Wednesday, July 31, 2019

धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!

धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!

               डॉ प्रभाकर लोंढे

          वर्तमानात धनगरांची जेवढी राजकीय दुर्गती झाली आहे अशी दुर्गती इतिहासामध्ये कदाचित प्रथम झाली असेल. या दुर्गतीचे, आतापर्यंत झालेल्या अन्यायाचे दोषारोप ही जमात जरी इतर धूर्त माणसावर करीत असली तरी या आरोपात तथ्य नसल्याचे आज धनगरांनीच सिद्ध करून दाखवले आहे. "2014 मध्ये आरक्षणाच्या नावावर धनगरांची मते घेतली"  "विश्र्वासघात केला," असा आरोप माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जातो आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने धनगरांना सत्तेपासून वंचित ठेवून धनगरांच्या सवलती मिळू दिल्या नाही.  किंवा धनगरांचा राजकीय नेता निर्माण होऊ दिला नाही, अशा प्रकारचा आरोप शरद पवार साहेबांवर केला जातो.( ते कदाचित खरे असावे) परंतु त्यामध्ये सुद्धा तथ्य नाही असे आज वाटायला लागले आहे. कारण धनगरांच्या नसा नसा त्यांनी ओळखल्या आहे.
                 हिंदी मध्ये एक म्हण आहे, "जब तक मुर्ख जिंदा है, तब तक अकलमंद मरता नहीं!" धनगरांवर अन्याय करून या धुर्त लोकांनी आपला राजकीय जिवंतपणा टिकवून ठेवला, यांचा अर्थ ते अकलमंद आहे. धनगरांवर त्यांनी राज केलं, अन्याय केला तेव्हा मी धनगरांना "मुर्ख" ठरवणार नाही पण त्यांचं त्यांनी ठरवावं. ते अकलमंद की मुर्ख...???  पण ते आज शाहण्या सारखे वागतांना सुध्दा दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वरील अन्याय भविष्यात संपुष्टात येईल, असे म्हणता येत नाही.
           अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. समूहातील एखादा फितूर झाल्याशिवाय समुहावर अट्याक करता येत नसतो. धनगरांमध्ये फितूरांची संख्या तर काही कमी नाही. इकडे त्याने अन्याय केला म्हणून बोंबलायचं आणि पुन्हा ज्याच्या बोंबाबोंब केल्या, त्याचेच भांडे चाटायचे. ही धनगर विचित्र प्रवृत्ती येथील धुर्तांनी ओळखली. म्हणून चाटू धोरणाचे पायिक धनगर त्यांनी ओळखले व आपल्या पाठीशी लावले. निसर्ग नियम आपणांस माहीत आहेच, भांडे चाटणारं जनावर मालकावर कधीच गुर्रावत नसतं. कारण ते खावून तृप्त झालेल असतं आणि त्याच्या एवढं दुसरं लाचार नसतं.
         शिवसेना-बीजेपी प्रणित फडणवीस साहेबांचं सरकार गठित झाल्यानंतर अनेक धनगरांनी निर्णायक मेळावे घेतले. अक्षरशः या सरकारवर अनेकांनी तोंडसुख घेतले. आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर या सरकारला जगू देणार नाही. अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा दिल्या. "या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!" अशा प्रकारच्या महापराक्रमी निर्णायक घोषणा सुध्दा देण्यात आल्या. परंतु त्याच सरकारने धनगरांपैकीच आपल्या शुभचिंतकाच्या सहकार्याने पाच वर्ष बिंधास्त काढून घेतले. हे सरकार पुन्हा स्थापन व्हावे हे म्हणणारा एकही धनगर मिळणार नाही असं वाटत होते. परंतु तसं दिसत नाही.
             या सरकारच्या आशीर्वादाने जगणारी काही धनगर मंडळी उघड उघड जरी काम करीत नसले तरी शिवसेना- बीजेपी सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे, या भावनेतून धनगर मतसंख्या बीजेपी शिवसेना पक्षाकडे जावी, यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. आरक्षण सोडले तर धनगरांना खूप काही या सरकारने दिलं, हे धनगर जनमानसामध्ये बिंबवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. "आदिवासी प्रमाणे कोणत्या? सवलती" हा मोठाच प्रश्न असतांना त्या निवडणूक काळात?? कशाप्रकारे?? या सर्व बाबी बाजूला सारून बीजेपी सरकारच्या
दातृत्वाच्या कहाण्या.. सामान्य धनगर माणसांना ऐकविल्या जात आहे. मात्र  आरक्षण अंमलबजावणीची मुळ मागणी संबंधी यांची वाचा बंद पडलेली आहे.
          धनगर जमातीला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बीजेपीकडून राजकीय दृष्ट्या उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्नात आहे असे धनगर नेते लक्षात आले नाही. जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत पण दिसत नाही. याचे कारण धनगरांमधून जनपाठींब्यावर नेता विकसित होणे कोणत्याही प्रस्थापित पक्षाला न आवडणारी सत्य बाब आहे.
        आरक्षणासह सामान्य धनगरांना काय काय मिळालं? हा खूप मोठा प्रश्न असला तरी काही विशिष्ट धनगर लोकांना कदाचित खूप काही मिळालं असेल, म्हणून ते पक्षानिष्ठेशी इतके बांधील आहेत की, त्यांना त्यांचे शब्द सुद्धा आठवत नाही. समाज गेला खड्ड्यात, आरक्षण जाऊ दे गड्ड्यात पण कसाही करून धनगर मत हे बीजेपी शिवसेनेला मिळालेच पाहिजे, याचा काहींनी चंगच बांधलेला दिसतो आहे. अशी भिष्म प्रतिज्ञा घेणारे कार्यकर्ते धनगर जमाती मध्येच मिळू शकतात. हे या पाच वर्षांत सरकारने ओळखलं आहे. हे झालं मागील पाच वर्षातील अन्यायाचं धनगर जमातीच फलित.
           दुसरीकडे शरद पवार साहेब व प्रियंका गांधी धनगर मेळाव्याला मार्गदर्शन करायला येणार आहे म्हणे. तेही धनगर नेत्यांच्या बोलावण्यावरून !! वाह, पराक्रमी धनगर नेत्यांनो.. जेवढं तुमचं ......  करावं  तेवढं कमीच आहे.
कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना शिव्या देत देत बीजेपी शिवसेनेला सत्तेत बसवलं. आणि आता हा "मार्गदर्शन सोहळा" लय अजब वाटला बा..
पवार साहेबांचे कोणते मार्ग अन् कुठले दर्शन घ्यायचं राहीलं राव!!  आयोजक धनगर नेते कोणती गुरुदक्षिणा देणार आहे की गुरूदिक्षा घेणार आहे हे अजून समलेलं नाही. एखाद्या हिंस्त्र प्राण्यांनी धनगरांच्या पिढ्या खावून फस्त केल्या, त्यांचं मार्गदर्शन या देशात केवळ धनगरच घेवू शकतात. त्यामुळेच कदाचित धनगरांना "येडे धनगर" म्हणत असावे.
          प्रियंका गांधी वड्राचं मार्गदर्शन ज्या धनगर नेत्यांना महत्त्वाचे वाटते, त्यांनी आपला राजकारणाचा व वयाचा अनुभव, महाराष्ट्रातील सत्ताकारण तपासून पाहिलं तर खूप बरं होईल. काही चूका होत असेल तर दुरूस्त करता येईल. असो काहीही पण या सर्व प्रकरणांनी काही धनगर नेत्यांचे छुपे अजेंड्यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे हे नक्की.‌ काहींना तर या महाराष्ट्रात धनगरांवर एवढे अन्याय का होतात. याचे उत्तर सापडले.  "घर का भेदी लंका ढाये" ही हिंदी मध्ये म्हण आहे..... अशा घरभेद्यांनीच धनगरावर अन्यायासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य वेळोवेळी केलेले आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, धनगरांवरील अन्यायाचे कर्तेधार्ते केवळ धनगरच आहेत..... हे समजून घेत नाही तोपर्यंत बाकीच्यांना दोष देणे निरर्थक आहे.


जय मल्हार!!

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Monday, July 29, 2019

ऱ्हास माणूसकीचा

ऱ्हास माणूसकीचा

जा माणसा जा,
तू 🌒 चंद्रावर जा.
मंगळावर जा.
पुन्हा जिथे जिथे जाता येईल,
तिथे तिथे अवश्य तू जा.
आलेली एकही संधी गमावू नको.
विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तुझाचं झेंडा गाड.
आणि हिम्मत असेल तर
त्या सुर्यावर सुध्दा जावून पहा.
मात्र जिथे कुठे जाशील,
तिथे माणूस म्हणूनच रहा......

जीत जिंदगी की. बहोत बार देखा मैने,

जीत जिंदगी की.

बहोत बार देखा मैने,
हसते खिलते हुए खेत खलियानों को,
बरसते बादल और उलझते तुफानोंसे
धडाडसे गीरते पेडों कों,
फिर भी जिने की तमन्ना रखकर मैं
सोचता रहा मन ही मन में,
क्यू जिंदा है तू ?
क्या पडी है तुझे जिनें की इस दर्दभरी संसार में.
तब उम्मिदे जाग उठी,
और बोलने लगी,
"तू जिंदा है तो
जिंदगी की जित पर यकीन कर."

Wednesday, July 3, 2019

हाच तो राष्ट्रभक्त शिंग्रोबा धनगर.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*हाच तो राष्ट्रभक्त शिंग्रोबा धनगर.*


           *डॉ प्रभाकर लोंढे*
 
       भारतीय भूमी ही कर्तुत्वान माणसांची भूमी असली तरी येथील मनोवृत्ती ही कर्तुत्वान माणसाला देव बनविणारी आहे. माणसाला देव बनविल्यामुळे त्याच्या विषयी श्रद्धा मनामनात निर्माण होत असते,  असं असलं तरी त्याच्या देव रूपातून त्याचं कर्तुत्व मात्र कधी निसटून गेलं हे कळतच नाही. त्यामुळे कर्तुत्ववान माणसाचे पुतळे हे त्याच्या देवरूपापेक्षा कधीही प्रेरणादायीच ठरत असतात.
      खंडाळा घाटातील शिंग्रोबा चे मंदिर हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. महामार्गावरून येताना - जाताना प्रत्येकजन त्याला नतमस्तक झाल्याशिवाय समोर जात नाही, ही सुद्धा वास्तविकता आहे.  असं असलं तरी त्या नतमस्तक होण्यामध्ये त्याच्या देव रूपाला महत्व दिले जाते.  परंतु शिंग्रोबा सारख्या कर्तुत्ववान माणसाचं व्यक्तित्व, कर्तुत्व हे खऱ्या अर्थाने त्याच्या पुतळ्या मधूनच सार्वजनिक होत असतं व सर्वांना प्रेरणादायी ठरतं. म्हणून महान राष्ट्रभक्त, मुंबई- पुणे रेल्वेमार्गाचा संशोधक शिंग्रोबा धनगर यांचा पुतळा जर पाहायला मिळाला तर तो सगळ्यांसाठीच आनंददायी क्षण व प्रेरणादायी प्रसंग असणार आहे. त्यामधून खऱ्या अर्थाने शिंग्रोबाच्या व्यक्तित्वाची ओळख होणार आहे.

*शिंग्रोबाचा हा पुतळा कुठे आहे?*
             शिंग्रोबा चा पुतळा पुण्याजवळ जगप्रसिद्ध निसर्ग रम्य संह्यांद्री पर्वताच्या डोंगररांगांमध्ये लोणावळा परिसरात मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकाच्या अगदी बाजूला लोणावळा वस्तीमध्ये एका चौकात हा पुतळा आपणास पाहायला मिळतो. *खांद्यावर घोंगडी, हातात लांब काठी, गुडघ्या पर्यंत धोतर, अंगावर बंडी, डोक्यावर फेटा, पायामध्ये चप्पल, राकट काळवंडलेला चेहरा व शरिरयष्टी पण चेहऱ्यावर झळकणारा दुर्दम्य आत्मविश्वास,* असा असलेला हा पुतळा नक्की धनगर वंशाच्या शिंग्रोंबाचाच असल्याचे सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे.
           नुकतीच २३ जून २०१९ ला खंडाळा, लोणावळा परिसराला मी सहपरिवार भेट दिली.  मुंबई वरून लोणावळा असा घाटमाथ्यांवरून तर कधी बोगद्यातून रेल्वे प्रवास सुरू असताना तसाही शिंग्रोबा डोक्यात घुमत होता. रेल्वे प्रवास लोणावळ्याला संपला व स्टेशनच्या बाहेर आलो. निसर्गरम्य परिसरात मन मोहून गेलं. रात्री मुक्काम केला. परिसरात फिरत असताना हा पुतळा दिसला. हा पुतळा व धनगर वेश याचा संबंध जुळत असल्यामुळे जिज्ञासा वाढली. व तेथे सर्वेक्षणास सुरुवात केली.  वयोवृद्ध माणसं पाहून त्यांना यासंबंधाने विचारणा केली. मुलाखती घेतल्या. अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यापैकी एक रागावला.  आज तो पुतळा "धनगर शेतकरी पुतळा" या नावाने ओळखला जातो.
दिवसभरात पंधरा व्यक्तींना विचारणा केली असता, त्यांच्या पैकी बहुतेकांनी या पुतळ्या संबंधीची खरी वास्तविकता लक्षात आणून दिली.
सर्वेक्षणात सारांश रूपाने त्यांना १) दादा हा पुतळा कोणाचा आहे?
२) हा पुतळा का बनवला गेला? ३) या पुतळ्याचा लोणावळा शी काय संबंध? अशा प्रकारचे प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारले.
त्यावर अनेकांच्या उत्तरांमधून सारांश रूपाने खालील प्रकारे उत्तरे आली.
१) तो धनगराचा पुतळा आहे. २) इंग्रजांनी याची हत्या केली.  ३) यांनी हा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी डोंगरातून रस्ता दाखवला ४) तो मुळात धनगर आहे परंतु अलीकडे त्याला धनगर मानलं जात नाही. ५) हा माणूस रस्ते दाखविणारा होय ६) काही लोक त्याला मावळा म्हणतात. ( एक चिडला व तुम्हाला काय करायचं आहे याचं? असं म्हणाऱ्याचं उत्तर)
याशिवाय सचिन नावाच्या एका वयस्क टॅक्सी चालकाने तर तेथील विशिष्ट सामाजिक वर्चस्ववादामुळे या पुतळ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे असे स्पष्टपणे सांगितले.
             असो काहीही परंतु तोपर्यंत मी एका स्पष्ट निष्कर्षापर्यंत जावून पोहोचलो होतो,  हे माझे प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण असले तरी मी संशोधनाच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन पोचलो होतो की *तो पुतळा शिंग्रोबाचाच असून धनगरांच्या राष्ट्रीय बाण्याचं, राष्ट्रभक्तीचं व अस्मितेचं प्रतिक आहे.*

 *कोण होता हा शिंग्रोबा?*

          शिंग्रोबा हा धनगर असून इंग्रजांना बक्षिसांच्या रुपात भारतीय स्वातंत्र्य मागणारा व राष्ट्रप्रेमापोटी शहीद झालेला महान राष्ट्रभक्त होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजांना मुंबई ठाणे  रेल्वे मार्ग पुणे पर्यंत जोडायचा होता. त्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांचं पथक नेमण्यात आलं होतं. गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना सह्यांद्रीच्या घाटमाथ्यावरंच कवडीचही ज्ञान नाही. तरी सर्वेक्षणाच काम सुरू झालं. बरेच दिवस काम सुरू होतं, डोंगरदऱ्यातून सोईसर रस्ता कुठुन टाकावं, हे त्यांना काही केल्या कळत नव्हतं.
         ही बाब रोज कड्या कपारीत माळरानावर शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या शिंग्रोबाच्या लक्षात आली. *धनगर कुठलाही असो, त्याला त्याच्या परिसराची इत्यंभूत माहिती असते. त्यामुळेच तो खरा धरतीपुत्र ठरतो. शिंग्रोबा सह्यांद्रीचा धरतीपुत्र होता, त्याला तेथील डोंगर माथ्यांची संपुर्ण माहिती होती.* त्यामुळे त्याच्यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना आपण मदत करू शकतो, त्यांचा प्रश्र्न सोडवू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. बऱ्याच दिवसांपासून सर्वेक्षणाचं काम करून यश येत नसल्याने  परेशान झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना तो बोलला. मी आपणास काही मदत करू शकतो काय?
             सर्वेक्षणात हा काय मदत करणार? हा कुश्चित प्रश्र्न पडलेले इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वत:ला सफलता येत (मरता क्या नहीं करता?)  नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून शिंग्रोबाची मदत घेतली. शिंग्रोबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणास सुरवात झाली. शिंग्रोबा पुढे, शेळ्या मेंढ्या त्याच्या मागे व सर्वात मागे इंग्रज अधिकारी हा डोंगर माथ्यांचा प्रवास सुरू झाला. *शेवटी शिंग्रोबाच्या मदतीने ठाणे ते पुणे रेल्वे मार्गाचा आराखडा तयार झाला.* इंग्रज अधिकारी खूष झाले. त्यांना शिंग्रोबा मुळे आपल्या जिक्रीच्या कार्यात यश आले होते.  त्यांना शिंग्रोबाच्या अतुलनीय मदतीबद्दल सार्थ अभिमान वाटला. त्याला आपण काही बक्षिस दिले पाहिजे, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यांनी शिंग्रोबाला विचारले, " तुला काय बक्षिस पाहिजे?" राष्ट्रप्रेमानी ओतप्रोत भरलेला शिंग्रोबा इंग्रजांना म्हणतो, " *तुम्हाला काही द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!"*
             शिंग्रोबाचे भारतीय स्वातंत्र्या विषयीचे राष्ट्राभिमानी शब्द ऐकताच ब्रिटिश अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. शिंग्रोबाला बक्षिस तर सोडा, तिथेच हत्या केली. शिंग्रोबा मेला, गेला, शहीद झाला, पण राष्ट्रासाठी काही देवून गेला. ब्रिटीशांना सबक शिकवून गेला. मुंबई पुणे रेल्वे मार्ग तयार झाला. त्यानंतर अनेक राष्ट्रभक्त, देशभक्त या देशात शहीद झाले. अनेकांचे स्मारक तयार झाले.  परंतु *राष्ट्रभक्त शिंग्रोबा का उपेक्षित राहीले?*  हा आज फार मोठा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या *अशिक्षित शिंग्रोबाला राष्ट्रभक्ती काय असते हे समजलं होतं, त्याची राष्ट्रभक्ती सुशिक्षित भारतीय व्यवस्थेला का समजू शकली नाही?* शिंग्रोबाच्या पुतळ्याला "धनगर शेतकऱ्याचा पुतळा" म्हणून उल्लेख करण्याची सामाजिक मानसिकता का निर्माण झाली?  लोहमार्गाला शिंग्रोबा लोहमार्ग म्हणून का ओळखला जात नाही? राष्ट्रभक्त शिंग्रोबा एक्सप्रेस या नावाने आगगाडी रेल्वे मार्गावर का धावत नाही? असे अनेक प्रश्न मनात घोळ करीत आहेत.
       लोणावळा परिसरात दिलेल्या भेटीमध्ये उघडकीस आलेला सत्य मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी आपापल्या परीने त्या संबंधाने अधिक संशोधन करून पुन्हा सत्य बाहेर काढून शिंग्रोबा च्या व्यक्तित्वाला व देशभक्ती ला न्याय देण्याचा प्रयत्न करावा या अपेक्षेने हा लेखन प्रपंच आपणापुढे मांडलेला आहे.

(आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन  ९६७३३८६९६३ या क्रमांकावर करावे . ही विनंती)

 *जय राष्ट्रभक्त शिंग्रोबा....*
_________________________
 *डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर*