Tuesday, September 11, 2018

धनगरांनो! आता फक्त राजकीय अजेंडा राबवा...*

🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

*धनगरांनो! आता फक्त राजकीय अजेंडा राबवा...*

                    *डॉ प्रभाकर लोंढे*
______________________

मृगाचा पाऊस पडला की सर्वच शेतकरी मुलाबाळासह पती-पत्नी शेतीच्या कामात गुंतून जातात. त्यांना माहीत आहे की पुढे चालून जगायचं असेल तर शेती पिकवणे महत्त्वाचे आहे, हे जर एका शेतकऱ्याचं नियोजन असेल तर धनगरांच्या भावी पिढ्यांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या/ आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करणाऱ्या धनगर राजकीय नेतृत्वानी सुद्धा अशा प्रकारचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
           आपापल्या शेतीची म्हणजेच मतदार संघाची मशागत करण्याच्या​ दृष्टीने सर्वप्रथम आपापले मतदारसंघ निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासोबतच निर्धारित मतदारसंघात प्रभावी मोर्चेबांधणी व नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्याची योजना सुद्धा तयार करणे अत्यावश्यक आहे. अशा नियोजनबद्ध कार्यक्रमातूनच धनगर राजकीय नेतृत्व राजकीय यश संपादन करू शकतात. हे धनगर नेतृत्वासाठी सोपे जरी नसले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही.
       धनगर नेत्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व अजमावणे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये अग्निपरीक्षाच देण्यासारखे आहे. पण नियोजनातून व प्रखर आत्मविश्वासातून हे त्यांना सहज शक्य होणारे आहे. त्यासाठी प्रस्थापितां विरूद्ध लढण्याची मानसिकता व ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. जमातीच्या संघटनात्मक व एकमताने मतदान करण्याच्या निर्धारातून ते सहज साध्य होणार आहे. "पिढ्यान् पिढ्यांपासून धनगरांचा सत्यानाश करणाऱ्या प्रस्थापितांना मतदान करणारच नाही." या भीष्मप्रतिज्ञेतूनच धनगरांचा राजकीय उदय होणार आहे ही बाब प्रत्येक धनगर बांधवांनी प्रथम समजून घेणे आवश्यक आहे.
         आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात 2019 च्या राजकीय रणसंग्रामाच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. सर्वच प्रस्थापित पक्ष आपले आराखडे बांधत असताना स्थानिक बुथ कमिटी पासून तर केंद्रीय राजकीय सत्तेच्या नियोजना पर्यंत सर्वच त्यात गुंतलेले आहे. भारतीय निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणेच जात हा अतिशय प्रभावी घटक छुप्या मार्गाने काम करताना दिसतो आहे. त्यातही प्रस्थापित जातींकडे निवडणुकी संबधी नियोजनबध्द आराखडे तयार आहे.
             या देशातील स्वतंत्र? असलेला मीडिया (प्रसार माध्यम) सुद्धा आपले बंदिस्त अंदाज प्रसारित करीत आहेत. महाराष्ट्रातील चार-पाच लोकांच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारी शिवाय इतर कोणीच या महाराष्ट्रात लायकीचा नाही, अशा प्रकारची वातावरण निर्मिती चालू झाली आहे. तशा प्रकारची अप्रत्यक्ष आव्हाने सार्वजनिक केली जात आहे. हे सर्व पाहून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात द्यायची, याचा ठेका प्रसार माध्यमांनाच दिला आहे, असे सुध्दा कधी कधी अनपेक्षित वाटायला लागते. सत्य बातमी मागील रसायन न सांगता त्यातून स्वतःला अपेक्षित समिकरणं मात्र मांडण्याचा प्रयत्न येथील प्रसार माध्यमांकडून बहुदा केला जातो. ही गंभीर बाब कधीकधी पहायला मिळते. तेव्हा अनेक प्रश्न डोक्यात भयंकर तुफान माजवतात.  
        याला कारण प्रस्थापितांपैकी अनेक उमेदवार  गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. प्रस्थापितांची नवीन पिढी राजकारणाच्या रिंगणात उतरायला कंबरेला पट्टा बांधून, मस्तकी टिळा लावून ----- भाऊ,-----दादा, युवा तडफदार नेते, या आवेशात धनगर व बहुजनांच्या भरोशावर दंड ठोकत तयार आहेत. त्यांच्या दयेवर जगणारे काही निवडक धनगर व बहुजन कार्यकर्ते सुध्दा गुलाल उधळण्याची, झेंडे मिरविण्याची वाट बघत आहे. बाप जाद्यांपासून कार्यकर्ता म्हणून तिसरी पिढी बरबाद झाली तरी यांना अक्कल दाढ आलेली नाही आहे. या सर्व रनधुमाळीत धनगर जमातीच्या नेत्यांचं काय? हाच मला मोठा प्रश्न पडलेला आहे.    
           येत्या 2019 च्या निवडणुकीत धनगर तरूण उमेदवार म्हणून  उतरणार आहेत काय? की प्रस्थापितांचा हक्काचा मतदार म्हणूनच भूमिका बजावणार आहे?  की दादा, भाऊंचे झेंडे, फलक लावणार आहे? की स्वाभिमानी  धनगर तरुण या अर्थाने धनगर नेत्यांचा कार्यकर्ता म्हणून धनगरांच्या राजकीय अस्मितेसाठी,अस्तित्वासाठी लढणार आहे? की यापुढेही प्रस्थापित दादा, भाऊं काकांच्या तुकड्यावर जगणारी अवलाद पैदा करणार आहेत? की इतरांच्या हातात सत्ता देऊन पुन्हा रस्त्यावर उतरणार आणि म्हणणार आहेत​. "हक्काचं आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही! " "आरक्षण माझ्या हक्काचं- नाही कुणाच्या बापाचं!"  वर्षानुवर्ष निवडणुकांच्या माध्यमातून मतदान करून स्वतःचा बाप(प्रस्थापित) पैदा करणारे आम्हीच!! आणि आमचीच राजकीय पैदाईश असलेल्या बापाचा (प्रस्थापितांचा) बाप काढणारे एवढे नालायक आम्हीच?

         या बाबी समजून घेणे आवश्यक आहे. इतरांच्या हातात सत्ता देणारे आम्हीच!! त्यांनी काहीच न दिल्याने त्यांच्या विरोधात ओरडण्याचं नाटक करणारे सुध्दा आम्हीच!! वर्षानुवर्षे वारंवार त्याच त्या चूका करणारे सुध्दा आम्हीच!! चूकांना उघड करणारे सुद्धा आम्हीच!! वारंवार चूका करून सुध्दा न सुधरणारे धनगर- आम्हीच!! तरीही धनगर असल्याचा सार्थ अभिमान बाळगणारे आम्हीच!! स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून प्रस्थापितांचा अभिमान जपण्यासाठी झटणारे, त्यासाठी जीव द्यायला सुध्द तयार असणारे आम्हीच !!
             होय! आम्हीच होतो ते!  छाती बडवून प्रस्थापितांच्या दारात उभे राहणारे!! प्रस्थापितांच्या दारात उभे राहून स्वतःला स्वाभिमानी म्हणवणारे होतो ते आम्हीच धनगर !! आणि प्रस्थापितांचे झेंडे उचलण्यासाठी खांद्याला खांदा लावून लढत होतो आम्ही!! आम्ही लढलोय स्वत:च्या भावाभावांमध्ये या प्रस्थापितासाठी!! प्रसंगी परस्परांचे रक्त सुद्धा सांडवलं आम्ही त्यांच्यासाठी!! आज त्याचे वाईट परिणाम भोगतो आहे आम्ही!! त्या परिणामांच्या वेदनांनी मात्र आज विव्हळतोय आम्ही!! खूप झाले अन्याय-अत्याचार आता, यापुढे सहन करणार नाही!! स्वतःच्या हक्काचे, अधिकारांचे पायिक बनणार आहोत आम्हीच!!
     होय!! खरं सांगतोय आज! आता यापुढे  स्वतःचा राजकीय अजेंडा राबविणार आहोत आम्ही!! धनगरांना सत्ताधीश केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही!! धनगरांच्या सत्तेच्या आड येणाऱ्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही आम्ही!! त्याशिवाय यापुढे आमची धनगरांची जात सांगणार नाही आम्ही!!
         सांगून ठेवतो आता अलीकडील स्वाभिमानी धनगरांची अवलाद आहोत आम्ही!! प्रस्थापितांना झोपवून स्वतःच्या हातात राजकीय सत्ता घेऊनच राज्यकर्ती जमात (धनगर) असल्याचे सांगणार आम्ही!!
   

                            ___एक धनगर____

                    सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

                                जय मल्हार
       एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________

*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:

Post a Comment