Monday, October 10, 2022

धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?

 धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?


डॉ प्रभाकर लोंढे


            परळी म्हणलं तर मुंडे, संजय राठोड - दारव्हा, नारायण राणे परिवार-सिंधुदुर्ग कोकण, पवार परिवार- पुणे बारामती,  गोंदिया+भंडारा- प्रफुल्ल पटेल, नाशिक- भुजबळ परिवार, गडकरी- नागपूर, फडणवीस- नागपूर, सांगोला-स्व गणपत आबा देशमुख, अकोला- प्रकाश आंबेडकर, नवनीत रवी राणा- अमरावती अशी अनेक मतदार संघ आपल्याला सांगता येईल की; ज्यांची ओळखच त्या राजकीय नेत्याच्या नावाने झालेली आहे. याचा अर्थ त्यानी त्या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला बनवलेला आहे. आपली स्वतःची ओळख त्या मतदारसंघाच्या माध्यमातून करून घेतलेली आहे. त्या त्या मतदारसंघांमध्ये जनसंपर्क वाढवून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे केवळ आपला जातीच्या नाही तर विविध समाजातील कार्यकर्त्यांची फौज आहे..‌‌         

      जेव्हा जेव्हा राजकीय सत्ता मिळाली तेव्हा राजकीय सत्तेचा वापर करून तेथील विकास कामांना महत्व देऊन सामाजिक समीकरणे आपल्याला पोषक करून घेतलेली आहे. जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. तेथे आपला सातत्याने विजय होत राहील याची काळजीच नाही तर नियोजन केलेला आहे. परिणाम तर त्या त्या मतदारसंघातून त्यांना हरविणे कठीण नसले तरी सहज शक्य होत नाही.. 

      या ठिकाणी सांगायचं हेच आहे की त्या त्या नेतृत्वाची तेथील जनमाणसामध्ये

राजकीय सत्तेत असो वा नसो एक छबी निर्माण झाली, त्यांनी त्या मतदारसंघात आपला सत्तेत जाण्याचा मार्ग निश्चित केलेला आहे. 

      त्यांनी कधीही आपल्या जातीचं, जातीच्या प्रश्नांचं, जमातीच्या भावनांचं भांडवल केलेलं दिसून येत नाही, किंवा आपल्या जातीचे भावनात्मक मुद्दे घेऊन त्यांनी कधी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेलं नाही. (याचा अर्थ ते त्या विशिष्ट जाती जमातीचे नाहीत असा होत नाही),  त्यामुळेच ते विशिष्ट जातीचे नेते आहेत, या आधारे त्यांना कधी जनतेने स्वीकारले नाही. विविध जाती जमाती मध्ये त्यांचे असलेले कार्यकर्ते हाच त्यांच्या सर्वांगीण शक्तीचा उगम स्त्रोत असतो.

         धनगर जमातीच्या विद्यमान नेत्यांमध्ये काही विशिष्ट अपवाद नेते सोडले तर ते केवळ धनगर जमातीच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  आपण त्या धनगर जमातीचा महाराष्ट्राचा मोठा नेता आहो.  किती मोठ्या प्रमाणात धनगर माझ्या पाठीमागे आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे ते का करतात? त्यांचं त्यांनाच माहित. परंतु पक्षश्रेष्ठीला खुश करून जमातीच्या बहुसंख्येच्या आधारे आपल्याला एखादं राजकीय पद मिळावं, ही अपेक्षा नाकारता येत नाही. 

        आणि आज पर्यंतच्या बहुतांश धनगर नेत्यांचा तो छुपा अजेंडा राहिलेला आहे, हे अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. तेव्हा हे नेते अखंड महाराष्ट्रामध्ये धनगरांचे नेते म्हणून मिरवत बसण्यापेक्षा एखाद्या मतदारसंघांमध्ये आपलं वजन का निर्माण करीत नाही??  एखाद्या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे का बांधत नाही?? त्या विशिष्ट मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना घेऊन पक्षश्रेष्ठींकडे का जात नाही?? मतदारसंघांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन त्या मतदारसंघात आपली स्वतःची ओळख का निर्माण करून घेत नाही??

जमातीच्या प्रश्नांच्या भांडवलाच्या आधारे एखाद्या वेळेस आमदारकी खासदारकी उपभोगल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच भावनात्मक मुद्द्यांच्या आधारे स्वतःचं राजकीय स्वहित का साध्य करू इच्छितात?

         विधानसभा राज्यसभेच्या माध्यमातून मिळालेल्या राजकीय सत्तेतून किंवा अन्य मार्गातून मिळालेला अमाप पैसा, त्यातून कार्यकर्ता निर्माण झाला असताना एखाद्या मतदारसंघावर ते केंद्रित का होत नाहीत? त्यांना लोकमताच्या आधारे निवडून जाण्याची हिंमत का होत नाही??हा मोठा प्रश्न निर्माण होतो व वैतागून समर्पक उत्तरासाठी सार्वजनिक करावासा वाटतो..


उत्तराच्या अपेक्षेत! प्रतिक्षेत!!


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर नेतृत्व आणि राजकीय जागृतीचा अभ्यासक)

No comments:

Post a Comment