Tuesday, November 28, 2017

मृगांक्षी

मृगासम अंग अक्ष तुझे
मृगांक्षी तुझे नाव.
नामकरणाचा तुझ्या त्या
आनंदाने सोसलाय मी तणाव.

असू दे मृगासम चतुराई तू
पर नसावी बेभान तुझी धाव.
जीवनाच्या वाटेवर असावं
तुझं शांत स्वयंभू असं गाव..

तसंही नावात काय असते
तुला आत्ताच काय कळणार राव.
नाव कमावण्यासाठी आनंदाने
किती सोसावे लागते घाव..

कधी हातोडा बनून घाल तू घाव.
गरज असेल तिथे अवश्य तोरा दाव.
प्रसंगी घाव झेलूनी जपतांना
नसू दे प्रसन्न मनी कुठे तणाव.

मार्गातील प्रत्येक तत्पर तो
असतो करण्या तुझा पाडाव.
वाईट वाटून चालत नाही.
ज्याला कमवायचं असत नाव..

समाज हा असा विकृत जरी
त्याशिवाय नाही तुला नाही वाव
पडत झडत, सदा धडपडत
अर्थाशी समर्पक कर तुझं नाव...

मृगांक्षी! अर्थ भर नावात तू
तुलाही जाणवेल समाधानाचा भाव.
अभिमान वाटेल जन्म देण्याचा,
उज्वल होईल माझंही नाव....
समृध्द देश

अनेक भाषा, अनेक धर्म ,
अनेक इथले वेश.
एकाच भूमातेची लेकरं आम्ही,
बनवु समृद्ध आमचा देश..

जगी सर्व लोकी आम्ही,
देवु हा संदेश .
प्राणापेक्षाही प्रिय आम्हा,
आमचा समृद्ध भारत देश...

या देशाच्या समृद्धीची,
किर्ती पसरेल देश-विदेश.
जगात एकच समृद्ध अमुचा,
असेल भारत देश.

वसा समृद्धीचा या देशाचा,
आदर्श मानेल हर परदेश.
समाजमनाच्या दरिद्रतेला,
नसेल कधी इथे लवलेश.


डॉ . प्रभाकर लोंढे .गोंदिया-चंद्रपूर
झाड

माणसा रे माणसा!
गेला तो काळ.
रस्तो रस्ती, कडीकपारी
दिसत होते झाड.

झाडावरती पक्षी,
भोवती त्याच्या पाळ.
सावलीत झाडाच्या
खेळे तुझेच बाळ..

झाडं गेले, पाळ गेले
उजाड झालं माळ.
इंटरनेटवर खेळ खेळे
अफलातून तुझं बाळ..

समजून घेरे माणसा
झाडाशी तुझी नाळ.
झाडा विना मानवाचा
कोण करेल सांभाळ.

           डॉ . प्रभाकर रामाजी लोंढे
गजानन कॉलनी अंगुर बगीचा, रिंग रोड, गोंदिया .९६७३३८६९६३
कसायाचा बैल.

धनी तुम्ही जीवनभर
चारले आम्हाला घास.
 कसा काढू गळ्यातील
आता तुमचा तो फास..

राबराब राबले धनी,
होतो आम्हीच आसपास.
समजलं नाही अजून तरी
आम्हाशिवाय तुमचं कोण खास.

माणसं तुमची, तुम्हासारखी
त्यांना तर कमविण्याचाच ध्यास.
फिरत होती तुमच्या भोवती,
की होता नुसताच आभास.

कष्ट केले तुम्हासोबत
शेत पिकवून दिलं हमखास.
कत्तलखान्यात पाठविलं तरी सांगतो
आम्हीच होतो तुमचे स्वास.
माडर्न सूनबाई

काय म्हणलं सासूबाई,
मला भलतच वेड हाय.
मी मोबाईल वापरताना
तुमच्या पोटात दुखते की काय?

गेला तुमचा जमाना अन
नुसता टाटा, हाय- बाय.
दुनिया जोडतोय आम्ही
चालु ठेवुन व्हाय-फाय.

जगतोय आम्ही सुटाबुटात,
गळ्यात लावून मोठा टाय.
अभिमान आम्हाला आमचा
आमच्या जमान्यात काहीच कमी नाय!

बयताड होती दुनिया तुमची,
नाहीत दुसरं काय?
मरत होते कष्टापायी
सगळे करुन हाय हाय..

प्रश्नच पडला सासूबाई,
तुमच करू तरी काय?
नवरा सुद्धा म्हणतो आज
सासूपेक्षा वाचव तू गाय.

गायीमध्ये शोधतोय तो,
आपली हक्काची माय.
तुम्हाला जिवंत ठेवून आता,
तुमचं करू तरी काय?

डॉ . प्रभाकर लोँढे. गोंदिया-चंद्रपूर
साहित्यिकाची वणवण
"""""""""""""***"""""""""""


जेथ जात नाही कोणी
तेथं पोहचते साहित्यिकाचं मन
साहित्यधारेत वाहतांना
सर्वांयचं दुःखन माञ कॉमन.

उपाशी पोटी साहित्य कायचं
पोटात पाहिजे अन्नाचा कण.
साहित्यानं काही पोट भरत नाही
सर्वांयचं दुःख माञ कॉमन.

बायको म्हणते तुमचं काव्हय.
तुम्ही करता लय वन वन.
जमत नाही का तुमचं कोठं
साहित्यिकांच भजन.

समजलं नाही का तुले अजून
आमचं काय असते वजन.
आम्ही नसलो समाजात तं
समाज कोणाले पूजन.

लय झालं तुमचं आता
समाजातलं वजन-पूजन.
प्रश्न पडलाय मले मोठा
संध्याकाळी अन्न कसं शिजन.

-----------------------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
धनगर एकता

जय मल्हारचा नारा
धनगर गोळा झाला सारा...
व्यवस्थेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा..
म्हणे धनगराच्या शब्दाशिवाय
दुसरा शब्द नाही खरा.

धनगरांच्या आवाजाला
दे तू सदैव थारा.
नाही तर होतील
लाथा बुक्यांचा मारा.

कर्तुत्ववान माणसांचा
यांचा वारसा आहे खरा.
पराक्रमाने  लिहीला आहे,
इतिहास यांचा राहील कसा कोरा?

हा असतो सदा थंड
नाहीतर वादळातील गारा.
फालतु विनोद करणाऱ्या
तावड्यांना करतो पुरा बरा.

म्हणूनच याच्या नादी लागू नये
असं म्हणतो संसार सारा.
प्रत्येक धनगर बोलतोय आज
धनगर है एक  हमारा......
*धनगर है एक हमारा......
शेतकरी दैना.

काव्हुन च्या बहीण
सरकार असं करते.
कास्तकार वाचला पाहिजे
अस नेहमीच म्हणते.
तरी बिचारा कास्तकार
तो रोजच मरते.

दिवसा मागून दिवस चालले.
तरी कास्तकार रोजच मरते.
समजलं नाही सरकार
त्यायच्यासाठी काय करते?
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बिजाई, खात घेता घेता
पैसा कास्तकाराचा सरते.
त्याच्या नावाची सब्सिडी
सरकार कारखान्यात भरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

कास्तकार करतो कष्ट
सरकार गोदाम भरते.
भाव देतानी मातर
मांग मांग सरते.
प्रशन माञर मलेस पडते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

हातच्याले सोडून सन्या
पळत्याले धरते.
कष्टकऱ्यांच्या राज्यात
असा कसा कास्तकार मरते.
काव्हुन च्या बहीण
सरकार असं सोंग करते.

बहीण द्यायची असन सबसिडी
तर  मी म्हणतो डायरेक
कास्तकाराले  द्यावी .
त्याच्या कष्टाच्या विम्यासह
जीवन मरणाची हमी सरकारनं घ्यावी.
धर्माची नशा
"""""""""""""""

कधी मला वाटलं.
आपल्या लोकांसाठी जगावं.
तेव्हा मला प्रश्न पडला ,
यांनी मला इतकं का छळावं?

तेव्हा मला वाटलं,
स्वतःसाठीच जगावं.
पण मला प्रश्न पडला,
यातच तुझं तू सर्वस्व पहावं?

का जगायचं? कसं जगायचं?
प्रश्न कधी संपलाच नाही.
जगायचं तर सर्वांसाठी!!
अर्थ अजून कळला नाही.

जगायचं तर
राष्ट्रासाठी जगायचं!
राष्ट्रासाठीच मरायचं!
पण प्रश्न पडला!
राष्ट्रासाठी कसं काय जगायचं ?
राष्ट्रभक्तांवर तर जग हसायचं!

म्हणून मी ठरवलं.
जगायचं तर धर्मासाठी!!
तेव्हा मला सर्वच काही मिळालं.
जगातलं भय दूर दूर पळाल.

पण अजून नाही कळालं.
धर्म ही अफूची गोळी आहे.
जेवढी घेतली तेवढी थोडी आहे.
नशेत असलेला देह,
न कधी कोणाला कळला आहे.
म्हणूनच या देशात,
साधू, सन्यासी, साध्वींचा
संसार फार मळला आहे.

धर्माच्या ठेकेदारांनो!!
ही जनता भोळी आहे.
वाकविली तेवढी थोडी आहे.
प्रसंग आला तर
बंदुकीची गोळी आहे.
पण काय करता,
तुम्ही एवढी नशा चढविली आहे की,
त्यावरच तुमची आजची पुरणपोळी आहे.

म्हणून म्हणतो, भक्तजनो!!
खूप झाले देव, धर्म .
भोंदूं साधूसंतांच्या नादी लागू नका.
जगात माय बापाच्या सेवेशिवाय
दुसऱ्या धर्माचा ठेका घेवू नका.

*********************

डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर..
 संसारारंभ

बघ! सखे ते जग आपुले.
दूरून दिसती चोहीकडे.
निळ्याश्यार ढगातून त्या
तव प्रितीचा थेंब गळे.

दूर डोंगराडपल्याड त्या
वाट कशी नागमोडी वळे.
सुख-दुःखाच्या पाऊलखुणांची
तुज साक्ष त्यात सापडे.

ते बघ! प्रेमाच्या दाट धुक्यातून
दर्शन सुर्यकिरणांचे घडे.
संसारवेलीच्या सुंदर फुलांवर
दवबिंदूचा तो सडा पडे.

बघ सखे ते, किती विचिञ असे,
दान्यांसोबतच पक्षी खाती खडे.
सुखासाठीच दुःख पचविण्याचे
निसर्गातूनच घे तू संसार धडे.

सुख काय असते ते
आज बघ तू माझ्या नयनाकडे
दुःखास म्हण तू आता,
तूझे वास्तव्य त्या क्षितिजापलिकडे.

सखे साथ मिळाली तुझी
भर तू संसारसुखाचे तळे.
आदर्श व्हावे जीवन अपुले
नसावे त्यात दुःखाचे खडे...
नवराञ

सांग ! माय माझे
तुझे जाते कसे नवराञ?
दुसरीकडे तुझीच बहीण
जगतेय जीवन गलितगाञ.

नऊ दिवस उपास.
म्हणून ती पिते पाणी माञ.
तुझे तर उपवास म्हणजे
असते खाण्याचेच सञ.

देवीच्या नावावर उठवतेस
तू नऊ कन्याचे पाञ.
उपाशा पोटी निघून जाते
तिच्या मुलींची राञ.

अख्ख नवराञ निघून जाते
तुझं मटकनस अहोराञ.
पोट भरण्याच्या विचारातच
तिची निघून जाते राञ.

सांग नं ! माय माझे
देवीच्या कृपेसाठी ती
कशी काय झाली अपाञ?
साविञीच्या लेकीनो !! तुम्ही
कधी समजून घ्याल खरं नवराञ?


डॉ . प्रभाकर लोंढे ,गोंदिया-चंद्रपूर
*किती मारू लाथा?*
-----------------------

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा?

बलात्कार, हत्या करूनी
प्रसंगी जीव तिचा घेता.
आपल्याच माय बहिणींना
डोळ्यासमोर पुन्हा किती छळता?

होवु द्या!  वेदना बलत्काराच्या
वा शोधा त्यात आपली माता.
या वासनांध नराधमांकडून
पून्हा किती जीव घेता?

उगारा अन्यायाविरुध्द मुठ,
दाखवा मर्दानकीचा छाता.
आहेत तुमचा मर्दानी बाना तर
आता कोणास काय भिता?

समजू द्या! या अधमाना
स्ञीच आहे त्याची माता.
नराधमानो या भूमिवर
तुम्ही जन्मच कसा घेता?

खूप झाले निषेध , मोर्चे
वा तोंडातील त्या बाता.
हृदयातून म्हणा एकदा
नराधमानो! किती मारु लाथा?

💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽

*दि. १७/९/२०१७*
  *डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर*

Monday, November 27, 2017

बाप!
"""""""

बाप! बाप!!
सगळ्यांनाच असतो बाप.
वाटतोय कधी जो भला ताप.
कठीण समय येता मात्र
आठवतो प्रत्येकालाच बाप.

माय लेकराच्या सुखासाठी
लागते जेव्हा कधी धाप.
या जगात धाव धावणारा.
कळते तेव्हा सर्वानाच बाप ...

बाप असतो उधानलेल्या
खळाळणाऱ्या नदीचा किनारा.
प्रवाहपतित राहून सदा
प्रवाहाला सांभाळणारा....

असतो तो मृगाच्या अखंड धारा,
धारांनी भिजवी संसार सारा.
तर कधी तो असतो
उधाणलेला बेभान वादळवारा,
रक्त नात्यांना जपत
उंच उंच शिखरावर आदळणारा.
तर कधी पायथ्याशीच राहून
उंच शिखरांनाही रडविणारा....

नसतो तो कधी अगतिक
वा परिस्थितीला हरणारा,
असतो तो प्रसंगावधी.
प्रसंगावधान राखून
प्रसंगांनाच जपणारा.....

खरंच  बाप नसतो,
नुसताच बाप!!
वा हाडामासाचा पसारा.
घरी असो वा नसो,
असतो त्याचाच दरारा.....

तो असतो धिरोदात्त,
अनं सर्वगुणसंपन्न सारा.
खरं-खोटं, बरं - वाईट
सारंच काही पचविणारा...

शेवटी एवढंच सांगतो,
बाप! असतो बाप!
खडकाळ माळरानावर
सदा खळाळणारा.
घामेजलेल्या लेकरांसाठी
असतो तो थंड थंड वारा..
असतो तो थंड थंड वारा.....

-------------------------------

कवी डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
इंदोर मधील वैभवशाली लालबाग पँलेस.
,"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 इंदोर, मध्यप्रदेशातील महत्त्वाचं शहर. या शहराचा इतिहास अभ्यासला असता होळकर साम्राज्याने या शहराच्या निर्मिती पासून तर शहराची किर्ती सातासमुद्रापार नेण्यात होळकरशाहीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मळवा प्रांताची राजधानी म्हणून होळकरांनी इंदोरचा विकास केला. इंदोरला आपल्या संस्थांनाची राजधानी बनविली. याचाच परिणाम  मराठेशाहीतील निर्णयात होळकरांच्या वर्चस्वामुळे या शहराला अतिशय महत्त्व होते. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर नंतर  खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, तुकोजीराव प्रथम, यशवंतराव यांच्या नंतर अनेक वारस होळकरशाहीच्या राजगादीवर आले. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दित महत्त्वाचे योगदान दिले.  होळकरांच्या कार्यकाळात या शहराचा उद्योग , व्यापार तसेच सर्वांगिण विकास झाला. त्या सर्व बाबींच्या खूणा आजही इंदोर शहरात पाहायला मिळतात.  त्यामुळे या शहरातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तु पाहणे म्हणजे  इतिहासाची पाने वाचण्यासारखीच वाटतात.  
        यापैकीच एक वास्तू म्हणजे फ्रेंच शैलीने बांधलेला, भारताचे विशेषतः होळकरशाहीचे इतिहासातील परराष्ट्रीय संबध स्पष्ट करणारा, होळकरशाहीच्या वैभवाची साक्ष देणारा पँलेस म्हणजे "इंदोरचा लालबाग पँलेस" ! इंदोर शहराच्या नैऋत्य दिशेला असलेला हा पँलेस खान नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे. संपूर्ण  बागेचे क्षेत्रफळ  ७१ एकर असून या राजबागेत हा पँलेस कौशल्यपूर्ण बांधला गेलेला आहे. व  इंदोर शहरातील ही सर्वात आकर्षक इमारत आहे.  त्यामुळेच त्याकाळात या पँलेसची भारतातील एकमेव अप्रतिम निवासस्थान (most stylish palace) अशी ओळख होती .

        महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय(इ.स १८४४-१८८६)  यांनी या पँलेसचे बांधकाम इ.स.१८८४ मध्ये सुरू केले. व शिवाजीराव होळकर यांच्या (इ.स.१८८९-१९०२) काळात पँलेसचे काम पुर्णत्वास गेले. या अप्रतिम पँलेसची निर्मिती इंग्लंड च्या मार्टीन एण्ड कंपनी व बर्नांड ट्रीग्स या वास्तुकला विशारद (architect) यांनी पाश्चात्त्य कलाशैलीने केलेली आहे. एकूणच हा पँलेस आंतरराष्ट्रीय बांधकाम व कलाशैलीचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना आहे.

               या पँलेसची प्रमुख विशेषतः म्हणजे त्याचे मुख्यव्दार(gate) आहे.  हे मुख्यद्वार इंग्लंड मधील बँकींगहम पँलेसच्या द्वाराची(gate) आशिया खंडातील एकमेव प्रतिकृती आहे.  तीन मजली असलेल्या या इमारतीत रचना व  प्रत्येक  वस्तू गुणात्मक दृष्ट्या वाखाणण्यासारखी आहे. पँलेसमधील खोल्यांच्या भिंतीवर तसेच छताला असलेले  नक्षीकाम (decoration) आणि रंगरंगोटी (colouring)   अप्रतिम असून इटालियन व भारतीय शैलीचे मिश्रण आहे,  इटालियन संगमवर,  इटालियन पध्दतीची वालपेंटींग, कलात्मक रचना,  दर्जेदार   कार्पेटस,  मजल्यांचा एकदुसऱ्याशी संबंध, चढण्यासाठीचा जिना(stairs)व त्यावर टाकलेले कार्पेटस, जिन्याला असलेले नक्षीदार लोखंडी रेलिंग्स,  संपूर्ण इमारतीच्या उच्च प्रतीच्या लोखंडी खिडक्या तसेच तुकोजीराव ने त्यावर लोखंडाने निर्माण केलेली स्वतःची ओळखचिन्ह (symbol).  या सर्व बाबी कलात्मक दृष्टीने तसेच आर्थिक बाबतीत श्रीमंती स्पष्ट करते.
      पँलेसच्या खिडक्यांवर (इंग्रजी टी.आर.एच) (TRH-TUKOJIRAO HOLKAR) असा अर्थ असलेले  प्रतिक (symbol ) तुकोजीराव होळकर यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देते. याच प्रतिकाची पेंटींग काचावर सुद्धा केलेली आढळते.  खिडक्यांना असलेला  हा काच बेल्जियम मधून आयात केलेला आहे. यावरून होळकरशाहीच्या वैभवाची कल्पना येते.
        अप्रतिम अशा पाश्चात्त्य शैलीत नटलेल्या या भारतीय पँलेसचे व त्यातील होळकरशाहीच्या वैभवाचे जतन होतांना आज फारसे दिसत नाही. पण  पँलेसची प्रत्येक खोली होळकराच्या वैभवाची व समृद्धीची साक्ष देत अतांनाच संपूर्ण वास्तूच आज राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आली आहे.  असे असताना  एका खोलीतील राष्ट्रीय,  ऐतिहासिक/ होळकरांचे वैभव हटवून सुरू झालेल्या तारांगण, उपक्रमामुळे  येत्या दहा विस वर्षात होळकरांच्या वैभवाची ओळख नक्की पुसली जाईल अशी शंका पाहणाऱ्याला सहज येते.

     होळकर राजानी बांधलेल्या  या राजवाड्याला आज "नेहरू राजबाग पँलेस" असे नामकरण केले आहे ही बाब व प्रवेशद्वारातच पंडित नेहरूंचा पुतळा ठेवणे हा तेथील मोठा आश्चर्याचा विषय वाटते. नेहरू व लालबाग पँलेस हे समिकरण न पचणारे वाटते. आज या पँलेसचे "तुकोजीराव होळकर राजबाग पँलेस" असे नामकरण झाले असते व प्रवेशव्दारात तुकोजीराव चा पुतळा असता तर त्यातून इतिहास, होळकरशाही व तुकोजीराव यांना आज न्याय मिळाला असता हे सत्य आहे.
             तुकोजीराव होळकर  द्वितीय यांनी निर्माण केलेल्या या अप्रतिम वास्तू मधून होळकरशाहीच वैभव नष्ट करण्याची कोणाला कुबुद्धी  सुचली तरी तुकोजीराव व्दितीय यांच्या दूरदृष्टीतून जागोजागी निर्माण केलेल्या प्रतिकामुळे (TRH) लालबाग मधील होळकरांच्या स्मृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रतिक(TRH) माञ नष्ट करणे सहज शक्य होणार नाही एवढे माञ निश्चित !!
             हा पँलेस भारतातील पाश्चात्त्य शैलीचा व आदर्श तसेच सुसज्ज वास्तुचा एक नमुना आहे. या पँलेसची रचना लक्षात घेता, पँलेसमध्ये राजदरबार, विशेष म्हणजे पाश्चात्त्य पध्दतीचे शुशोभित डायनिंग हाल, डायनिंग हालमधील अप्रतिम बैठक व्यवस्था व उच्च प्रतीचे राजेशाही थाटाचे साहित्य हे पाहणाऱ्या व्यक्तीला भूरळ पाडणारे आहे . लागूनच असलेला भारतीय पध्दतीने जेवण करण्याचा हाल भारतीय पध्दतीवरची होळकरांची निष्ठा स्पष्ट करते.  स्वयंपाकघर, स्वयंपाकघरातून  जेवणाचे हालमध्ये जेवण पोहचविण्याचा झुला(lift) कल्पनातित आहे,   ग्रंथालय, कार्यालय,  राजाची सल्लामसलतीसाठी बसावयाची खोली,  नर्तनगृह,  नर्तिकांसाठी सजण्याची ड्रेसींग रूम, खेळण्याची खोली,  महाराजाचे तसेच राणीसाहेबांचे स्वतंत्र शयनगृह, दोन्हीही शयनगृहांना जोडणारा मार्ग , अद्ययावत व  सर्व सोईनी परिपूर्ण अप्रतिम नहाणीगृह (bathroom) हे होळकरशाहीचा पाश्चात्त्य   दृष्टिकोन स्पष्ट करते.
       राजवाड्यात  विशेष आकर्षण पहायला मिळते.  एकूण आठ मोठे वाघ व एक चित्ता यांच्या शिकारीनंतर त्यांच्यामध्ये भुसा भरून त्यांना प्रदर्शनात ठेवलेले आहे. ह्या शिकार केलेल्या वाघांच्या भक्कम शरिरावरून होळकर राजांचे शौर्य  व हिम्मतीची कल्पना येते.  ते संपूर्ण वाघ आजही पँलेसमध्ये पहायला मिळते.

  अशा या वैभवशाली पँलेसमध्ये होळकर वंशज इ.स१९७८ पर्यत राहत होते .  तुकोजीराव तृतीय हे  इ.स १९२६ मध्ये होळकर राजगादी त्यागणारे व मरेपर्यंत या पँलेसमध्ये राहणारे होळकरशाहीचे शेवटचे वंशज ठरले. आज हा पँलेस मध्य प्रदेश सरकारच्या आधिपत्याखाली असल्याचे लक्षात येते .

        या वैभवशाली पँलेसचे तेथील रचनेसह सर्व वैभवाचे रक्षण करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ती वास्तु आज इतर कामासाठी वापरण्यापेक्षा ऐतिहासिक वास्तू व ठेवा म्हणून जतन करणे केंद्र सरकार सह मध्यप्रदेश सरकार, प्रत्येक नागरिक व प्रशासन यांचे प्रथम कर्तव्य ठरते... आमची सर्व वाचकांची कर्तव्यनिष्ठाच आज राजबाग पँलेस व वैभव वाचवू शकते ...हे मात्र निश्चित !!!
-------------------------------------------------

    डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
9673386963

Wednesday, November 15, 2017

मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.



डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर