धनगरांना कपडे नाही तर नीती बदलण्याची गरज
डॉ प्रभाकर लोंढे
शीर्षक वाचता बरोबरच काही बांधवांना या माझ्या विचारांचा कदाचित राग सुद्धा आलेला असेल, काहीतर फालतू लिखाण करत अकलेचे तारे तोडण्याचा आरोप सुद्धा माझ्यावर करून स्वतः मोकळे होण्याचा प्रयत्न करेल. असो! प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्यामुळे तो प्रत्येक वेळी प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. अशा मताचा मी आहे. त्याचाच आधार घेऊन मी हे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.
धनगर ऐतिहासिक समृद्ध जमात, धनगर सामाजिक सांस्कृतिक राजकीय वारसा लाभलेली जमात, असं प्रत्येक जण सांगताना दिसतोय, त्या आधारे छाती फुलवताना/ फुलवताना पण दिसून येतोय, खरच तो त्याचा अधिकार आहे, तो सुद्धा वापरलाच पाहिजे परंतु त्याचं तसेच धनगरांच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःची पोळी भाजणारा धनगर दिसून येतो तेव्हा तो त्याच्या वारशावरच प्रश्नचिन्ह स्वत:च निर्माण करतो. हे करीत असताना कदाचित त्यांना याची कल्पना येत नसेल किंवा कल्पना येत असली तरी त्याच्या वाईट परिणामाची जाणीव नसल्याने? कदाचित ते तसे वागत असावे.
ते आपले ध्येय, निर्णय एका धनगर विरोधी विशिष्ट व्यवस्थेला पोसणारे आहेत हे सामान्य धनगरांपर्यंत पोहचूच देत नाही, कळू सुद्धा देत नाही. किंवा ते लपवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. त्यासाठी जमातीच्या प्रश्र्नांची लत्करे (स्वत:च केलेली) पांघरूण नव्या रुपात नव्या उत्साहाने नि: संकोचपणे जमातीत फिरायला तयार होतात..... फिरताना दिसतात... फिरतात.
या ठिकाणी त्यांनी ज्याप्रमाणे कपडे बदलावे त्याप्रमाणे त्यांचा तो कार्यक्रम चालू असतो. यावर काहीच हरकत नाही, कोणी किती वेळा कपडे बदलायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे परंतु जमातीला, जमातीमध्ये इमानेइतबारे काम करणाऱ्या स्वयंसेवी आणि समाज धार्जिण्या जमात बांधवांना नागडं करून कपडे बदलण्याचा यांचा कार्यक्रम जमातीसाठी पुढच्या पिढीला खूप घातक आहे. तो जमातीच्या व इतर कोणाच्याच हिताचा नसतो. गुलामांची पिढी पैदा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारा त्यांचा उपक्रम मात्र नक्कीच सिध्द होतो.
धनगर आरक्षणाच्या नावावर कपडे बदलणारे जमातीला सुपरिचित झाले. राजकीय सत्तेसाठी कपडे बदलणारे सर्वांनी पाहीले. एका खासदारकीसाठी कायदेशीर धनगर आंदोलनाचे, आंदोलनातील सच्च्या कार्यकर्त्यांचे सामान्य धनगरांचे कपडे फाडणारे पाहीले, आज अख्या धनगर जमातीच्या ईज्जतीची लत्करे वेशीवर टांगून ठेवणारे नवीन कपडे घालून जमातीत फिरण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यांना धनगर हित रक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा! म्हणूनच हा लेख प्रपंच.
त्यापुर्वी मात्र सामान्य धनगर बांधवांच्या वतीने एकच विनंती आहे, तुम्हाला काय काय बदलायचे आहे ते बदला, परंतु त्याअगोदर बहूतेकांना आपली नीती बदलणे आवश्यक आहे.
विद्येविना मती गेली
मती विना नीती गेली
नीती विणा गती गेली
गती विना वित्त गेले.
वित्ताविणं शुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
हा महात्मा फुले यांचा विचार समस्त शुद्रांच्या अधोगतीची कारणमीमांसा स्पष्ट करणारा मूलमंत्र प्रत्येक धनगरांनी समजून घेणे आवश्यक आहे. धनगरांना शुद्र माणायचं की नाही हा मोठा प्रश्न असला तरी जमातीची आजची अवस्था दयेवर जगणारी आहे. याचना करणारी आहे. मागुन खाणारी आहे. ही जमात आज राजकीय दृष्ट्या अतिशुद्र या प्रवर्गात मोडते, ही दुरावस्था घालविण्यासाठी प्रत्येकाला आपल्या नीती, कृतीमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.
जमातीची दुर्गती मतीहीन लोकांच्या नीतीहीन अनुनयाचा परिणाम आहे. त्यामुळेच जमात विकासाच्या बाबतीत गतीहीन (प्रवाहातून बाहेर फेकल्या गेली) झाली.
जमात जागच्या जागी थांबली. निसर्गाचा नियम (थांबला तो संपला) आहे की, ज्याची गती ( बदलाचा वेग) थांबली, तो हळूहळू संपतो.
म्हणून संपण्याच्या आधी धनगर जमातीने सावरणे आवश्यक आहे. त्यासाठी जमातीच्या प्रश्र्नांची जाण ठेवून दिर्घायुषी नीती निर्धारण म्हणजेच ध्येयधोरण व कृती कार्यक्रम आवश्यक आहे. तरच भावी पिढीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.....
धन्यवाद!!!!
डॉ. प्रभाकर लोंढे
धनगर राजकीय नेतृत्व
आणि
जाणीव-जागृतीचे अभ्यासक
९६७३३८६९६३
No comments:
Post a Comment