Friday, June 19, 2020

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

धनगरांनो! कार्यकर्ताच चळवळींचा आत्मा.

डॉ प्रभाकर लोंढे

         कुठलीही चळवळ ही एका विचाराने प्रेरित होऊन मार्गक्रमण करीत असते. त्या विचाराला मानणारी मंडळी जुळत जातात. तन मन धन देऊन चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. प्रत्येक चळवळीला कार्यकर्त्यांमुळे खरी बळकटी येत असते. त्यातून चळवळ शक्तिशाली होवून आपला मार्गक्रमण करीत असते. या सर्व प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका असते त्यावेळी सामान्य जनता हा चळवळीचा मुख्य आधार असते. चळवळीतील कार्यकर्ते हे चळवळ व सामान्य जनता याना जोडणारा अतिशय महत्वाचा दुवा असते. त्या कार्यकर्त्यांमुळेच जनसामान्यांचा चळवळीवरचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत जातो. आणि तीच चळवळीची खरी ताकद असते. 
     सामान्यांचा व कार्यकर्त्यांचा विश्वास ही चळवळीची ताकद असल्यामुळे ती जपणे अत्यंत आवश्यक आहे. व ती नेतृत्वाची महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणून नेतृत्वाकडून घेतले जाणारे निर्णय सामान्य जनता तसेच कार्यकर्ते यांचा विश्वासघात होणार नाही शिवाय चळवळीला कोणतेही नुकसान होणार नाही या दोन दृष्टीने होणे अत्यंत आवश्यक आहे. तरच निरंतरता व गतिशीलता हे दोन गुण सदासर्वकाळ चळवळीच्या सोबत राहू शकतात. 
        चळवळ ही कोणाही एका व्यक्तीमुळे नाही तर विचारांमुळे ध्येयाच्या दिशेने प्रवाहित असते. त्यामुळे विचार हा नेहमी चळवळीचा गाभा असलाच पाहिजे. विचारांच्या आधारे निर्माण झालेल्या चळवळीला दिशा देण्याचे कार्य मात्र नेतृत्व करीत असते. त्यामुळे नेतृत्वाने आपली  विवेकनिष्ठा व ध्येयनिष्ठा सोबतच समाजनिष्ठा जपलीच पाहिजे, कारण  नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे चळवळीचे भवितव्य ठरत असते.   
          नेतृत्वाविषयी जनमानसात निर्माण झालेली विश्वासार्हता ही नेतृत्वाच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता सोबतच जनभावना व तिचा आदर यावर अवलंबून असते. जनभावनेशी जुळलेली चळवळ वेगाने फोफावत असते. परंतु तिचा अनादर झाला तर त्याचे वाईट परिणाम नेतृत्वावर नाही पण चळवळ व कार्यकर्ता यांच्या वर होतात. कार्यकर्त्यांची तर फार मोठी फजिती होते. कार्यकर्त्यांना तोंड दाखवायला सुध्दा जागा नसते. कारण सामान्य जनतेपर्यंत नेता नाही तर कार्यकर्ता जात असते. चळवळीतील कार्यकर्ताच सामान्य ते असामान्य यांपासून चळवळीसाठी तन-मन-धन जमा करीत असते. त्यामुळे चळवळीतील नेतृत्वाने जनभावनेचा आदर करीत सर्व बाबतीत निर्णय घेणे, पारदर्शकता जपणे अतिशय आवश्यक आहे. 
       चळवळीमध्ये व्यक्ती व व्यक्तीसंबंधी भक्ती या दोन गोष्टी चळवळीला अतिशय मारक असतात. त्यामुळे नेतृत्वाचे विचार व कृती यांचे कार्यकर्त्यांकडून नेहमी समीक्षण व्हायलाच पाहिजे. याच आधारे नेतृत्वाच्या खाजगी कर्तुत्वाचे पोवाडे नाही तर सामाजिक कार्याचा आलेख मांडायला काही हरकत नाही. परंतु तो भक्ती स्वरूपाचा नसावा. त्यासाठी कार्यकर्त्यांची नेतृत्वावर श्रद्धा असलीच पाहिजे परंतु ती अंधश्रद्धा नसावी.
           धनगर चळवळी उभ्या राहत असताना चळवळीतील ह्या अत्यंत महत्वाच्या बाबी सर्वांनी समजून घ्याव्या. त्यादृष्टीने कार्य करावे
नाहीतर अनेक महान आत्मे (नेते)जन्माला येतील, चळवळ मात्र जागेवर मरून जातील, कार्यकर्ते कडीपत्यासारखे स्वाद घेवून (वापरून) फेकले जातील, सामान्य माणसांमध्ये नैराश्य, औदासिन्य सातत्याने पहायला मिळतील. सामाजिक प्रश्न जागचे जागेवर पिढ्या बरबाद करतील. समाज मात्र भरकटत राहतील. 
          हे होवू नये असं जर वाटत असेल तर चळवळी भरडल्या जाणार नाही यादृष्टीने सर्वांनी आपली कर्तव्य भावना जपावी. ही विनंती त्यासाठी सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!

डॉ.  प्रभाकर लोंढे 
धनगर राजकीय नेतृत्व 
आणि 
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३..

No comments:

Post a Comment