Wednesday, July 3, 2019

हाच तो राष्ट्रभक्त शिंग्रोबा धनगर.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*हाच तो राष्ट्रभक्त शिंग्रोबा धनगर.*


           *डॉ प्रभाकर लोंढे*
 
       भारतीय भूमी ही कर्तुत्वान माणसांची भूमी असली तरी येथील मनोवृत्ती ही कर्तुत्वान माणसाला देव बनविणारी आहे. माणसाला देव बनविल्यामुळे त्याच्या विषयी श्रद्धा मनामनात निर्माण होत असते,  असं असलं तरी त्याच्या देव रूपातून त्याचं कर्तुत्व मात्र कधी निसटून गेलं हे कळतच नाही. त्यामुळे कर्तुत्ववान माणसाचे पुतळे हे त्याच्या देवरूपापेक्षा कधीही प्रेरणादायीच ठरत असतात.
      खंडाळा घाटातील शिंग्रोबा चे मंदिर हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. महामार्गावरून येताना - जाताना प्रत्येकजन त्याला नतमस्तक झाल्याशिवाय समोर जात नाही, ही सुद्धा वास्तविकता आहे.  असं असलं तरी त्या नतमस्तक होण्यामध्ये त्याच्या देव रूपाला महत्व दिले जाते.  परंतु शिंग्रोबा सारख्या कर्तुत्ववान माणसाचं व्यक्तित्व, कर्तुत्व हे खऱ्या अर्थाने त्याच्या पुतळ्या मधूनच सार्वजनिक होत असतं व सर्वांना प्रेरणादायी ठरतं. म्हणून महान राष्ट्रभक्त, मुंबई- पुणे रेल्वेमार्गाचा संशोधक शिंग्रोबा धनगर यांचा पुतळा जर पाहायला मिळाला तर तो सगळ्यांसाठीच आनंददायी क्षण व प्रेरणादायी प्रसंग असणार आहे. त्यामधून खऱ्या अर्थाने शिंग्रोबाच्या व्यक्तित्वाची ओळख होणार आहे.

*शिंग्रोबाचा हा पुतळा कुठे आहे?*
             शिंग्रोबा चा पुतळा पुण्याजवळ जगप्रसिद्ध निसर्ग रम्य संह्यांद्री पर्वताच्या डोंगररांगांमध्ये लोणावळा परिसरात मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकाच्या अगदी बाजूला लोणावळा वस्तीमध्ये एका चौकात हा पुतळा आपणास पाहायला मिळतो. *खांद्यावर घोंगडी, हातात लांब काठी, गुडघ्या पर्यंत धोतर, अंगावर बंडी, डोक्यावर फेटा, पायामध्ये चप्पल, राकट काळवंडलेला चेहरा व शरिरयष्टी पण चेहऱ्यावर झळकणारा दुर्दम्य आत्मविश्वास,* असा असलेला हा पुतळा नक्की धनगर वंशाच्या शिंग्रोंबाचाच असल्याचे सर्वेक्षणातून सिध्द झाले आहे.
           नुकतीच २३ जून २०१९ ला खंडाळा, लोणावळा परिसराला मी सहपरिवार भेट दिली.  मुंबई वरून लोणावळा असा घाटमाथ्यांवरून तर कधी बोगद्यातून रेल्वे प्रवास सुरू असताना तसाही शिंग्रोबा डोक्यात घुमत होता. रेल्वे प्रवास लोणावळ्याला संपला व स्टेशनच्या बाहेर आलो. निसर्गरम्य परिसरात मन मोहून गेलं. रात्री मुक्काम केला. परिसरात फिरत असताना हा पुतळा दिसला. हा पुतळा व धनगर वेश याचा संबंध जुळत असल्यामुळे जिज्ञासा वाढली. व तेथे सर्वेक्षणास सुरुवात केली.  वयोवृद्ध माणसं पाहून त्यांना यासंबंधाने विचारणा केली. मुलाखती घेतल्या. अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यापैकी एक रागावला.  आज तो पुतळा "धनगर शेतकरी पुतळा" या नावाने ओळखला जातो.
दिवसभरात पंधरा व्यक्तींना विचारणा केली असता, त्यांच्या पैकी बहुतेकांनी या पुतळ्या संबंधीची खरी वास्तविकता लक्षात आणून दिली.
सर्वेक्षणात सारांश रूपाने त्यांना १) दादा हा पुतळा कोणाचा आहे?
२) हा पुतळा का बनवला गेला? ३) या पुतळ्याचा लोणावळा शी काय संबंध? अशा प्रकारचे प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचारले.
त्यावर अनेकांच्या उत्तरांमधून सारांश रूपाने खालील प्रकारे उत्तरे आली.
१) तो धनगराचा पुतळा आहे. २) इंग्रजांनी याची हत्या केली.  ३) यांनी हा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी डोंगरातून रस्ता दाखवला ४) तो मुळात धनगर आहे परंतु अलीकडे त्याला धनगर मानलं जात नाही. ५) हा माणूस रस्ते दाखविणारा होय ६) काही लोक त्याला मावळा म्हणतात. ( एक चिडला व तुम्हाला काय करायचं आहे याचं? असं म्हणाऱ्याचं उत्तर)
याशिवाय सचिन नावाच्या एका वयस्क टॅक्सी चालकाने तर तेथील विशिष्ट सामाजिक वर्चस्ववादामुळे या पुतळ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे असे स्पष्टपणे सांगितले.
             असो काहीही परंतु तोपर्यंत मी एका स्पष्ट निष्कर्षापर्यंत जावून पोहोचलो होतो,  हे माझे प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण असले तरी मी संशोधनाच्या अंतिम टोकापर्यंत जाऊन पोचलो होतो की *तो पुतळा शिंग्रोबाचाच असून धनगरांच्या राष्ट्रीय बाण्याचं, राष्ट्रभक्तीचं व अस्मितेचं प्रतिक आहे.*

 *कोण होता हा शिंग्रोबा?*

          शिंग्रोबा हा धनगर असून इंग्रजांना बक्षिसांच्या रुपात भारतीय स्वातंत्र्य मागणारा व राष्ट्रप्रेमापोटी शहीद झालेला महान राष्ट्रभक्त होता. ब्रिटिश राजवटीत इंग्रजांना मुंबई ठाणे  रेल्वे मार्ग पुणे पर्यंत जोडायचा होता. त्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांचं पथक नेमण्यात आलं होतं. गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना सह्यांद्रीच्या घाटमाथ्यावरंच कवडीचही ज्ञान नाही. तरी सर्वेक्षणाच काम सुरू झालं. बरेच दिवस काम सुरू होतं, डोंगरदऱ्यातून सोईसर रस्ता कुठुन टाकावं, हे त्यांना काही केल्या कळत नव्हतं.
         ही बाब रोज कड्या कपारीत माळरानावर शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या शिंग्रोबाच्या लक्षात आली. *धनगर कुठलाही असो, त्याला त्याच्या परिसराची इत्यंभूत माहिती असते. त्यामुळेच तो खरा धरतीपुत्र ठरतो. शिंग्रोबा सह्यांद्रीचा धरतीपुत्र होता, त्याला तेथील डोंगर माथ्यांची संपुर्ण माहिती होती.* त्यामुळे त्याच्यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना आपण मदत करू शकतो, त्यांचा प्रश्र्न सोडवू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. बऱ्याच दिवसांपासून सर्वेक्षणाचं काम करून यश येत नसल्याने  परेशान झालेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना तो बोलला. मी आपणास काही मदत करू शकतो काय?
             सर्वेक्षणात हा काय मदत करणार? हा कुश्चित प्रश्र्न पडलेले इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वत:ला सफलता येत (मरता क्या नहीं करता?)  नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून शिंग्रोबाची मदत घेतली. शिंग्रोबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणास सुरवात झाली. शिंग्रोबा पुढे, शेळ्या मेंढ्या त्याच्या मागे व सर्वात मागे इंग्रज अधिकारी हा डोंगर माथ्यांचा प्रवास सुरू झाला. *शेवटी शिंग्रोबाच्या मदतीने ठाणे ते पुणे रेल्वे मार्गाचा आराखडा तयार झाला.* इंग्रज अधिकारी खूष झाले. त्यांना शिंग्रोबा मुळे आपल्या जिक्रीच्या कार्यात यश आले होते.  त्यांना शिंग्रोबाच्या अतुलनीय मदतीबद्दल सार्थ अभिमान वाटला. त्याला आपण काही बक्षिस दिले पाहिजे, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्यांनी शिंग्रोबाला विचारले, " तुला काय बक्षिस पाहिजे?" राष्ट्रप्रेमानी ओतप्रोत भरलेला शिंग्रोबा इंग्रजांना म्हणतो, " *तुम्हाला काही द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या!"*
             शिंग्रोबाचे भारतीय स्वातंत्र्या विषयीचे राष्ट्राभिमानी शब्द ऐकताच ब्रिटिश अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. शिंग्रोबाला बक्षिस तर सोडा, तिथेच हत्या केली. शिंग्रोबा मेला, गेला, शहीद झाला, पण राष्ट्रासाठी काही देवून गेला. ब्रिटीशांना सबक शिकवून गेला. मुंबई पुणे रेल्वे मार्ग तयार झाला. त्यानंतर अनेक राष्ट्रभक्त, देशभक्त या देशात शहीद झाले. अनेकांचे स्मारक तयार झाले.  परंतु *राष्ट्रभक्त शिंग्रोबा का उपेक्षित राहीले?*  हा आज फार मोठा प्रश्न निर्माण होतो. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या *अशिक्षित शिंग्रोबाला राष्ट्रभक्ती काय असते हे समजलं होतं, त्याची राष्ट्रभक्ती सुशिक्षित भारतीय व्यवस्थेला का समजू शकली नाही?* शिंग्रोबाच्या पुतळ्याला "धनगर शेतकऱ्याचा पुतळा" म्हणून उल्लेख करण्याची सामाजिक मानसिकता का निर्माण झाली?  लोहमार्गाला शिंग्रोबा लोहमार्ग म्हणून का ओळखला जात नाही? राष्ट्रभक्त शिंग्रोबा एक्सप्रेस या नावाने आगगाडी रेल्वे मार्गावर का धावत नाही? असे अनेक प्रश्न मनात घोळ करीत आहेत.
       लोणावळा परिसरात दिलेल्या भेटीमध्ये उघडकीस आलेला सत्य मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी आपापल्या परीने त्या संबंधाने अधिक संशोधन करून पुन्हा सत्य बाहेर काढून शिंग्रोबा च्या व्यक्तित्वाला व देशभक्ती ला न्याय देण्याचा प्रयत्न करावा या अपेक्षेने हा लेखन प्रपंच आपणापुढे मांडलेला आहे.

(आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन  ९६७३३८६९६३ या क्रमांकावर करावे . ही विनंती)

 *जय राष्ट्रभक्त शिंग्रोबा....*
_________________________
 *डॉ प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर*

No comments:

Post a Comment