Saturday, July 15, 2023

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील धनगर राजकीय नेतृत्वाची समिक्षा...

 स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील धनगर राजकीय नेतृत्वाची समिक्षा...


डॉ प्रभाकर लोंढे


       प्रत्येक समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच विशेषता म्हणजे राजकीय अंगाने होणे अपेक्षित असते. आणि त्यातून त्या समाजाची संस्कृती व सांस्कृतिक परंपरा विकसित होत असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या महत्वपूर्ण प्रक्रियेत त्या समाज घटकातील राजकीय नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका असते.

        एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये त्या समाज (जमात) घटकाचे किती प्रतिनिधित्व आहेत आणि ते राजकीय प्रतिनिधित्व कुठल्या स्तराला आहे. राजकीय नेतृत्व किती प्रभावी आहे, राजकीय सत्तेला केंद्रित, नियंत्रित करणारी नेतेमंडळी त्या समाजा मध्ये किती आहेत. निर्णय क्षमता असलेली किंवा निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकणारी किंवा त्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव असलेली नेतेमंडळी जमातीमध्ये किती आहे, हे अतिशय महत्त्वाचं असून ते त्या समाज घटकाचं(भारतात जाती/जमातीचं) नेहमी एक महत्त्वाचं बलस्थान असते. 

     त्या सर्व बाबीवरून जमातीच्या प्रगतीचा आलेख, प्रगतीची दिशा, प्रगतीचे मापदंड निश्चित होत असतात. या बाबतीत धनगर जमातीचा विशेषत्वाने विचार केल्यास स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील राजकीय सत्ताकारणामुळे धनगर जमात राजकीय सत्तेपासून आज उपेक्षित असलेली दिसून येते.       

      या सर्व प्रक्रियेत  जमातीतील नेतृत्वाचा जर विचार केला तर नेतृत्वाचे प्रमाण जमातीत फार कमी असून ते नेतृत्व येथील राजकीय व्यवस्थेमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यात अयशस्वी ठरलेले दिसून येते. अशाही परिस्थितीमध्ये ज्या धनगर नेतृत्वाने स्वतःच अस्तित्व या व्यवस्थेत निर्माण केलं, स्वतःला कसं बसं टिकवून ठेवलं. त्या सर्व धनगर राजकीय नेतृत्वाचा विचार केला तर त्यांचं पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येतं. 

      सदर वर्गीकरण हे समग्र स्वरूपात असून धनगर नेत्यांच्या खाजगी गुणधर्माचा, त्याच्या नेतृत्व शैली, त्याच्या नेतृत्वाची कार्यपद्धती, त्यामागची त्या नेतृत्वाची विचारसरणी, त्याची जमाती प्रती निष्ठा, त्याने जमातीसंबंधी केलेल्या सकारात्मक- नकारात्मक कार्याचा परिणाम, त्याने जमातीसंबंधी घेतलेल्या निर्णयाचा जमातीवरील चांगला वाईट परिणाम, या सर्व बाबींचा विचार करून सर्वसमावेशक वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.


धनगर राजकीय नेतृत्वाचे वर्गीकरण ;-


१) स्वयंप्रेरीत प्रेरणादायी नेतृत्व..

         धनगर जमातीतील राजकीय नेतृत्वाचा विचार करता स्वयंप्रेरणेने स्वतःसह जमात विकासाच्या दृष्टीने राजकीय सत्तेचे महत्त्व जाणून सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक धनगर राजकीय नेतृत्वाचा समावेश यामध्ये करता येईल. या प्रकारात मोडणारे धनगर नेते स्वतःच्या अस्तित्वा बरोबर जमातीच्या अस्तित्वाला व त्याच्या राजकीय उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.. स्वतःच्या जगण्या, वागण्या, बोलण्यातून आणि कर्मातून जमातीमध्ये प्रेरणा निर्माण करीत असतात. याचाच परिणाम म्हणून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते, नेते जमातीमध्ये सातत्याने सक्रिय असतात. 

         अशा प्रकारचे नेते महाराष्ट्रातील धनगर जमातीमध्ये  नगण्य असले तरी काहीच्या बाबतीत या प्रकारामध्ये त्यांचा समावेश केला जावू शकतो. या प्रकारात मोडणारे नेते धनगर जमातीसाठी कधीच घातक नसतात. ते स्वतः प्रेरणादायी असल्यामुळे त्यांच्या विचार व कर्माचा जमातीमध्ये एक प्रवाह निर्माण झालेला असतो व तो जमातीला राजकीय सत्तेकडे नेण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो.


२) स्वयंप्रेरित आत्मकेंद्रित नेतृत्व :-

 हा धनगर जमातीतील नेतृत्वाचा दुसरा प्रकार असून हा नेता स्वयंप्रेरित, स्वयंसिद्ध असला तरी तो नेता आत्मकेंद्रित असल्यामुळे जमातीच्या हितासाठी तेवढा कामाचा नसतो. तो आत्मकेंद्रीत असल्यामुळे मी, माझा मतदारसंघ, माझा कार्यकर्ता, माझं हित, माझा परिवार, या पुरताच मर्यादित राजकीय सत्तेच्या दृष्टीने विचार व काम करीत असतो. 

         त्याला जमातीच्या समस्या, जमातीचे सामाजिक प्रश्न, जमातीचा सामाजिक उत्कर्ष, याच्याशी त्याचं काहीही देणं घेणं नसतं. त्यामुळेच त्याला "आत्मकेंद्रीत नेतृत्व" असे म्हणता येते. अशा प्रकारचे काही धनगर नेते आत्मकेंद्रित असल्यामुळे जमातीला स्वतःच्या नजरेतून स्वतःच्या हितासाठी वापरण्याच्या प्रयत्नात असतात.. त्यामुळे ते स्वतः खूप मोठ्या उंचीचे नेते म्हणून समाज मान्यता पावतात. परंतू जमातीच्या तेवढे कामाचे नसतात


३) परपोषी(परजीवी) नेतृत्व...

      धनगर जमातीमध्ये अशा नेतृत्वाचं प्रमाण इतर नेतृत्व प्रकाराच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात दिसून येतं. हे नेते येथील प्रस्थापित व्यवस्थेतील प्रस्थापित गैरधनगर नेत्यांचे "हस्तक" म्हणून जमातीमध्ये कार्य करीत असतात. त्यांना ना जमाती विषयी निष्ठा असते, ना जमाती विषयी कळवळा असते, फक्त ते आपल्या मालकाच्या आदेशानुसार जमातीमध्ये जाऊन आपली जमात त्या आपल्या मालकाच्या मागे कशी राहील, सातत्याने मालकाचा उदोउदो करतील, यासाठी ते प्रयत्नशील असतात.      

        मालकाकडून भेटणाऱ्या पद, थोडाफार आर्थिक लाभ, प्रतिष्ठा, त्यासाठी तो भुकेला असतो. जमात विकास व जमातीचे प्रश्न यासंदर्भात त्याची निष्ठा औपचारिक असते.

 त्यामुळे ते "धनगर नेतृत्व" या नावाने धनगर जमातीमध्ये फिरणारं एक कळसुत्री बाहुलं असतं. त्याची प्रत्येक कृती ही त्याच्या धन्याच्या मर्जी व भल्यासाठी असून धन्याच्या आदेशाकडे त्यांचं पुर्णतः लक्ष असतं. त्याच्याकडे धनगर जमाती विषयी कुठलंच स्वतःच व्हिजन नसतं. त्यामुळे तो केवळ जमाती मधलं एक राजकीय नेतृत्व नावाने असलेलं "बुजगावणं" ठरतं. त्याचं सर्वांगीण पोषण व नियंत्रण गैर धनगर प्रस्थापित नेत्याच्या भरोशावर होत असतं. त्यामुळेच त्याला परपोषी (परजीवी) धनगर नेतृत्व असं आपण म्हणू शकतो.     

            ते कोणत्याही क्षणी जमातीशी कोणत्याही प्रकारची गद्दारी सुद्धा करण्यासाठी तयार असतात. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात जमातीचं जे काही नुकसान झालं, ते याच नेतृत्वाच्या प्रकारामुळे झालेलं आहे. त्यामुळे यापुढे जमातीच्या राजकीय उत्थानासाठी अशा प्रकारच्या नेतृत्वाची संख्या समाप्त होणे अत्यावश्यक आहे.

          महाराष्ट्रातील धनगर जमातीमध्ये इ. स.२०१३ चं तन मन धन देऊन उठलेलं जनआंदोलन याच प्रकारच्या नेतृत्वा ने हळूहळू समाप्त केलं. याचं त्यांना काहीच वाईट वाटत नाही. कारण त्यांच्यामध्ये जमाती विषयी असलेल्या निष्ठांपेक्षा त्यांच्या मालकांच्या/पक्षश्रेष्ठीं विषयीच्या निष्ठा त्यांच्यासाठी महत्वाच्या व श्रेष्ठ असतात.


४) संधीसाधू नेतृत्व...

         या प्रकारचं धनगर नेतृत्व जमातीसाठी, जमातीच्या हितासाठी जेवढं घातक त्यापेक्षा प्रसंगी अधिक लाभदायक होऊ शकतं. कारण अशा प्रकारचं नेतृत्व हे स्वतःच्या हिताच्या, विकासाच्या संधी सतत शोधत असत. अशा संधीसाधक, उचित संधीशोधक, संधीसाधू राजकीय नेतृत्वाची धनगर जमातीला गरज असून व्यवस्थेमध्ये स्वतःचे व जमातीचे अस्तित्व/ व्यवस्थेत वर्चस्व निर्माण करण्यासाठी अशाप्रकारच्या नेतृत्वाचा भविष्यामध्ये धनगर जमातीला नक्कीच फायदा होऊ शकतो. 


५) समाजहितवादी नेतृत्व

     या प्रकारचे नेतृत्व केवळ जमातहितवादी विचार व कार्य करीत असून ते आपल्या खाजगी जीवन, संपत्ती, प्रसंगी सर्वच काही जमातीसाठी अर्पण करण्याच्या मानसिक तयारीत असतात. जमातीच्या प्रश्नांचा ते गांभीर्याने विचार करतात. आपल्या समाजसुधारणवादी कार्यात ते सतत मग्न असतात. असे कार्य करीत असताना मात्र ते कधीच प्रसिद्धीच्या भानगडीत पडत नसतात.

त्यांच्या मागे असणारा कार्यकर्ता संख्येने कमी असला तरी त्याच्या सुधारणावादी विचार व  कार्याचा  पायिक असतो. तशा अर्थाने त्यांना राजकीय नेतृत्व हा शब्द लागू होत नसला तरी ते जमातीतून राजकीय नेतृत्व विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात... त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.. नेतृत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.


६) जमातशोषक नेतृत्व

       या प्रकारामध्ये नेतृत्वाचा जन्मच जमातीच्या शोषणातून होतो.. ते जमातीत तुरीच्या शेंगांमध्ये असलेल्या पोटकिड्या प्रमाणे पैदा होतात.  शेंगामध्येच वाढतात, आपले वंशज/किड्यांची जमात वाढवितात, ते सर्व किडे शेंगांमध्ये असलेल्या सर्व दाण्यांना खराब करतात. वरून शेंग खूप चांगली दिसत असली तरी ती आतून पोखरल्या गेलेली असते,  त्यामुळे त्या शेंगाना बाजारात कवडीची इज्जत नसते.

        त्या शेंगा प्रमाणेच धनगर जमातीची आज अवस्था झालेली असून त्यासाठी हे जमात शोषक धनगर नेतृत्व कारणीभूत आहेत. या प्रकारच्या नेतृत्वामुळे जमात आज बेदखल झालेली आहे. 


७) जमात विचारप्रवाही नेतृत्व

        धनगर जमातीमध्ये असलेले अशा प्रकारचे नेते जमातीच्या ऐतिहासिक परंपरा, ऐतिहासिक वैभव या आधारे जमातीला एक वैचारिक दिशा देऊन राजकीय सत्तेमध्ये प्रवाही करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. 

      तशा विचारांचा प्रवाह निर्माण करून तो प्रवाह जमातीच्या अंतिम टोकापर्यंत/ अंतिम घटकापर्यंत कसा प्रवाहित होईल? त्यातून एक राजकीय क्रांती घडून येईल, याचा ते विचार करतात व त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परंतु  सत्य वास्तविकता ही आहे की, या नेतृत्वाला जमातीतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, 

त्याच्या अधिकाधिक वेळ जमातीमध्ये आपला विचार व दृष्टीकोन रुजविण्यासाठी जात असतो.

       त्यामुळे या नेत्यांचा "जीवन संघर्ष" हा समाजासाठी प्रेरणादायी ठरतो परंतु संघर्षातून राजकीय क्रांती करण्यासाठी समाज त्याला प्रतिसाद देत नाही, ही त्याची शोकांतिका असते. त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व काही वेळा राजकीय सत्तेपर्यंत पोहचू शकत नाही तरी मात्र सत्तेपर्यंत जाण्याचा प्रवाह हे नेतृत्व निर्माण करीत असतं.


         अशाप्रकारे वेगवेगळ्या सात प्रकारामध्ये आतापर्यंतच्या धनगर जमातीतील नेतृत्वांना आपल्याला वर्गिकृत करता येत. एखादा नेता कशाप्रकारे होता? त्याची कार्यपद्धती काय होती? त्याने समाजासाठी दिलेलं योगदान, त्याने निर्माण केलेला विचारप्रवाह, या सर्व बाबी कमी अधिक प्रमाणात त्याच्यामध्ये किती आहेत? यावरून तो नेता कोणत्या प्रकारात मोडतो, हे ठरवण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे. 

       जो तो उठतो आणि मी धनगरांचा नेता म्हणून समाजात वावरतो, जमातीची दिशाभूल करतो, तेव्हा यापुढे हे बंद व्हायला हवं, समाजामध्ये खऱ्या नेत्याची ओळख व्हावी, त्यासोबतच खऱ्या नेत्याच्या कर्माची समाजात कदर व्हावी. आणि जमातीने सोंगाड्या नेत्यापासून सावध राहून योग्य नेत्यांना समाजाने कशाप्रकारे साथ द्यावी.  यासाठीच हा लेखन प्रपंच आहे.  कोणता नेता कशा प्रकारचा हे जरी तंतोतंत या मुद्द्यांमध्ये बसत नसलं तरी मात्र समाजातील नेत्यांचं मूल्यमापन करण्यासाठी हा लेख अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे, तरी वाचक या लेखाला एक दृष्टिकोन या नजरेने स्विकारतील,  कोणत्याही नेत्याला वैयक्तिक स्तरावर न घेता त्याच्यातील असलेल्या गुणधर्मांचा विचार करून हे मूल्यमापन सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतील, हे नक्की.

   यापुढे समाजातील योग्य नेत्यांची ओळख समाजाला करता यावी, यासाठी हा लेख लिहिल्या गेलेला आहे. त्या संबंधाने कोणाला काही अडचणी असल्यास, कोणाला काही तक्रारी असल्यास किंवा काही गोष्टी सुचवायच्या असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.


----------------------------

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

डॉ प्रभाकर लोंढे

गोंदिया 

९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment