आजचे मतदारसंघ म्हणजेच ऐतिहासिक किल्ले...
डॉ प्रभाकर लोंढे
धनगरांचा इतिहास आणि त्यातही पेशवाईच्या इतिहास जर पाहिला तर मराठ्यांच्या पराक्रमांमध्ये धनगरांच्या तलवारीचा पराक्रम महान होता. म्हणूनच काश्मीर ते कन्याकुमारी कच्छ गुजरात ते बंगाल अशा संपूर्ण भारतात धनगरांच्या हातात असलेल्या राजकीय सत्तेने विकासाची काम केली.. याचे नमुने आजही पाहायला मिळतात.
तत्कालीन धनगरांना ते तेव्हा शक्य झालं कारण ते तत्कालीन परिस्थितीनुसार धनगर वागले. त्यांनी तलवारीच्या भरोसावर प्रत्येक किल्ले काबीज केले. काही मुसद्देगिरीच्या भरोशावर मिळवून घेतले. काही किल्ले पराक्रमाने शासकाला प्रभावित करून मिळवून घेतले. कारण किल्ले ही तत्कालीन राजकीय सत्ता प्राप्तीची केंद्र होती. त्या किल्ल्यांमधून त्यांनी आपली स्वतःची प्रशासन यंत्रणा, आपली कायदे व्यवस्था स्वतःच निर्माण केली, किल्यां मधून राज्यव्यवस्था चालविली जात होती. याचे उत्तर उदाहरण म्हणजेच "होळकरशाही".....
याशिवाय धनगरांच्या जीवनातील किल्ल्यांचे दुसरे उदाहरण देता येईल. (ज्यावर मी यापूर्वी स्वतंत्र असा लेख लिहिला होता). "आसा अहिर" नावाच्या धनगरांनी एक किल्ला बांधला होता, अत्यंत कठीण, शत्रूंनी स्वबळावर कधीही पराक्रमाने जिंकलेला नाही, तर केवळ फंद फितूरी करूनच जिंकता आला, हा त्यांचा इतिहास. त्याला "दख्खनद्वार" म्हटलं जात होतं, तो असिरगड.. उत्तरेतील ज्याला कोणाला दक्षिणेवर राज्य करायचं असेल त्याला सर्वप्रथम असीरगड जिंकावा लागत होता. म्हणूनच त्याला दख्खन द्वार म्हटलं जातं...
एवढे मोठे किल्ले व त्या किल्ल्यांमधून राजकीय सत्तेचं संचलन धनगरांनी केलं असेल तर आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये धनगरांना मतदार संघाच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करणं का शक्य नाही?
ती राजकीय सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून मतदारसंघ हे राजकीय सत्ता प्राप्तीचे महाद्वार आहे. त्या महाद्वारात प्रवेश करणार नाही तोपर्यंत आम्हाला सत्तेची दारं कधीच उघडी होणार नाही. तोपर्यंत आम्हाला चोरवाटांनीच सत्तेपर्यंत जावं लागेल. तोपर्यंत सत्ता हे धनगरांसाठी लोकशाहीतील दिवास्वप्नच असणार आहे.
लोकशाहीचं वास्तव हेही आहे की, प्रत्येक मतदारसंघात मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी झाल्याशिवाय सत्ता हस्तगत करता येत नाही. म्हणून विविध सामाजिक समीकरणे जोडून लोकांचा विश्वास संपादन केल्यास निवडणुकीच्या प्रसंगी त्या विश्वासाला सत्तेपर्यंत जाण्याचं साधन बनवता येईल. त्यासाठी तसा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण या जगातील सत्य हा परमेश्वर सुद्धा प्रयत्नाने प्राप्त होतो, असाच जनतेचा विश्वास आहे.
सत्ता प्राप्तीचा अतिशय महत्त्वाचा आणि धनगरांसाठी गंभीर असलेला विषय म्हणजे "उमेदवारी प्राप्त करणे". आज पर्यंत या महाराष्ट्रात कुठल्याच मोठ्या पक्षांनी धनगरांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात तर सोडाच कधी उमेदवारीच दिलेली नाही. त्यांना सत्तेची दारं बंद कसे करता येतील, याचाच विचार केलेला आहे. तेव्हा जिथे मिळत असेल तिथे उमेदवारी प्राप्त करून जनतेच्या विश्वासाला पात्र होणे. त्या विश्वास संपदानातून सत्ता संपादन करणे आणि सत्ता संपादनातून जमातीच्या इतिहासातील असलेल्या वैभवाला पुनर्वैभव प्राप्त करून देणे, अत्यावश्यक आहे.
त्यासाठी तत्कालीन ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे आजचे "मतदारसंघ" काबीज करण्याशिवाय धनगरांकडे दुसराही पर्याय नाही...
----------------------
डॉ प्रभाकर लोंढे
(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)