दयेवर जगण्याशिवाय पर्याय नसतो. त्यांच्यावर अनपेक्षितपणे सातत्याने अन्याय अत्याचार चालू असतात. तेव्हा अशा उपेक्षितांचा तारणहार समाजामध्ये परीस्थितीतून जन्माला येतो. त्यापैकीच एक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे!

         उपेक्षितांच्या वेदनांविषयी सामाजिक संवेदना जागवितो आणि त्या संवेदनेमधून क्रांतीसाठी एक सामाजिक वातावरण निर्माण करतो. त्यांच्या वाणी, लेखनीतून वैचारिक परिवर्तनाचा प्रवाह समाजामध्ये वाहायला लागतो. अशा त्या प्रवाहातील एक महत्त्वाचा "निखारा" म्हणून महाराष्ट्राच्या भूमीत १ आगष्ट १९२० ला सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे जन्माला आला तो अण्णाभाऊ त्याच मुळ नाव तुकाराम भाऊराव साठे !

     अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काम धंद्यासाठी गाव सोडून मुंबईत गेलेला हा आर्थिक दरिद्री माणूस प्रथम मार्क्सवाद व नंतरच्या काळात शाहू- फुले- आंबेडकर परिवर्तनवादी विचारसरणीचा पायिक ठरला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाने महाराष्ट्राचा व मराठी साहित्य जगताचा प्रेरणास्थान ठरला. केवळ भारतातीलच नाही तर जागतिक पातळीवर कामगार उपेक्षितांच्या जीवनात एक क्रांतीज्योत पेटवणारा एक "मशाल" ठरला.

       संपूर्ण जिवनात केवळ दिड दिवस शाळेत गेलेला हा अण्णा  आपल्या जीवनात ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य,११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या लिहीतो आणि मराठी साहित्य जगतात आपल्या लेखणीचा व वाणीचा ठसा उमटवतो. यावरून अण्णाभाऊंच्या जिवनाचं उच्च कोटीत्व लक्षात येतं.

        त्यांच्या साहित्य लेखनात माणूस हा केंद्रीय स्थानी असून संपूर्ण साहित्यातून दारिद्र्य, उपेक्षित जीवन व जीवन संघर्ष मांडला आहे. ते करीत असताना संपूर्ण परीवर्तनासाठी वैचारिक क्रांती कशी होईल याचा विचार मांडला आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन स्विकारून "ही धरती शेषनागावर नाही तर कष्टकऱ्यांच्या श्रमावर, त्यांच्या तळहातावर उभी आहे, अशा प्रकारचा वास्तववाद त्यांनी आपल्या लिखाणातून मांडला आहे. संपूर्ण विकास प्रक्रियेत कष्टकऱ्यांच्या कामाला महत्त्व देऊन श्रमिक व त्याचे श्रम याला विकासाचा केंद्रबिंदू बनविलं आहे. परंतु व्यवस्थेत श्रमिकांचं सातत्याने शोषण होतं, ही मात्र अण्णांची नेहमी खंत राहिलेली आहे, म्हणूनच शोषणमुक्त समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी कामगार, उपेक्षितांची चळवळ उभी राहावी, यादृष्टीने त्यांनी आपला विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

         इंग्रजांपासून मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्यासंबंधीचा त्यांचा एक वेगळा वास्तववादी विचार असून १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेलं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य नसून त्यांना स्वातंत्र्यासाठी समग्र क्रांति अपेक्षित होती. या स्वातंत्र्यातून सवर्णांचं, उच्चवर्णीयांचं राज्य स्थापन होणार आहे, त्यातून शोषणमुक्त समाज निर्माण होऊच शकत नाही, असं त्यांना वाटत असल्यामुळेच त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये २०००० लोकांसह मोर्चा काढला आणि "यह आजादी झुटी है, देश की जनता भुखी है! या घोषणेने सरंजामी स्वातंत्र्याचा धिक्कार केला.

      संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेचं योगदान अतिशय मोलाचं आहे. भाषावार प्रांतरचनेमध्ये मराठी भाषेच्या आधारे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी जे जन आंदोलन उभं राहिलं, त्या जन आंदोलनात प्राण भरण्याचं, सामाजिक वातावरण निर्माण करण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ, अमर शेख यांनी केलं. शाहिरी, पोवाडा, लावणी सारख्या लोकसंगीतातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरात रूजविण्याचं, चळवळीला सार्वत्रिक करण्याचं कार्य अण्णाभाऊनी केलं.

'माझी मयना गावाकडं राहीली, माझ्या जिवाची होतेया काहीली.." हे त्यांचं गाणं चळवळीमध्ये अतिशय गाजलं. त्यांची डफावरील थाप आणि पहाडी आवाजातील पोवाडे, गीतं, लावण्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत माणसं जोडण्याचं काम केलं, म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अण्णाभाऊचं योगदान विसरता येणार नाही.

      मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेल्या अण्णाभाऊंनी भारतात साम्यवादी विचारसरणी  रूजविण्याचं कार्य केलं, विचारसरणी कोणतीही असो, परंतु उपेक्षितांच्या वेदना हाच त्यांच्या अंतरंगातील विचार व कर्माचा मुळ आधार होता. म्हणूनच शेवटी ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पायिक झाले होते.  म्हणूनच एका ठिकाणी ते म्हणतात,

    " जग बदल घालूनी घाव,

      सांगून गेले मज भिमराव"

          यावरून अण्णाभाऊंचा दृष्टीकोन कसा वैश्विक होता, हे लक्षात येईल.  जिवनाच्या शेवटच्या टप्प्यात १८ जूलै १९६९ ला त्याचा मृत्यू झाला. परंतु अण्णा साहित्य रूपात आजही जिवंत आहे. आजही जगण्याची प्रेरणा व दिशा देतो आहे.

             केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊंचं साहित्य आज संपूर्ण जगामध्ये 27 विदेशी भाषांमध्ये भाषांतरित झालं, जागतिक पातळीवर त्याला स्विकारलं गेलं.  सोबतच आज उच्च शिक्षित, सुशिक्षित वर्गांसाठी विचाराचं प्रेरणास्थान ठरलं, यातून अण्णाभाऊंच्या लेखणी, वाणी आणि कर्मकहानी ची गहनता, प्रगल्भता व सर्वोत्कृष्टता सिद्ध होते.... अशा त्या लेखणी, वाणी व विचारसरणी सम्राटाला कोटी कोटी वंदन........


    लोकशाहीर अण्णाभाऊंना मी माझ्या "वेदना उपेक्षितांच्या" काव्यसंग्रहात पुढील प्रमाणे काव्यं स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे...


"प्रणाम"


लोकशाहीर अण्णा!

घालून शब्दांचे वार

मुक्त केले तू

कामगारांचे बंदिस्त आवार.

कामगार क्रांतीचा महामेरू तू ,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


तू होतास धगधगता निखार,

तुझ्या लेखणीला तलवारीची धार.

उपेक्षित पिडीत कामगारांचा

तू होतास तारणहार.

उपेक्षितांच्या क्रांतीचा महामेरू तू ,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


जाणुनी उपेक्षितांच्या वेदना,

जागवल्या तू शाहिरी, पोवाडा

अन् तमाशातून संवेदना.

उपेक्षितांचा क्रांतीनायक तू ,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा

होतास तू कर्णधार.

मराठी माणसासाठी अण्णा,

तू पेटवले शिवार.

संयुक्त महाराष्ट्राचा शिल्पकार तू,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.


आज तुझ्या आठवणीने,

अण्णा झालोय आम्ही बेजार.

तुझ्यावाचुनी या पामरांना

असे तुझ्या साहित्याचाच आधार.

तूच असे स्वामी आमचा,

तुम्हा करतो प्रणाम त्रिवार.



१८/०७/२०२३

डॉ प्रभाकर लोंढे

उज्वल सोसायटी, नागपूर

९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment