Monday, December 2, 2019

महाराजा यशवंतराव होळकर समजून घेण्याची गरज.

🇮🇳🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🏇🏻🇮🇳
महाराजा यशवंतराव होळकर समजून घेण्याची गरज.
                      *डॉ प्रभाकर लोंढे*

           थोर राष्ट्रभक्त महाराजा यशवंतराव होळकर यांचा आज जन्मदिवस! जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तित्व, कर्तुत्व, विचार, राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाला सलाम करतो आणि या समाजव्यवस्थेतील पारंपारिक अप्रत्यक्ष जातीयवादी व्यवस्थेमध्ये जगत असताना थोर पराक्रमी यशवंतराव होळकर यांची जातीनिरपेक्ष खरी ओळख समजून घ्यावी ही विनंती करतो.

 *महाराजा यशवंतरावांचे श्रेष्ठत्व कशात आहे?*

              भारतीय इतिहासाला यशवंतराव नावाचं पान जोडला गेलं ते केवळ एक व्यक्ती म्हणून नाही किंवा एका राजवंशातील पुरुष म्हणून नाही तर विपरीत परिस्थितीमध्ये प्रसंगावधान राखून स्वतःच्या राजवंशाचा नाश थांबविण्याचा व होळकरांचे बलाढ्य साम्राज्य गिळंकृत करण्यासाठी टपलेल्या गिधाडांना धडा शिकवून स्वतःच अस्तित्व कायम टिकविण्याचा, त्याही पेक्षा इंग्रजांचा धोका ओळखून राष्ट्रीय भावना जपण्याचा महाप्रलयकारी प्रयत्न *ज्या (दुर्दम्य आशावाद तसेच पराक्रमी) मनगटातून व स्वाभीमानी वृत्तीतून घडला तो म्हणजेच महाराज यशवंतराव होळकर.*

 *राजकीय परिस्थितीवर मात.*

    एकीकडे इंग्रजांच्या रुपाने भारतावरील संकट, पेशवाईचा (ब्राम्हण) उन्माद व मराठेशाहीचा (मराठे- शिंदे) अतिरेक झाला असताना होळकरशाहीची (धनगर) अस्मिता धुळीस मिळवण्याचा प्रयत्न कदाचित हेतुपुरस्सरपणे या दोघांकडून (शिंदे व पेशवे) संगनमताने सुरू होता. थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या  मृत्युपासूनच यांची नियत फिरलेली होती. राजमाता अहिल्याबाई होळकरांनी यांना जोरदार धडा शिकविला. त्यांच्या मृत्यूनंतर होळकर साम्राज्य सांभाळण्याचे कार्य तुकोजीराव होळकर यांनी केले. केवळ दोनच वर्षात *तुकोजीराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचे १) काशीराव, २) दुसरे मल्हारराव, ३) विठोजीराव व ४) यशवंतराव असे चार मुले होती.* परंतु त्यांना  दासीपुत्र, अनौरस संतती अशा नावाने हीनवण्याचा व होळकर वंशात भांडणे लागतील, या दृष्टीने वारंवार प्रयत्न केला जात होता. तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर वारसा संबंधाने होळकरशाही मध्ये हेतूपुरस्सर कलह माजवला गेला. त्यासाठी साम, दाम, दंड, नीती, भेद या सर्वांचाच सहारा घेतला गेला, यातून पेटलेला संघर्ष इतका महाभयंकर होता की, *पेशव्याकडून शनिवारवाड्यावर विठोजी राजेंचा निर्दयपणे खून करण्यात आला. शिंदे यांच्या सैनिकाकडून झालेल्या अचानक हल्ल्यामध्ये मल्हारराव दुसरा मारला गेला.* दोन कर्तबगार भाऊ मारले गेले. सोबतच होळकर वंशातील स्त्रिया- मुलांना बंदिवासात टाकण्यात आले. *काशीराव पेशव्यांच्या गोटात जावून बसला होता.* आता आशा बाळगू शकेल असा फक्त यशवंतराव बाकी होता. होळकर राजवंशाची वाताहत झाली होती. त्यामागे एकच उद्देश होता हे स्पष्ट होते, *तो म्हणजे होळकरांचा (धनगरांचा) राजकीय वारसा समाप्त करणे.*
           एकूण प्रकरणांत होळकर राजवंशातील अस्थिरतेला खतपाणी घालण्याचे सातत्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रयत्न पेशव्यांनी व दौलतराव शिंदे कडून झाले. त्यांची संपूर्ण नजर होळकर साम्राज्याच्या समृद्धीवर होती. त्यांनी *दुबळ्या काशीरावाला हाताशी धरून होळकरांचे एक एक महाल ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. तोपर्यंत मालक पेशवे आपल्याला होळकर राजगादीचा वारस घोषित करतील या खोट्या आशावादात होळकर वंशज काशीराव जगत होता* . त्याच्या माध्यमातून होळकरांचे प्रदेश, महाल ताब्यात घेण्याचा सपाटा शिंद्यांनी लावला होता, ही बाब त्याच्या लक्षात आली नाही.
     या सर्व बाबींमुळे *होळकरशाही लयास जाते की काय? असा प्रश्न निर्माण झाला असताना तो यशवंतरावांच्या स्वाभिमानाला डिवचत होता.* त्यातून महान पराक्रमी यशवंतराव होळकरशाहीचा तारणहार म्हणून पुढे आला. त्यानी आपली सुटका करून घेतली व स्वत:च सैन्य उभारलं. *होळकरांचे शिंद्यांनी ताब्यात घेतलेले प्रदेश मुक्त करण्याचा विडाच उचलला. पेशवे शिंद्यांची दानादान उडवत होळकरशाहीला पुनर्वेभव मिळवून देत भारतात राष्ट्रीय भावना सुद्धा जपण्याचा प्रयत्न केला.* इंग्रज भारतात स्थिरावणार नाही, यासाठी *स्वातंत्र्य संग्राम उभारणारा प्रथम स्वातंत्र्ययोध्दा म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहासात उल्लेख केला जातो.*

 *_यशवंतरावांचे असामान्यत्व._*

         यशवंतरावांनी पेंढाऱ्याचं सैन्य उभं केलं. एकट्याच्या भरोशावर आपल्या होळकर राजघराण्यातील प्रश्र्न सोडविले, *भारत इंग्रजांच्या तावडीत जाणार नाही याचा पूरेपूर प्रयत्न केला. इंग्रजांच्या फौजेची दाणादाण उडवली. त्यावेळी पेशवे व शिंदे यांनी यशवंतरावांचं ऐकलं असतं तर इंग्रजांच्या नावाने दीडशे वर्षाचा इतिहास या भारत भूमी मध्ये लिहिला गेला नसता.* सोबतच अख्या महाराष्ट्रावरच नाहीतर संपूर्ण भारतावर आपल्या न्यायिक राजसत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या होळकरशाहीचं पुनरुज्जीवन केलं. म्हणून  *महाराजा यशवंतराव होळकर खर्‍या अर्थाने राष्ट्रपुरुष ठरतात* . त्यांचा पराक्रम, दुरदृष्टी, राष्ट्रीय भावना यांना आज मी विनम्र अभिवादन करतो. तो काळ पेशवाईचा होता. होळकर ( धनगर) संस्थान सर्वाधिक समृद्ध होत. त्याचा नाश व्हावा. सर्व संपत्ती, प्रदेश आपल्या अधिपत्याखाली यावा. असे शिंदे आणि पेशव्यांना मनोमन व कृतीतून वाटत होतं. त्या *घाण विकृत मनोवृत्तीला धडा शिकवून इंग्रजांसारखे परकीय येथे नकोत अशी राष्ट्रीय भावना जपणारा एक राष्ट्रपुरूष म्हणून यशवंतरावांकडे भारतातील इतिहासकारांनी पहावं.* हीच आजच्या प्रसंगी अपेक्षा.....

 *जय यशवंतराव !!*

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment