Sunday, October 16, 2022

खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे खासदारकी मिळाली होती!?

 खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे खासदारकी मिळाली होती!?

डॉ प्रभाकर लोंढे


         दोन दिवसापूर्वी एक (सौरभ हटकर आणि संतोष महात्मे) या दोन बांधवांचा वाद- संवाद ऐकला, त्या संवादामध्ये आदरणीय संतोष महात्मे यांनी एक वाक्य वापरले, की, "धनगरांच्या प्रश्न/ आंदोलनामुळे डॉ. विकास महात्मे साहेबांना  खासदारकी मिळालेली नाही, तर त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, पद्मश्री (लता मंगेशकर प्रमाणे) या बाबींमुळे त्यांना खासदारकी मिळाली. त्यांच्यातील वादाचा मोठा मुद्दा सोडला तर हे ऐकून खूप चांगलं वाटलं. परंतु मला एक प्रश्न निर्माण झाला आणि तो वारंवार सतावतो आहे म्हणूनच हा लेखन प्रपंच... की, 

खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे/वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे खासदारकी मिळाली होती!?

      याचे उत्तर "होय" असेल तर अतिशय उत्तम, कारण ही व्यवस्था धनगरातील गुणवत्तेची कदर करायला लागलेली आहे.

महाराष्ट्रातील नेत्रतज्ञ क्षेत्रातील पद्मश्री प्राप्त एक महत्त्वाचं नाव म्हणजेच डॉ. 'विकास महात्मे' असं मला वाटत होतं. इतकं मोठं "नेत्रतज्ञ" म्हणून महत्त्वाचं व्यक्तीत्व धनगर जमातीत असल्याचा अभिमान प्रत्येकालाच वाटावा,  ही अत्यावश्यक बाब असली तरी 2013 पूर्वी डॉ. विकास महात्मे साहेब धनगर असल्याचा अनेकांना संशय येत होता. त्या अगोदर त्यांनी कधीही स्वतःला धनगर म्हणून प्रोजेक्ट केलेलं नव्हतं. किंवा  धनगरांच्या     

कुठल्यातरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधीच आढळलेले नाही. (कदाचित असेलही? ) परंतु मला माझ्या 2003 पासूनच्या धनगर जमातीच्या अभ्यासामध्ये दिसले नाही. होऊ शकते माझा अभ्यास तिथंपर्यंत पोहोचला नसावा....

         खरं काय ते संपूर्ण समाज जाणतो आहे. २०१३-१४ च्या समस्त धनगरांच्या दृढ भावनेच्या आधारे तन-मन-धनातून उभं राहिलेलं जनआंदोलन त्यांच्या घटनात्मक अधिकारासाठी होतं. वर्षानुवर्षीपासून चालू असलेला अन्याय आता संपणार, त्यासाठी सर्वांनी मिळून मोठ्या ताकतीने व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारला. संपूर्ण महाराष्ट्र धनगरांच्या मोर्चा, आंदोलन उपोषण यांनी वेठीस धरला, एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात धनगर जमात आहे, याची प्रचिती सर्वांना आली. इतरांना धनगरांच्या संख्येची जाणीव झाली. ‌

      धनगरांच्या आंदोलनाची धग, त्या आंदोलनातील आक्रोश, आवेश आणि उर्मी पाहून येथील व्यवस्था व प्रस्थापित नेते घाबरले होते हे मात्र नक्की.. अशा त्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला एकछत्री नेतृत्व देणे हा धनगरांपुढे मोठा प्रश्न होता. 

      पहिल्याच अडाणी, अशिक्षित धनगरांना त्या "पद्मश्री व नेत्रतज्ज्ञ" शब्दाची भुरळ पडली. पहिलाच भावनाप्रधान समाज आणि त्यातही नेतृत्वाचा अभाव, यामुळे सर्वांनी त्या पद्मश्री व नेत्रतज्ञ या शब्दाला हृदयात घेऊन डॉ. विकास महात्मे साहेबांचा नेतृत्व म्हणून स्वीकार केला.  

       धनगर आंदोलनाचं नेतृत्व आता डॉ. विकास महात्मे साहेबांनी आपल्याकडे घेतलं.  देवभोळ्या, अंधश्रद्धाळू, अंधविश्वासू धनगरांच्या आंदोलनाचं भवितव्य आता महात्मे साहेबांच्या हातात आलं.. त्यानंतर धनगरांचंं आंदोलन टप्प्याटप्प्याने कसं शांत शांत होत गेलं, हे मी किंवा इतर कोणी समाजाला किंवा अन्य कोणाला सांगण्याची गरज नाही, प्रत्येक जण ते जाणतो आहे. 

       इतिहासात राजकीय सत्ता भोगणाऱ्या धनगरांना आज आपण येथील राजकीय सत्तेत नसल्याची कधी नव्हे ती जाण झाली. ती काही वेळेस करून देण्यात आली. धनगरांचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी डॉ. विकास महात्मे साहेबांची राज्यसभेसाठी सेटिंग सुरू झाली.

          पहिलेच धनगरांच्या आंदोलनाने घाबरून गेलेल्या व्यवस्थित प्रस्थापित नेत्यांनी ही बाब हेरली. आणि धनगरांचं आंदोलन दडपायचं असेल तर "नेताच" आपल्या काबूत घ्यायचा, या तत्त्वाने डॉ. विकास महात्मे साहेबांना राज्यसभेमध्ये खासदारकी देण्यात आली. डॉ. विकास महात्मे साहेबांनी स्वीकारली. धनगरांचे प्रश्न राजदरबारी मांडण्यासाठी मी राज्यसभेची खासदारकी स्वीकारली, आसा काही ठिकाणी स्वतः डॉ साहेबांनी कबुली जवाब सुद्धा दिला. याचे साक्षीदार समाजात अनेक आहेत.

        राज्यसभेतील गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी धनगरांच्या प्रश्नाला किती मार्गाला लावलं? किती प्रश्न सोडवले? कितीला पाने पुसली? हे आदरनीय डॉ विकास महात्मे साहेबांचे वैयक्तिक प्रश्न असले तरी धनगरांच्या आंदोलनाचा त्यांच्या राज्यसभेतील खासदारकीमध्ये १००% वाटा ते नाकारू शकत नाही. सहा वर्षे खासदारकी उपभोल्यानंतर जर ती खासदारकी पद्मश्री व नेत्रतज्ञ म्हणून मिळाली होती, असं  माननीय संतोष महात्मे साहेब किंवा कोणी म्हणत असेल तर यापुढे सुद्धा ती कायम राहिली पाहिजे.... त्यासाठी डॉ. महात्मे साहेब प्रयत्न करतील. राज्यसभेमध्ये जातील परंतु आपल्या राजकीय जीवनातील धनगरांचे स्थान ते कदापिही विसरू शकणार नाही. त्यांना विसरता येणार नाही.

       ते अगदी खर आहे की, त्यांच्या पद्मश्री व नेत्रतज्ञ यामुळे त्यांना धनगर समाजाने स्वीकारलं. डोक्यावर उचलून घेतलं. त्यामुळे ते धनगरांच्या गळ्यातील ताईत बनले.  आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना धनगरांसाठी खासदारकी दिली.. 

एवढं सर्वांना मान्य करावंच लागेल की, डॉ. महात्मे साहेबांच्या खासदारकीचा/ त्यांच्या राजकीय जीवनाचा मार्ग धनगराच्या आंदोलनातून जातो हे सर्वांना सदा सर्वकाळ मान्य करावंच लागेल.   

         हे सत्य आहे की, राजकीय नेत्यांना खोटं बोलावचं लागतं परंतु धनगर नेत्यांनी जमातीत खोटं बोलू नये. जेवढं बोलायचं आहे, तेवढे धनगराच्या हितासाठी बाहेर जाऊन बोलावं,  धनगरांमध्ये कोणीही भ्रम पसरवू नये. चुकीच्या बाबीचे कोणीही समर्थन करू नये, एवढीच या लेखणा मागची अपेक्षा आहे..


(सदर लेखाला आ. डॉ. विकास महात्मे साहेबांच्या भक्त किंवा विरोधकांनी भावनात्मक न होता वाचावा. ही विनंती)


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

No comments:

Post a Comment