Tuesday, August 28, 2018

न्यायालयीन लढा व स्वाभिमानी राजकीय राडाच देवू शकतो धनगरांना न्याय.*

🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
*न्यायालयीन लढा व स्वाभिमानी राजकीय राडाच देवू शकतो धनगरांना न्याय.*

                           *डॉ प्रभाकर लोंढे*
-------------------------------------------------------------
         " *न्याय* " हा शब्द छोटा जरी असला तरी त्यामध्ये अभिप्रेत असलेला अर्थ मात्र पराकोटीचा गहन आहे. तो शब्द सर्वपरिचित असला तरी सर्वांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती उपलब्ध करून देणारा तो असामान्य शब्द आहे. बरेचदा या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थाने घेतला जात असतो,  त्यामध्ये अभिप्रेत असलेल्या अर्थापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला जात नाही. तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला स्वतःला अपेक्षित असलेला अर्थ काढत असतात. परंतु *"न्याय" या संकल्पनेमध्ये "सर्वोदय" अभिप्रेत आहे.* प्रत्येकाला त्याचे अधिकार व प्रत्येकाला विकासाची समान संधी उपलब्ध होणे हे सुद्धा अपेक्षित आहे. कोणीही कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करणार नाही. कोणाचही कोणावर वर्चस्व प्रस्थापित होणार नाही. मात्र सर्वांमध्ये समन्वय प्रस्थापित होईल. आणि हा समन्वय सर्वांना हवाहवासा राहील. कोणामध्येही अन्यायाची भावना राहणार नाही, कोणीही अन्यायायाविरुद्ध पेटून उठणार नाही. असाच तो समाज न्याय आधारित समाज म्हणून ओळखला जाईल. आणि अशाच समाजात सर्वांची न्यायाची अपेक्षा पूर्ण होण्याची खात्री देवू शकतो. न्यायाची अपेक्षा ठेवू शकतो.
                 धनगर जमात भारतीय लोकशाहीमध्ये अन्यायाच्या छत्रछायेखाली सातत्याने वावरत आलेली आहे. सातत्याने होणाऱ्या अन्यायामुळे, न मिळणाऱ्या घटनात्मक अधिकारामुळे आज त्यांच्यामध्ये सरासरी न्यूनगंड, नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. मात्र जमातीला ना मिळालेला बरोबरीचा राजकीय वाटा, ना घटनात्मक अधिकार, समाजात ना बरोबरीचे स्थान,  या सर्व बाबींची जाणीव आजच्या धनगर तरुण पिढ्यांमध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मनात अन्यायाची चीड व न्यायाची चाड(अपेक्षा) निर्माण झालेली आहे. त्यामुळे तरूण वर्ग न्यायाची अपेक्षा ठेवून त्यासाठी तो प्रयत्न करू पहातो आहे. परंतु धनगरांची एकूण परिस्थिती त्याला त्याच्या प्रयत्नांमध्ये साथ देईल, असे वाटत नाही.  कारण आज  जमातीमध्ये अनेक विचारप्रवाह क्रियाशील झाल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी कोणता प्रवाह उत्तम याचे योग्य उत्तर मिळत नसल्याने धनगर तरुणांनी कोणत्या मार्गाने जावे, याची दिशा निश्चित होत नाही. मात्र तो मार्ग/ दिशा निश्चित होणे अत्यावश्यक आहे. त्यापैकी  येथील *प्रस्थापितांचा मार्ग मात्र धनगरांच्या राजकीय उध्दाराचा मार्ग होवूच शकत नाही कारण त्या मार्गाने धनगरांचा स्वाभिमानी राजकीय प्रवास होणेच शक्य नाही.*
