इंदोर मधील वैभवशाली लालबाग पँलेस.
,"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इंदोर, मध्यप्रदेशातील महत्त्वाचं शहर. या शहराचा इतिहास अभ्यासला असता होळकर साम्राज्याने या शहराच्या निर्मिती पासून तर शहराची किर्ती सातासमुद्रापार नेण्यात होळकरशाहीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मळवा प्रांताची राजधानी म्हणून होळकरांनी इंदोरचा विकास केला. इंदोरला आपल्या संस्थांनाची राजधानी बनविली. याचाच परिणाम मराठेशाहीतील निर्णयात होळकरांच्या वर्चस्वामुळे या शहराला अतिशय महत्त्व होते. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर नंतर खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, तुकोजीराव प्रथम, यशवंतराव यांच्या नंतर अनेक वारस होळकरशाहीच्या राजगादीवर आले. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दित महत्त्वाचे योगदान दिले. होळकरांच्या कार्यकाळात या शहराचा उद्योग , व्यापार तसेच सर्वांगिण विकास झाला. त्या सर्व बाबींच्या खूणा आजही इंदोर शहरात पाहायला मिळतात. त्यामुळे या शहरातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तु पाहणे म्हणजे इतिहासाची पाने वाचण्यासारखीच वाटतात.
यापैकीच एक वास्तू म्हणजे फ्रेंच शैलीने बांधलेला, भारताचे विशेषतः होळकरशाहीचे इतिहासातील परराष्ट्रीय संबध स्पष्ट करणारा, होळकरशाहीच्या वैभवाची साक्ष देणारा पँलेस म्हणजे "इंदोरचा लालबाग पँलेस" ! इंदोर शहराच्या नैऋत्य दिशेला असलेला हा पँलेस खान नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे. संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ ७१ एकर असून या राजबागेत हा पँलेस कौशल्यपूर्ण बांधला गेलेला आहे. व इंदोर शहरातील ही सर्वात आकर्षक इमारत आहे. त्यामुळेच त्याकाळात या पँलेसची भारतातील एकमेव अप्रतिम निवासस्थान (most stylish palace) अशी ओळख होती .
महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय(इ.स १८४४-१८८६) यांनी या पँलेसचे बांधकाम इ.स.१८८४ मध्ये सुरू केले. व शिवाजीराव होळकर यांच्या (इ.स.१८८९-१९०२) काळात पँलेसचे काम पुर्णत्वास गेले. या अप्रतिम पँलेसची निर्मिती इंग्लंड च्या मार्टीन एण्ड कंपनी व बर्नांड ट्रीग्स या वास्तुकला विशारद (architect) यांनी पाश्चात्त्य कलाशैलीने केलेली आहे. एकूणच हा पँलेस आंतरराष्ट्रीय बांधकाम व कलाशैलीचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना आहे.
या पँलेसची प्रमुख विशेषतः म्हणजे त्याचे मुख्यव्दार(gate) आहे. हे मुख्यद्वार इंग्लंड मधील बँकींगहम पँलेसच्या द्वाराची(gate) आशिया खंडातील एकमेव प्रतिकृती आहे. तीन मजली असलेल्या या इमारतीत रचना व प्रत्येक वस्तू गुणात्मक दृष्ट्या वाखाणण्यासारखी आहे. पँलेसमधील खोल्यांच्या भिंतीवर तसेच छताला असलेले नक्षीकाम (decoration) आणि रंगरंगोटी (colouring) अप्रतिम असून इटालियन व भारतीय शैलीचे मिश्रण आहे, इटालियन संगमवर, इटालियन पध्दतीची वालपेंटींग, कलात्मक रचना, दर्जेदार कार्पेटस, मजल्यांचा एकदुसऱ्याशी संबंध, चढण्यासाठीचा जिना(stairs)व त्यावर टाकलेले कार्पेटस, जिन्याला असलेले नक्षीदार लोखंडी रेलिंग्स, संपूर्ण इमारतीच्या उच्च प्रतीच्या लोखंडी खिडक्या तसेच तुकोजीराव ने त्यावर लोखंडाने निर्माण केलेली स्वतःची ओळखचिन्ह (symbol). या सर्व बाबी कलात्मक दृष्टीने तसेच आर्थिक बाबतीत श्रीमंती स्पष्ट करते.
पँलेसच्या खिडक्यांवर (इंग्रजी टी.आर.एच) (TRH-TUKOJIRAO HOLKAR) असा अर्थ असलेले प्रतिक (symbol ) तुकोजीराव होळकर यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देते. याच प्रतिकाची पेंटींग काचावर सुद्धा केलेली आढळते. खिडक्यांना असलेला हा काच बेल्जियम मधून आयात केलेला आहे. यावरून होळकरशाहीच्या वैभवाची कल्पना येते.
अप्रतिम अशा पाश्चात्त्य शैलीत नटलेल्या या भारतीय पँलेसचे व त्यातील होळकरशाहीच्या वैभवाचे जतन होतांना आज फारसे दिसत नाही. पण पँलेसची प्रत्येक खोली होळकराच्या वैभवाची व समृद्धीची साक्ष देत अतांनाच संपूर्ण वास्तूच आज राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आली आहे. असे असताना एका खोलीतील राष्ट्रीय, ऐतिहासिक/ होळकरांचे वैभव हटवून सुरू झालेल्या तारांगण, उपक्रमामुळे येत्या दहा विस वर्षात होळकरांच्या वैभवाची ओळख नक्की पुसली जाईल अशी शंका पाहणाऱ्याला सहज येते.
होळकर राजानी बांधलेल्या या राजवाड्याला आज "नेहरू राजबाग पँलेस" असे नामकरण केले आहे ही बाब व प्रवेशद्वारातच पंडित नेहरूंचा पुतळा ठेवणे हा तेथील मोठा आश्चर्याचा विषय वाटते. नेहरू व लालबाग पँलेस हे समिकरण न पचणारे वाटते. आज या पँलेसचे "तुकोजीराव होळकर राजबाग पँलेस" असे नामकरण झाले असते व प्रवेशव्दारात तुकोजीराव चा पुतळा असता तर त्यातून इतिहास, होळकरशाही व तुकोजीराव यांना आज न्याय मिळाला असता हे सत्य आहे.
तुकोजीराव होळकर द्वितीय यांनी निर्माण केलेल्या या अप्रतिम वास्तू मधून होळकरशाहीच वैभव नष्ट करण्याची कोणाला कुबुद्धी सुचली तरी तुकोजीराव व्दितीय यांच्या दूरदृष्टीतून जागोजागी निर्माण केलेल्या प्रतिकामुळे (TRH) लालबाग मधील होळकरांच्या स्मृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रतिक(TRH) माञ नष्ट करणे सहज शक्य होणार नाही एवढे माञ निश्चित !!
हा पँलेस भारतातील पाश्चात्त्य शैलीचा व आदर्श तसेच सुसज्ज वास्तुचा एक नमुना आहे. या पँलेसची रचना लक्षात घेता, पँलेसमध्ये राजदरबार, विशेष म्हणजे पाश्चात्त्य पध्दतीचे शुशोभित डायनिंग हाल, डायनिंग हालमधील अप्रतिम बैठक व्यवस्था व उच्च प्रतीचे राजेशाही थाटाचे साहित्य हे पाहणाऱ्या व्यक्तीला भूरळ पाडणारे आहे . लागूनच असलेला भारतीय पध्दतीने जेवण करण्याचा हाल भारतीय पध्दतीवरची होळकरांची निष्ठा स्पष्ट करते. स्वयंपाकघर, स्वयंपाकघरातून जेवणाचे हालमध्ये जेवण पोहचविण्याचा झुला(lift) कल्पनातित आहे, ग्रंथालय, कार्यालय, राजाची सल्लामसलतीसाठी बसावयाची खोली, नर्तनगृह, नर्तिकांसाठी सजण्याची ड्रेसींग रूम, खेळण्याची खोली, महाराजाचे तसेच राणीसाहेबांचे स्वतंत्र शयनगृह, दोन्हीही शयनगृहांना जोडणारा मार्ग , अद्ययावत व सर्व सोईनी परिपूर्ण अप्रतिम नहाणीगृह (bathroom) हे होळकरशाहीचा पाश्चात्त्य दृष्टिकोन स्पष्ट करते.
राजवाड्यात विशेष आकर्षण पहायला मिळते. एकूण आठ मोठे वाघ व एक चित्ता यांच्या शिकारीनंतर त्यांच्यामध्ये भुसा भरून त्यांना प्रदर्शनात ठेवलेले आहे. ह्या शिकार केलेल्या वाघांच्या भक्कम शरिरावरून होळकर राजांचे शौर्य व हिम्मतीची कल्पना येते. ते संपूर्ण वाघ आजही पँलेसमध्ये पहायला मिळते.
अशा या वैभवशाली पँलेसमध्ये होळकर वंशज इ.स१९७८ पर्यत राहत होते . तुकोजीराव तृतीय हे इ.स १९२६ मध्ये होळकर राजगादी त्यागणारे व मरेपर्यंत या पँलेसमध्ये राहणारे होळकरशाहीचे शेवटचे वंशज ठरले. आज हा पँलेस मध्य प्रदेश सरकारच्या आधिपत्याखाली असल्याचे लक्षात येते .
या वैभवशाली पँलेसचे तेथील रचनेसह सर्व वैभवाचे रक्षण करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ती वास्तु आज इतर कामासाठी वापरण्यापेक्षा ऐतिहासिक वास्तू व ठेवा म्हणून जतन करणे केंद्र सरकार सह मध्यप्रदेश सरकार, प्रत्येक नागरिक व प्रशासन यांचे प्रथम कर्तव्य ठरते... आमची सर्व वाचकांची कर्तव्यनिष्ठाच आज राजबाग पँलेस व वैभव वाचवू शकते ...हे मात्र निश्चित !!!
-------------------------------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
9673386963
No comments:
Post a Comment