Saturday, March 2, 2019

होय पवार साहेब!! धनगरांनी मत इतरांनाच दिली....*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*होय पवार साहेब!! धनगरांनी मत इतरांनाच दिली....*

         *डॉ प्रभाकर लोंढे*
-------------------------------------------
      खरंच पवार साहेब।। आपले खूप खूप धन्यवाद.. आपण जीवनाच्या अंतिम टप्प्यात जगातलं सत्य सार्वजनिक रित्या कबुल करीत जगासमोर मांडलं. " *धनगर इतरांना मतदान करतात."* करमाळ्याच्या सभेत आपल्या मुखाग्नीतून तावूनसुलाखून निघालेलं हे सत्यवचन जगाने ऐकलं. आपल्या उतार वयात प्रगल्भ अनुभवातून हे वाक्य आपल्या मुखातुन आम्हाला ऐकायला मिळणं, हे आम्ही सर्व अन्यायग्रस्त धनगर आमचं अहोभाग्यच समजतो. कारण आम्हाला आज पुन्हा एकदा सत्याची जाणीव झाली की, खरंच धनगर इतरांना म्हणजेच(बीजेपी, शिवसेना, रा. कांग्रेस, कांग्रेस पक्ष) यांना व त्यांच्या नेत्यांनाच मतदान करतात, आणि सातत्याने करीत आलेले आहे. तरी सुद्धा गेल्या सत्तर वर्षाच्या कालावधीत हे पक्ष कधीच आमचे धनगरांचे झालेले नाही. या पक्षांनी आम्हाला उमेदवारी सूध्दा दिलेली नाही. आमचा कोणताच नेता मोठा होवू दिला नाही. याचाच अर्थ ते पक्ष व नेते (आपणसुद्धा) आमचे कधीच नव्हते. तरी सुध्दा *आम्ही मतदान मात्र या पक्षांनाच व आपणास करीत आलो आहे,* म्हणजेच जे आमचे कधीच नव्हते, ज्यांनी आम्हाला कधीच उमेदवारी दिली नाही, ज्यांनी आम्हाला कधीच आपल्या पंगतीला येऊ दिले नाही. त्या *इतरांनाच  आम्ही आपले मतदान केले आहे.*
    आपण अगदी बरोबर बोललात, पवार साहेब! आपण स्वतः याची जाणीव ठेवली, असल्या सत्याची आपण आम्हाला जाणीव ऐनवेळेवर निवडणूक काळात करून दिली, आपण तसे जाणीवेचे पक्के!? आपण धनगर जमातच काय, इतर अनेक छोट्या-मोठ्या जमातींच्या सहकार्याची किती मोठ्या प्रमाणात जाणीव  ठेवलेली आहे, असं कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही, त्यामुळेच कदाचित या महाराष्ट्रातील काही अ जाणते लोक आपणास "जाणता राजा" म्हणतात म्हणे. असो साहेब! कोणाला काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण *आपणास धनगरांनी काय म्हणायचं? हा मोठाच प्रश्न उभा राहिलेला आहे.* साहेब! आपण आपली तिसरी पिढी राजकारणात आणली आहे.  धनगर उदार दिलाने स्वागत करणार आहे, यावर काही शंकाच घेवू नका कारण *धनगर नेहमीच इतरांना मतदान करीत आलेले आहे.*
          आदरनिय पवार साहेब! आपण आपले राजकीय अस्तित्व व वाटचाल सुरु केली ती माढा, बारामती मतदारसंघातून !! की जे धनगर बहूल मतदारसंघ आहेत. तरी सुध्दा धनगर इतरांना मतदान करतात असे आपण म्हणणे किती संयुक्तिक आहे हे आपल्या अनुभवी नजरेतून ठरवावे. एखाद्या वेळेस धनगरांनी बीजेपी शिवसेनेला (आपल्याच शिष्यांना)  मतदान केले म्हणून काय झाले, सुप्रियाताईना तर बारामतीत निवडून (जानकर साहेबांना हरवून)आणण्याचे कार्य धनगरांनीच तर केले, यावरून तरी आमची पवार घराण्यासंबधी निष्ठा लक्षात असू द्या साहेब.. आपण मान्य करा नाही तर नका करा, साहेब, तुमची व तुमच्या रक्तनातेवाईकांची तिसरी पिढी राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी या *धनगरांनी निष्ठेने आपणास मतदान केलं आहे* साहेब..  तुमच्या पिढ्यांना सत्तेत पाठविण्यासाठी धनगरांनी, धनगर रक्ताच्या उमेदवारांना कसं मातीत घातलं आहे, याची आपणास चांगली कल्पना आहेच. याचे आपण सदेह साक्षीदार आहात साहेब... *इतरांच्या तिसऱ्या पिढ्या राजकारणात सक्रिय होत असताना अख्या महाराष्ट्रातून धनगरांची अजून पहीली पिढी सुध्दा राजकारणामध्ये प्रवेश केलेला नाही.* अशा परिस्थितीत सुद्धा अलीकडे आपल्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारी मध्ये एकाही धनगराला उमेदवारी जाहीर केली नाही. असं का होतं? हे मला अजून कळलं नाही, साहेब! पण असं नेहमीच झालेलं आहे, त्यामुळे आमचे (धनगर) उमेद्वारच नसल्याने आम्ही इतरांनाच मतदान केलेले आहे. म्हणूनच आपण जे बोललात ,ते अगदी खरं बोललात साहेब.  आणि आपण नेहमी अनुभवातूनच बोलत असता. त्यामुळे आपली कोणीही बरोबरी करू शकत नाही.
        आपल्या एवढा अनुभवी नेता महाराष्ट्रात नाही. असा तो आपला अनुभव आज साक्षीदार आहे, धनगर किती निष्ठावंत आहे, हे आपण इतरांना उत्तम प्रकारे उदाहरणांसह  स्पष्ट करून सांगू शकता. *धनगरांनी नेहमीच इतरांना मतदान केले आहे,* याचा आपल्या एवढा जीवंत साक्षीदार कोणीही नाही.
भलेही धनगरांचे हक्क, आरक्षण मिळाले नसतील परंतु आपल्या दुसऱ्या पिढी पर्यंत आम्ही धनगर नेहमीच आपल्या पाठीशी राहिलो आहे.  आपले नातू पार्थचे सुध्दा राजकारणात पदार्पण होत असताना भव्य स्वागत करावे ही कदाचित आपली अंतिम राजकीय इच्छा असेल, आपण म्हणाल तर ती आम्ही धनगर ती पुर्ण करूनही देवू, कारण *आम्ही आता पर्यंत इतरांनाच मतदान करीत आलो आहे.*
         साहेब! आपणास जाणीव आहेच, आपलं राजकीय अस्तित्व धनगरबहूल मतदानातून निर्माण झालेलं आहे. तोपर्यंत कोणीही धनगर नेता मोठा झाल्याचे उदाहरण दिसत नाही. धनगरांनी बीजेपी शिवसेनेला मतदान करायचे असे ठरविले असताना सुध्दा मागील लोकसभेत आपल्या सुकन्या *सुप्रिया ताईंना धनगरांनी निवडून आणलं,*  त्यासाठी धनगरांनी स्वजातीय श्रीमान महादेव जानकर साहेबांना पाडलं. यावरून तर आपलं म्हणणं सिध्दच झाले आहे साहेब, *धनगर इतरांनाच मतदान करतात* . अगदी बरोबर बोललात साहेब..... आपण शक्य तोवर खोटं बोलत नाही साहेब.... आणि जे बोलता ते खरंचं विचार करायला लावणारं बोलता... धनगर विचार करीत नाही,  हा त्यांचा गुणधर्म आहे.
      मागील विधानसभेत अजीत दादांना विययी करण्यासाठी श्रीमान ---- गावडे या धनगर उमेदवारांला पराभूत केले आहे साहेब.. हे सुद्धा आपल्या धनगर बहुल बारामती मध्ये घडले आहे. हा एक आपला अनुभव असल्यानेच तसेच असे अनेक अनुभव आपल्या पाठीशी असल्याने आपण, *धनगर इतरांना मतदान करतात.* असे बोललात ते अगदी खरं बोललात साहेब....
            यापुढे  सुध्दा धनगर इतरांना मतदान करून पार्थ बरोबरच तुमची तिसरी पिढी सुध्दा राजकारणात मजबूत करण्यासाठी मतदान करणारच आहे. यापुढे धनगरांवर शंका घेण्याची गरजच नाही, कारण यांना आपला माणूस चालतच नाही,  म्हणून *ते इतरांनाच मतदान करतात.* आणि आपण हा धनगरांचा दुर्गुण चांगला ओळखता.  म्हणूनच आपण महाराष्ट्रात विश्वासपुर्ण राजनीती करता....  तेवढ्याच विश्वासाने सांगतो साहेब, हे *धनगर नेहमीच इतरांना मतदान करतात. आणि घटनात्मक आरक्षण मागत पिढ्या बरबाद करतात...*

 *जय मल्हार साहेब*

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment