महाराष्ट्राची नीती समजून घेतल्याशिवाय धनगरांचा राजकीय उध्दार नाही.
डॉ प्रभाकर लोंढे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराया नंतरचा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच पेशवाईचा इतिहास होय. आणि पेशवाईचा इतिहास म्हणजेच होळकरांच्या तलवार आणि मुसद्देगिरीच्या बळावर विस्तारित झालेला आणि शिंदे यांची कुबडी मिळाल्याने मजबूत झालेल्या पेशवाईचा झेंडा अटकेपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वीरानी केलं तो वीर म्हणजे " सुभेदार मल्हारराव होळकर."
शिंदे यांचे मूळ पुरुष राणोजी शिंदे यांना "पागा" म्हणून
पेशवाई मध्ये स्थान ज्यांनी मिळवून दिलं व पागा म्हणून पेशवाईत प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या करंगळीला पकडून मल्हारराव होळकरांनी ज्याला मोठा केलं हेच ते "राणोजी शिंदे" पुढे पेशवाईचा होळकरा नंतरचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनले.. या महाराष्ट्राच्या नाहीतर संपूर्ण भारताच्या राजकीय पटलावर शिंदे राजघराण्याचा उदय झाला.
पुढे होळकर - शिंदे यांची जोडी त्यांच्या युद्धनीती व पराक्रम यासाठी संपूर्ण भारतात ओळखली जाऊ लागली. दोघांनी मिळून पेशवाईचा झेंडा अटकेपार फडकविला... मराठ्यांचा इतिहास तलवार आणि युद्धनीतीच्या जोरावर घडविला. प्रसंगी दिल्लीच्या बादशहाला घाबरविणारा आणि स्वामिनिष्ठा व नैतिकता असल्याने दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी सोडणारा थोर सुभेदार मल्हारराव होळकर जीवनभर शिंदे,पवारां सह मराठा सरदारांना मान, स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा शिकवित राहीला.
यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की, शिंद्यांना पेशवाई मध्ये राजकीय सत्ता आणि सरदार म्हणून स्थान व महत्त्व मिळवून देण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केलं. स्वतःच्या मुलाप्रमाणे राणोजी शिंदे यांच्या मुलांना रणांगण व राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी राजकारण युद्धनीतीचे डावपेच शिकविले, त्याच शिंदेंचा मुलगा जयप्पा शिंदे यांनी सुभेदार मल्हाररावांचा एकुलता एक पुत्र शूरवीर खंडेरावांना ज्या सुरजमल जाटानी मारलं, त्या सुरजमल जाटाला अभय देण्याचं विश्वासघातकी काम केलं.
"सुरजमल जाटाचा शिरछेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीनं तरच जन्मास आल्याचे सार्थक! नाही तर प्राणत्याग करीन!," या आपल्या प्रतिज्ञेवर, मराठ्यांमध्ये एकोपा टिकून राहावा, या राष्ट्रीय भावनेला जपण्यासाठी महापराक्रमी मल्हाररावांनी पाणी सोडलं. स्वतःच्या एकुलता एक मुलाच्या मृत्यूचं दुःख, घोर अपमान, विश्वासघात राष्ट्रहितासाठी पचविला. स्वतःला सांभाळात स्वामीनिष्ठा जपत पुन्हा राष्ट्र रक्षणासाठी स्वतःला झोकून दिलं....
स्वतःची गादी सांभाळण्यात मग्न असणाऱ्या स्वामी पेशव्याशी जिवनात कधीही गद्दारी केली नाही. सहकाऱ्याचा वाटा न्यायाने दिल्याशिवाय राहीला नाही. "न्यायाला न्याय आणि दुश्मनालाही सन्मान" यासाठी दुश्मनाचाही सन्मान जनक अंतिम संस्कार ज्यांनी केला, तो थोरणी मुत्सद्दी सुभेदार मल्हारराव!
दुश्मनाच्या स्त्रियांनी सुद्धा आपली इज्जत धोक्यात असताना लज्जा रक्षणासाठी "मल्हार! तू कहा है?," या विश्वासानी आठवण करावी, प्रसंगी स्वतःच्या कमरेचा शेला दुश्मनाचे(बादशहाच्या) स्त्रियांच्या लज्जा रक्षणासाठी ज्यानी दिला.. परिणामी, "मल्हार, आप यहा होते, तो हमारे उपर ऐसा गजहब नहीं होता!" अशा शब्दांत ज्या मल्हाररावां विषयी परस्त्रियांनी विश्वास व्यक्त केला,
तो नीतीवंत मल्हारराव जीवनभर नैतिकता, स्वामीनिष्ठा, पराक्रम, बुद्धीचातुर्य, राष्ट्राभिमान, राष्ट्रनिष्ठा, परस्त्री सन्मान, स्वअस्तित्व निर्माण यासाठी जगला आणि स्वतःचा प्रत्येक श्वास मराठेशाही, पेशवाई जिवंत ठेवण्यासाठी खर्ची घातला. अशा त्या सुभेदार मल्हारराव होळकरांना जीवनाच्या शेवटच्या काळात पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या पराभाचे खापर फोडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला..
वाचकांनी समालोचनात्मक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन आपल्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आधारे महाराष्ट्रातील सर्वांगीण नीती समजून घेण्याचा प्रयत्न करावा.. एवढीच अपेक्षा..
डॉ प्रभाकर लोंढे
(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)
No comments:
Post a Comment