Thursday, January 31, 2019

रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच

🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच!*   

                 डॉ प्रभाकर लोंढे

         भारतातील धनगर जमातीसह सर्वच बहूजन समाजाची अवस्था पाहीली तर या समाजाला *राजकीय क्रांतीची गरज आहे* . त्याशिवाय त्यांची प्रगती होणे शक्य नाही, हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. असे असले तरी ही *क्रांती रक्तविहीन क्रांती होणे* आवश्यक आहे. कारण भारतात लोकशाही आहे. लोकशाही मध्ये राजकीय क्रांती ही केवळ निवडणूकीच्या माध्यमातून शक्य आहे. येथे प्रत्येक निवडणूक जनमताच्या आधारे जिंकली जात असते, असं म्हटलं जातं, त्यामुळे येथील *धनगर सह बहूजन उमेदवारांपासून तर कार्यकर्ते व मतदारांना एका व्हिजन (दृष्टी)ची गरज आहे.* त्यांना एका कल्याणकारी विचारसरणीची आवश्यकता आहे. अशी ही *समाजोपयोगी, सर्वकल्याणकारी दृष्टी विकसित करण्याची ताकद मात्र फक्त होळकरशाही, तिचा इतिहास व तिच्या त्या नऊ रत्नांमध्ये आहे.* याची ग्वाही होळकरांचा इतिहास व तत्कालीन समाजव्यवस्था आपणा सर्वांना देते. त्यासाठी सर्वांनी तो इतिहास वाचनाची आवश्यकता आहे.
            भारतीय समाजातील धनगर सह बहूजनांपैकी आजच्या प्रत्येक नेत्यांना त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्या राजकीय अस्मिता जपायच्या असेल तर *स्वबळावर शून्यातून विश्व निर्माण करणारे थोर सुभेदार मल्हारराव होळकर डोक्यात ठेवावे लागेल..... त्यांचा स्वबळावर स्वअस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प  समजून  घ्यावा लागेल.  त्यांच्या सारखी पराक्रमाची  शर्थ लावावीे लागेल. त्यांचा गनिमी कावा लक्षात घेऊन तो तलवारीच्या नाही तर मतसंख्येच्या भरोशावर वास्तवात उतरवावा लागेल. मल्हाररावांचा बानेदारपणा, कठोर परिश्रम करण्याची तयारी, समय सुचकता, ध्येयाप्रती निष्ठा व निष्ठेपोटी असलेली कटीबध्दता* समजून घेणे आवश्यक आहे.
         आज धनगर सह बहुजन समाजामध्ये समाजहित केद्रित नेत्यांची कमतरता आहे, असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही कारण नेतृत्वाच्या कर्तुत्वाचा परिणाम दिसत नाही. व वास्तविकता ही आहे की, हा बहुजन समाज राजकीय सत्तेपासून व त्याच्या लाभापासून आजही वंचित आहे. त्याला केवळ नेतेच जबाबदार नाही तर येथील परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. मात्र या परिस्थितीवर मात करूनच बहूजन समाजाचा विकास शक्य आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने संघटित प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे प्रयत्न करण्याची ताकद देण्याची क्षमता फक्त होळकरशाहीच्या इतिहासात आहे.  विपरीत व प्रतिगामी सामाजिक, राजकीय परिस्थिती असताना खाजगी जीवनातील दुःखाचे भांडवल न करता राजकीय सत्ता  हातात घेऊन *बहुजन नेत्यांना स्वबळावर लोकाभिमुख, लोकहितवादी  राज्यकारभार करायचा असेल व लोकांच्या गळ्यातील ताईत बनायचे असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श पुरेसा आहे...*
                   होळरशाहीतील महापराक्रमी *यशवंतराव होळकरांचा इतिहास तर आजच्या सर्वच प्रश्र्नांचे उत्तर देणारा आहे* . सोबतच लढण्याची ताकद निर्माण करणारा आहे. स्वराज्यातील संकटांच्या मालिकांमुळे स्वराज्याची घडी विस्कळीत झालेली असताना स्वबळावर स्वराज्य पुनर्गठित  करण्याचे कार्य पराक्रमी यशवंतराव होळकरांनी केले. राष्ट्रीय भावना जपत समान दुखितांना संघटित करून  शत्रुवर वार करण्याचे कार्य केले. हे सर्व समजून घेण्यासाठी  मात्र शूरवीर यशवंतराव वाचावा लागेल.
       स्वजनांच्या उद्धारासाठी काही करायची खरी इच्छा असेल, धनगरांच्या घरातील दुरावस्थे बरोबरच जमात व राष्ट्रावर आलेली संकटे ओळखून राष्ट्र वाचवायचे असेल सोबतच *आजच्या संकटसमयी एकत्र येऊन शत्रूवर जरब निर्माण कराविशी वाटत असेल तर  मन, मनगट व मस्तकात महाराजा यशवंतराव होळकर व त्यांचा पराक्रम, दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.*
              थोडक्यात सांगायचे झाले तर धनगर जमातीच्या नेते, कार्यकर्ता यांनी होळकरशाहीच्या संस्थापकाची दूरदृष्टी व पराक्रम, मातोश्री अहिल्यामातेची लोकाभिमुखता व कल्याणकारी दृष्टीकोन, यशवंतरावांचे प्रसंगावधान व धडाडी सोबतच राष्ट्रीय भावना समजून घेतले तर *धनगर सोबतच सर्वच बहूजन जमातीतून सक्षम नेतृत्व विकसित होऊ शकते.* ..... *प्रस्थापितांची मुजोरी खतम होवू शकते...*

                त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

           जय मल्हार
 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment