राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वैश्विक अद्वितीयता,
डॉ प्रभाकर लोंढे
इतरांवर अधिराज्य गाजवण्याची प्रत्येकामध्येच नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतरांवर प्रभाव निर्माण करण्याची अभिलाषा प्रत्येकच अंतर्मनात असते. यातूनच राजकीय सत्ता प्राप्त करून स्वतःला अपेक्षित असा जगाला आकार देण्याची उपभोग प्रामाण्यवादी अघोरी वृत्ती सुद्धा निर्माण होऊ शकते.
यातूनच जग जिंकण्यासाठी निघालेला नेपोलियन असो की सिकंदर, मुस्लिम शासक बाबर असो की अकबर, चंद्रगुप्त मोर्या पासून कलिंगच्या युद्धापर्यंतचा सम्राट अशोक असो, किंवा शिवरायांनी निर्माण केलेल्या शिवशाहीच्या वारसांना हटवणारे पेशवे असो, एवढेच नाही तर इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून स्वतःच्या साम्राज्यवादी नितीने जगात दबदबा निर्माण करणारे इंग्रज, राणी एलिझाबेथ शिवाय वारेन हेस्टिंग सारखे अनेक इंग्रज अधिकारी असो, किंवा आजच्या वर्तमानातील भारत, महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेसाठी चाललेली नितीभ्रष्टता असो, या सर्वांच्या पायाशी स्वार्थ, उपभोगवादी वृत्ती असून त्यासाठीच त्यांनी जीवन घालवलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या जीवनाचा अर्थच तसा निघतो आहे...
असे हे साम्राज्यवादी आणि अतिक्रमणकारी भूमिका असणारे भौतिकतावादाला प्राधान्य देणारे जागतिक सम्राट जगाच्या लवकर लक्षात आले, जगाच्या नजरेत चटकन भरले. परंतु संपूर्ण जगाचा सर्वांगीण इतिहास लक्षात घेतला तर जगाच्या पाठीवर स्वतःच्या जीवनधर्म, कर्म, आणि बुद्धीप्रामाण्य यांच्या आधारे संपूर्ण जगात सुख, शांती आणि मानवतेची महती गाणारे, स्वकर्मातून मानवतेला अलंकारित करणारे राजे, महाराजे आणि त्यामध्येही महाराण्या यांना मात्र आपल्याला विशेष समजून घेणे आवश्यक ठरते.
जगाच्या इतिहासामध्ये आपल्या कर्माने नावलौकिक कमाविणाऱ्या महाराण्यांचा शुक्ष्म अभ्यास केल्यास त्यामध्ये मध्ययुगीन कालखंडात भारताच्या इंदोर संस्थानात होऊन गेलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख जागतिक पातळीवर प्रथमस्थानी करावाच लागतो. त्याशिवाय महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
देश-विदेशातील ऐतिहासिक संदर्भाचा अभ्यास केल्यास महाराणी अहिल्याबाई होळकरांचा इ.सन १७६६ ते १७९५ असा २९ वर्षाचा माळवा प्रांतातील राज्यकारभार असला तरी तो संपूर्ण भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्त्री कर्तुत्वाला परमोच्च शिखरावर नेऊन पोचविणारा आहे.
स्वतःच्या वैयक्तिक सुख-दुःखाकडे लक्ष न देता, त्याच्यावर मात करीत धर्म, जात, लिंग, प्रांत या संकुचित भावनांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या सुखात स्वतःच सुख शोधणं, स्वतःकडे असलेल्या राजकीय सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करीत असताना स्वतःच्या उत्तरदायित्वाचं स्थान 'स्वतःच' ईश्वराला निर्धारित करणं, त्याच्या साक्षीने सर्व लोकोपयोगी कार्य प्राधान्याने करणं, न्यायाधारित समाज निर्मितीला प्राथमिकता देत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, कोणीही दलित, शोषित, पिडीत, वंचित, उपेक्षित राहणार नाही, या सर्व बाबींची काळजी घेणारी आदर्श राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा विक्रम जर जगाच्या इतिहासामध्ये कोणत्या देशाच्या नावे दिसत असेल तर तो आहे भारत व त्यातही लोकमाता अहिल्याबाई होळकर या नावाचाच उल्लेख करावा लागतो.
राजमाता अहिल्याबाई होळकरांनी धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाला लोककल्याणाचा मार्ग बनवले, प्रत्येक हातात कौशल्य, कौशल्य पूर्ण हाताला काम व कामाचे उचित दाम, या तत्त्वावर राज्याचा आर्थिक, सामाजिक विकास साध्य करण्याचे मॉडेल अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यात तयार केले होते की, जे आजही जगाला दिशादर्शक आहेत.
चूल- मुल आणि उपभोग्य वस्तू याच्या पलीकडे तत्कालीन सामाजिक वास्तव तसेच परिस्थिती नसलेल्या त्या काळातील स्त्रियांच्या मनगटाबरोबर भयग्रस्त मनात बळ भरण्याचे कार्य करणारी, स्त्रियांच्या हातात तलवार देवून महिलांची फौज निर्माण करणारी जगातील पहिली राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा इतिहासात उल्लेख येतो . ही जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणारी सर्वप्रथम बाब होती.
राजमाता अहिल्याबाई होळकरांनी स्वतःपासून स्त्री शिक्षणास सूरवात केली व स्त्रियांच्या हातात सर्वप्रथम "शास्त्र" आणि स्त्रियांच्या फौजेच्या माध्यमातून "शस्त्र" दिले ही समाजाच्या व स्त्रियांच्या जीवनातील अतिशय मोठी ऐतिहासिक क्रांतिकारी घटना होती.
संपूर्ण भारताचा विचार केल्यास भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सर्वांगीण उच्च पदास इतर कोणतीही भारतीय ऐतिहासिक स्त्री पोहचू शकली नाही. म्हणजेच तिच्याशी तुलना करू शकेल अशी कुठलीही भारतीय स्त्री भारताच्या इतिहासात दिसत नाही.
अशा या महान सर्वांगीण महीला क्रांतिकारी राज्यकर्त्यीची तुलना जागतिक पातळीवर जर करायची ठरविली तर ती केवळ ऑस्ट्रियाची राणी "मारीया थेरेसा" हिच्याशीच होऊ शकते.
मारीया थेरेसा आणि अहिल्याबाई होळकर या जवळपास समकालीन होत्या. राणी मारीया युरोप मध्ये तर राणी अहिल्या आशियाई भारतात होवून गेली. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म इ.स.१७२५ मध्ये मे महिन्यातील ३१ तारखेला तर मारीया थेरेसा चा जन्म १७१७ मध्ये मे महिन्यातील १३ झाला होता. दोन्हीच्या जन्मामध्ये नऊ वर्षाचा फरक होता. राणी अहिल्या इ.स १७६६ मध्ये राजगादीवर आली तेव्हा ती ४१ वर्ष वयाची होती तर मारीया थेरेसा इ.स. १७४० मध्ये राजगादीवर आली तेव्हा ती तरुण केवळ २४ वर्ष वयाची होती.
मारीया थेरेसाने इ. सन१७४० ते इ. सन १७८० असा ४० वर्ष राज्यकारभार केला तर अहिल्याबाई होळकरांनी इ.सन १७६६ ते इ.सन १७९५ असा २९ वर्षे राज्यकारभार केला. दोघीही राजगादीवर आल्या तेव्हा निराधार अवस्थे मध्येच आल्या. त्यांना अबला समजून त्यांची राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न दोन्ही कडे झाला. अहिल्याचे राज्य गिळंकृत करण्याचा राघोबा दादा पेशव्याने प्रयत्न केला तर तिकडे मारीयाचे जीवनात तसा प्रयत्न प्रशियाचा राजा फ्रेडरिक याने केला. परंतु असा हा प्रयत्न आपल्या मुसद्देगिरीने दोघींनीही हाणून पाडला आणि शेवटपर्यंत स्वबळावर राज्यकारभार केला.
मारिया जन्मताच राजघराण्यातील होती. ती रोमन सम्राट "चार्ल्स सहावा" याची मुलगी होती, त्यामुळे तिच्यावर जन्मताच राजसंस्कार झाले होते परंतु अहिल्याचा जन्म एका सामान्य माहदाजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. मेंढपाळ कुटुंबात जन्म झाल्याने तिचे बालपण सामान्य असले तरी तिच्या विवाह नंतर तिच्या जिवाला फार मोठी कलाटणी मिळाली. सासरे सुभेदार मल्हारराव होळकर व सासू गौतमाबाई होळकर यांच्या सर्वांगीण संस्कारामुळे व शिलेदार खंडेराव होळकरांची पत्नी म्हणून त्यांच्यावर जे संस्कार झाले ते त्यांना उच्च पदावर नेऊन पोचविण्यासाठी कारणीभूत ठरले.
मारियाचा एकुलता एक भाऊ अकाली मृत्यू पावल्यामुळे व राज्याला वारस नसल्यामुळे ती राज पदावर आली होती तर अहिल्या सुद्धा एकुलता एक मुलगा मालेरावांच्या मृत्युनंतर होळकर राजगादीवर आली होती. म्हणजेच त्या काळामध्ये महिलांना राजगादी सामाजिक दृष्टीने फार मोठा समस्या होती. अशाही परिस्थितीमध्ये दोघींनीही आपल्या राज्याला सुव्यवस्थित सांभाळण्याचे एवढेच नाही तर एक राजकीय आदर्श निर्माण करण्याचे कार्य केले.
त्यांच्या कार्यकाळात राज्यविस्ताराची अभिलाषा दोघींनीही कधीच बाळगली नाही. त्यामुळे इतर राज्यांना गिळंकृत करण्याचा दोघींनी कधीच प्रयत्न केलेला नाही. मात्र सैन्य व्यवस्था दोन्हीकडे मजबूत होती, ती केवळ स्वसंरक्षणासाठी होती.
मेरिया थेरेसाचा विचार केला तर सुरुवातीला तिच्याकडे केवळ १५००० इतकी फौज होती. ती वाढत जावून तिच्या शेवटच्या काळात १ लाख ७०००० वर पोहचली होती. या सैनिकी शक्तीचा वापर करून ती आपल्या राज्याच्या सीमा विस्तारू शकत होती परंतु तिने तिच्या शक्तीचा वापर इतर राज्यांना गिळंकृत करण्यासाठी किंवा साम्राज्य विस्तारासाठी कधीच केला नाही.
त्याच प्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचा जर विचार केला तर तुकोजी होळकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडे सुद्धा मोठी फौज होती. याशिवाय त्यांच्याकडे महिलांची स्वतंत्र अशी फौज होती. महिलांची फौज निर्माण करणे जगातील पहिली महाराणी म्हणून अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख करावा लागतो,
असं असलं तरी त्यांनी आपल्या राज्याची धनशक्ती सैन्यावर किंवा फौजेवर अतिरेकी खर्च करण्याचा त्यांच्या मानस नव्हता. त्यामुळे मेरीया थेरेसा च्या तुलनेत त्यांच्याकडे कमी फौज असली तरी त्यांना ती कधीच कमजोरी वाटली नाही. किंवा आवश्यक तिथे त्या कधीच कमी पडल्या नाही.
अहिल्याबाईंनी युद्धाला कधीच प्राधान्य न दिल्यामुळे किंवा मानवी जीवनात त्यांना युद्ध नको असल्यामुळे त्यांनी केवळ स्वसंरक्षणासाठी अत्यावश्यक असेल तिथेच युद्ध स्विकारले. मात्र परराज्याला अंकित किंवा गुलाम बनविण्याच्या हेतूने कधीही कोणत्याही परराज्यावर आक्रमण केलेले नाही.
दोघींच्याही धार्मिक जीवनाचा विचार केल्यास दोन्ही आपापल्या ठिकाणी धर्मात्मा होत्या. मेरिया कथालिक धर्माची तर अहिल्या हिंदू धर्माचे अनुपालन करणारी होती, असे असले तरी त्या कधीच एकाच धर्माच्या पुरस्कर्त्या नव्हत्या. किंवा धर्मांध नव्हत्या. त्यांचे वैयक्तिक, सार्वजनिक तसेच राजकीय अधिष्ठान धर्माच्या पलीकडे जाऊन होते. त्या दोघीही प्रत्येक धर्माला समान महत्त्व देत होत्या. असे असले तरी दोघींमध्ये अहिल्याबाई श्रेष्ठ ठरते. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे, यावर त्यांचा त्यातही अहिल्याबाईचा विशेष विश्वास होता. तशी दैनंदिन जीवनात ती लागली सुद्धा...
खाजगी जीवनात प्रत्येकाने परस्परांच्या धर्माचा आदर केला पाहिजे यावर त्यांची ठाम निष्ठा होती. त्यांनी त्यांच्या हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांच्या हार्दिक शुभेच्छा तेवढेच महत्त्व दिले एवढेच नाहीतर इतर धर्माच्या धर्मिक स्थळांची बांधकाम सुद्धा केली.
यामुळेच अहिल्याबाईंचा राज्यकारभार धर्माच्या पलीकडे जाऊन रजसत्तेला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन मानवतेच्या कल्याणासाठी उभारलेला व चालवलेला तो एक "महायज्ञ" होता. जागतिक पातळीवरचा "आदर्श राज्याचा नमुना" होता म्हणूनच जगात त्यांची तुलना केवळ मारीया थेरेसा सारख्या महान राणीशी होऊ शकते, प्रसंगी अहील्या तिच्यापेक्षा काही बाबतीत श्रेष्ठ ठरते. असे ते श्रेष्ठत्व जपणारी, सर्वांगीण दृष्टीने महानत्व सिद्ध करणारी, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावर देश विदेशातील इतिहासकारांनी, लेखकानी स्तुती सुमने उधळल्याचे इतिहासाच्या पानापाणी लक्षात येते..... ते त्यांच्या निष्काम सेवा व कर्माचे फलित आहे..
---------------------------
डॉ प्रभाकर रामाजी लोंढे
९६७३३८६९६३