Wednesday, June 17, 2020

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज

धनगर जमातीला भक्तांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज!
  
           डॉ. प्रभाकर लोंढे

संपूर्ण समाज विकास प्रक्रियेतील सर्व समाज घटकांच्या त्या समाजासाठी चाललेल्या कार्याचे निरपेक्षपणे समीक्षण केले असता प्रत्येक समाजामध्ये व त्या समाजाच्या चळवळ, वळवळ, उपक्रम, उपद्रव एकूणच विकास प्रक्रियेमध्ये तीन प्रकारचे लोक कार्य करीत असतात. प्रत्येकाचा उद्देश समाज विकास हाच असतो, असा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेला असतो.  हाच त्यांच्यात ठासून भरलेला भाव समाजामध्ये काम करण्यासाठी त्यांना प्रेरित करीत असतो. त्याच प्रेरणेने प्रत्येकाचे समाज विकासाच्या नावाने कार्य सुरू असते. आणि त्यातून समाज विकास प्रक्रियेची पावलं पडत असतात. त्या सर्व पावलांचं सरासरी दृष्ट्या चाललेलं मार्गक्रमण समाजाच्या विकास प्रक्रियेचा वेग ठरवत असते.
             माझ्या मते, या सर्व प्रक्रियेत कार्य करणाऱ्यां समाजधुरीणांचे  भक्त, कार्यकर्ता आणि समाजसेवक असे प्रकार आपल्याला वर्णन करता येतात, असं मला वाटत.  असा त्याला पर्यायी विचार सर्वांना नक्कीच करता येईल. तो प्रत्येकाचा अधिकार असतो. आणि तो प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. मात्र सार रूपाने अशा प्रकारचे वर्णन मात्र संयुक्तिक ठरेल. असे वर्गीकरण करताना कितीही कठीण काम असले तरी समाज चळवळीचा ओघ व वेग निश्चित करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे असं मला वाटते.
              धनगर समाजात काम करणाऱ्या या तिन्ही वर्गाची मिळून एकूण संख्या खूप झाले तर १० ते १५ टक्के आहे. त्यातही भक्तांची संख्या अधिक आहे. त्यानंतर तर कार्यकर्त्यांची संख्या व सर्वात शेवटी समाजसेवकांची संख्या फार दुर्मिळ आहे. पहिले दोन वर्ग समाज सेवक हा शब्द कधीकधी लावण्याचा प्रयत्न करीत असतात. असो! काही का असेना या दहा पंधरा टक्के लोकांमुळे समाजातील चळवळ व उपक्रम सातत्याने सुरू असतात.  आज समाधान आहे की अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
      आता कोणी म्हणतील या सर्वांची व्याख्या कशी काय करता येईल, हे फार कठीण काम आहे तरी पण मी माझ्या परीने त्याचा प्रयत्न करतो त्यापैकी पहिला प्रकार 
१) भक्त - 
     हा शब्द प्रत्येकानेच ऐकलेला आहे. परंतु समाज चळवळीमध्ये सुद्धा भक्त असतात हे मात्र कदाचित नवीन संकल्पना आहे.  भक्त हा कधीच समीक्षक नसतो. त्याचा एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या विचारावर दृढ विश्वास असतो. त्या व्यक्ती किंवा विचार यापुढे जाऊन सुद्धा नवीन काही असू शकते यावर त्याचा कधीच विश्वास नसतो. किंवा स्विकारायला तयार नसतो.  यापुढे जाऊन काहींना तर अंधभक्त शब्द सुद्धा वापरू शकतो. काही भक्त तर एखाद्या व्यक्तीकडे सत्तेचा लाभ किंवा एखाद्याकडून आर्थिक फायदा मिळवून घेण्यासाठी त्या व्यक्तीची भक्ती करतात किंवा करीत असल्याचं सॉंग सुध्दा करीत असतात.  "..........
  चा मी कट्टर समर्थक" अशा भूमिकेतील लोकांचा  यामध्ये समावेश होतो.

२) कार्यकर्ता 
       हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याच्याकडे स्वतःचा विचार असतो. तो समीक्षक असतो. चांगलं काय? वाईट काय? हे सुद्धा तो समजून घेत असतो. घेण्याच्या पात्रतेचा असतो. विरोधी विचारांचा सुध्दा त्याला आदर असून त्यातील यथार्थता तो समजून घेत असतो. मान्य करीत असतो. असाच विचारी कार्यकर्ता समविचारी कार्यकर्त्यांशी जुळवून घेत असतो आणि त्यामधून समविचारी कार्यकर्त्यांची एक वैचारिक प्रवाही चळवळ निर्माण होत असते. तीच समाजाचे भले करू शकते आणि अशाच चळवळीची समाजाला आज गरज आहे.  तिथे व्यक्तीना नाही तर विचारांना महत्त्व असतं. विचार प्रमाण असतो पण अंतिम नाही. विचाराची सातत्याने समीक्षा होत असते. आणि त्याच्यातून काळ सापेक्ष विचार स्वीकारला जातो. स्वीकारण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची तयारी असते. अशा कार्यकर्त्यांची दिवसेंदिवस वाढ होणे समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असते.
         
      ३) समाज सेवक - हा समाज कार्यकर्त्यांमधील अतिशय महत्त्वाचा प्रकार असून तो खरा समाज सुधारक असतो. त्याला केवळ समाजहिताचा शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची हाव नसते. त्याच्या सर्व बाबी समाज हितासाठीच असतात.  ते समाजहितासाठी केवळ सत्याचे आग्रही असतात. "हाडाचा कार्यकर्ता" शेवटी समाजसेवक  पदापर्यंत पोहचू शकतो. वयाच्या सत्तर च्या दरम्यान असलेल्या अनेक धनगर कार्यकर्त्यांचा समाजसेवक या सदरामध्ये समावेश करू शकतो. माझ्या नजरेत असलेली अनेक नावे मला या ठिकाणी देता आली असती. परंतु याठिकाणी व्यक्तीसापेक्षता टाळण्यासाठी सामाजिक दृष्टिकोन स्विकारून मी ती टाळतो आहे. माझ्या साठी ते नेहमी प्रेरणास्थान आहे. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर अशा समाजसेवकाचा शोध घ्यावा ही वाचकांना विनंती
       आता पर्यंत मांडलेले विचार हे माझं मत असल्याने, ते प्रमाण माणण्याची गरज नाही. मात्र त्यावर विचार व्हावा. त्यापेक्षा नवीन विचार समाजासमोर यावा. वैचारिक क्रांती ची पावलं वेगानी पडावी ही मात्र अपेक्षा. 

त्यादृष्टीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment