Wednesday, May 13, 2020

जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!*

🥈🥉🥈🥉🥈🥉🥈🥈🥈🥉
*जयंती साजरी करण्याचा नवीन फंडा!* 
 
                    *डॉ प्रभाकर लोंढे.* 

                 माणूस जन्मापासून तर मरेपर्यंत स्वतःच्या क्षमतेनुसार जगत असतो, असं असलं तरी त्याचा दृष्टीकोन त्याला त्याच्या जगण्याची दिशा ठरवण्यासाठी मदत करीत असतो. हा त्याचा दृष्टीकोन त्याच्यावरील संस्कार, उपलब्ध परिस्थिती व त्याने जीवनामध्ये पाहिलेल्या स्वप्नांवरून ठरत असतो. यापुढे त्याने आपल्या दृष्टिकोनाला सांभाळत असताना केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख हा त्याच्या जीवनाचा दर्जा ठरवित असतो, प्रसंगी त्याच्या/ तिच्या व्यक्तित्वाला अमरत्व प्राप्त करून देत असतो. तेच अमरत्व इतर सामान्य माणसांच्या दृष्टीने त्याला महापुरुषाचा दर्जा प्राप्त करून देत असतो. व त्याच्या प्रेरणेतून सामान्य माणूस संपूर्ण जीवन जगत असतो.
        असे *कर्तुत्ववान प्रेरणादायी महापुरुष पैदा करता येत नाही तर ते घडविता येतात. महापुरुष हा विचारांनी व कर्तुत्वानी घडत असतो,*  त्यामुळे स्वतःच्या जीवनातील आचारपद्धती व स्वप्न साकार करण्यासाठी इतिहासात घडून गेलेल्या महापुरुषांची कार्य पद्धती व जीवन कार्य सामान्यांना जीवनामध्ये आधारस्तंभ दीपस्तंभ यासारखे कार्य करीत असते.  समाजात घडून गेलेले महापुरुष समाजात सातत्याने दीपस्तंभासारखे जळत राहावे, सर्वसामान्यांपर्यंत जगण्याची दृष्टी देत राहावे, यादृष्टीने महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या समाजामध्ये साजरा करावयाच्या असतात. 
             *पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर हे व्यक्तित्व समाजामध्ये अनेक अंगाने मार्गदर्शक असून जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर जगण्याची ऊर्जा देऊन जात. संपूर्ण जग दुःखमय असताना दुःखातही सुख शोधण्याची वृत्ती निर्माण करतं. खाजगी जगत असताना सार्वजनिक, सर्वकालिक होण्याची प्रेरणा देतं. सर्वधर्मसमभाव यातून सामाजिक समतोल साधण्याची एक विचार प्रेरणा घेऊन जगण्यासाठी माणसाला प्रेरित करतं. सत्तेचा माज उतरवून समाजामध्ये सेवाभावी दृष्टीने जगण्यासाठी मजबूर करतं.* म्हणून ज्याप्रमाणे एकलव्याने द्रोनाचार्याचा पुतळा बनवला होता तो पुतळा एकलव्या तील सर्व स्कील विकसित करण्यासाठी प्रेरणा देत होता. त्यातूनच तो उत्तम धनुर्धारी बनला. यातून मला एवढेच सांगायचे आहे की महापुरुषांचे पुतळे, चित्र, स्मृती ह्या बाबी कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं जीवन जगण्यासाठी व स्वतःतील गुण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक ती मदत करीत असतात. 
                 त्यासाठीच यावर्षीची राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे २०२० ला सर्व सामाजिक व राजकीय बंधन पाळून आपण आपल्या घरी वाड्या-वस्त्यांवर राहून उत्साहात साजरी करू शकतो. यावेळी कोणीही शासकीय निर्बंध,नियम, कायदा तोडणार नाही, याची संपूर्ण खबरदारी घेऊनच जयंती साजरी करावी. व ते सर्वांवर बंधनकारक आहे. परंतु याचा असा एक फायदा आहे की, त्यामुळे दरवर्षी जयंतीसाठी मोठ्या खर्च होणारा पैसा वाचणार आहे. *हा वाचलेला पैसा खर्च झालाच पाहिजे, असं बंधनकारक नाही. परंतु त्या मधून भुकेलेल्यांना अन्न, पैशावाचून शिक्षण थांबणाऱ्यांना शिक्षणाच्या सोयी, बिमारांना आर्थिक मदत, समाजातील अन्याय, अत्याचारग्रस्त यांना मदत, याशिवाय प्रत्येकाच्या मनात असलेले समाज उद्धारक नवोउपक्रम राबवण्यासाठी या जयंतीचा वापर करून खऱ्या अर्थाने आपण दानदात्या राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वारस असल्याचे सिद्ध करू शकतो.* 
        याशिवाय लॉक डाऊनचा काळ असल्यामुळे कुठे सार्वजनिक स्थळी राजमाता *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी न करण्याचं शल्य मनात येऊ न देता पारंपारिक उत्साह जोश कायम ठेवून त्याला मात्र वेगळ्या वळणावर परिस्थितीसापेक्ष निर्णय घेऊन यावर्षीची जयंती साजरी केली तर ती अविस्मरणीय राहणार आहे.*         

अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विविध चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वाड्या-वस्त्या यांना महापुरुषांची नावे देण्याची ट्रेंड प्रचलित होताना दिसत आहे. सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक अंगाने मार्गदर्शक जीवन असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा चौक, रोड, रस्ता उड्डाणपूल दिसत नाही किंवा ऐकायला मिळत नाही.  *यावर्षीच्या जयंती निमित्ताने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव एखाद्या चौक, उड्डाणपूल, रोड, रस्ता, वार्ड, मोहल्ला, वाड्या-वस्त्यांना  देऊन, त्याची ३१ मेला तत्वतः घोषणा करून सर्वांनी आपल्या घरीच राहुन ऑनलाइन पद्धतीने विचारविनिमय करून ऑनलाइन पद्धतीनेच त्याची घोषणा केली तर लाकडाऊन नंतर त्याची अंमलबजावणी करता येईल.* या लाकडाऊनच्या निमित्ताने ती अविस्मरणीय बाब ठरणार आहे. 
       सर्वांनी सार्वजनिक व खाजगी आरोग्याची काळजी घेऊन लाकडावून चे पालन करण्यासाठी शासनाला व प्रशासनाला संपूर्णतः सहकार्य करावे. *राष्ट्र प्रथम कर्तव्य समजावे.* .. ही विनंती..

 *त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!* 


 *डॉ प्रभाकर लोंढे*
*गोंदिया* 
९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment