महाराष्ट्रातील तिसरी आघाडी :: प्रस्थापित विरुद्ध विस्थापित..
-------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे
-----------------------
महाराष्ट्रातील सत्ताकारणामध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पर्याय म्हणून अलीकडे तिसरी आघाडी निर्माण होताना व जोरदार पाठिंबा मिळतांना दिसून येत आहे. आतापर्यत महाराष्ट्रातील संपूर्ण सत्ता पहिल्या दोन आघाड्यांमध्ये प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या पक्षानींच उपभोगलेली आहे. या सर्व पक्षांची विचारधारा यापेक्षा कृती कार्यक्रम येथील विशिष्ट प्रस्थापितांना प्रस्थापित करणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी मोठी सामाजिक दरी निर्माण झालेली आहे.
अशा या परिस्थितीत असलेल्या महाराष्ट्रीयन लोकसमुदायाचे/ समाजाचे, कार्ल मार्क्स च्या मते "आहे रे (have's)" आणि "नाही रे(have's not)" असे स्पष्ट वर्गीकरण करता येते. यातील "आहे रे" हा वर्ग नेहमीच सत्ताधीश तर "नाही रे" वर्ग नेहमीच सत्ताहीन राहिलेला आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात पॅकेज, मदतीच्या, दयेवर, आशेवर उपेक्षित जगत आला व जगताना दिसून येतो आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी वर्ग, छोट्या-मोठ्या जातीं जमातीं या रूपाने जगत आहे. हे वर्ग देशात लोकशाही व लोकशाही संविधान असतांना सुध्दा संविधानिक अधिकारांसाठी, सत्ताधारी (आहे रे) वर्गाकडून अपेक्षा करीत उपेक्षित जगत आहेत. राजकीय सत्तेत प्रस्थापित असलेला आहे रे, हा वर्ग संख्येने फार थोडा असून बहुसंख्य असलेला विस्थापित/नाही रे, हा वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिलेला आहे. ही स्थिती वरवर पाहता लक्षात येत नसली तरी लोकशाहीच्या तळाशी याचे भयान अस्तित्व लक्षात येते. त्यामुळेच या महाराष्ट्रा पुरता विचार करता, महाराष्ट्रात लोकशाही पूर्णता रुजली आहे असे म्हणता येत नाही. हा विस्तापित वर्ग सत्ताहीन असल्याने विचारांने संघटित नसला तरी आज त्याला आपल्या शोषणा विषयी संपूर्ण जाणीव निर्माण झालेली आहे.
असा तो महाराष्ट्रातील "आहे रे" वर्ग हा बीजेपी, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून आतापर्यत नेहमीच सत्तेमध्ये राहिलेला आहे. सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने हा वर्ग या पक्षांच्या माध्यमातून नेहमी विकासाचा आशावाद, धार्मिक भावना, धार्मिक प्रश्न, वाद, जातीयवाद, दंगली, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, अंधश्रद्धा, अशा मुद्दांचा आधार घेतात, असे दिसून येते. या सर्व मुद्यांवर महाराष्ट्रातील संपूर्ण उपेक्षित/ नाही रे वर्ग भावनिक होवून या सर्व पक्षांच्या माध्यमातून प्रस्थापित/आहे रे वर्गानी आपल्या पाठीशी लावून ठेवलेला आहे. यांचे मतदान या चार पक्षांपेक्षा इतरांना जाणार नाही, किंवा तसा इतर पर्याय निर्माण होणार नाही, याची वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आज पर्यंत यांच्या व्यतिरिक्त सत्ता इतरत्र गेलेली नाही.
राजकीय सत्तेचा वापर करून या वर्गाने स्वतःची केवळ सत्ताकेंद्र काबीजच नाही तर मजबूत केली आहे. या सर्वच पक्षांनी येथील सत्ता हस्तगत करून येथील, आहे रे वर्गाला त्यांनी संगनमताने प्रस्थापित केले आहे.
यासाठी या पक्षांनी, विस्थापित, नाही रे वर्गातील काही तितरं (आपल्या उपेक्षित वर्गाचं/उपेक्षित जाती-जमातींच प्रतिनिधित्व करण्याचं सोंग करण्यात पटाईत असलेले, प्रसंगी प्रस्थापित वर्गाशीच बांधीलकी जपणारे) आपल्या हाताशी पकडलेले आहे. व त्यांच्या माध्यमातून हे पक्ष, नाही रे वर्गाला आपल्याशी बांधून ठेवण्याचा/ बांधीलकी जपण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असतात. ही बाब विस्थापित/नाही रे वर्गातील जाणकारांना अलीकडच्या काळात लक्षात आलेली आहे.
याच जाणिवेतून महाराष्ट्रात या वर्गात अस्मितेचे वारे वाहू लागले आहे. त्यातूनच तिसरी आघाडी जन्माला येण्याची पार्श्वभूमी तयार झाली. यामुळे बारा बलुतेदारांची, उपेक्षित, वंचित, भटक्या-विमुक्त, दलित-आदिवासी, मुस्लीम, इतर मागासवर्गीय घटकांची राजकीय सत्तेसाठी महत्त्वाकांक्षा वाढली. त्यातूनच महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडी ची संकल्पना वास्तविक रूप धारण करू लागली. सामाजिक-राजकीय आराखडे, खलबते आखण्यास सुरुवात झाली. अनेक मतप्रवाह विचारप्रवाह असलेल्या विविध सामाजिक राजकीय संघटना या आघाडीमध्ये समाविष्ट होताना दिसू लागल्या. हा तिसऱ्या आघाडीचा प्रवाह नक्कीच प्रलयात रूपांतरित होईल, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. येणाऱ्या काळात ही आघाडी प्रस्थापित बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अनीतीमत्तेवर नक्कीच विजय मिळवेल, हा विश्वास महाराष्ट्रातील एकूण वातावरण बघता लक्षात येते.
येत्या 2019 च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ही आघाडी सत्ताधारी बनेलच हे सांगता येत नसले तरी ती येथील राजकीय समीकरणे बदलविण्यास ती नक्कीच समर्थ ठरणार आहे. पिढ्यान् पिढ्यां गारद झाल्यानंतर उपेक्षितांमध्ये राजकीय सत्तेच्या आकांक्षा निर्माणच नाही तर वास्तवामध्ये स्वप्न साकार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपेक्षितांच्या विकासाचे सोंग करणाऱ्या, स्ववर्गाच्या हितासाठी उपेक्षितांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या, मुजोर अल्पसंख्यांक प्रस्थापित,आहे रे वर्गाला (ज्यांच्याकडे सर्वच आहे) हे समस्त उपेक्षित, नाही रे वर्ग(ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही ) लोकशाहीतील मतदान या शास्त्राच्या माध्यमातून आपल्या मतसंख्येच्या आधारे मोठा धक्का देणार आहे.
उपेक्षित एकता-- उपेक्षित भाग्यविधाता !!!
एकच ध्यास --- उपेक्षितांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३