Thursday, October 4, 2018

धनगरांचा भविष्यकाळ निर्धारित करणारा हाच तो वर्तमान काळ!!*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*धनगरांचा भविष्यकाळ निर्धारित करणारा हाच तो वर्तमान काळ!!*
-------------------------------------------
                         *डॉ. प्रभाकर लोंढे*
------------------------------------------
               हिंदी मध्ये एक म्हण आहे व सर्वत्र बोललं जातं "समय बलवान है!"  आणि ते खरंही आहे. प्रत्येक गोष्टीची विशिष्ट वेळ असते. वेळ आल्यानंतर संधी उपलब्ध होत असते. त्या वेळेचा/संधीचा प्रत्येकालाच फायदा घेता येतो आणि आलेल्या संधीचा/वेळेचा फायदा घेण्यात तो किती यशस्वी ठरतो, यावरून त्याचा भविष्यकाळ निश्चित होत असतो. म्हणूनच ती योग्य वेळ ओळखणे आवश्यक असते.  मग ती वेळ एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असो की एखाद्या समाज घटकाच्या बाबतीत असो, उपलब्ध परिस्थितीचा पुरेपूर विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच त्याचा भविष्यकाळ निर्धारित करीत असतो. मात्र यासाठी त्याला सतर्क राहून त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा उठवता येईल याचा विचार व त्यानुसार आचार करणे अत्यावश्यक असते. कारण त्यातूनच यशाचा मार्ग निश्चित होत असतो.
         एकदा हातात आलेली संधी गेली तर पश्चाताप करण्याशिवाय हातामध्ये काहीच नसतं. म्हणून आलेली संधी गमावली जाणार नाही, तिचा पुरेपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेता येतील, यासाठी प्रयत्न करणं, यातचं खरा शहाणपणा असतो.  अशा प्रकारचा शहाणपणा धनगर जमातीमध्ये आता आला आहे. अस मत जर कोणी व्यक्त केलं तर ते चुकीचं होणार नाही. मात्र तो शहाणपणा प्रत्यक्ष आचरणात/ जीवनात उतरवणे, हे प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सामान्य धनगरांच्या​ हातामध्ये आहे. मात्र किती टक्के शहाणपणा प्रत्येकाच्या वागण्यामध्ये प्रत्यक्ष दिसणार आहे, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. परंतु यावरच जमातीचा भविष्यकाळ निर्धारित होणार आहे.
       त्याचवेळी आलेल्या संधीचा फायदा घेऊन समाजहित साधायचं की स्वहित साध्य करायचं? की स्वहितासाठी समाजाचा वापर करायचा? की समाजाचा छुप्या पद्धतीने लिलाव करायचा? यांचा निर्णय मात्र नेत्यांवर अवलंबून आहे. परंतु आता यापुढे हे होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्या इतपत आजच्या धनगर नेत्यांनी आपली विश्वासार्हता वाढविली आहे, असं मी म्हटलं तर कोणत्याही धनगर नेत्यांची हरकत नसावी. ही आग्रहाची नम्र विनंती.
              महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या, राजकीय सामाजिक दृष्ट्या वंचित, उपेक्षित धनगर जमातीचा हा काळ अतिशय महत्त्वपूर्ण असून या जमातीच्या सर्वांगीण भल्याचा मार्ग शोधणारा हा काळ आहे. अशावेळी धनगर नेत्यांनी टाकलेली योग्य पावले ही
१) धनगरांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक उद्धार
नक्कीच करू शकते.
२) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर धनगर आपली अतिशय महत्त्वाची पकड निर्माण करू शकते.
३) एवढेच नाही तर महाराष्ट्राची राजकीय सत्ता सुद्धा हातात घेऊ शकते.
४) येथील राजकीय व्यवस्थेवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकते.
५) जमातीला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकते.
              परंतु आता जर  नियोजन चुकलं तर धनगर जमातीला पुन्हा मातीत सुद्धा घालू शकते. परंतु अशा प्रकारचे नियोजन चुकणार नाही एवढा विश्वास फक्त आपण व्यक्त करू शकतो.
         सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा विचार करता प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये धनगर नेते, कार्यकर्ते सक्रियपणे काम करताना दिसून येत आहे. सर्वांना आपला पक्ष हा प्रिय असून ते पक्षनिष्ठेने काम करणारे निष्ठावंत असल्याचेही लक्षात येते. आणि ते अत्यावश्यक सुध्दा आहे. असे असताना त्यांची जमातनिष्ठा सुध्दा कायम आहे. यापुढे ते पक्षनिष्ठेला प्राधान्य देतात की समाजनिष्ठेला हाच एक मोठा प्रश्न आहे. परंतु पक्षहिताला प्राधान्य देत असताना समाजहित व स्वहित बाजूला ठेवून चालणार नाही. त्याही पलीकडे आम्ही जर जमात विकासाच्या, जमात अस्तित्वाच्या गोष्टी जर हृदयातून करीत असू तर समाजहिताला प्राधान्य देऊन स्व हिताकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल अशा प्रकारची मानसिकता असलेले नेतेच आज धनगर जमातीचा भविष्यकाळ घडवू शकतात. व अशाच नेत्यांची धनगर जमातीला आज गरज आहे. सुदैवाने आज अशा नेत्यांचे प्रमाण धनगर जमातीत वाढले आहे. प्रत्येक नेता समाज हिताचा विचार सुध्दा करीत आहे.  धनगर जमातीच्या या संक्रमण काळामध्ये अशा प्रकारच्या धनगर नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वरवर दिसून येत आहे, ही जमातीसाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे परिस्थिती सापेक्ष धनगर हितवादी निर्णय परस्पर समन्वयाने धनगर नेते घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यास कोणतीही हरकत नसावी असं सुद्धा वाटते आहे
              प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये धनगर नेते, कार्यकर्ते सक्रिय असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षातच त्यांची घुसमट होताना सुद्धा दिसून येत आहे. धनगरांना उमेदवारीच न देण्याची मानसिकता असणाऱ्या आपल्या पक्षांकडून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याची सुद्धा चिंता काही धनगर नेत्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अस्वस्थ मन असलेली धनगर नेते मंडळी पुर्ण ताकदीने स्वतःचे अस्तित्व अजमावण्याच्या प्रयत्नात​ सुद्धा दिसून येत आहे. स्वतःला. विविध पक्षांमधून अजमाविण्याचे धनगर नेत्यांचे प्रयत्न सुरू असले तरी काही अपवाद वगळता बहुतांश धनगर नेते परस्परांच्या संपर्कात आहेत. ही सुद्धा  धनगर नेत्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे अशा प्रकारे परस्पर संपर्कात राहून आपल्या समस्येवर धनगर नेते निश्चितपणे तोडगा काढू शकतात. ही धनगर नेते व समाजासाठी जमेची बाजू आहे. सर्वांनी विचार विनिमयातून काढलेला तोडगा अथवा विचार विनिमयातून केलेला स्वअस्तित्व निर्मितीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने जमातीमध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचा एक पहिला पायंडा असेल. त्यादृष्टीने सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!!!!!

                         ___एक धनगर____

                           
                             जय मल्हार

     एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________

*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:

Post a Comment