                धनगरांमधील विद्यमान प्रवाह/ मार्ग जवळपास सर्वच बरोबर आहे. सर्वच धनगरांना कमी अधिक यश देणारे आहेत. मात्र सर्वाधिक लाँग टर्म यश देणाऱा मार्ग कोणता? हाच मोठा व वादग्रस्त प्रश्न आहे. माझ्या मते मात्र सर्वाधिक यश फक्त आरक्षण अंमलबजावणी साठी न्यायालयीन लढाई व स्वाभिमानी राजकीय लढाई हे दोनच मार्ग धनगरांना शाश्वत(दिर्घायु) न्याय देवू शकते. शेवटी हे माझे मत आहे ते सर्वमान्य व्हावे असा माझा आग्रह मुळीच नाही. मी मात्र माझ्या मतावर नेहमी ठाम आहे. कारण धनगरांचे सर्वच प्रश्न आज प्रस्थापितांकडून राजकारणाचे विषय बनविले गेलेले आहे. त्यामुळे धनगर नेतृत्व स्वाभिमानी मार्गाने राजकीय सत्तेत गेल्याशिवाय आरक्षणासह सर्वच प्रश्नावर सत्तेचं राजकीय वजन बणूच शकत नाही. आणि धनगरांनी आजपर्यंत न स्विकारलेलं पुर्णसत्य आहे की, धनगरांचं व्यवस्थेवर राजकीय वजन हे प्रस्थापीतांच्या मार्गाने निर्माण होणे शक्यच​ नाही.
                त्यामुळे स्वयंभू व स्वाभिमानी मार्गाने राजकीय सत्तेत गेलेले धनगर नेतेच धनगरांच्या प्रश्नांवर राजकीय दबाव व त्या दबावातून जमातीचा व्यवस्थेवर प्रभाव निर्माण करू शकतात. व प्रभावातून जमातीचे प्रश्न सुटण्यासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण करू शकतात. (जे आजच्या धनगर नेत्यांना कितीही वाटत असले तरी ते त्यांना शक्य झालेले नाही ही वास्तविकता.) त्यासाठीच स्वाभिमानी राजकीय राडा (प्रवाह) निर्माण झालाच पाहिजे कारण प्रस्थापित पक्ष धनगरांना न्याय देऊ इच्छित नाही, तशी त्यांची देण्याची नियत नाही हे वास्तव त्या त्या पक्षात काम करणाऱ्या सर्व धनगर बांधवानी/नेत्यांनी स्वीकारलेच पाहिजे.
                सर्वच धनगर रक्ताच्या आत्मियतेचा प्रश्न असलेला प्रश्न म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी! हा प्रश्न सोडविण्याचे सर्वच मार्ग​ आज पर्यंत​ धनगरांनी पडताळून पाहीलेले आहे. त्यातून काय यश हाती आलं? हे सर्वांना माहीतच आहे. त्याआधारे किती राजकारण झालं, आमच्या किती पिढ्या बरबाद झाल्या हे मी सांगण्याची गरजच नाही आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्षात काम करणाऱ्या समजदार धनगर बांधवानी आपल्या राजकीय पक्षांचा धनगर जमाती संबंधी लेखाजोखा सामान्य धनगरांच्या निदर्शनास आणून दिला तर फार मोठी सामाजिक बाब होईल. त्यामुळे​ त्या पक्षांची स्वच्छ प्रतिमा धनगर बांधवांपुढे येईल.
              धनगर आरक्षण अमलबजावणीच्या प्रश्नावर राजकारण न होता तो सोडवण्याचा एकच मार्ग आज धनगरांच्या हाती उरलेला आहे. आणि माननीय मधु शिंदे डॉ. जे पी बघेल साहेब व टीमने​ संपूर्ण धनगरांसाठी धनगरांच्या साथीने आज धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने न्यायालयामध्ये केस दाखल केली आहे.  ते सर्वांच्या साथीने न्यायालयाचा मार्ग चोखाळत आहे. त्यामधून यश येईल याची खात्री बाळगण्यास काही कुणाची हरकत नसावी. काहींच्या मध्ये तो मार्ग यशाचा नसेल परंतु त्यापेक्षा सरस, सुयोग्य, आशादायी, हमखास इतर कोणताही मार्ग आता धनगरांपुढे उरलेला नाही असं मला वाटतंय. हे जेवढं सत्य आहे तेवढेच न्यायालयाच्या मार्गातून मिळालेला निर्णय सरकारद्वारा अमलात आणावा, यासाठी सरकारवर दबाव निर्माण करणारे धनगर राजकीय नेतृत्व विधिमंडळात असणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई ला पोषक असे राजकीय नेतृत्वाचा विकास होणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही मार्गातून यश मिळवण्यासाठी धनगरांनी निर्णायक व नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे. तरच धनगरांना या व्यवस्थेकडून न्याय मिळू शकतो. त्यासाठी एक होऊन सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. नाहीतर लक्षात ठेवा धनगरांनो! प्रत्येक रात्र ही आज वैऱ्याची आहे.


सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!


 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Monday, August 20, 2018

धनगरांवरील अन्यायाचे सर्वाधिक श्रेय कोण धनगर नेता घेणार?
 
                     डॉ प्रभाकर लोंढे


             ज्याप्रमाणे या देशांमध्ये सर्वाधिक कर्तबगार व  पराक्रमी जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख करता येतो, त्याचप्रमाणे अलीकडील काळात भारतीय लोकशाहीमध्ये या जमातीवरील अन्यायाची फार मोठी लांबलचक यादीच तयार होऊ शकते.  हे सर्व अन्याय सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, इतिहास लेखन, या सर्व प्रकारांमध्ये आपणास वर्गीकृत करता येते. यामध्ये याला जबाबदार कोण? व हे अन्याय, अत्याचार का झाले? याचा विचार केला तर ती जबाबदारी सामाजिक दृष्ट्या निश्चित करता येत नसली तरी त्याची जबाबदारी स्वीकारणारा मात्र एकही नेता सापडलेला नाही. किंवा दिसत नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो, त्यामुळे धनगर जमातीतील असे कोणी समोर येतील ही अपेक्षा असणे सहाजिक आहे.
        मात्र दुसरीकडे छोट्या-मोठ्या वेळ काढू फसवणुकीतून बाहेर न काढता अंशतः का होईना मिळालेल्या यशाचे(भोपळा देवून आवळा भेटला तरी) श्रेय घेण्याची संधी मात्र आजचे धनगर नेते सोडत नसल्याचे प्रकर्षाने लक्षात येते. मग न झालेल्या विद्यापीठ नामांतराचे असो, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असो, राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाला निधी मिळविण्याचे असो, वाड्या-वस्त्यांवर हायमास्ट लाइट्स लावल्याचे असो, एखादी सरकारी योजना जर घोषित झाली तर त्याचे श्रेय असो, परदेशात न गेलेल्या मेंढ्यांचे श्रेय असो, सरकारी अन्यायाविरोधात आवाज उठविणारे डॉक्टर भिसेंना (उशिरा का होईना) तुरुंगातून बाहेर आणल्याचे श्रेय असो, धनगर आरक्षणा संबंधाने पुरावे गोळा करून न्यायालयात केस टाकण्याची बाब असो, (दोन दिवसांपूर्वी एक धनगर नेता बोलला, की मधु शिंदे साहेब, डॉ जे पी. बघेल साहेब, यांच्या अगोदर आम्हीच न्यायालयात केस टाकणार होतो. सत्य काय ते त्यांनाच माहीत) (आरक्षणासंदर्भात पूरावे सर्वप्रथम गोळा करणारे व आम्हा धनगर  तरूणांना प्रोत्साहित करणारे तरूण तुर्क म्हातारे आकोटचे अघडते गुरुजी मात्र धनगर श्रेयवादाच्या लढाईत बाहेर फेकले गेले हे मात्र विशेष)  असे धनगर श्रेयवादाचे असंख्य उदाहरणे देता येतील. या श्रेय वादाच्या स्पर्धेत जमात भरकटत जाते. हे मात्र आम्ही कधीच कोणी न स्विकारलेलं सत्य!
        सामाजिक हिताच्या दृष्टीने  या ठिकाणी मी माझा श्रेयवादाचा सिद्धांत आपणा समोर मांडतो आहे. श्रेयवाद हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे. अशा परिस्थितीत ज्याचे त्याने श्रेय घेतलंच पाहिजे, हा त्याचा नैसर्गिक हक्क!  त्याला दिलंच पाहिजे हे सर्वांच सामाजिक कर्तव्य! मिळालेल्या फळाच्या संबंधाने कर्माच्या प्रमाणात प्रत्येकालाच त्याचं श्रेय मिळणे हा झाला सामाजिक न्याय!
यशाबरोबरच आपल्या अपयशाचेही श्रेय स्वतः स्विकारणे ही प्रगल्भता! एक निष्काम सामाजिक भावनेतून कर्म करतो,  आणि दुसराचं त्याचं फळ व श्रेय लाटतो हा झाला सामाजिक अन्याय, अत्याचार!! किंवा विशिष्ट सामाजिक वातावरणाचा गैरफायदा एखादाच नेता घेतो ही झाली सामाजिक गद्दारी! 
         अशा परिस्थितीत मला धनगर म्हणून नोकरी लागली,  धनगर म्हणून मला मान मिळाला, एखादं छोटं मोठं राजकीय, सामाजिक पद मिळालं, राजकीय पक्षांत वजन वाढलं, . बहुसंख्य असलेल्या धनगर जमातीचा कार्यकर्ता, नेता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. समस्त धनगर बांधव मला आपला म्हणून स्विकारतात, माझा शब्द प्रमाण मानतात. ही माझी उपलब्धी नाही तर समाजाने दिलेली माझ्यावर जबाबदारी आहे, म्हणून मी तेवढ्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्यासाठी बांधील आहे. व माझी त्यांच्या प्रती निष्ठा सदैव कायम आहे. त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या विश्वासाचा/ भल्याचा विचार केल्याशिवाय मी माझा वैयक्तिक स्वार्थ/हेतू गौण माणून सामाजिक बांधिलकीला प्रथम प्राधान्य देईल. याला म्हणतात सामाजिक प्रतिबद्धता!  हे जर घडत असेल तर जमात नक्कीच विकासाच्या नियोजनबध्द मार्गावर जाईल. भविष्यात जमातीचे चांगले दिवस येईल. परंतु धनगर जमातीमध्ये हे किती प्रमाणात घडतंय हा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे.
        काही दिवसातच विद्यमान महाराष्ट्र​ राज्य सरकार,  केंद्र सरकार कडे धनगर आरक्षण संबंधाने शिफारस पत्र पाठवणार किंवा त्यासंबंधाने काही तरी नक्कीच करणार.   हे काही धनगर नेत्यांच्या एकूण वागण्या-बोलण्यावरून सुद्धा स्पष्ट होते, स्पष्ट निदर्शनास येते.शिवाय भावी 2019 ची सार्वत्रिक  निवडणूक व विद्यमान एकूण वातावरण/घडामोडी पाहता निश्चित लक्षात येते. काहींनी तर आपण आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या नावावर सरकारसाठी? कि विरोधात? किती माहोल निर्माण करू शकतो, यासाठी शक्तिप्रदर्शनाचाच खटाटोप लावलेला आहे. "धनगर- धनगड एकच आहेत"  हे आम्ही वर्षानुवर्षे सांगत आलो याकडे कोणीच धनगर नेते लक्ष देत नव्हते, आता मात्र तेच बोंबलताना दिसत आहे. याचं औचित्य मात्र अजून समजलेलं नाही. आरक्षण अंमलबजावणीचे काय होणार! आज जरी सांगता येत नसले तरी या शक्ती प्रदर्शनातून खासदार-आमदारकीच्या सिटा निश्चित होतील हे मात्र खरं आहे.  असंच काहींच्या वागण्या बोलण्यातून वाटायला लागले आहे. त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!! असो .
       धनगरांचा राजकीय विकास कोणत्या ना कोणत्या मार्गातून​ झाला हे धनगरांसाठी, धनगरांच्या राजकीय प्रगतीसाठी हितावहच राहणार आहेत. परंतु स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी संपूर्ण धनगर जमात एखाद्या पक्षाला नेऊन बांधणे, जमातीचा स्वाभिमान गहाण ठेवणे, संपूर्ण जमातीचा सत्यानाश करून स्वतःच्या खासदार आमदारकी च्या सीटा निश्चित करणे हे किती संयुक्तिक राहणार हे मात्र काळच ठरवणार आहे. यापुढे तरी धनगरांच्या इतिहासाला लाजवेल अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी घडणार नाही. अशा प्रकारचे अपयश धनगरांच्या पदरात पडणार नाही. एवढीच माफक अपेक्षा सामान्य धनगर म्हणून आम्ही करू शकतो. कशाही प्रकारे नेत्यांना यश/अपयश जर पदरात पडलं तर मात्र नेत्यांनी त्याचं श्रेय घेण्यासाठी तत्पर राहवे, कारण यशाबरोबरच अपयश जरी हाती लागले, तर धनगर नेता म्हणून ते अवश्य स्विकारावं, कारण तो सुध्दा आपला हक्क आहे.

                  सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!


एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक 
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३