Wednesday, May 13, 2020

गोपिचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

गोपीचंद ला गोपीनाथ बणण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

डॉ प्रभाकर लोंढे

         धनगर नेते म्हणून ब्रँडिंग झालेले मा. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळताच धनगर समाजामध्ये काही प्रमाणात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.  प्रथमतः गोपीचंद पडळकर यांचे त्रिवार विशेष अभिनंदन!!!  ही धनगर जमातीसाठी अभिनंदनाची बाब असली तरी ही  विधान परिषदेची उमेदवारी मिळवून घेण्यासाठी त्यांना बारामती मध्ये येऊन स्वतःच डिपॉझिट जप्त करून घ्यावं लागलं ही बाब अतिशय विचार करायला लावणारी आहे. . धनगर बहुल बारामतीमध्ये येऊन धनगर उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणं ही जमातीसाठी अभिमानास्पद बाब आहे, असं मला तरी वाटत नाही. परंतु ते बारामतीत का आले? हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी सांगली(जिल्हा) सोडली नसती तर कदाचित ही वेळ आली नसती.
              गोपीचंद म्हणजे एका सामान्य धनगर कुटुंबातील माणूस पण त्यांनी "50 धनगरांना आमदार व तीन महिन्याच्या आत एस.टी.चे सर्टिफिकेट" या मुद्यांवर उत्तम वकृत्व शैलीच्या आधारे धनगर तरुणाईला भारित केलं.  असं एक व्यक्तित्व म्हणून बीजेपी ने गोपीचंद पडळकरांना पुन्हा जवळ केलं. त्याआधारे बीजेपीला जी काही मत मिळायची ती मिळाली. तसा गोपीचंद पडळकर यांचा प्रवास हा अत्यंत खडतर, त्यांना प्रस्थापितांच्या कट कारस्थानांच्या बाबतीत चांगला अनुभव आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वत:ला चांगल्या प्रकारे स्थीर ठेवलं. काही प्रमाणात का होईना स्वत:ला आर्थिक राजकीय बाबतीत सक्षम केलं.
          प्रस्थापितांनी त्यांच्याशी कसेही वागले तरी धनगर लाटेला वळविण्याचं काम गोपीचंदनी उत्तम प्रकारे केलं किंवा करू शकतो हा विश्वास बीजेपीला वाटल्यामुळे तसेच धनगरांचा नवीन पत्ता खेळण्याच्या दृष्टीने ही उमेदवारी दिलेली आहे, असं मला वाटते. शेवटी हे माझं मत आहे. पण विधान परिषदेतील उधारीच्या सभासदत्वाची धनगर संख्या एक ने वाढेल. त्याबद्दल धनगर जमातीचे विशेष अभिनंदन!!
          गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच मात्र अनेकांनी त्यांची तुलना गोपीनाथ मुंडेशी केली. बीजेपी तील गोपीनाथ मुंडे बनण्याची संधी, ओबीसी नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी अशा आशयाची प्रतिक्रिया वाचली. आनंद झाला. डोक्यात  विचार आला. मन गंभीर झालं आणि त्यानी ठरवून टाकलं. की मी लिहून देतो, गोपीचंद पडळकरांना गोपीनाथ मुंडे बनण्याचे मार्ग पूर्णता बंद झालेले आहे. 
           गोपीनाथ मुंडेंचा ज्या परिस्थितीमध्ये राजकीय जन्म झाला, ती राजकीय परिस्थिती बीजेपी मध्ये गोपीचंद यांना नक्कीच मिळणार नाही. याशिवाय गोपीचंदची जमात धनगर, महाराष्ट्रात हेतुपुरस्सर राजकीय उपेक्षित ठेवल्या जात असलेली धनगर. (आजचा अलिखित नियमच बनून गेला आहे की या महाराष्ट्रात धनगर नेतृत्व सदासर्वकाळ सत्तेत किंवा नेतृत्वात राहूच द्यायचा नाही) आजच्या महाराष्ट्रातील धनगर नेतृत्वाचा इतिहास पाहिला तर धनगरांचा कोणताही पत्ता(नेतृत्व) फूल टाइम वापरला गेला नाही. (आबा अपवाद) धनगरांच्या नेत्याला शह देण्यासाठी नवीन दुसरा धनगर नेता शोधणे व त्याला पुढे करून जमातीला बांधून ठेवणे, ही येथील प्रस्थापित पक्षांची नीती. पडळकरांना  उमेदवारी देण्यामागचा कदाचित हा उद्देश असण्याची दाट शक्यता आहे.  बीजेपीला पडळकरांची राजकीय ताकद वाढवायची असती तर विधानसभेसाठी बारामतीत नेऊन त्यांची डिपॉझिट जप्त होऊ दिली नसती.  
           गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. लोकांना माहीत नसलेला बीजेपी पक्ष त्यांनी घराघरात नेऊन पोहचविला. ती बीजेपी ची गरज होती.  त्यामुळे त्यांची नाळ ही अठरापगड जातीशी व घरात पत्नी महाजन (प्रमोद महाजन ची बहिण) घराण्याची होती. त्या
मुळे गोपीनाथ  मुंडे साहेबांना शेवटचे गोपीनाथ मुंडेसाहेब बनण्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली. तशी संधी आज गोपीचंदजीना बीजेपी मध्ये उपलब्ध आहे, असं मला तरी वाटत नाही. 
            तसं पाहिलं तर प्रस्थापितांनी गोपीचंद पडळकरांची  महाराष्ट्रातील विधिमंडळात /राजकारणात सुरुवातच विधानसभेची  डिपॉझिट जप्त करून विधानपरिषदे पासून केली . (याचा अर्थ असा काढू नका की, गोपीचंद पडळकर निवडून येवू शकत नाही ) मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की त्यांच्यासाठी ही परिस्थिती हेतुपुरस्सर निर्माण केल्या गेली. 
             गोपीचंद पडळकरना मिळालेली उमेदवारी ती मागावी लागली. येथे मिळलेली उमेदवारी ही धनगर समाजाला आहेत की गोपीचंद पडळकरांना आहे?, हा मोठा प्रश्र्नच आहे. पडळकर साहेबांच्या कार्याचं ? की धनगर जमातीच्या त्यागाचं फलित? म्हणून ही उमेदवारी मिळालेली आहे. (यापूर्वी धनगरांच्या त्यागाच फलित म्हणून धनगरांना खासदारकी मिळाली आहे)
            या ठिकाणी प्रश्न कितीही असले तरी आलेली संधी मात्र गोपीचंद पडळकर साहेबांच्या राजकीय जीवनाचे सार्थक करू शकते. आलेले कटू अनुभव व योग्य पावले पडली तर धनगर जमातीच्या राजकीय पटलावर एक नेतृत्व म्हणून विधानमंडळात महत्त्वाची भूमिका बजावू होऊ शकते. 
   त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment