Tuesday, November 29, 2022

आ. जयंत पाटिलांच्या घरच्या लग्नावरून धनगरांना इतिहास आठवला नाही काय??

 आ. जयंत पाटिलांच्या घरच्या लग्नावरून धनगरांना इतिहास आठवला नाही काय??


डॉ प्रभाकर लोंढे


     महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आणि सत्तेमध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण केलेले मा. जयंत पाटील माजी मंत्री सुद्धा राहिले. त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच सांगली मधील इस्लामपूर मधील एका साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये पार पडला... लग्न सोहळा आणि त्याप्रसंगी उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रमुख वजनदार सत्ताधारी/ राजकारणी लोकांची (केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध पक्षांचे प्रमुख)उपस्थिती अवाक होण्यासारखी नसली तरी मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक इतिहास प्रेमीला त्यातही होळकरशाहीला प्रेरणास्थान मानणाऱ्या प्रत्येकाला एका "ऐतिहासिक लग्न" सोहळ्याची आठवण करून देणारा तो सोहळा होता.. परंतु या ठिकाणी आमच्या "ऐतिहासिक संवेदना" किती जागृत आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

         "पेशवाई" मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान. त्यातही सुभेदार मल्हारराव होळकर व  होळकरशाही तत्कालीन राजकीय परिस्थितीवर निर्णय घेणारं व्यक्तित्व. संपूर्ण भारतातील तत्कालीन राजकीय व्यवस्थेवर प्रभाव/ उपकार असलेलं व्यक्तित्व म्हणजे मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर यांचा एकुलता एक पुत्र खंडेरावांचा विवाह शनिवार वाड्यावर झाला होता असे संदर्भ सापडतात. त्याप्रसंगी खुद्द छत्रपती शाहु महाराज, पेशव्यांपासून तर भारतातील अनेक राजे महाराजे व सरदार सुभेदार सगळे उपस्थित होते. त्याला इतिहासामध्ये "शाही" सोहळा असा उल्लेख आढळतो. त्याप्रसंगी असलेली राजे महाराजांची उपस्थिती व त्यांनी दिलेल्या "भेटवस्तू" यावरून त्या शाही सोहळ्याची आपल्याला नक्कीच कल्पना येतं.

     सुभेदार मल्हारराव होळकर आणि मा.जयंतराव पाटील यांची तुलना होऊ शकत नाही. तुलना करणं सुध्दा योग्य वाटत नाही. परंतु त्यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीने मात्र त्या ऐतिहासिक सोहळ्यांची आठवण नक्की झाली.

         या लग्न सोहळ्याचे निमित्ताने होळकरशाहीच्या इतिहासावर प्रेम असणाऱ्या सर्व इतिहास प्रेमींना त्या इतिहासाची जाणीव करून देणे हाच या लेखा मागे उद्देश आहे. इतिहासात तत्कालीन राजकीय व्यवस्थेमध्ये "दखल पात्र" असलेले "होळकर" व त्यांचे

 वंशज आज कसे "अदखल पात्र" झाले याची जाणीव करून देणे हा या लेखा मागचा मुख्य उद्देश आहे.


(खंडेराव अहिल्येचा शाही लग्न सोहळा)


राजपुत्र खंडेराव मराठा साम्राज्याचे थोर, मुत्सद्दी सुभेदार राजश्री मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक पुत्र. त्यांचा विवाह चौंढी गावाचे पाटील मानकोजी शिंदे यांची एकुलती एक मुलगी अहिल्या हिच्याशी झाला. त्यावेळी खंडेरावांचे वय १४ वर्षे आणि अहिल्याबाईंचे वय १२ वर्षे होते. हा विवाह सोहळा संवत १७९४ म्हणजेच  इ. सन १७३७ च्या २० मे ला पुणे येथील पेशव्यांच्या शनिवारवाडयावर मोठ्या थाटामाटात पेशव्यांच्याच पुढाकाराने पार पडला. या सोहळ्याचे यजमानपद खुद पेशवे बाजीराव व रघुनाथरावांनी आपल्याकडे घेतले होते.

                  बर्‍याच संदर्भ ग्रंथात खंडेरावांचा हा विवाह पेशवे बाजीरावांच्या मध्यस्थीने निश्चित झाला होता असा उल्लेख आहे. आणि हे सत्य आहे. त्यामुळेच त्यांनी मुलीकडील म्हणजेच मानकोजी शिंदे यांचेकडील बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली होती. मानकोजी शिंदे म्हणजे राजश्री मल्हाररावांच्या तुलनेत अत्यंत गरीब. विवाह सोहळ्याप्रसंगी मुलाकडील राजदरबारातील थाट व मानसन्मान सांभाळणे मानकोजीना आवाक्याबाहेर होते. याची कल्पना सुभेदार मल्हारराव व पेशवे बाजीराव यांना असल्यामुळेच दोघांनीही संगनमत करून वधू पक्ष सांभाळण्याची जबाबदारी पेशवे बाजीरावांनी आपल्याकडे घेतली व विवाह सोहळ्याचे यजमानपद स्विकारून सोहळा शनिवारड्यावर थाटामाटात पार पाडला.   

              त्याकाळात  सलग पाच दिवस थाटामाटात चाललेला हा विवाह शाही स्वरूपाचा होता. खंडेराव-अहिल्येचा हा विवाह म्हणजे मराठा इतिहासाचे सोनेरी पानच होते. या विवाह प्रसंगावरून होळकरांच्या तत्कालीन प्रभावाची व दरार्‍याची आजही आपल्याला कल्पना येते. या सोहळ्याची दिव्यता एवढी होती की, या सोहळ्या प्रसंगी खुद छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अहिल्येच्या साळी-चोळीसाठी चोळ हे गाव अहिल्येला आंदण म्हणून दिले. याशिवाय महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्याचे यजमानपद प्रत्यक्ष पेशव्यांकडे होते.

     एकुलत्या एक मुलाचा विवाह असल्याने सुभेदार मल्हारराव व गौतमाबाई सोबतच संपूर्ण होळकर संस्थांनासाठी हा सोहळा म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण होता. पुरुषोत्तम कृत अहिल्याबाईंच्या चरित्रात त्यांच्या लग्नाविषयी पुढील प्रमाणे उल्लेख मिळतो.                     “अहिल्याबाईचे लग्न मल्हारराव होळकरच्या खंडेराव नामक पुत्राशी झाले, हा संयोग केवळ तिच्या भाग्यात परमेश्वराने अपार संपत्ती, स्वतंत्र राज्योयोपभोग व दिगंत किर्ति लिहिली होती. म्हणूनच हा योग जुळून आला होता. मल्हारराव यावेळी धनगरांचा राजा झाला होता व त्याचे जवळ पैकाही खूप होता.”


               या उल्लेखावरुन असे लक्षात येते की खंडेरावाच्या विवाहप्रसंगी मल्हाररावांचा सर्वत्र दरारा निर्माण झाला होता. शिवाय तोपर्यंत ते मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत सुभेदार बनले होते, ही बाब स्पष्ट होते.

                याचाच परिणाम स्वरूप होळकर राजघराण्यातील हा विवाह सोहळा असल्याने संपूर्ण भारतातील जवळपास सर्वच राजे, महाराजे, सरदार पुण्यात उपस्थित झाले होते. याला कारणही तसेच होते. कारण भारतात असा कोणताही राजा, सरदार नव्हता की, ज्याला मल्हाररावांनी मदत केली नव्हती.

        या बाबीची प्रचिती त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा अहिल्याबाईंना आली होती.        

       होळकर घराण्यात जेव्हा कोणीही वारस उरला नव्हता, अशा परिस्थीतीत राघोबा पेशव्याने होळकर संस्थान गिळंकृत करता येईल या दुष्ट वृत्तीने संस्थांनावर वाकडी नजर टाकली. त्यावेळी राजमाता अहिल्याबाईनी सर्वांना मदत मागितली, तेव्हा त्यांना सर्व स्तरातून मदत मिळाली. या प्रसंगाच्या संबंधाने “होळकरांची कैफियत” मधील उल्लेखानुसार वरफडच्या सरदाराने “मल्हारजींचा उपकार नाही असे कोण नाही? प्रसंगास आपले जवळचे समजावे.”  असे लिहून पाठविले, यावरून असे लक्षात येते की, राजश्री मल्हाररावांचा सर्वत्र दरारा होता. शिवाय त्यांचे उपकार संपूर्ण भारतातील अनेकांवर होते तसेच त्यांचे संबंध सर्वांशी चांगले व सन्मानाचे होत्ते, ही बाब लक्षात येते.

              म्हणूनच खंडेरावांच्या विवाहाचे निमंत्रण सर्वांना देणे अगत्याचे होते. त्यादृष्टीने लेखी निमंत्रण पत्रिका पाठवून सर्वांना निमंत्रित करण्यात आले. त्यासाठी निमंत्रण पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या होत्या. राजश्री मल्हारपुत्र खंडेराव व अहिल्याबाई यांच्या लग्नाची ती पत्रिका पुढील प्रमाणे होती.


       “अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मलारजी होळकर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करणे. हयानंतर चिरंजीव राजेश्री खंडेराऊ ह्यांच्या लग्नाची तीथ जेष्ठ शुद्ध ७ सुरजेस कर्तव्य निश्चय जाला आहे. तरी आपण येवून लग्नमंडप शोभिवंत करावा. रवाना  चंद्र २१ मोहरम हे विनंती.” 

                     नियोजित २० मे १७३७ ला हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बर्‍याच पुस्तकांमध्ये खंडेरावांचा विवाह १७३३ मध्ये दाखविलेला आहे. पुरुषोत्तमकृत अहिल्या चरित्रात आहील्याबाईंचा विवाह वयाच्या आठव्या वर्षी इ.स. १७३३ मध्ये मल्हारराव होळकरांच्या खंडेराव नामक मुलाशी झाला असा उल्लेख सापडतो. असे असले तरी मूळ संशोधनपर ग्रंथातील संदर्भ लक्षात घेवून २० मे १७३७ ही तारीख मी ग्राह्य मानली आहे. हा पाच दिवशीय जंगी विवाह सोहळा उरकल्यावर वाद्ये, वाजंत्री, पालख्या, समान घेवून वरात पुण्यातून इंदोरकडे रवाना झाली. पूर्वीची अहिल्या मानकोजी शिंदे आता अहिल्या खंडेराव होळकर झाली होती. एकीकडे खंडेरावांची धर्मपत्नी तर त्याच वेळी दुसरीकडे एका समृद्ध, महापराक्रमी होळकर घराण्याची सून, इंदोर संस्थांनाची भावीभावी पालक रूपात तिने इंदोर राजवाड्यात पाऊल टाकलं. तो दिवस आहिल्याबाईंच्या जीवनाला वळण देणारा ठरला. तेव्हापासून आता खंडेरावांची जबाबदारी सुद्धा वाढली होती. 


                        शाही विवाह सोहळा असल्याने या प्रसंगी मोठया प्रमाणात भेटवस्तु व अहेर प्राप्त झाला होता. त्यापैकी काही निवडक महत्वाच्या बाबींचा उल्लेख याठिकाणी करावासा वाटतो. या विवाह सोहळ्यातील सर्वात मोठी भेट छत्रपती शाहू महाराजांनी अहिल्याबाईंना साळी-चोळीसाठी म्हणून चोळ नावाचे गाव आंदन म्हणून दिले होते तर पेशव्यांकडून या विवाह सोहळ्यात मल्हाररावांच्या सुनबाई म्हणजेच अहिल्याबाईना तत्कालीन रुपये २७२५ रकमेचे २०० तोळे सोन्याचे नग तयार करण्यात आले. तर मल्हाररावांच्या मुलाचे लग्न म्हणून वधू वरास ४०२ रुपये १४ आणे किमतीचे वस्त्र वराती समयी दिल्या गेले. ही रक्कम आजच्या परिस्थितीत करोडो च्या आकड्यात असेल, यावरून एवढे स्पष्ट होते किंवा सांगता येते की, मल्हारराव होळकरांचे पेशवे घराण्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्यांचा छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात सुद्धा मान होता. म्हणूनच खंडेरावांचा विवाह हा केवळ होळकरशाहीचा नाही तर मराठेशाहीचा पारीवारिक सन्मान सोहळा ठरला होता.  

         हा सोहळा होळकरशाहीला व त्यांचे वंशज मानणाऱ्या प्रत्येकाला स्वतःचे महाराष्ट्रातील राजकारणात स्थान यासंबंधी आत्मचिंतन करायला लावणारा आहे.....

तेव्हा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन वर्तमानाचे आत्मचिंतन सर्व स्तरातून व्हावे हीच या लेखा मागची अतिशय प्रामाणिक निष्कलंकित इच्छा... अपेक्षा...

------------------------


(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)
 डॉ. प्रभाकर लोंढे

Sunday, October 16, 2022

आजचे मतदारसंघ म्हणजेच ऐतिहासिक किल्ले...

 आजचे मतदारसंघ म्हणजेच ऐतिहासिक किल्ले...


डॉ प्रभाकर लोंढे 



धनगरांचा इतिहास आणि त्यातही पेशवाईच्या इतिहास जर पाहिला तर मराठ्यांच्या पराक्रमांमध्ये धनगरांच्या तलवारीचा पराक्रम महान होता. म्हणूनच काश्मीर ते कन्याकुमारी कच्छ गुजरात ते बंगाल अशा संपूर्ण भारतात धनगरांच्या हातात असलेल्या राजकीय सत्तेने विकासाची काम केली.. याचे नमुने आजही पाहायला मिळतात. 

        तत्कालीन धनगरांना ते तेव्हा शक्य झालं कारण ते तत्कालीन परिस्थितीनुसार  धनगर वागले. त्यांनी तलवारीच्या भरोसावर प्रत्येक किल्ले काबीज केले. काही मुसद्देगिरीच्या भरोशावर मिळवून घेतले. काही किल्ले पराक्रमाने शासकाला प्रभावित करून मिळवून घेतले. कारण किल्ले ही तत्कालीन राजकीय सत्ता प्राप्तीची केंद्र होती. त्या किल्ल्यांमधून त्यांनी आपली स्वतःची प्रशासन यंत्रणा, आपली कायदे व्यवस्था स्वतःच निर्माण केली, किल्यां मधून राज्यव्यवस्था चालविली जात होती. याचे उत्तर उदाहरण म्हणजेच "होळकरशाही".....

      याशिवाय धनगरांच्या जीवनातील किल्ल्यांचे दुसरे उदाहरण देता येईल. (ज्यावर मी यापूर्वी स्वतंत्र असा लेख लिहिला होता). "आसा अहिर" नावाच्या धनगरांनी एक किल्ला बांधला होता, अत्यंत कठीण,  शत्रूंनी स्वबळावर कधीही पराक्रमाने जिंकलेला नाही, तर केवळ फंद फितूरी करूनच जिंकता आला, हा त्यांचा इतिहास. त्याला "दख्खनद्वार" म्हटलं जात होतं, तो असिरगड.. उत्तरेतील ज्याला कोणाला दक्षिणेवर राज्य करायचं असेल त्याला सर्वप्रथम असीरगड जिंकावा लागत होता. म्हणूनच त्याला दख्खन द्वार म्हटलं जातं...

           एवढे मोठे किल्ले व त्या किल्ल्यांमधून राजकीय सत्तेचं संचलन धनगरांनी केलं असेल तर आजच्या लोकशाहीच्या काळामध्ये धनगरांना मतदार संघाच्या माध्यमातून राजकीय सत्ता हस्तगत करणं का शक्य नाही?

       ती राजकीय सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून मतदारसंघ हे राजकीय सत्ता प्राप्तीचे महाद्वार आहे.  त्या महाद्वारात प्रवेश करणार नाही तोपर्यंत आम्हाला सत्तेची दारं कधीच उघडी होणार नाही. तोपर्यंत आम्हाला चोरवाटांनीच सत्तेपर्यंत जावं लागेल. तोपर्यंत  सत्ता हे धनगरांसाठी लोकशाहीतील दिवास्वप्नच असणार आहे.

             लोकशाहीचं वास्तव हेही आहे की, प्रत्येक मतदारसंघात मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी झाल्याशिवाय सत्ता हस्तगत करता येत नाही. म्हणून विविध सामाजिक समीकरणे जोडून लोकांचा विश्वास संपादन केल्यास निवडणुकीच्या प्रसंगी त्या विश्वासाला सत्तेपर्यंत जाण्याचं साधन बनवता येईल. त्यासाठी तसा प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण या जगातील सत्य हा परमेश्वर सुद्धा प्रयत्नाने प्राप्त होतो, असाच जनतेचा विश्वास आहे.

      सत्ता प्राप्तीचा अतिशय महत्त्वाचा आणि धनगरांसाठी गंभीर असलेला विषय म्हणजे "उमेदवारी प्राप्त करणे". आज पर्यंत या महाराष्ट्रात कुठल्याच मोठ्या पक्षांनी धनगरांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात तर सोडाच कधी उमेदवारीच दिलेली नाही. त्यांना सत्तेची दारं बंद कसे करता येतील, याचाच विचार केलेला आहे. तेव्हा जिथे मिळत असेल तिथे उमेदवारी प्राप्त करून जनतेच्या विश्वासाला पात्र होणे. त्या विश्वास संपदानातून सत्ता संपादन करणे आणि सत्ता संपादनातून जमातीच्या इतिहासातील असलेल्या वैभवाला पुनर्वैभव प्राप्त करून देणे, अत्यावश्यक आहे.

        त्यासाठी तत्कालीन ऐतिहासिक किल्ल्यांप्रमाणे आजचे "मतदारसंघ" काबीज करण्याशिवाय धनगरांकडे दुसराही पर्याय नाही...



----------------------


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे खासदारकी मिळाली होती!?

 खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे खासदारकी मिळाली होती!?

डॉ प्रभाकर लोंढे


         दोन दिवसापूर्वी एक (सौरभ हटकर आणि संतोष महात्मे) या दोन बांधवांचा वाद- संवाद ऐकला, त्या संवादामध्ये आदरणीय संतोष महात्मे यांनी एक वाक्य वापरले, की, "धनगरांच्या प्रश्न/ आंदोलनामुळे डॉ. विकास महात्मे साहेबांना  खासदारकी मिळालेली नाही, तर त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातील योगदान, पद्मश्री (लता मंगेशकर प्रमाणे) या बाबींमुळे त्यांना खासदारकी मिळाली. त्यांच्यातील वादाचा मोठा मुद्दा सोडला तर हे ऐकून खूप चांगलं वाटलं. परंतु मला एक प्रश्न निर्माण झाला आणि तो वारंवार सतावतो आहे म्हणूनच हा लेखन प्रपंच... की, 

खरंच डॉ. महात्मे साहेबांच्या पद्मश्रीमूळे/वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे खासदारकी मिळाली होती!?

      याचे उत्तर "होय" असेल तर अतिशय उत्तम, कारण ही व्यवस्था धनगरातील गुणवत्तेची कदर करायला लागलेली आहे.

महाराष्ट्रातील नेत्रतज्ञ क्षेत्रातील पद्मश्री प्राप्त एक महत्त्वाचं नाव म्हणजेच डॉ. 'विकास महात्मे' असं मला वाटत होतं. इतकं मोठं "नेत्रतज्ञ" म्हणून महत्त्वाचं व्यक्तीत्व धनगर जमातीत असल्याचा अभिमान प्रत्येकालाच वाटावा,  ही अत्यावश्यक बाब असली तरी 2013 पूर्वी डॉ. विकास महात्मे साहेब धनगर असल्याचा अनेकांना संशय येत होता. त्या अगोदर त्यांनी कधीही स्वतःला धनगर म्हणून प्रोजेक्ट केलेलं नव्हतं. किंवा  धनगरांच्या     

कुठल्यातरी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कधीच आढळलेले नाही. (कदाचित असेलही? ) परंतु मला माझ्या 2003 पासूनच्या धनगर जमातीच्या अभ्यासामध्ये दिसले नाही. होऊ शकते माझा अभ्यास तिथंपर्यंत पोहोचला नसावा....

         खरं काय ते संपूर्ण समाज जाणतो आहे. २०१३-१४ च्या समस्त धनगरांच्या दृढ भावनेच्या आधारे तन-मन-धनातून उभं राहिलेलं जनआंदोलन त्यांच्या घटनात्मक अधिकारासाठी होतं. वर्षानुवर्षीपासून चालू असलेला अन्याय आता संपणार, त्यासाठी सर्वांनी मिळून मोठ्या ताकतीने व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारला. संपूर्ण महाराष्ट्र धनगरांच्या मोर्चा, आंदोलन उपोषण यांनी वेठीस धरला, एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात धनगर जमात आहे, याची प्रचिती सर्वांना आली. इतरांना धनगरांच्या संख्येची जाणीव झाली. ‌

      धनगरांच्या आंदोलनाची धग, त्या आंदोलनातील आक्रोश, आवेश आणि उर्मी पाहून येथील व्यवस्था व प्रस्थापित नेते घाबरले होते हे मात्र नक्की.. अशा त्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला एकछत्री नेतृत्व देणे हा धनगरांपुढे मोठा प्रश्न होता. 

      पहिल्याच अडाणी, अशिक्षित धनगरांना त्या "पद्मश्री व नेत्रतज्ज्ञ" शब्दाची भुरळ पडली. पहिलाच भावनाप्रधान समाज आणि त्यातही नेतृत्वाचा अभाव, यामुळे सर्वांनी त्या पद्मश्री व नेत्रतज्ञ या शब्दाला हृदयात घेऊन डॉ. विकास महात्मे साहेबांचा नेतृत्व म्हणून स्वीकार केला.  

       धनगर आंदोलनाचं नेतृत्व आता डॉ. विकास महात्मे साहेबांनी आपल्याकडे घेतलं.  देवभोळ्या, अंधश्रद्धाळू, अंधविश्वासू धनगरांच्या आंदोलनाचं भवितव्य आता महात्मे साहेबांच्या हातात आलं.. त्यानंतर धनगरांचंं आंदोलन टप्प्याटप्प्याने कसं शांत शांत होत गेलं, हे मी किंवा इतर कोणी समाजाला किंवा अन्य कोणाला सांगण्याची गरज नाही, प्रत्येक जण ते जाणतो आहे. 

       इतिहासात राजकीय सत्ता भोगणाऱ्या धनगरांना आज आपण येथील राजकीय सत्तेत नसल्याची कधी नव्हे ती जाण झाली. ती काही वेळेस करून देण्यात आली. धनगरांचा प्रश्न संसदेत मांडण्यासाठी डॉ. विकास महात्मे साहेबांची राज्यसभेसाठी सेटिंग सुरू झाली.

          पहिलेच धनगरांच्या आंदोलनाने घाबरून गेलेल्या व्यवस्थित प्रस्थापित नेत्यांनी ही बाब हेरली. आणि धनगरांचं आंदोलन दडपायचं असेल तर "नेताच" आपल्या काबूत घ्यायचा, या तत्त्वाने डॉ. विकास महात्मे साहेबांना राज्यसभेमध्ये खासदारकी देण्यात आली. डॉ. विकास महात्मे साहेबांनी स्वीकारली. धनगरांचे प्रश्न राजदरबारी मांडण्यासाठी मी राज्यसभेची खासदारकी स्वीकारली, आसा काही ठिकाणी स्वतः डॉ साहेबांनी कबुली जवाब सुद्धा दिला. याचे साक्षीदार समाजात अनेक आहेत.

        राज्यसभेतील गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी धनगरांच्या प्रश्नाला किती मार्गाला लावलं? किती प्रश्न सोडवले? कितीला पाने पुसली? हे आदरनीय डॉ विकास महात्मे साहेबांचे वैयक्तिक प्रश्न असले तरी धनगरांच्या आंदोलनाचा त्यांच्या राज्यसभेतील खासदारकीमध्ये १००% वाटा ते नाकारू शकत नाही. सहा वर्षे खासदारकी उपभोल्यानंतर जर ती खासदारकी पद्मश्री व नेत्रतज्ञ म्हणून मिळाली होती, असं  माननीय संतोष महात्मे साहेब किंवा कोणी म्हणत असेल तर यापुढे सुद्धा ती कायम राहिली पाहिजे.... त्यासाठी डॉ. महात्मे साहेब प्रयत्न करतील. राज्यसभेमध्ये जातील परंतु आपल्या राजकीय जीवनातील धनगरांचे स्थान ते कदापिही विसरू शकणार नाही. त्यांना विसरता येणार नाही.

       ते अगदी खर आहे की, त्यांच्या पद्मश्री व नेत्रतज्ञ यामुळे त्यांना धनगर समाजाने स्वीकारलं. डोक्यावर उचलून घेतलं. त्यामुळे ते धनगरांच्या गळ्यातील ताईत बनले.  आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना धनगरांसाठी खासदारकी दिली.. 

एवढं सर्वांना मान्य करावंच लागेल की, डॉ. महात्मे साहेबांच्या खासदारकीचा/ त्यांच्या राजकीय जीवनाचा मार्ग धनगराच्या आंदोलनातून जातो हे सर्वांना सदा सर्वकाळ मान्य करावंच लागेल.   

         हे सत्य आहे की, राजकीय नेत्यांना खोटं बोलावचं लागतं परंतु धनगर नेत्यांनी जमातीत खोटं बोलू नये. जेवढं बोलायचं आहे, तेवढे धनगराच्या हितासाठी बाहेर जाऊन बोलावं,  धनगरांमध्ये कोणीही भ्रम पसरवू नये. चुकीच्या बाबीचे कोणीही समर्थन करू नये, एवढीच या लेखणा मागची अपेक्षा आहे..


(सदर लेखाला आ. डॉ. विकास महात्मे साहेबांच्या भक्त किंवा विरोधकांनी भावनात्मक न होता वाचावा. ही विनंती)


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

Monday, October 10, 2022

धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?

 धनगर नेते मतदार संघावर केंद्रित का होत नाही?


डॉ प्रभाकर लोंढे


            परळी म्हणलं तर मुंडे, संजय राठोड - दारव्हा, नारायण राणे परिवार-सिंधुदुर्ग कोकण, पवार परिवार- पुणे बारामती,  गोंदिया+भंडारा- प्रफुल्ल पटेल, नाशिक- भुजबळ परिवार, गडकरी- नागपूर, फडणवीस- नागपूर, सांगोला-स्व गणपत आबा देशमुख, अकोला- प्रकाश आंबेडकर, नवनीत रवी राणा- अमरावती अशी अनेक मतदार संघ आपल्याला सांगता येईल की; ज्यांची ओळखच त्या राजकीय नेत्याच्या नावाने झालेली आहे. याचा अर्थ त्यानी त्या मतदारसंघाला आपला बालेकिल्ला बनवलेला आहे. आपली स्वतःची ओळख त्या मतदारसंघाच्या माध्यमातून करून घेतलेली आहे. त्या त्या मतदारसंघांमध्ये जनसंपर्क वाढवून स्वतःची एक प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे केवळ आपला जातीच्या नाही तर विविध समाजातील कार्यकर्त्यांची फौज आहे..‌‌         

      जेव्हा जेव्हा राजकीय सत्ता मिळाली तेव्हा राजकीय सत्तेचा वापर करून तेथील विकास कामांना महत्व देऊन सामाजिक समीकरणे आपल्याला पोषक करून घेतलेली आहे. जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे. तेथे आपला सातत्याने विजय होत राहील याची काळजीच नाही तर नियोजन केलेला आहे. परिणाम तर त्या त्या मतदारसंघातून त्यांना हरविणे कठीण नसले तरी सहज शक्य होत नाही.. 

      या ठिकाणी सांगायचं हेच आहे की त्या त्या नेतृत्वाची तेथील जनमाणसामध्ये

राजकीय सत्तेत असो वा नसो एक छबी निर्माण झाली, त्यांनी त्या मतदारसंघात आपला सत्तेत जाण्याचा मार्ग निश्चित केलेला आहे. 

      त्यांनी कधीही आपल्या जातीचं, जातीच्या प्रश्नांचं, जमातीच्या भावनांचं भांडवल केलेलं दिसून येत नाही, किंवा आपल्या जातीचे भावनात्मक मुद्दे घेऊन त्यांनी कधी स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेलं नाही. (याचा अर्थ ते त्या विशिष्ट जाती जमातीचे नाहीत असा होत नाही),  त्यामुळेच ते विशिष्ट जातीचे नेते आहेत, या आधारे त्यांना कधी जनतेने स्वीकारले नाही. विविध जाती जमाती मध्ये त्यांचे असलेले कार्यकर्ते हाच त्यांच्या सर्वांगीण शक्तीचा उगम स्त्रोत असतो.

         धनगर जमातीच्या विद्यमान नेत्यांमध्ये काही विशिष्ट अपवाद नेते सोडले तर ते केवळ धनगर जमातीच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  आपण त्या धनगर जमातीचा महाराष्ट्राचा मोठा नेता आहो.  किती मोठ्या प्रमाणात धनगर माझ्या पाठीमागे आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. हे ते का करतात? त्यांचं त्यांनाच माहित. परंतु पक्षश्रेष्ठीला खुश करून जमातीच्या बहुसंख्येच्या आधारे आपल्याला एखादं राजकीय पद मिळावं, ही अपेक्षा नाकारता येत नाही. 

        आणि आज पर्यंतच्या बहुतांश धनगर नेत्यांचा तो छुपा अजेंडा राहिलेला आहे, हे अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे. तेव्हा हे नेते अखंड महाराष्ट्रामध्ये धनगरांचे नेते म्हणून मिरवत बसण्यापेक्षा एखाद्या मतदारसंघांमध्ये आपलं वजन का निर्माण करीत नाही??  एखाद्या मतदारसंघातील सामाजिक समीकरणे का बांधत नाही?? त्या विशिष्ट मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना घेऊन पक्षश्रेष्ठींकडे का जात नाही?? मतदारसंघांमध्ये स्वतःला गुंतवून घेऊन त्या मतदारसंघात आपली स्वतःची ओळख का निर्माण करून घेत नाही??

जमातीच्या प्रश्नांच्या भांडवलाच्या आधारे एखाद्या वेळेस आमदारकी खासदारकी उपभोगल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच भावनात्मक मुद्द्यांच्या आधारे स्वतःचं राजकीय स्वहित का साध्य करू इच्छितात?

         विधानसभा राज्यसभेच्या माध्यमातून मिळालेल्या राजकीय सत्तेतून किंवा अन्य मार्गातून मिळालेला अमाप पैसा, त्यातून कार्यकर्ता निर्माण झाला असताना एखाद्या मतदारसंघावर ते केंद्रित का होत नाहीत? त्यांना लोकमताच्या आधारे निवडून जाण्याची हिंमत का होत नाही??हा मोठा प्रश्न निर्माण होतो व वैतागून समर्पक उत्तरासाठी सार्वजनिक करावासा वाटतो..


उत्तराच्या अपेक्षेत! प्रतिक्षेत!!


डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर नेतृत्व आणि राजकीय जागृतीचा अभ्यासक)

Thursday, September 29, 2022

महाराष्ट्राची नीती समजून घेतल्याशिवाय धनगरांचा राजकीय उध्दार नाही.

 महाराष्ट्राची नीती समजून घेतल्याशिवाय धनगरांचा राजकीय उध्दार नाही.


डॉ प्रभाकर लोंढे

          हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराया नंतरचा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच पेशवाईचा इतिहास होय. आणि पेशवाईचा इतिहास म्हणजेच होळकरांच्या तलवार आणि मुसद्देगिरीच्या बळावर विस्तारित झालेला आणि शिंदे यांची कुबडी मिळाल्याने मजबूत झालेल्या पेशवाईचा झेंडा अटकेपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वीरानी केलं तो वीर म्हणजे " सुभेदार मल्हारराव होळकर."

      शिंदे यांचे मूळ पुरुष राणोजी शिंदे यांना "पागा" म्हणून    

पेशवाई मध्ये स्थान ज्यांनी मिळवून दिलं व पागा म्हणून पेशवाईत प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या करंगळीला पकडून मल्हारराव होळकरांनी ज्याला मोठा केलं  हेच ते "राणोजी शिंदे" पुढे पेशवाईचा होळकरा नंतरचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनले.. या महाराष्ट्राच्या नाहीतर संपूर्ण भारताच्या राजकीय पटलावर शिंदे राजघराण्याचा उदय झाला.

       पुढे होळकर - शिंदे यांची जोडी त्यांच्या युद्धनीती व पराक्रम यासाठी संपूर्ण भारतात ओळखली जाऊ लागली. दोघांनी मिळून पेशवाईचा झेंडा अटकेपार फडकविला... मराठ्यांचा इतिहास तलवार आणि युद्धनीतीच्या जोरावर घडविला. प्रसंगी दिल्लीच्या बादशहाला घाबरविणारा आणि स्वामिनिष्ठा व नैतिकता असल्याने दिल्लीच्या तख्तावर बसण्याची संधी सोडणारा थोर सुभेदार मल्हारराव होळकर जीवनभर शिंदे,पवारां सह मराठा सरदारांना मान, स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा शिकवित राहीला.

     यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की, शिंद्यांना पेशवाई मध्ये राजकीय सत्ता आणि सरदार म्हणून स्थान व महत्त्व मिळवून देण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केलं. स्वतःच्या मुलाप्रमाणे राणोजी शिंदे यांच्या मुलांना रणांगण व राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी राजकारण युद्धनीतीचे डावपेच शिकविले, त्याच शिंदेंचा मुलगा जयप्पा शिंदे यांनी सुभेदार मल्हाररावांचा एकुलता एक पुत्र शूरवीर खंडेरावांना ज्या सुरजमल जाटानी मारलं, त्या सुरजमल जाटाला अभय देण्याचं विश्वासघातकी काम केलं.                    

          "सुरजमल जाटाचा शिरछेद करून कुंभेरीची माती यमुनेत टाकीनं तरच जन्मास आल्याचे सार्थक! नाही तर प्राणत्याग करीन!," या आपल्या प्रतिज्ञेवर, मराठ्यांमध्ये एकोपा टिकून राहावा, या राष्ट्रीय भावनेला जपण्यासाठी महापराक्रमी मल्हाररावांनी पाणी सोडलं. स्वतःच्या एकुलता एक मुलाच्या मृत्यूचं दुःख, घोर अपमान, विश्वासघात राष्ट्रहितासाठी पचविला. स्वतःला सांभाळात स्वामीनिष्ठा जपत पुन्हा राष्ट्र रक्षणासाठी स्वतःला झोकून दिलं.... 

       स्वतःची गादी सांभाळण्यात मग्न असणाऱ्या स्वामी पेशव्याशी जिवनात कधीही गद्दारी केली नाही. सहकाऱ्याचा वाटा न्यायाने दिल्याशिवाय राहीला नाही. "न्यायाला न्याय आणि दुश्मनालाही सन्मान" यासाठी दुश्मनाचाही सन्मान जनक अंतिम संस्कार ज्यांनी केला, तो थोरणी मुत्सद्दी सुभेदार मल्हारराव!

          दुश्मनाच्या स्त्रियांनी सुद्धा आपली इज्जत धोक्यात असताना लज्जा रक्षणासाठी   "मल्हार! तू कहा है?," या विश्वासानी आठवण करावी, प्रसंगी स्वतःच्या कमरेचा शेला  दुश्मनाचे(बादशहाच्या) स्त्रियांच्या लज्जा रक्षणासाठी ज्यानी दिला.. परिणामी, "मल्हार, आप यहा होते, तो हमारे उपर ऐसा गजहब नहीं होता!" अशा शब्दांत ज्या मल्हाररावां विषयी परस्त्रियांनी विश्वास व्यक्त केला,

         तो नीतीवंत मल्हारराव जीवनभर नैतिकता, स्वामीनिष्ठा, पराक्रम, बुद्धीचातुर्य, राष्ट्राभिमान, राष्ट्रनिष्ठा, परस्त्री सन्मान, स्वअस्तित्व निर्माण यासाठी जगला आणि स्वतःचा प्रत्येक श्वास मराठेशाही, पेशवाई जिवंत ठेवण्यासाठी खर्ची घातला. अशा त्या सुभेदार मल्हारराव होळकरांना जीवनाच्या शेवटच्या काळात पानिपतच्या युद्धातील मराठ्यांच्या पराभाचे खापर फोडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.. 


वाचकांनी समालोचनात्मक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन आपल्या सद्सद्विवेक बुद्धीच्या आधारे महाराष्ट्रातील सर्वांगीण नीती समजून घेण्याचा प्रयत्न करावा.. एवढीच अपेक्षा..




डॉ प्रभाकर लोंढे

(धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक)

Saturday, September 10, 2022

धनगरांना कपडे नाही तर नीती बदलण्याची गरज

 धनगरांना कपडे नाही तर नीती बदलण्याची गरज


डॉ प्रभाकर लोंढे


       शीर्षक वाचता बरोबरच काही बांधवांना या माझ्या विचारांचा कदाचित राग सुद्धा आलेला असेल, काहीतर फालतू लिखाण करत अकलेचे तारे तोडण्याचा आरोप सुद्धा माझ्यावर करून स्वतः मोकळे होण्याचा प्रयत्न करेल. असो! प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्यामुळे तो प्रत्येक वेळी प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. अशा मताचा मी आहे. त्याचाच आधार घेऊन मी हे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

         धनगर ऐतिहासिक समृद्ध जमात, धनगर सामाजिक सांस्कृतिक राजकीय वारसा लाभलेली जमात, असं प्रत्येक जण सांगताना दिसतोय, त्या आधारे छाती फुलवताना/ फुलवताना पण दिसून येतोय, खरच तो त्याचा अधिकार आहे, तो सुद्धा वापरलाच पाहिजे परंतु त्याचं तसेच धनगरांच्या प्रश्नांचं भांडवल करून स्वतःची पोळी भाजणारा धनगर दिसून येतो तेव्हा तो त्याच्या वारशावरच प्रश्नचिन्ह स्वत:च निर्माण करतो. हे करीत असताना कदाचित त्यांना याची कल्पना येत नसेल किंवा कल्पना येत असली तरी त्याच्या वाईट परिणामाची जाणीव नसल्याने? कदाचित ते तसे वागत असावे. 

           ते आपले ध्येय, निर्णय एका धनगर विरोधी विशिष्ट व्यवस्थेला पोसणारे आहेत हे सामान्य धनगरांपर्यंत पोहचूच देत नाही, कळू सुद्धा देत नाही. किंवा ते लपवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. त्यासाठी जमातीच्या प्रश्र्नांची लत्करे (स्वत:च  केलेली) पांघरूण नव्या रुपात नव्या उत्साहाने नि: संकोचपणे जमातीत फिरायला तयार होतात..... फिरताना दिसतात... फिरतात.

          या ठिकाणी त्यांनी ज्याप्रमाणे कपडे बदलावे त्याप्रमाणे त्यांचा तो कार्यक्रम चालू असतो. यावर काहीच हरकत नाही, कोणी किती वेळा कपडे बदलायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे परंतु जमातीला, जमातीमध्ये इमानेइतबारे काम करणाऱ्या स्वयंसेवी आणि समाज धार्जिण्या जमात बांधवांना नागडं करून कपडे बदलण्याचा यांचा कार्यक्रम जमातीसाठी पुढच्या पिढीला खूप घातक आहे.  तो जमातीच्या व इतर कोणाच्याच हिताचा नसतो. गुलामांची पिढी पैदा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारा त्यांचा उपक्रम मात्र नक्कीच सिध्द होतो. 

               धनगर आरक्षणाच्या नावावर कपडे बदलणारे जमातीला सुपरिचित झाले. राजकीय सत्तेसाठी कपडे बदलणारे सर्वांनी पाहीले. एका खासदारकीसाठी कायदेशीर धनगर आंदोलनाचे, आंदोलनातील सच्च्या कार्यकर्त्यांचे सामान्य धनगरांचे कपडे फाडणारे पाहीले, आज अख्या धनगर जमातीच्या ईज्जतीची लत्करे वेशीवर टांगून ठेवणारे नवीन कपडे घालून जमातीत फिरण्याच्या तयारीत दिसत आहेत.  त्यांना धनगर हित रक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा! म्हणूनच हा लेख प्रपंच.

          त्यापुर्वी मात्र सामान्य धनगर बांधवांच्या वतीने एकच विनंती आहे, तुम्हाला काय काय बदलायचे आहे ते बदला, परंतु त्याअगोदर बहूतेकांना आपली नीती बदलणे आवश्यक आहे. 


        विद्येविना मती गेली

        मती विना नीती गेली

        नीती विणा गती गेली

         गती विना वित्त गेले.

         वित्ताविणं शुद्र खचले

         इतके अनर्थ एका अविद्येने केले.

        

          हा महात्मा फुले यांचा विचार समस्त शुद्रांच्या अधोगतीची कारणमीमांसा स्पष्ट करणारा मूलमंत्र प्रत्येक धनगरांनी समजून घेणे आवश्यक आहे. धनगरांना शुद्र माणायचं की नाही हा मोठा प्रश्न असला तरी जमातीची आजची अवस्था दयेवर जगणारी आहे. याचना करणारी आहे. मागुन खाणारी आहे. ही जमात आज राजकीय दृष्ट्या अतिशुद्र या प्रवर्गात मोडते, ही दुरावस्था घालविण्यासाठी प्रत्येकाला आपल्या नीती, कृतीमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे.

           जमातीची दुर्गती मतीहीन लोकांच्या नीतीहीन अनुनयाचा परिणाम आहे. त्यामुळेच जमात विकासाच्या बाबतीत गतीहीन (प्रवाहातून बाहेर फेकल्या गेली)  झाली.

जमात जागच्या जागी थांबली. निसर्गाचा नियम (थांबला तो संपला) आहे की, ज्याची गती ( बदलाचा वेग) थांबली, तो हळूहळू संपतो. 

म्हणून संपण्याच्या आधी धनगर जमातीने सावरणे आवश्यक आहे. त्यासाठी जमातीच्या प्रश्र्नांची जाण ठेवून दिर्घायुषी नीती निर्धारण म्हणजेच ध्येयधोरण व कृती कार्यक्रम आवश्यक आहे. तरच भावी पिढीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.....


धन्यवाद!!!!


डॉ.  प्रभाकर लोंढे 

धनगर राजकीय नेतृत्व 

आणि 

जाणीव-जागृतीचे अभ्यासक

९६७३३८६९६३

Friday, September 9, 2022

राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वैश्विक अद्वितीयता,

 राजमाता अहिल्याबाई होळकर यांची वैश्विक अद्वितीयता,

डॉ प्रभाकर लोंढे


          इतरांवर अधिराज्य गाजवण्याची प्रत्येकामध्येच नैसर्गिक प्रवृत्ती असते. इतरांवर प्रभाव निर्माण करण्याची अभिलाषा प्रत्येकच अंतर्मनात असते. यातूनच राजकीय सत्ता प्राप्त करून स्वतःला अपेक्षित असा जगाला आकार देण्याची उपभोग प्रामाण्यवादी अघोरी वृत्ती सुद्धा निर्माण होऊ शकते.

       यातूनच जग जिंकण्यासाठी निघालेला नेपोलियन असो की सिकंदर, मुस्लिम शासक बाबर असो की अकबर, चंद्रगुप्त मोर्या पासून कलिंगच्या युद्धापर्यंतचा सम्राट अशोक असो, किंवा शिवरायांनी निर्माण केलेल्या शिवशाहीच्या वारसांना हटवणारे पेशवे असो, एवढेच नाही तर इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणाच्या माध्यमातून स्वतःच्या साम्राज्यवादी नितीने जगात दबदबा निर्माण करणारे इंग्रज, राणी एलिझाबेथ शिवाय वारेन हेस्टिंग सारखे अनेक इंग्रज अधिकारी असो, किंवा आजच्या वर्तमानातील भारत, महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेसाठी चाललेली नितीभ्रष्टता असो, या सर्वांच्या पायाशी स्वार्थ, उपभोगवादी वृत्ती असून त्यासाठीच त्यांनी जीवन घालवलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या जीवनाचा अर्थच तसा निघतो आहे... 

     असे हे साम्राज्यवादी आणि अतिक्रमणकारी भूमिका असणारे भौतिकतावादाला  प्राधान्य देणारे जागतिक सम्राट जगाच्या लवकर लक्षात आले, जगाच्या नजरेत चटकन भरले. परंतु संपूर्ण जगाचा सर्वांगीण इतिहास लक्षात घेतला तर जगाच्या पाठीवर स्वतःच्या जीवनधर्म, कर्म, आणि बुद्धीप्रामाण्य यांच्या आधारे संपूर्ण जगात सुख, शांती आणि मानवतेची महती गाणारे, स्वकर्मातून मानवतेला अलंकारित करणारे राजे, महाराजे आणि त्यामध्येही महाराण्या यांना मात्र आपल्याला विशेष समजून घेणे आवश्यक ठरते.

      जगाच्या इतिहासामध्ये आपल्या कर्माने नावलौकिक कमाविणाऱ्या महाराण्यांचा शुक्ष्म अभ्यास केल्यास त्यामध्ये  मध्ययुगीन कालखंडात भारताच्या  इंदोर संस्थानात होऊन गेलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख जागतिक पातळीवर प्रथमस्थानी करावाच लागतो.  त्याशिवाय महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

     देश-विदेशातील ऐतिहासिक संदर्भाचा अभ्यास केल्यास महाराणी अहिल्याबाई होळकरांचा इ.सन १७६६ ते १७९५ असा २९ वर्षाचा माळवा प्रांतातील राज्यकारभार असला तरी तो संपूर्ण भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्त्री कर्तुत्वाला परमोच्च शिखरावर नेऊन पोचविणारा आहे. 

        स्वतःच्या वैयक्तिक सुख-दुःखाकडे लक्ष न देता, त्याच्यावर मात करीत धर्म, जात, लिंग, प्रांत या संकुचित भावनांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानव जातीच्या सुखात स्वतःच सुख शोधणं,  स्वतःकडे असलेल्या राजकीय सत्तेचा वापर लोककल्याणासाठी करीत असताना स्वतःच्या उत्तरदायित्वाचं स्थान 'स्वतःच' ईश्वराला निर्धारित करणं, त्याच्या साक्षीने सर्व लोकोपयोगी कार्य प्राधान्याने करणं, न्यायाधारित समाज निर्मितीला प्राथमिकता देत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, कोणीही दलित, शोषित, पिडीत, वंचित, उपेक्षित राहणार नाही, या सर्व बाबींची काळजी घेणारी आदर्श राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा विक्रम जर जगाच्या इतिहासामध्ये कोणत्या देशाच्या नावे दिसत असेल तर तो आहे भारत व त्यातही लोकमाता अहिल्याबाई होळकर या नावाचाच उल्लेख करावा लागतो.

      राजमाता अहिल्याबाई होळकरांनी धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाला लोककल्याणाचा मार्ग बनवले,  प्रत्येक हातात कौशल्य, कौशल्य पूर्ण हाताला काम व कामाचे उचित दाम, या तत्त्वावर राज्याचा आर्थिक, सामाजिक विकास साध्य करण्याचे मॉडेल अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यात तयार केले होते की, जे आजही जगाला दिशादर्शक आहेत. 

     चूल- मुल आणि उपभोग्य वस्तू याच्या पलीकडे तत्कालीन सामाजिक वास्तव तसेच परिस्थिती नसलेल्या त्या काळातील स्त्रियांच्या मनगटाबरोबर भयग्रस्त मनात बळ भरण्याचे कार्य करणारी, स्त्रियांच्या हातात तलवार देवून महिलांची फौज निर्माण करणारी जगातील पहिली राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा इतिहासात उल्लेख येतो . ही जगाच्या इतिहासामध्ये स्त्रियांच्या जीवनात क्रांतिकारी  बदल घडवून आणणारी  सर्वप्रथम बाब होती.

     राजमाता अहिल्याबाई होळकरांनी स्वतःपासून स्त्री शिक्षणास सूरवात केली व स्त्रियांच्या हातात सर्वप्रथम "शास्त्र" आणि स्त्रियांच्या फौजेच्या माध्यमातून "शस्त्र" दिले ही समाजाच्या व स्त्रियांच्या जीवनातील अतिशय मोठी ऐतिहासिक क्रांतिकारी घटना होती. 

    संपूर्ण भारताचा विचार केल्यास भारतामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सर्वांगीण उच्च पदास इतर कोणतीही भारतीय ऐतिहासिक स्त्री पोहचू शकली नाही. म्हणजेच तिच्याशी तुलना करू शकेल अशी कुठलीही भारतीय स्त्री भारताच्या इतिहासात दिसत नाही.

          अशा या महान सर्वांगीण महीला क्रांतिकारी राज्यकर्त्यीची तुलना जागतिक पातळीवर जर करायची ठरविली तर ती केवळ ऑस्ट्रियाची राणी  "मारीया थेरेसा" हिच्याशीच होऊ शकते.

       मारीया थेरेसा आणि अहिल्याबाई होळकर या जवळपास समकालीन होत्या. राणी मारीया युरोप मध्ये तर राणी अहिल्या आशियाई भारतात होवून गेली. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म इ.स.१७२५ मध्ये मे महिन्यातील ३१ तारखेला तर मारीया थेरेसा चा जन्म १७१७ मध्ये मे महिन्यातील १३ झाला होता. दोन्हीच्या जन्मामध्ये नऊ वर्षाचा फरक होता. राणी अहिल्या इ.स १७६६ मध्ये राजगादीवर आली तेव्हा ती ४१ वर्ष वयाची होती तर मारीया थेरेसा इ.स. १७४० मध्ये राजगादीवर आली तेव्हा ती तरुण केवळ २४ वर्ष वयाची होती. 

      मारीया थेरेसाने इ. सन१७४० ते  इ. सन १७८० असा ४० वर्ष राज्यकारभार केला तर अहिल्याबाई होळकरांनी इ.सन १७६६ ते इ.सन १७९५ असा २९ वर्षे राज्यकारभार केला. दोघीही राजगादीवर आल्या तेव्हा निराधार अवस्थे मध्येच आल्या. त्यांना अबला समजून त्यांची राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न दोन्ही कडे झाला. अहिल्याचे राज्य गिळंकृत करण्याचा राघोबा दादा पेशव्याने प्रयत्न केला तर तिकडे मारीयाचे जीवनात तसा प्रयत्न प्रशियाचा राजा फ्रेडरिक याने  केला. परंतु असा हा प्रयत्न आपल्या मुसद्देगिरीने दोघींनीही हाणून पाडला आणि शेवटपर्यंत स्वबळावर राज्यकारभार केला.


      मारिया जन्मताच राजघराण्यातील होती. ती रोमन सम्राट "चार्ल्स सहावा" याची मुलगी होती, त्यामुळे तिच्यावर जन्मताच राजसंस्कार झाले होते परंतु अहिल्याचा जन्म एका सामान्य माहदाजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला.  मेंढपाळ कुटुंबात जन्म झाल्याने तिचे बालपण सामान्य असले तरी तिच्या विवाह नंतर तिच्या जिवाला फार मोठी कलाटणी  मिळाली. सासरे सुभेदार मल्हारराव होळकर व सासू गौतमाबाई होळकर यांच्या सर्वांगीण संस्कारामुळे व शिलेदार खंडेराव होळकरांची पत्नी म्हणून त्यांच्यावर जे संस्कार झाले ते त्यांना उच्च पदावर नेऊन पोचविण्यासाठी कारणीभूत ठरले.

    मारियाचा एकुलता एक भाऊ अकाली मृत्यू पावल्यामुळे व राज्याला वारस नसल्यामुळे ती राज पदावर आली होती तर अहिल्या सुद्धा एकुलता एक मुलगा मालेरावांच्या मृत्युनंतर होळकर राजगादीवर आली होती. म्हणजेच त्या काळामध्ये महिलांना राजगादी सामाजिक दृष्टीने फार मोठा समस्या होती. अशाही परिस्थितीमध्ये दोघींनीही आपल्या राज्याला सुव्यवस्थित सांभाळण्याचे एवढेच नाही तर एक राजकीय आदर्श निर्माण करण्याचे कार्य केले.

       त्यांच्या कार्यकाळात राज्यविस्ताराची अभिलाषा दोघींनीही कधीच बाळगली नाही. त्यामुळे इतर राज्यांना गिळंकृत करण्याचा दोघींनी कधीच प्रयत्न केलेला नाही. मात्र  सैन्य व्यवस्था दोन्हीकडे मजबूत होती, ती केवळ स्वसंरक्षणासाठी होती. 

          मेरिया थेरेसाचा विचार केला तर सुरुवातीला तिच्याकडे केवळ १५००० इतकी फौज होती. ती वाढत जावून तिच्या शेवटच्या काळात १ लाख ७०००० वर पोहचली होती. या सैनिकी शक्तीचा वापर करून ती आपल्या राज्याच्या सीमा विस्तारू शकत होती परंतु तिने तिच्या शक्तीचा वापर इतर राज्यांना गिळंकृत करण्यासाठी किंवा साम्राज्य विस्तारासाठी कधीच केला नाही. 

        त्याच प्रमाणे राजमाता अहिल्याबाई होळकरांचा जर विचार केला तर तुकोजी होळकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याकडे सुद्धा मोठी फौज होती. याशिवाय त्यांच्याकडे महिलांची स्वतंत्र अशी फौज होती. महिलांची फौज निर्माण करणे जगातील पहिली महाराणी म्हणून अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख करावा लागतो, 

          असं असलं तरी त्यांनी आपल्या राज्याची धनशक्ती सैन्यावर किंवा फौजेवर अतिरेकी खर्च करण्याचा त्यांच्या मानस नव्हता. त्यामुळे मेरीया थेरेसा च्या तुलनेत त्यांच्याकडे कमी फौज असली तरी त्यांना ती कधीच कमजोरी वाटली नाही. किंवा आवश्यक तिथे त्या कधीच कमी पडल्या नाही.

       अहिल्याबाईंनी युद्धाला कधीच प्राधान्य न दिल्यामुळे किंवा मानवी जीवनात त्यांना युद्ध नको असल्यामुळे त्यांनी केवळ स्वसंरक्षणासाठी अत्यावश्यक असेल तिथेच युद्ध स्विकारले. मात्र परराज्याला अंकित किंवा गुलाम बनविण्याच्या हेतूने कधीही कोणत्याही परराज्यावर आक्रमण केलेले नाही.

       दोघींच्याही धार्मिक जीवनाचा विचार केल्यास दोन्ही आपापल्या ठिकाणी धर्मात्मा होत्या. मेरिया कथालिक धर्माची तर अहिल्या हिंदू धर्माचे अनुपालन करणारी होती, असे असले तरी त्या कधीच एकाच धर्माच्या पुरस्कर्त्या नव्हत्या. किंवा धर्मांध नव्हत्या. त्यांचे वैयक्तिक, सार्वजनिक तसेच राजकीय अधिष्ठान धर्माच्या पलीकडे जाऊन होते. त्या दोघीही प्रत्येक धर्माला समान महत्त्व देत होत्या. असे असले तरी दोघींमध्ये अहिल्याबाई श्रेष्ठ ठरते.  धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे, यावर त्यांचा त्यातही अहिल्याबाईचा विशेष विश्वास होता.  तशी दैनंदिन जीवनात ती लागली सुद्धा...      

      खाजगी जीवनात प्रत्येकाने परस्परांच्या धर्माचा आदर केला पाहिजे यावर त्यांची ठाम निष्ठा होती. त्यांनी त्यांच्या हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांच्या हार्दिक शुभेच्छा तेवढेच महत्त्व दिले एवढेच नाहीतर इतर धर्माच्या धर्मिक स्थळांची बांधकाम सुद्धा केली. 

         यामुळेच अहिल्याबाईंचा राज्यकारभार धर्माच्या पलीकडे जाऊन रजसत्तेला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन मानवतेच्या कल्याणासाठी उभारलेला व चालवलेला तो एक "महायज्ञ" होता. जागतिक पातळीवरचा "आदर्श राज्याचा नमुना" होता म्हणूनच जगात त्यांची तुलना केवळ मारीया थेरेसा सारख्या महान राणीशी होऊ शकते, प्रसंगी अहील्या तिच्यापेक्षा काही बाबतीत श्रेष्ठ ठरते. असे ते श्रेष्ठत्व जपणारी, सर्वांगीण दृष्टीने महानत्व सिद्ध करणारी, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावर देश विदेशातील इतिहासकारांनी, लेखकानी स्तुती सुमने उधळल्याचे इतिहासाच्या पानापाणी लक्षात येते..... ते त्यांच्या निष्काम सेवा व कर्माचे फलित आहे..


---------------------------


डॉ प्रभाकर रामाजी लोंढे

        ९६७३३८६९६३


Wednesday, August 24, 2022

ऐतिहासिक श्रध्दास्थानांवरील अतिक्रमण थांबवा.

 ऐतिहासिक श्रध्दास्थानांवरील अतिक्रमण थांबवा.


डॉ प्रभाकर लोंढे


    या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात बहुतांश तिर्थक्षेत्र​ मुळात धनगरांचे कर्मस्थान व श्रद्धास्थान राहीलेले आहे.  या श्रद्धास्थानावर काळानुसार विविध प्रकारे अतिक्रमण झाल्याचे दाखले इतिहासाच्या अभ्यासावरून लक्षात येते. हे अतिक्रमण धार्मिक आधारावर मोठ्या प्रमाणात झालेले आहे. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास पंढरपुरचा विठोबा व क्षेत्राचे देता येईल. 

       मुळात पशुपालक असलेला कानडा विठ्ठल एक पराक्रमी पुरुष होय. त्याच्या पराक्रमाविषयी धनगरांच्या मनात प्रचंड आस्था व स्वाभिमान. काळाबरोबर पुढे ते धनगरांचं आराध्य दैवत बनले. त्याच्या प्रति जनमानसात असलेल्या श्रद्धेपोटी व असलेल्या आत्मिक-व्यावसायिक नात्यातून या महाराष्ट्रात आषाढी-कार्तिकीची वारी सुरू झाली. ती मुळात धनगरांनी सुरू केली. प्रत्येक धनगर आषाढी कार्तिकी ला पंढरपुरात न चुकता जावू लागला. 

        पुढे हीच वारी समाजप्रबोधनासाठी महाराष्ट्रातील संत परंपरेने वापरली. पंढरीचा विठ्ठल हा जनसामान्यांच्या मनातील ताईत असल्याने प्रबोधनासाठी संतांनी आपल्या अभंगांचा आधार विठ्ठलाला बनवले. विठ्ठलाला साक्षी ठेवून आपले विचार जनमाणसात पेरले.  पुढे हव्यासापोटी याच विठ्ठल मंदिराचा कब्जा बडव्यांनी आपल्याकडे घेतला. जनसामान्यांच्या संपुर्ण शोषणाचे केंद्रच हे पंढरपुरचे मंदिर बनले. शेवटी बडव्यांच्या हातून या देवस्थानची सुटका करून घेण्यासाठी न्यायालयातच जावे लागले. 

           असे ते पंढरपूरचे देवस्थान मुळात धनगरांचे श्रद्धास्थान असताना तो रानोमाळ भटकत राहणारा धनगर त्याच्या मूळ अवस्थेतच राहीला पण या देवस्थानचा फायदा मात्र इतरांनीच लुटला. आज ती ट्रस्ट सुध्दा इतरांच्याच अधिपत्याखाली काम करते हे वास्तव! त्याचा अध्यक्ष सुध्दा इतरांच्याच मर्जीने निश्चित होत असते. हे अतिक्रमणाचं एक ऐतिहासिक उदाहरण झालं .

               वर्तमान काळातील अतिक्रमणाचं ज्वलंत उदाहरण...

        धनगरांचं दुसरं अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे गांव आहे. या ठिकाणाचा महिमा म्हणजे जगात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला नगण्य स्थान असताना स्त्रीचं कर्तुत्व काय असते याचे ज्वलंत उदाहरण, स्त्रीजन्माची यशोगाथा असलेल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे हे जन्मगाव!! ज्यानी सामाजिक राजकीय परिस्थिती विपरीत असताना 28 वर्ष राज्य केलं. इंदोर सारख्या बलाढ्य संस्थानाच्या राज्यकारभाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. भारत भूमीच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्या कर्तुत्वाच्या पाऊलखुणा निर्माण केल्या. सामाजिक कल्याणासाठी राजकीय सत्तेचा वापर करून राज्यकारभार केला. याचाच परिणाम जनमाणसामध्ये त्यांची प्रतिमा लोक कल्याणकारी लोकमाता अशा प्रकारची उंचावली. व तो इतिहास कधीही विसरला जाऊ शकत नाही. 

          याचाच परिणाम म्हणून अलीकडे चौंडी या त्यांच्या जन्मगावामध्ये राजमाता अहिल्याबाई चे स्मारक तयार करण्यात आले. ही जरी योग्य बाब असली तरी  तिथे बसविण्यात आलेले बारा राशींचे पुतळे खूप मोठा प्रश्न निर्माण करतात. यातून काय सांगायच आहे/ काय सिद्ध करायचं आहे, हे जरी मला समजलं नसलं तरी त्यातून समस्त होळकरशाहीच्या कर्तुत्वाचा सहसंबंध त्या राशीभविष्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे की काय?असा प्रश्न सहज निर्माण होतो.  

         राजमाता अहिल्याराणीच्या व होळकरशाहीच्या कार्यकर्तृत्वावर अतिक्रमणाची सुरवात झाली आहे असं कोणी म्हटलं तर चुकीचं  होणार नाही..

         आद्य समग्र क्रांतीकारी महीला राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाला नतमस्तक होण्यासाठी आलेला त्यांच्या विचारांचा अनुयायी या राशी चक्रापासून काय प्रेरणा घेणार आहे. व या राशीचक्राचा राजमाता अहिल्याबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा कशाप्रकारे सहसंबंध जोडणार आहे, हाच मोठा अनाकलनीय प्रश्न मला पडला आहे. सर्वानाच पडावा ही अपेक्षा!!! जेणेकरून त्याचे उत्तर सार्वजनिक पातळीवर मिळू शकेल. परंतु हे राशीचक्र/राशींचे पुतळे अहिल्या मातेच्या स्मारकापुढे तयार करण्याची कारण मिमांसा जर कुणाला माहित असेल,  खरंच त्या राशीचक्राचा अहिल्या मातेच्या जीवन व कार्य कर्तुत्व मध्ये महत्त्वाचा वाटा असेल आणि ते राशीचक्र अगदी प्रवेशद्वारावर तयार करण्याचे औचित्य ज्याना कोणाला माहित असेल त्यांनी जर ते सार्वजनिक केले तर एका कर्तुत्ववान महिलेच्या जीवनामध्ये असलेले राशीचक्राचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येतील व आम्हा सर्व बहुजनांच्या महिलांना अहील्या मातेच्या आदर्श जीवनकार्यापेक्षा राशी चक्रात गुंतवून त्याचा निश्चितच उद्धार करता येतील. 

     परंतु माझ्या अल्पबुध्दी, अल्पमतीनुसार हे राशीचक्र, राशीपुतळे अहिल्या मातेच्या स्वावलंबी, कर्मण्यवादी, सत्यशीलाधारित न्यायप्रिय लोकराणीच्या कार्यकर्तृत्वाला न्याय देणारे नाही. त्याचा कोणताही संबंध राजमाता अहिल्याईच्या जीवनाशी नाही. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नको ती वेगळी झालर चढविण्याचा नको तो प्रयत्न केला जातो आहे, असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. असा हा प्रकार सरळ सरळ त्यांच्या कर्तृत्व-व्यक्तित्व/ जीवन चरित्रावर श्रद्धा असणाऱ्या जनमानसाच्या श्रध्देवर व श्रद्धास्थानावरच अतिक्रमण आहे. येथील राशी चक्रापासून भावी पिढीला काय संदेश जाणार आहे किंवा कोणता संदेश अपेक्षित आहे, ही बाब सर्वांनाच लक्षात घ्यावी लागेल. अनावश्यक वाटत असेल तर ते हटविणे अत्यावश्यक आहे.

    हे झालं धार्मिक अतिक्रमणाचं उदाहरण!!! दुसरं उदाहरण म्हणजे इंदोरमधील राजबाग पेलेस. यावर मी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लेख लिहिला होता.



सदर लेखन प्रपंच करीत असताना इतिहासावर होणारं अतिक्रमण थांबवून त्याचं विकृतीकरण होणार नाही, यादृष्टीने चिकित्सक वृत्तीने वाचकांनी प्रत्येक गोष्टीचे समीक्षण करावे व सत्य जाणून घ्यावे एवढीच अपेक्षा..


__________________________


डॉ प्रभाकर लोंढे

गोंदिया

९६७३३८६९६३

Tuesday, May 3, 2022

धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?

 धनगरांच्या संघटना आत्महत्या का करतात?


                  डॉ प्रभाकर लोंढे


              शिर्षक वाचून प्रथम दर्शनी काहीना आश्चर्य वाटेल की संघटना सुद्धा आत्महत्या करतात? तेव्हा आज पर्यंत च्या अनुभव आणि अभ्यासावरुन मी त्यांना म्हणेल "होय". धनगर संघटना आत्महत्याच करतात... तसं यामध्ये त्यांना आश्चर्य वाटण्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही कारण आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या , तरुणांच्या आत्महत्या, सुनेची आत्महत्या अशा खाजगी जीवन संपविणाऱ्या आत्महत्या ऐकलेल्या आहेच, परंतु  त्यांनी "आत्महत्या" हा शब्द केवळ एका व्यक्तीशी संबंधित आहेत, या अर्थाने ऐकलेला आहे हे नक्की...  आता संघटना सुद्धा "आत्महत्या" करीत असते, हा विचार कदाचित त्यांना प्रथम दर्शनी नवीन असल्याने.. आश्र्चर्यकारक वाटू शकतो.


         साधारणतः "आत्महत्या" तो करीत असतो, जो आत्मबल गमावून बसतो. तशी आत्महत्या ही एक मानसिक प्रक्रिया असते,  त्याच्या असण्या- नसण्यात, त्याच्या जगण्या- मरण्यात त्याला काहीच रस उरत नसतो. तो विवेकशून्य होवुन जातो आणि नकळत स्वतःच स्वतःला संपवून घेतो. स्वत:ला संपविण्यासाठी तो स्वत:च जबाबदार असतो. कधी कधी यामागे कारणीभूत भलेही दुसराच कोणीतरी वाटत असेल तरी आत्महत्येची जबाबदारी मात्र त्याच्यावरच निश्चित होत असते. कारण आत्मबल, आत्महत्या ह्या बाबी व्यक्तीच्या मनोबलाशी संबंधित असतात. मनोबलाच्या नकारात्मक अवस्थेचा अंतिम परिणाम "आत्महत्या" हा असतो. 

           प्रत्येकाच्या मनोबलाची अवस्था ही त्याची विचारक्षमता तसेच वैचारिक गुणवत्ता आणि वैचारिक दिशा यावरून निर्धारित होत असते. आणि या सर्व बाबींचा प्रमुख आधार असतो तो "विचारप्रणालीचा".... साधारणतः व्यक्तिगत पातळीवर विचार केल्यास व्यक्तीच्या खाजगी जीवनात आध्यात्मिकतेला किंवा भौतिकतेला प्राधान्य देणारी विचारसरणी जीवनाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आधार असतो... विचारसरणी खाजगी जीवनाचा अतिशय महत्त्वाचा पैलू असतो. आणि तिला अनुसरण्याच्या प्रमाणावरून जीवनाच्या आलेखाची दिशा व अंत निर्धारित होत असतो.

         हाच विचार किंवा हिच सत्यता संस्था, संघटना, चळवळीच्या बाबतीत सुद्धा लागू होत असते.  त्यामुळे  संस्था, संघटना, चळवळी मोडित का निघतात? याचा विचार करतांना मी म्हणेल, काही संघटना तर नकळत स्वतःच आत्महत्या करीत असतात... स्वत:च्या कार्यपद्धतीतून अनपेक्षित, अनभिज्ञपणे स्वत:च स्वतःच्या आत्महत्येची बीजं पेरतात. आणि अशी परिस्थिती निर्माण करतात की, ती संघटना काही काळाने आपोआप अंतिम घटका मोजायला लागते.. आणि नामशेष होवून जाते. 

          यालाच संघटनेची "आत्महत्या" असे म्हणता येईल. असे मला वाटते. आणि धनगर जमातीतील विविध संघटनांच्या बाबतीत ऐतिहासिक अभ्यास केला तर अशा अनेक संघटनांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. किंवा वर्तमानातील बहूतांश संघटना आता आत्महत्येच्या मार्गावर आहेत. आर.एस.एस आणि बामसेफ यांच्या धनगर जमातींमध्ये घुसलेल्या "विंग" सोडल्या तर  इतर बहुतेक धनगर संघटना (स्वत;ला बुध्दिजीवी समजणाऱ्यांच्या सुद्धा)  आत्महत्येच्या मार्गावर आहे, असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही.. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दीर्घायुष्यी धनगर संघटनां दिसत नाही.... हे समाजाची खंत आहे. (हे माझं विश्लेषणात्मक मत आहे, काहीच्या बाबतीत चुकीचे असण्याची दाट शक्यता आहे.. त्यांनी संशोधन करावे)

              धनगर संघटनांच्या आत्महत्ये मागे अनेक कारणे कारणीभूत असली तरी, त्यापैकी काही निवडक, ठळक, महत्त्वाची कारणं पुढील प्रमाणे मांडता येईल.


१) अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वस्थाच्या भावनेचा अभाव...


२) निर्मिती मागचा छुपा संकुचित दृष्टिकोन...


 ३) एका निश्चित सर्वसमावेशक विचारसरणीचा कमी अधिक अभाव, 


४) दुरगामी ध्येयवृत्तीचा अभाव,


५) स्वामीत्वाच्या छुप्या भूमिकेत असलेले संघटनेचे मालक ठरवेल तीच अंतिम कार्यपद्धती... 


 ६) एखाद्या संघटनात्मक पदावर आरूढ होऊन, पदांची झालर चढवून पद, प्रतिष्ठा प्राप्त करण्याची मनिषा...


७) सभासदांचा  विचार, संघटनेप्रती धारणा, दृष्टिकोन यांना स्थान न देता संघटनेची होणारी एककल्ली,- एकवल्ली सरंजामी वाटचाल. 

८) एखादा व्यक्ती, संकुचित प्रवृत्ती संबंधात बटीक वृत्ती


या कमी अधिक अभावात्मक परिस्थितीमध्ये केवळ भावना(काहितरी दिव्य करण्याची) व स्वार्थ (पदांची लालसा, प्रसिद्धीची भूक किंवा प्रासंगिक/संघटनांत्मक प्रतिशोध/व्यक्तिगत विरोध) यांच्या आधारे संघटना जन्म घेते. भावनात्मक आधार घेऊन संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सदस्य यांच्या मनाला भावेल अशी ती "संघटना" ही संघटनेची व्याख्या होऊ लागते, तिचा विस्तार सुद्धा संकुचित ध्येयासह मनाच्या समाधानासाठी एककल्ली मार्गाने होवू लागते, तेव्हा ती संघटना ----------- लिमिटेड & कंपनी सिध्द होते. संघटनेविषयी मालकीची भावना निर्माण होते व  बळावते. विचारसरणी पेक्षा स्वार्थाला/ व्यक्तीला महत्त्व दिले जाते. 

         अशी ती संघटना काही प्रमाणात श्वास घेत असली तरी तिचा प्रवास मात्र सर्वनाशा कडे सुरू झालेला असतो. केवळ स्वार्थाने चिपकलेली माणसं त्या संघटनेचे पायिक नाही तर "वाहक"  या अर्थाने कार्य करीत असतात. स्वाभिमानी (Self respect) माणसं कधीचेच दूर झालेले असतात.

          गाय मरताच गेचूडांनी पलायन करावे, या भूमिकेत असलेले स्वार्थपिपासू संघटनेच्या अंतिम घटकेला सोबत राहीलच याचा नेम नसतो.. शेवटी संघटनेचा मालक स्वरूपात असलेला अध्यक्ष किंवा इतर वाहक संघटनेच्या आत्महत्येचा साक्षिदार ठरतो. हा संघटनेच्या निर्मितीपासून पेरल्या गेलेल्या बिजांकूराचा परिणाम असतो.


         असले बिजांकूर वेळीच ओळखले नाही तर फार मोठं सामाजिक व खऱ्या समाजहित चिंतकांच खूप मोठं नुकसान होत असतं.... कारण जीवनातील वेळ, पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होतो... अनपेक्षित चुकीच्या प्रवृत्तींना बळ मिळतं.. यातून एखादा "ढेंड्या" मोठा होतो आणि समाजाचा लिलाव होतो...  समाज प्रवाहाबाहेर फेकला जातो. 

         असला प्रकार संघटनेच्या बाबतीत कुठे होऊ नये कारण, "संघटना" कुठल्याही समाजाचा आत्मा असतो. संघटनांच्या माध्यमातून संघटित झालेला समाज एक कृतिशील तसेच आत्मनिष्ठ आणि कार्यप्रवण प्रगल्भ समाज असतो. अशा त्या संघटना समाजामध्ये सातत्याने परिवर्तन तसेच प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य करीत असते. अशा संघटना म्हणजे काय याचा विचार केला तर एका "विशिष्ट विचारसरणीच्या आधारे संघटित होऊन विशिष्ट कार्यपद्धतीनुसार विशिष्ट ध्येयासाठी कार्य करणारा संघटित प्रवाही गट म्हणजेच संघटना होय"


धनगर संघटनांना आत्मपरीक्षणार्थ, समाजहितार्थ सदर लेखन प्रपंच....

यामध्ये काही आक्षेप असल्यास कृपया

९६७३३८६९६३ या क्रमांकावर संवाद साधू शकता....




डॉ प्रभाकर लोंढे